होस्पेट : कर्नाटक राज्यातील एक औद्योगिक, शैक्षणिक, व्यापारी व तालुक्याचे शहर. लोकसंख्या २,०६,०२६ (२०११). ते बेल्लारी जिल्ह्यात बेल्लारी शहराच्या पश्चिमेस सु. ६१ किमी.वर तुंगभद्रा नदीकाठी वसले आहे. या शहराची बांधणी व स्थापना विजयानगरचा राजा कृष्णदेवराय (कार. १५०९–२९) याने १५०९–२० दरम्यान आपल्या नागलदेवी राणीच्या सन्मानार्थ केली आणि त्याला नागलपूर हे नाव दिले. तेथे तिच्यासाठी भव्य प्रासाद बांधला. त्या ठिकाणी त्याचे अधूनमधून वास्तव्य असे. विजयानगरच्या (हंपी) प्रवेशाच्या दृष्टीने हे शहर गोव्याहून येणाऱ्या विशेषतः पश्चिमेकडून येणाऱ्या प्रवाशांना सोयीचे होते. पायश या तत्कालीन पोर्तुगीज प्रवाशाच्या म्हणण्यानुसार हे स्थळ तटबंदीयुक्त असून जागोजागी मनोरे (बुरूज) टेहळणीसाठी बांधले होते. त्यांत अनेक व्यापारी राहत असून कृष्णदेवराय परकीय व्यापाऱ्यांना आमंत्रित करीत असे. कृष्णदेवरायाने शहराच्या दक्षिणेस असलेल्या दोन टेकड्यांत भराव टाकून सांडूर खोरे अलग केले. हे काम त्याने जोओ दी ल पाँटे या पोर्तुगीज अभियंत्याच्या मदतीने केले. या टेकड्यांवरूनच सांप्रत हडगळ्ळी, हरपनहळ्ळी आणि कुड्लिगी या तालुक्यांच्या शहरांना मुख्य रस्ता जातो. शहराच्या दक्षिण टोकास भरावाच्या उत्तरेला एक शंक्वाकार टेकडी असून तिला जोलदरशी (जोंधळ्याची रास) टेकडी म्हणतात. तिच्या थोडे पूर्वेला त्याच पर्वतश्रेणीत जंबुनाथ-कोण्डनामक सर्वोच्च शिखर ( उंची ९०० मी.) आहे. तेथील अरुंद दरीत जंबुनाथ मंदिर आहे. होस्पेटपासून सु. पाच किमी.वर ते असून तेथे खनिजयुक्त गरम पाण्याचा झरा आहे.
विजयानगरकालीन होस्पेटमध्ये एक मुख्य बाजार रस्ता आहे. त्याला लागून लहानलहान गल्ल्या आहेत. रस्त्याच्या एका टोकाला वीरुपाक्ष मंदिर आहे. त्यानंतर चितवड्गी हे उपनगर पूर्वेला असून जुन्या वास्तूंत तीन मुसलमानी थडगी बाजार रस्त्याच्या पूर्व बाजूस आहेत. त्या भागात सुभेदार बावी नावाची मोठी विहीर आहे. तसेच एक मशीद असून तिच्यावरील उर्दू शिलालेखात ती १७८५-८६ मध्ये होस्पेटचा सुभेदार गफूर खान याने टिपूच्या अंमलाखाली हा प्रदेश असताना बांधली, असा उल्लेख आहे. त्या काळात होस्पेटमध्ये खांडसरी साखरनिर्मितीचे केंद्र होते आणि हातमागाचे कापड विणले जाई. तुंगभद्रा प्रकल्प, इंडिया शुगर्स अँड रिफायनरी लि. आणि तुंगभद्रा स्टील प्रॉडक्ट्स लि. या कंपन्यांमुळे शहराची औद्योगिक क्षेत्रात झपाट्याने वाढ झाली. मेसर्स एम्. जी. ऑटोमोबाईल्स (१९२४) ही कंपनी वाहतूक व्यवस्था, मोटार दुरुस्ती, स्पेअर पार्ट्सची निर्मिती वगैरे करत असून तिच्या अन्यत्र शाखा आहेत. तिच्यामुळे लघुउद्योगांना चालना मिळाली. इंडिया शुगर्सची ऊर्ध्वपातन भट्टी ( डिस्टलरी) असून त्यातून ब्रँडी, व्हिस्की, रम इ. उच्च प्रतीच्या मद्याची निर्मिती होते. तुंगभद्रा जलविद्युत् प्रकल्पाचे एक प्रमुख उपकेंद्र येथे असून विजयानगर स्टील प्रोजेक्ट, तरंगळ (तोरणगळ) येथे झाल्यामुळे होस्पेट परिसरातील लोहखनिजाची निर्यात होऊ लागली आणि लोकांना मोलमजुरीही प्राप्त झाली. याशिवाय होस्पेटच्या परिसरात मँगॅनीज व रेड ऑक्साईड ही खनिजे मुबलक प्रमाणात सापडतात. त्यामुळे खाणउद्योगही जोरात आहे. शहराच्या परिसरात सर्व प्रकारची कृषी अवजारे बनविणारी कंपनी आहे. सहकारी तत्त्वावरील टाउन को-ऑपरेटिव्ह बँक (१९१५) ही होस्पेटमधील पहिली बँक होय. शहरात महिला समाज (स्था. १९५५) संस्थेद्वारा मुलांसाठी बालवाडी, तसेच शिवणकाम व कशिदाकामाचे स्त्रियांचे वर्ग घेतले जातात.
होस्पेटच्या नगरपालिकेचे रूपांतर महानगरपालिकासदृश शहर नगरपालिकेत १९६४ मध्ये करण्यात आले. नगरपालिका शहराचा पाणीपुरवठा, रस्तेदुरुस्ती, स्वच्छता, पर्यावरण, आरोग्य आदी बाबींची व्यवस्था पाहते. शहरात भूमिगत जलनिःसारण योजना असून नगरपालिकेतर्फे चार दवाखाने व एक प्रसूती रुग्णालय चालविले जाते. येथून ८ किमी. वरील मल्लापुरम येथे तुंगभद्रा नदीवर धरण बांधलेले असून त्याद्वारे परिसरातील शेतीसाठी सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आहे. जवळच हंपी हे महत्त्वाचे ऐतिहासिक स्थळ असल्यामुळे पर्यटकांची नेहमीच ये-जा असते. त्यासाठी होस्पेटमध्ये उत्तम लॉजेस आहेत.
देशपांडे, सु. र.
“