होफमाइस्टर, व्हिल्हेल्म फ्रीड्रिख बेनेडिक्ट : (१८ मे १८२४ – १२ जानेवारी १८७७). जर्मन वनस्पतिशास्त्रज्ञ. वनस्पती संरचनेसंबंधी केलेल्या संशोधनकार्यामुळे त्यांना तुलनात्मक वनस्पती आकारविज्ञानाचे प्रवर्तक मानले जाते [→ आकारविज्ञान]. 

 

होफमाइस्टर यांचा जन्म लाइपसिक येथे झाला. त्यांचे रूढार्थाने शिक्षण असे झाले नाही. त्यांनी पूर्णतः स्वयंशिक्षण घेतले. वयाच्या सतराव्या वर्षी त्यांनी वडिलांच्या संगीत दुकानात व संगीत प्रकाशन संस्थेत कामाला सुरुवात केली. पुढे त्यांची पुस्तके सुद्धा प्रकाशित झाली. त्यांनी जरी विद्या-पीठाची पदविका अथवा पदवी मिळविली नसली, तरी ते हायडल्बर्ग येथील शास्त्रीय उद्यानामध्ये वनस्पतिविज्ञानाचे संचालक व प्राध्यापक (१८६३–७२) होते. तसेच ते ट्यूबिंगेन येथे प्राध्यापक होते (१८७२–७६). 

 

होफमाइस्टर यांनी १८४७ मध्ये वनस्पतिविज्ञानातील पहिला शोधनिबंध इनोथेरा या फुलझाडातील फलनक्रियेसंबंधी प्रसिद्ध केला. Die Entstehung des Embryo der Phanerogamen (१८४९ इं. शी. ‘द जेनेसीस ऑफ द एंब्रिओ इन फॅनेरोगॅम्स ‘) हा शोधनिबंध प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांना रॉस्टॉक विद्यापीठाने सन्माननीय पदवी प्रदान केली. या शोधनिबंधात त्यांनी कोशिकानिर्मितीमध्ये केंद्रकाच्या वर्तनाचे सविस्तर वर्णन केले आणि वनस्पती गर्भ हा परागनलिकेपासून विकसित होतो हा सिद्धांत खोडून काढला. 

 

होफमाइस्टर यांचे अतुलनीय संशोधन On the Germination, Development and Fructification of the Higher Crypto-gamia and on the Fructification of the Coniferae (इं. भा. १८६२) या तुलनात्मक वनस्पती आकारविज्ञानाच्या ग्रंथात दिसून येते. यामध्ये त्यांनी विविध अबीजी वनस्पतींमधील संबंध स्पष्ट केले. तसेच अबीजी वनस्पती आणि सपुष्प वनस्पतींमधील प्रकटबीज वनस्पती (उदा., शंकुधारी) यांचे स्थान निश्चित केले. हरिता, नेचे आणि बीजी वनस्पतींच्या लैंगिक व अलैंगिक पिढ्यांमधील नियमित एकाआड एक बदलांचा देखील शोध लावला आणि प्राण्यांप्रमाणेच वनस्पतींतही पिढ्यांचे एकांतरण असते, ही गोष्ट दाखवून दिली [→ एकांतरण, पिढ्यांचे.

 

होफमाइस्टर यांचे लाइपसिकजवळ लिंडनौ येथे निधन झाले. 

भारस्कर, शिल्पा चं. जमदाडे, ज. वि.