उस्मानिया विद्यापीठ : आंध्र प्रदेश राज्यातील एक जुने विद्यापीठ. पूर्वीच्या हैदराबाद संस्थानातील उर्दू माध्यम असणारे हे पहिले विद्यापीठ होय. हैदराबाद येथे १९१८ साली त्यावेळचे निजाम सर मीर उस्मान अलीखान बहाद्दुर यांनी त्याची स्थापना केली आणि १९५९ च्या पुनर्रचनेच्या कायद्यानुसार त्यास इतर विद्यापीठांप्रमाणे दर्जा प्राप्त झाला. ह्याचे स्वरूप निवासी, अध्यापनात्मक व संलग्‍नक असे आहे. त्याच्या कक्षेत अदिलाबाद, हैदराबाद, करीमनगर, खम्मम, महबूबनगर, मेडक, नळगोंदा, निझामाबाद व वरंगळ हे जिल्हे येतात. विद्यापीठीय संविधानानुसार विद्यापीठाचा प्रमुख कुलपती असून प्रत्यक्षात कुलगुरू व कुलसचिव सर्व विद्यापीठीय प्रशासन व्यवहार पाहतात. कुलगुरूची नियुक्ती कुलपती करतो. सध्या विद्यापीठात ११ विविध विषयांच्या कक्षा आहेत. त्यांतून मानव्यविद्या, नैसर्गिक विज्ञाने, पाश्चात्त्य वैद्यक, आयुर्वेद, युनानी, अभियांत्रिकी, ललितकला, वाणिज्य, विधी इ. विषयांची व्यवस्था आहे. येथील प्रगत व प्रायोगिक ज्योतिष शास्त्राचा अभ्यासविभाग प्रसिद्ध आहे. तसेच ह्या शाखोपशाखांत अध्ययनाबरोबर संशोधनाचीही व्यवस्था आहे. विद्यापीठीय सहा महाविद्यालयांव्यतिरिक्त ११ घटक महाविद्यालये व ७६ संलग्‍न महाविद्यालये आहेत त्यांपैकी ११ महाविद्यालये केवळ स्त्रियांकरिता आहेत. हे विद्यापीठ स्थापन झाले, त्यावेळी उर्दू माध्यमातून अध्यापन व उर्दूमधून इतर साहित्याचे भाषांतर हे त्याचे खास वैशिष्ट्य होते. मात्र हैदराबाद संस्थान विलीन झाल्यावर आज तेथे पदाव्युत्तर अध्यापनाचे माध्यम इंग्रजी असून पदवीपूर्व अध्यापन इंग्रजी, हिंदी, तेलुगू व उर्दू ह्या भाषांद्वारा होते. १९७१-७२ मध्ये विद्यापीठाचे एकूण उत्पन्न सु. २,२०,८३,३३९ रु. एवढे होते. १९७१ मध्ये ४०,०६४ विद्यार्थी सर्व संबंधित महाविद्यालयांतून शिकत होते.

मराठे, रा. म.