हेस, हेर्मान : (२ जुलै १८७७–९ ऑगस्ट १९६२). जर्मन कादंबरीकार आणि कवी. जन्म कॅल्व, वुटेनबर्ग येथे. वडिलांच्या आज्ञेनुसार त्याने धर्मोपदेशकाचे शिक्षण देणाऱ्या माउल येथील प्रॉटेस्टंट सेमिनरीत प्रवेश घेतला; तथापि तेथील बौद्धिक प्रचलितशिक्षणपद्धती विरुद्ध त्याने बंडखोरी केली आणि तो तेथून पळून गेला. त्याच्या जवळजवळ सर्वच साहित्यकृतींमध्ये ह्या घटनेचा परिणाम या-ना-त्या स्वरूपात जाणवतो. ह्या पलायनानंतर थोडे दिवस एका माध्यमिक शाळेत काढून मनोऱ्यांवरची घड्याळे बनविणाऱ्या एका कारखान्यात तो शिकाऊ कामगार म्हणून लागला. पुढे एका पुस्तकाच्या दुकानात त्याने नोकरी धरली. ठराविक चाकोरीतल्या शिक्षणाचा त्याला उबग येत असे. उण्टम राड (१९०६) मध्ये त्याची ही वृत्ती प्रकट झाली आहे तथापि ग्रंथविक्रीच्या व्यवसायात असताना त्याने जर्मन भाषेतले, तसेच परभाषेतले साहित्य खूप वाचले. भावकविता, कथा असे लेखनही करायला आरंभ केला. त्याची भावकविता नवस्वच्छंदतावादी काव्यसंकेतांना अनुसरणारी आहे; तथापि त्याची कीर्ती त्याच्या कादंबरीलेखनावरच मुख्यतः अधिष्ठित आहे.
हेसला कादंबरीकार म्हणून नाव मिळवून दिले, ते पेटर कामेन्त्सिंड (१९०४, इं. भा. १९६१) ह्या कादंबरीने. खिन्नता विकाराने (मेलॅन् कोलिआ) पछाडलेला एक अतिसंवेदनशील कलावंत परोपकारी कृत्ये आणि निसर्गसान्निध्य ह्यांच्या आधाराने आपला मनोविकार नाहीसा करण्याचा प्रयत्न कसा करतो, हे ह्या कादंबरीत हेसने दाखविले आहे. हेसच्या जवळपास सर्वच कादंबऱ्यांतून आढळणाऱ्या जीवनाच्या ह्या आकृतिबंधाचे आरंभीचे रूप ह्या कादंबरीत दिसते. त्यात शाळेतले भावनाशून्य वातावरण ह्यांच्या ताणाखाली चिरडून गेलेल्या एका संवेदनशील तरुणाचे करुण चित्र त्याने रंगविलेले आहे. ह्या कादंबरीतील आत्मचरित्रात्मकतेचा घटक लक्षणीय आहे. डेमिआन (१९१९, इं. भा. १९५८), सिद्धार्थ (१९२२, इं. भा. १९५४), स्टेप्पेन वोल्फ (१९२७, इं. भा. द वुल्फ ऑफ द स्टेप्स, १९६५), नार्त्सिस उण्ड गोल्डमुंड (१९३०, इं. शी. ‘डेथ अँड उ लव्हर‘), दस ग्लासपेर्लेनश्पील (१९४३, इं. भा. मॅजिस्टर लुडी, १९५०) ह्या त्याच्या अन्य उल्लेखनीय कादंबऱ्या.
पहिल्या महायुद्धाच्या काळात अलिप्त राष्ट्र असलेल्या स्वित्झर्लंडमध्ये हेसने वास्तव्य केले. तेथे असताना त्याने लष्करशाही आणि तिच्याशी निगडित असलेल्या राष्ट्रवादावर तीव्र टीकात्मक लेखन केले. परिणामतः एक शांततावादी देशद्रोही म्हणून जर्मन पत्रकारांनी त्याचा निषेध केला. जर्मन युद्धकैदी आणि अंतर्वासित यांच्यासाठी त्याने एका जर्नलचे संपादन केले होते. ह्या युद्धात युद्धकैद्यांसाठी काम करीत असताना जे धक्कादायक अनुभव त्याला आले, त्यातून तो युद्धविरोधक झाला होता. १९१९ मध्ये स्वित्झर्लंडचा तो कायम रहिवासी झाला आणि १९२३ मध्ये त्याला त्या देशाचे नागरिकत्वही मिळाले. स्वित्झर्लंडमधील माँटाग्नोलायेथे तो स्थायिक झाला. पहिल्या महायुद्धकाळात आणखी काही अप्रिय गोष्टीही त्याच्या आयुष्यात घडल्या. त्याचा एक मुलगा गंभीर आजारी झाला. त्याच्या पत्नीच्या मानसिक आजाराची सुरुवातीची लक्षणे ह्याच काळात दिसू लागली. विख्यात मानसशास्त्रज्ञ ⇨ कार्ल युंग ह्याच्या मनोविश्लेषण पद्धतीतून त्यालाही जावे लागले.
अशा विविध आणि आघातजन्य अनुभवांतून हेसची डेमिआन ही कादंबरी निर्माण झाली. एमिल सिंक्लेअर ह्या पौंगडावस्थेतल्या एका संत्रस्त युवकामध्ये आत्मजागृती कशी घडून येते, हे ह्या कादंबरीत दाखविले आहे. डेमिआन ह्या गूढ व्यक्तिमत्त्वाच्या एका मुलाच्या प्रभावाखाली ही आत्मजागृती होते. युंगप्रणीत मनोविश्लेषणाची वैशिष्ट्यपूर्ण संरचना ह्या कादंबरीच्या आकलनाला पूरक ठरते, असे समीक्षकांनी दाखवून दिले आहे. हेसने पुढील काळात लिहिलेल्या कादंबऱ्यांतही युंगप्रणीत विश्लेषक मानसशास्त्रातल्या काही संकल्पनांमध्ये – उदा., अंतर्मुखता, बहिर्मुखता, सामूहिक अबोध – हेसला वाटत असणारे स्वारस्य दिसून येते.
हेसने भारताला भेट दिली होती. तसेच त्याला पौर्वात्य गूढवादाचेही आकर्षण होते. त्यांतून त्याच्या मनावर झालेल्या संस्कारांतून सिद्धार्थ ही भावकाव्यात्म कादंबरी त्याच्याकडून लिहिली गेली. ती बुद्धाच्या आरंभीच्या जीवनावर आहे. स्टेप्पेन वोल्फ मध्ये एका कलावंताच्या दुभंग व्यक्तिमत्त्वातील पाशवी प्रेरणा त्याने शोधल्या. गुंतागुंतीचा आशय प्रकट करणारी हेसची ही एक प्रायोगिक कादंबरी आहे. नार्त्सिस उंड गोल्डमुंडमध्ये त्याने मन आणि इंद्रिये यांच्यातील अखंड चाललेला संघर्ष दाखविला आहे. हेसच्या अत्यंत लोकप्रिय कादंबऱ्यांत ह्या कादंबरीचा अंतर्भाव होतो. मॅजिस्टर लुडी ही हेसची सर्वांत दीर्घ आणि प्रसिद्ध कादंबरी. तो अकरा वर्षे ती लिहीत होता. त्यात त्याने एका विद्याव्यासंगी व्यक्तीचा ‘युटोपिया’ दाखविला आहे. कास्तालिया ह्या एका स्वतंत्र प्रांतात हा युटोपिया अवतरतो. आत्मा आणि सत्य ह्यांच्याशी कठोर निष्ठा ठेवणे, ती जपणे हे ह्या युटोपियाचे उद्दिष्ट आहे. बाहेरच्या शाळांमध्ये शिकवण्यासाठी प्रशिक्षित शिक्षक तयार करणे हेही आणखी एक उद्दिष्ट.
हेसने कथा आणि कादंबऱ्याही लिहिल्या. त्याच्या कवितांचेही अनेक संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. १९४६ मध्ये साहित्याचा नोबेल पुरस्कार देऊन त्याच्या साहित्यसेवेचा गौरव करण्यात आला.
माँटाग्नोला (स्वित्झर्लंड) येथे तो निधन पावला.
संदर्भ : 1. Field, G. W. Hermann Hesse, 1970.
2. Milecks, Joseph, Hermann Hesse : Biography and Bibliography, 2 Vols., 1977.
3. Mileck, Joseph, Hermann Hesse : Life and Art, 1978.
कुलकर्णी, अ. र.