होफ्मानस्टाल, हूगो फोन : (१ फेब्रुवारी १८७४–१५ जुलै १९२९). ऑस्ट्रियन कवी, नाटककार आणि निबंधकार. जन्म व्हिएन्ना
होफ्मानस्टाल यांच्या लेखनाच्या कारकिर्दीचा १८९०–९९ हा पहिला कालखंड. व्हिएन्नामधल्या लेखक-कलावंतांचा सहवास त्याला ह्या कालखंडात खूप मिळाला. त्याच्या आरंभीच्या कविता, तसेच काही चिकित्सक निबंध आणि काही पद्यनाटके ह्याच काळात लिहिली गेली. ‘येस्टरडे’ (१८९१, इं. शी.), ‘डेथ अँड टिशन’ (१८९२, इं. शी.) आणि ‘डेथ अँड द फूल’ (१८९३, इं. शी.) ही त्यांपैकी काही होत. श्रेष्ठ जर्मन कवी म्हणून ह्या नाटकांतून तो परिपक्व होत गेला.
बेल्जियन लेखक ⇨ मॉरिस माटरलिंक आणि इंग्रज कवी ⇨ रॉबर्ट ब्राउनिंग ह्यांची नाट्यात्म एकभाषिते ह्यांचा प्रभाव त्याच्या नाट्यलेखनावर दिसतो.
१९००–१८ हा त्याच्या वाङ्मयीन कारकिर्दीचा मध्यकाल होय. ह्या काळात त्याने आपले काव्यलेखन थांबवून तो नाटके, संगीतिका, बॅले असे लेखन करू लागला. ह्या कालखंडातील ‘एव्हरीमन’ (१९११, इं. शी.) ही नाट्यकृती पंधराव्या शतकातील एका इंग्रजी सदाचार-नाटकांवर आधारलेली आहे. एलेक्त्रा (१९०३, इं. शी., ‘इलेक्ट्रा ‘), डेअर रोझेन काव्हालियर (१९११, इं. शी., ‘द कॅव्हलिअर ऑफ द रोझ ‘) ह्या त्याच्या उल्लेखनीय संगीतिका. रिचर्ड स्ट्राउस ह्याने ह्या संगीतिकांना संगीत दिले होते. होफ् मानस्टाल ह्याच्या वाङ्मयीन निर्मितीचा काळ १९१९–२९ हा होता. ह्या कालखंडात ‘द डिफिकल्ट जंटलमन’ (१९२१, इं. शी.) ही सुखात्मिका व ‘द टॉवर’ (१९२३, इं. शी.) ही शोकात्मिका त्याने लिहिली. ह्या कालखंडातील ‘द वुमन विदाउट अ शॅडो’ (१९१९, इं. शी.) ही त्याची अन्य उत्कृष्ट संगीतिका (संगीत – रिचर्ड स्ट्राउस).
होफ्मानस्टालच्या निर्देशनीय नाट्यकृतींत ‘द लिट्ल थिएटर ऑफद वर्ल्ड’ (१८९७, इं. शी.), मॅडोना डायोनारा (१८९८, इं. भा. १९१६), ‘द ॲडव्हेंचरर अँड द सिंगर’ (१८९९, इं. भा. १९१७-१८) अशा काही नाट्यकृतींचा समावेश होतो. ह्या नाट्यकृतींना त्याच्या कवितेसारखेच सौंदर्य लाभलेले आहे. दृश्य आणि वास्तव, क्षणभंगुरता आणि कालातीतता, मानवी व्यक्तिमत्त्वातील सातत्य आणि परिवर्तन ह्यांवरील भावगेयतेचा स्पर्श झालेले चिंतन त्यांतून आढळते.
होफ्मानस्टाल हा विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील श्रेष्ठ कवी आणि नाटककारच नव्हता, तर श्रेष्ठ निबंधकारही होता. डी बेर्यूसंग ड्येअर स्फेयरेन (१९३१) मध्ये त्याने पश्चिम यूरोपातील सर्वश्रेष्ठ लेखकांच्या कार्याचे मूल्यमापन केले आहे. ‘डेअर डिस्टर उण्ट डीझत्साइट ‘(१९०७) ह्या आपल्या जाहीर भाषणामध्ये त्याने आजच्या हादरलेल्या जगातील कवीची भूमिका आणि कार्य ह्यांच्या मर्यादा सांगितल्या आहेत.
व्हिएन्ना शहराच्या बाहेरील रोदन येथे तो निधन पावला.
संदर्भ :1. Saintsbury, G. E. A History of Nineteenth Century Literature, 1780–1895 London, 1896.
गुडेकर, विजया म.
“