हैदराबाद-२ : पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील प्रमुख शहर व याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्यालय. लोकसंख्या ५८,२९,४७१ (२०१४). हे कराचीच्या ईशान्येस १४५ किमीवर, गांजो तक्कर डोंगररांगेच्या कुशीत, सिंधू नदीकिनारी वसलेले आहे. हे देशातील पाचव्या क्रमांकाचे शहरअसून सांस्कृतिक व व्यापारी केंद्र आहे. हे दळणवळण केंद्र असूनराष्ट्रीय महामार्ग व रेल्वेने इतर मोठमोठ्या शहरांशी जोडलेले आहे. येथे विमानतळ आहे. 

 

सिंधचा बादशहा गुलामशाह काल्होरा याने १७६८ मध्ये प्राचीन शहर नीरून-कोट या शहराच्या ठिकाणी हे वसविले. मुहम्मद पैगंबराचा जावई हैदर याच्या नावावरून या शहराचे हैदराबाद असे नामकरण झाले. काल्होरा व तालपूर घराण्याच्या सत्ताकाळात १८४३ पर्यंत येथे सिंध प्रांताची राजधानी होती. सिंधच्या तालपूर अमिरांच्या ब्रिटिशांनी मिआनी, दाबो युद्धात पराभव केला व हे शहर ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली आले. ब्रिटिश सत्ताकाळात सिंध प्रांताची राजधानी येथून कराचीस हलविण्यात आली. पाकिस्तानाच्या स्वातंत्र्यानंतर १९४७ ते १९५५ पर्यंत सिंध प्रांताची येथे राजधानी होती. येथे १८५३ मध्ये नगरपालिका स्थापन झाली आहे. 

 

हे प्रमुख औद्यागिक व व्यापारी केंद्र आहे. येथे सोने-चांदीचे दागिने बनविणे, बांगड्या तयार करणे, पारंपरिक हस्तकला, सुती कापड, गालीचे, रेशीम, खाद्यतेल, काच, साखर, सिमेंट, साबण, कागद, रसायने, प्लॅस्टिक, चर्मशोधन, लाकूड कापण्याच्या गिरण्या इ. निर्मितिउद्योग भरभराटीस आले आहेत. आसमंतातील शेतमालाची ही बाजारपेठ आहे. समुद्रावरून येणारा खारा वारा अडवला जावा व त्यामुळे उन्हाळ्यात घरात गारवा निर्माणव्हावा या हेतूने घराच्या छपरावर विशिष्ट पेटीसारखे बांधकाम केलेले असते येथे त्यास बादगिर्स (विंड कॅचर्स) म्हणतात. हे येथील घरांचे एक वैशिष्ट्य आहे. हे शहर शैक्षणिक दृष्ट्या महत्त्वाचे केंद्र असून सिंध विद्यापीठाची स्थापना १९४७ मध्ये कराचीत करण्यात आली होती. सदर विद्यापीठ येथे १९५१ मध्ये हलविण्यात आले. येथील काल्होरा व तालपूर या राजवटीतील सत्ताधिशांच्या कबरी, हुसेनबाद उद्यान, राजीबाग, प्राणिसंग्रहालय, खेळाचे प्रेक्षागार, गुलाम मुहम्मद बंधारा, सिंध अमिरांचे राजवाडे, मुस्ताफा पार्क, सिंध संग्रहालय, लेक व्ह्यू पार्क इ. पर्यटकांची आकर्षणे आहेत. 

पुजारी, आप्पासाहेब