हैदराबाद विद्यापीठ : तेलंगणा राज्यातील विद्यापीठ. सांसदीय अधिनियम (क्र. ३९) १९७४ नुसार केंद्रीय विद्यापीठ म्हणून२ ऑक्टोबर १९७४ रोजी स्थापना. अध्यापनात्मक स्वरूपाच्या या विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण आणि संशोधन यांवर विशेष भर दिला जातो. हैदराबाद शहराजवळ गाचीबावली या परिसरात हे वसले आहे. सामाजिक शास्त्रे, कला व संस्कृती, जीवविज्ञान, व्यवस्थापन, अर्थशास्त्र, गणित, संगणक आणि माहिती तंत्रज्ञान, वैद्यकशास्त्र, अभियांत्रिकी इ. विषयांच्या १० विद्याशाखा आणि त्यांना संलग्नित ४६ विभाग विद्यापीठात आहेत. विद्यापीठाचा कायदा इतर विद्यापीठांप्रमाणे असून कुलगुरू आणि कुलसचिव हे सवेतन सर्वोच्च अधिकारी असतात. एम्. ए., एम्. एस्सी., बी. टेक्., एम्. सी. ए., एम्. फिल., पीएच्. डी. इ. अभ्यासक्रमांच्या अध्यापनाची–मार्गदर्शनाची सुविधा येथे उपलब्ध आहे. विद्यापीठात इंदिरा गांधी स्मृती ग्रंथालय ४,००,००० पुस्तकांनी सुसज्ज असून अनेकविध देशीविदेशी नियतकालिकेही येथे उपलब्ध आहेत. भारतीय कला व संस्कृती, सामाजिक चळवळी यांच्यासमवेतच डॉ. भीमराव आंबेडकर, महात्मा गांधी, सरोजिनी नायडू यांच्या विचारांचे अध्ययन आणि संशोधन करणारी केंद्रेही विद्यापीठात स्थापन करण्यात आली आहेत. विद्यापीठाचा संशोधनावर भर असल्याने विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थांशी विद्यापीठ संलग्न आहे. आजमितीस ४०० प्राध्यापक येथे कार्यरत असून ५,००० विद्यार्थी अध्ययन करीत आहेत (२०१२). 

भटकर, जगतानंद