होलिअँडर, अलेक्झांडर : (१९ डिसेंबर १८९८–६ डिसेंबर १९८६). अमेरिकन जीवभौतिकीविज्ञ. तसेच ओक रिज नॅशनल लॅबोरेटरीच्या (ORNL) जीवविज्ञान विभागाचे संचालक होते (१९४६–६६). त्यांच्या नेतृत्वाखाली प्रारण (उत्सर्ग) आनुवंशिकी, जीवरसायनशास्त्र, उत्सर्जित कर्कजन्य उत्पत्तिशास्त्र (कार्सिनोजेनेसिस) आणि रेणवीय जीवविज्ञान या विषयांत झालेल्या संशोधनामुळे या प्रयोगशाळेने आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त केली. 

 

होलिअँडर यांचा जन्म जर्मनीतील स्मॅटर येथे झाला. १९२१ मध्ये ते अमेरिकेला स्थलांतरित झाले. १९२७ मध्ये त्यांनी अमेरिकन नागरिकत्व स्वीकारले. त्यांनी बी.ए. (१९२९), एम्.ए. (१९३०) व भौतिकीय रसायनशास्त्रात पीएच्.डी. (१९३१) या पदव्या विस्कॉन्सिन विद्यापीठातून प्राप्त केल्या. 

 

होलिअँडर यांनी कमी तीव्रतेच्या प्रारणाच्या परिणामाचा सखोल अभ्यास केला. त्यांनी प्रारणाचे मापनकरण्याच्या पद्धती विकसित करण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांनी प्रारणाचा कोशिका-विभाजनावर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास केला. अभ्यासाअंती त्यांना जंबुपार प्रारणाच्या परिणामापासून बरे होण्याची जीवाणूमध्ये असलेली क्षमता आढळली. प्रारणाच्या हानीमुळे कोशिका-विभाजनास विलंब होतो, हे त्यांचे संशोधन ⇨ प्रारण जीवविज्ञाना तील महत्त्वाचे संशोधन समजले जाते. त्यांनी एकवर्णी तसेच जंबुपार किरणांचा जीवशास्त्रीय संस्थांवर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास केला. विषाणू अकार्यक्षम होणे व विविध प्राण्यांमध्ये होणारे उत्परिवर्तन यात संशोधन केेले असता त्यांना असे आढळून आले की, विशिष्ट तरंगलांबी असणारे किरण इतर किरणांपेक्षा जादा क्षमतेने शोषले जातात. १९४६ मध्ये क्लिंटन प्रयोगशाळेत येण्या-आधी त्यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ या संस्थेतील प्रारण जीवविज्ञान प्रयोगशाळेचे संचालक पद भूषविले. तेथे त्यांनी बुरशीवर जंबुपार प्रारणाचा होणारा परिणाम अभ्यासला. संशोधनावरून त्यांनी अचूक निष्कर्ष काढला की, पुनर्जननामध्ये कोशिकांतील प्रथिने नव्हे, तर न्यूक्लिइक अम्ल जननिक माहिती साठवून ठेवत असतात (१९३९). त्यांच्या पेनिसिलिनावरील उत्परिवर्तनाच्या संशोधनाचा उपयोग पेनिसिलिनाच्या उत्पादनवाढीसाठी झाला. विशिष्ट तरंगलांबीच्या किरणांचा वापर सूक्ष्मजीव नष्ट करण्यासाठी होऊ शकतो, असे लक्षात आल्यावर या संशोधनाचा वापर त्यांनी हवेद्वारा प्रसार होणाऱ्या रोगांच्या नियंत्रणासाठी केला. विशेषतः जंबुपार किरणांचा वापर त्यांनी साथीचे रोग निर्मूलनासाठी केला. 

 

अलेक्झांडर होलिअँडर
 

क्लिंटन प्रयोगशाळेतील प्रारणाच्या विविध स्रोतांमुळे होलिअँडर त्या संस्थेकडे आकर्षित झाले. त्यांना ओक रिज येथे ‘नॅशनल इन्स्टिट्यूट्स ऑफ हेल्थ इन्स्टिट्यूट ऑफ रेडिएशन हेल्थ’ स्थापन करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. त्याऐवजी त्यांनी जीवविज्ञान विभागस्थापन केला. 

 

होलिअँडर हे महत्त्वाकांक्षी तसेच नव्या कल्पनांचा स्वीकार करणारे होते. मूलत: त्यांना वाटत होते की, सूक्ष्मजीव आणि फळमाश्या यांच्या कोशिकांवर होणाऱ्या प्रारणांच्या परिणामावरून सर्व प्रजातींच्या जनुकांचा अभ्यास करता येईल. मात्र, जेव्हा त्यांना समजले की, उंदरावर प्रारणाचा होणारा जनुकीय परिणाम मानवाकरिता अधिक योग्य व परिणामकारक आहे. तेव्हा त्यांनी उंदरांच्या जननिक अभ्यासाच्या प्रकल्पाची उभारणी करण्यास सुरुवात केली. त्यांनी प्रारणाचा उंदरांवर होणाऱ्या परिणामाचा (आनुवंशिक व कायिक घटकांवर) अभ्यास केला. 

 

प्रारणाच्या प्रभावामुळे न्यूक्लिइक अम्लाचे विघटन होते, त्यामुळे सजिवांच्या भौतिक स्वरूपावर गंभीर परिणाम होतो. अणुप्रकल्पातून उत्सर्जित होणाऱ्या प्रारणाचे मानवावर तसेच इतर सस्तन प्राण्यांवर होणारे दुष्परिणाम हा महत्त्वाचा प्रश्न होता. होलिअँडर यांचे संशोधन अणुऊर्जेच्या संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण ठरले. 

 

होलिअँडर यांना अनेक मानसन्मान प्राप्त झाले. ते १९६८ मध्ये नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेस या संस्थेमध्ये सदस्य म्हणून निवडून आले. तसेच याच वर्षी पाचव्या आंतरराष्ट्रीय प्रकाशजीवविज्ञानाच्या परिषदेमध्ये त्यांना फिन्सेन मेडल प्रदान करण्यात आले. त्यांना अमेरिकी ऊर्जा विभागाचा सर्वोच्च फेर्मी पुरस्कारदेखील (१९८३) मिळाला. तसेच १९८४ मध्ये नॅशनल मेडल ऑफ सायन्स या पदकाने त्यांना सन्मानित करण्यात आले.लीड्स विद्यापीठ (व्हर्माँट), मार्केट विद्यापीठ (विस्कॉन्सिन) यांनी सन्माननीय पदव्या देऊन त्यांचा गौरव केला. दुसऱ्या महायुद्धानंतर त्यांनी इंटरनॅशनल डी फोटोबायोलॉजी कमिटी संघटित करण्याची जबाबदारी स्वीकारली, तसेच इंटरनॅशनल ॲसोसिएशन फॉर रेडिएशन रिसर्च या संस्थेच्या स्थापनेत सहभाग घेतला. 

 

होलिअँडर यांनी वैज्ञानिक शोध, वैज्ञानिक शिक्षण आणि वैज्ञानिक प्रशासन या विभागांत भरीव योगदान दिले. १९६८ मध्ये त्यांनी मेरी बंटिंग, ग्लेन सीबॉर्ग आणि अँडी होल्ट यांच्या मदतीने युनिव्हर्सिटी ऑफ टेनेसी ओक रिज ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बायोमेडिकलची स्थापना केली. त्यांच्या सन्मानार्थ नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस (अमेरिका) दर तीन वर्षांनी जीवभौतिकी (बायोफिजिक्स) या विषयात अलेक्झांडर ॲवॉर्ड प्रदान करते. 

 

होलिअँडर यांचे रेडिएशन बायोलॉजी (३ खंड १९५४–५६) व केमिकल म्यूटेजीन्स प्रिन्सिपल्स अँड मेथड फॉर देअर डिलिशन (४ खंड १९७१–७६) हे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. 

 

होलिअँडर यांचे वॉशिंग्टन (अमेरिका) येथे निधन झाले. 

पाटील, चंद्रकांत प.