होहोबा वृक्ष : (जोजोबा वृक्ष इं. गोटनट लॅ. सिमॉन्डसिया चायनेन्सिस कुल-बक्सेसी) . हा सदाहरित बहुवर्षायू वृक्ष मूळचा दक्षिण कॅलिफोर्निया (अ. सं. सं.) सोनोरान वाळवंटी प्रदेश तसेच ॲरिझोना आणि उत्तर मेक्सिको येथील आहे. त्याचे महत्त्व त्याच्या तेलबियांसाठी आहे.
होहोबा वृक्ष साधारण २.४ मी. उंचीपर्यंत वाढतो. काही विशिष्ट वृक्ष ४-५ मी. उंचीपर्यंत वाढल्याची नोंद आहे. हा वृक्ष सु.१०० वर्षांपर्यंत जगू शकतो. त्याला अनेक फांद्या असून पाने लहान व मांसल असतात. त्याच्यात नर व मादी असे भेद असतात. तो ३-४ वर्षांचा असताना पाकळ्याहीन फुले येण्यास सुरुवात होते. परागीभवन वाऱ्याद्वारे होते. मादी फूल वंजुफळासारखे विकसित होते. त्यात १–३ वाटाण्याच्या आकाराच्या बिया असतात.
होहोबा वृक्ष सरासरी ३ किग्रॅ.पर्यंत बियांचे उत्पादन करतो, ते उच्चतम समजले जाते. मात्र, १० किग्रॅ.पर्यंत देखील बिया प्राप्त झाल्याची नोंद आहे. बियांमध्ये ४०–६० टक्क्यांपर्यंत तेल असते. नेहमीच्या खऱ्या तेलापेक्षा रासायनिक दृष्ट्या हे तेल ⇨ मेण (वॅक्स) समजले जाते. या तेलाचे गुणधर्म स्पर्म व्हेलच्या तेलासारखेच असतात. होहोबा तेलाचा वापर पॉलिश, सौंदर्यप्रसाधने (साबण, शांपू आणि केस अनुकूलक), औषधे, उच्च-दाब वंगणे आणि पोषकतत्त्वे आधारक म्हणून केला जातो. तेल गाळून उरलेल्या चोथ्याचा वापर पशूंसाठी खाद्य म्हणून केला जातो.
होहोबा वृक्षाची व्यापारी दृष्ट्या लागवड १९७० च्या सुमारास सुरू झाली. त्याची ॲरिझोना, कॅलिफोर्निया, मेक्सिको, इझ्राएल, आफ्रिका, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि भारत या ठिकाणी लागवड केली जाते. तेलासाठी स्पर्म व्हेल माशांची होणारी बेसुमार हत्या टाळण्याकरिता मोठ्या प्रमाणावर होहोबा वृक्षाची लागवड करण्यात येते.
भारस्कर, शिल्पा चं.
“