होफमान, आउगुस्ट व्हिल्हेल्म फोन : (८ एप्रिल १८१८–२ मे १८९२). जर्मन कार्बनी रसायनशास्त्रज्ञ. कार्बनी संयुगांचे संश्लेषण ॲनिलिनापासून रंजकद्रव्ये तयार करण्याची पद्धत फॉर्माल्डि-हाइड, हायड्रॅझोबेंझीन इत्यादींचा शोध अमाइडाची अमाइनामध्ये रूपांतरण करणारी होफमान विक्रिया आणि बाष्प घनतांच्या साहाय्याने द्रवांचा रेणवीय भार निश्चित करणारी पद्धत या कार्यांकरिता ते प्रसिद्ध होते. 

 

होफमान यांचा जन्म गीसेन (डार्मस्टाट, जर्मनी) येथे झाला. १८३६ मध्ये त्यांनी गीसेन विद्यापीठात प्रवेश घेतला आणि कायदा, तत्त्वज्ञान व गणित या विषयांचे अध्ययन केले. १८४३ मध्ये ते रसायनशास्त्र विषयाच्या अभ्यासाकडे वळले. त्यांनी ‘केमिकल इन्व्हेस्टिगेशन ऑफ द ऑर्गॅनिक बेसेस इन कोल टार’ हा प्रबंध लिहून डॉक्टरेट पदवी संपादन केली. तेन्यू रॉयल कॉलेज ऑफ केमिस्ट्री (लंडन) येथे प्राध्यापक आणि पहिले संचालक होते (१८४५–६५). तसेच ते बर्लिन विद्यापीठात प्राध्यापक आणि प्रयोगशाळेचे संचालक होते (१८६५–९२). 

 

होफमान यांनी १८४५ मध्ये बेंझिनापासून ॲनिलीन तयार केले आणि त्यामुळे संश्लेषित (कृत्रिम) रंजकद्रव्य उद्योगाचा पाया रचला गेला. त्यांनी ॲरोमॅटिक संयुगांमधील हायड्रोजनाच्या जागी क्लोरीन अणू प्रतिष्ठापित करण्यासंबंधीची समस्या सोडविली. या कार्याबद्दल त्यांना पर्शियन सोसायटी द फार्मसी या संस्थेचे सुवर्ण पदक मिळाले. १८४५ मध्ये त्यांना व्हिक्टोरिया राणीने लंडनमध्ये शास्त्रीय संशोधन करण्यास आमंत्रित केले आणि त्यांनी ते स्वीकारले. 

 

होफमान यांनी इंग्लंडमध्ये वीस वर्षे संशोधक आणि अध्यापक म्हणून काम केले. त्यांनी सर फ्रेडरिक ऑगस्टस आबेल, सर विल्यम हेन्री पर्किन, इ. सी. निकोलसन इ. हुशार शास्त्रज्ञांच्या पिढीला प्रशिक्षित केले. होफमान यांना यूरोपमधील सर्वोत्तम शास्त्रीय संस्थांनी सन्मानित केले. त्यांनी प्रशस्त अशा नवीन प्रयोगशाळांमध्ये संशोधन केले. या कालावधीमध्ये त्यांनी केलेल्या संशोधनामुळे जर्मन रंजकद्रव्ये आणि औषधनिर्माण उद्योगांची जलद भरभराट झाली, कारण कोळसा, लोखंड यांसह जर्मनीचे औद्योगिक क्षेत्र अग्रेसर होते. या यशामागे होफमान निम्नीकरण प्रक्रिया, वसाम्लांमधील अमाइडांवर ब्रोमीन आणि अल्कली यांची क्रिया करून कार्बन साखळीच्या लांबीचे होणारे आनुक्रमिक क्षपण या गोष्टी होत्या. काटेकोरपणे या पायऱ्यांच्या साहाय्याने इंडिगो द्रव्याचेऔद्योगिक उत्पादन करण्यात आले. होफमान यांचे औद्योगिक दृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण कार्य म्हणजे उष्ण प्लॅटिनमावरून मिथिल अल्कोहॉलाचेबाष्प सोडून फॉर्माल्डिहाइड या संयुगाची निर्मिती हे होय. त्यांनी चतुर्थक अमोनियम लवणांचा शोध लावला आणि अमोनियाचे नियमनिष्ठ अनुजात म्हणून सर्व अमाइनांचे वर्गीकरण केले. 

 

होफमान १८५१ मध्ये रॉयल सोसायटीचे सदस्य झाले. १८६८ मध्ये त्यांनी जर्मन केमिकल सोसायटी स्थापन करण्यास मदत केली. या संस्थेचे ते चौदा वेळा अध्यक्ष झाले (१८६८–९२). त्यांना रॉयल पदक (१८५४), कॉप्ली पदक (१८७५) इ. पदकांनी सन्मानित करण्यात आले. त्यांनीसु. ३०० शोधनिबंध प्रकाशित केले. 

 

होफमान यांचे बर्लिन (जर्मनी) येथे निधन झाले.

 

मगर, सुरेखा अ. सूर्यवंशी, वि. ल.