मौनी विद्यापीठ : महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी (ता. भुदरगड) येथील विद्यापीठवजा शिक्षणसंस्था. स्थापना १९५२. मौनीबाबांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विद्यापीठास ‘मौनी विद्यापीठ’ असे नाव देण्यात आले. विद्यापीठाचा कायदेशीर दर्जा या संस्थेस अजून देण्यात आलेला नाही. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाशी मौनी विद्यापीठाच्या उच्च शिक्षणसंस्था संलग्न आहेत.

प्रारंभी ही संस्था ‘मौनी विद्यामंदीर’ नावाने ग्रामीण शाळेच्या स्वरूपात स्थापन झाली. ही संस्था स्थापन करण्याचे श्रेय प्रिन्स शिवाजी एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर, गोविंदराव कोरगावकर धर्मादाय संस्था कोल्हापूर आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन, पुणे यांना दिले जाते.

‘शिक्षणातून विकास आणि विकासातून शिक्षण’ हे या संस्थेचे तत्त्व आहे.परिसराचा शैक्षणिक आणि सामाजिक विकास, ग्रामीण पुनर्रचना हे संस्थेचे उद्दिष्ट आहे. गरीब, होतकरू व दलितवर्गाच्या मुलामुलींच्या शिक्षणाची मोफत सोय विद्यापीठात उपलब्ध आहे. विद्यापीठात (१) कर्मवीर हिरे महाविद्यालय (बी. एड्. चा स्पेशल अभ्यासक्रम), (२) इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल अँड रुरल इंजिनीअरींग, (३) संयुक्त प्रशिक्षण केंद्र (पंचायत विस्तार अधिकारी व गटविकास अधिकारी प्रशिक्षण केंद्र, (४) ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र), (५) पंचायत राज्य प्रशिक्षण केंद्र, (६) श्री. शाहू कुमारभवन गारगोटी (बारावीपर्यंतची बहूद्देशीय माध्यमिक शाळा) (७) जवाहरलाल भवन, गारगोटी (प्रायोगिक प्राथमिक शाळा) इ. संस्था आहेत. संस्थेत ७,००० विद्यार्थी शिकत असून तेथील ग्रंथालयात ८०,००० ग्रंथ होते. (१९८४–८५). याच वर्षाचे संस्थेचे उत्पन्न ५८,०७,८२८ रु. व खर्च ५८,०७,८२८ रु. होता.

मिसार, म. व्यं.