हैदराबाद-१ :भारतातील तेलंगणा व आंध्र प्रदेश राज्याचीसंयुक्त राजधानी. लोकसंख्या ६८,०९,९७० (२०११). हे कृष्णा नदीची उपनदी मुसी हिच्या किनारी वसले आहे. हे महत्त्वाचे दळणवळण केंद्र राष्ट्रीय महामार्ग व लोहमार्गाने इतर मोठमोठ्या शहरांशी जोडलेले आहे. हैदराबाद येथील हैदराबाद डेक्कन स्टेशन, काचीगुडा, बेगमपेठ, माल्कनगीरी, नामपल्ली ही प्रमुख रेल्वे स्थानके आहेत. येथे राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. 

 

हैदराबाद म्हणजे हैदरचे निवासस्थान किंवा सिंहाचे शहर. उर्दू भाषेत हायदर किंवा हैदर म्हणजे सिंह व बाद म्हणजे निवासस्थान किंवा शहर. पारंपरिक आख्यायिकेनुसार मुहम्मद कुली याची भागमती नावाची पत्नी होती. यावरून शहराचे नाव भाग्यनगर किंवा भागानगर असे होते. पत्नीने नंतर हैदर महल हे नाव धारण केले व तिच्या सन्मानार्थ भागानगरचे हैदराबाद असे या शहराचे नामकरण करण्यात आले. 

 

गोवळकोंड्याच्या कुत्बशाहीचा पाचवा राजा सुलतान मुहम्मद कुलीयाने हे सु. १५८९ मध्ये वसविले. तटबंदी व हिऱ्याचे व्यापारकेंद्रयासाठी हे प्रसिद्ध होते. हे मोगल सम्राट औरंगजेब याच्या आधिपत्या-खाली १६८७ मध्ये आले. १७१३ मध्ये दक्षिणेचा मोगल सुभेदार मीर कमरुद्दीन (पहिला आसफजाह) हा होता. यास निजामुल्मुल्क हा किताब देण्यात आला होता. याने १७२४ मध्ये त्याचा प्रतिस्पर्धी मुयारिजखानचा साखरखेड लढाईत पराभव केला. तदनंतर याने आसफशाही घराण्याची स्थापना केली. हेच घराणे नंतर हैदराबादचे निजाम म्हणून ओळखलेजाऊ लागले. हैदराबाद शहराभोवती मोठी दगडी भिंत बांधण्यात आली होती. ही भिंत समांतरभुज चौकोनाकृती असून तिचा परिघ सु. ९.७ किमी. होता. तिचे क्षेत्र सु. ५.८ चौ.किमी. होते. या भिंतीचे बांधकाम मोगलांचा सुभेदार मुयारिजखानने सुरू केले होते व हिचे बांधकाम पहिल्या निजामाच्या कारकिर्दीत पूर्ण झाले होते. येथे निजामशाहीच्या काळात हैदराबाद संस्थानची १७ सप्टेंबर १९४८ पर्यंत राजधानी होती. हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाल्यानंतर] गटातील हैदराबाद राज्याची व भाषावर प्रांतरचनेनुसार १ नोव्हेंबर १९५६ रोजी आंध्र प्रदेश राज्याची राजधानी येथे करण्यात आली होती. आंध्र प्रदेश पुनर्रचना कायदा २०१४ अन्वये तेलंगणा राज्याची राजधानी येथे केली असून आंध्र प्रदेशाची १० वर्षे राजधानी येथे असणार आहे. उपरोक्त कायद्यान्वये ग्रेटर हैदराबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशनची घोषणा करण्यात आली आहे. 

 

हैदराबाद तेलंगणा राज्याचे आर्थिक राजधानीचे शहर आहे. येथे होणाऱ्या मोत्याच्या व्यापारामुळे यास मोत्याचे शहर असे म्हणतात. १९ व्या शतकात हे शहर बंदराशी जोडण्यात आले व लोहमार्ग सुविधाही येथे प्राप्त झाली. त्यामुळे उद्योगधंद्यांस सुरुवात झाली. १९५० ते १९७० पर्यंत येथे भारत हेवी इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीज लि., न्यूक्लियर फ्युएल कॉम्प्लेक्स, नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, भारत इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि., डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लि., सेंटर फॉर सेल्यूलर अँड मॉलेक्युलर बायॉलॉजी, सेंटर फॉर डीएनए फिंगर प्रिटिंग डायग्नोस्टिक्स इ. संस्था येथे कार्यरत झाल्या. येथे रोखे बाजार आहे. 

 

येथे साडी, कलाकुसरीच्या वस्तू, हस्तकला, लाखेच्या बांगड्या, रेशमी व सुती कापड इ. उद्योग चालतात. याचबरोबर सार्वजनिक औद्योगिक क्षेत्राचा विस्तार झालेला आहे. १९९० पासून माहिती तंत्रज्ञान वाढीमुळे या शहरास जागतिक महत्त्व प्राप्त झाले असून यास सायबर सिटी असे संबोधतात. येथे १३०० पेक्षा जास्त माहिती तंत्रज्ञान व्यवसाय संस्था आहेत. यांमध्ये जागतिक प्रसिद्ध मायक्रोसॉफ्ट, गुगल, आयबीएम, याहू, डेल, फेसबुक इ. तसेच भारतीय टेक महिंद्रा, इन्फोसिस, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, विप्रो इत्यादींचा समावेश आहे. 

 

हैदराबाद हे शैक्षणिक केंद्र असून येथील उस्मानिया विद्यापीठ, हैदराबाद विद्यापीठ, मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठ, जवाहरलाल नेहरू तंत्रज्ञान विद्यापीठ, डॉ. बी. आर. आंबेडकर मुक्त विद्यापीठ, एन.जी. रंगा कृषी विद्यापीठ, पट्टी श्री रामुलू तेलुगू विद्यापीठ, नॅशनल ॲकॅडमी ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च युनिव्हर्सिटी, सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस ॲकॅडमी इ. संस्था प्रसिद्ध आहेत. 

 

हैदराबादच्या ईशान्येस सु. ९.६ किमी.वर हैदराबादचे जुळे शहर सिकंदराबाद आहे. हे सिकंदराबाद कँटोनमेंट म्हणून ओळखले जाते. ब्रिटिश सत्ताकाळात ब्रिटिशांच्या सैन्याचे केंद्र म्हणून यास महत्त्व होते. हे लोहमार्ग प्रस्थानक असून दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्य कार्यालय येथे असून भारताच्या दक्षिण विभागाच्या ९ व्या बटालियनचे मुख्यालय येथे आहे. 

 

तेलंगणाचे आर्थिक, शैक्षणिक, व्यापारी, सांस्कृतिक केंद्र म्हणून हैदराबाद भरभराटीस आलेले आहे. 

 

हैदराबाद येथील चार मिनार, चार कमान, मक्का मशिद, सालारजंग संग्रहालय, बादशाही अशुरखान, चौमहल राजवाडा, जामा मशिद, निजाम वेधशाळा, बरदारी व दरबार हॉल, बिर्ला संग्रहालय, बिर्ला मंदिर, बिर्ला खगोलालय, फालकनुमा राजवाडा, हुसेनसागर तलाव व त्यामधील बुद्ध पुतळा, के. बी. रेड्डी नॅशनल पार्क, अस्मानगड राजवाडा, हैदराबाद वनस्पतिउद्यान, रामोजी फिल्म सिटी, एन. टी. रामाराव उद्यान व तेथील लेझर शो इ. पर्यटकांची आकर्षणे आहेत. 

सैंदाणे, एम्. एम्.