हेस, वॉल्टर रूडोल्फ : (१७ मार्च १८८१?१२ ऑगस्ट १९७३). स्विस शारीरक्रियावैज्ञानिक. शरीरांतर्गत इंद्रियांच्या कार्यातील सुसूत्रता वॉल्टर रूडोल्फ हेसआणि निर्णयक्षमता यांकरिता मेंदूच्या विशिष्ट भागांचा सहभाग असतो यासंबंधीचा शोध लावल्याबद्दल हेस यांना ⇨ इगास आंतॉन्यू काअताना द अब्रेउ फ्रईर मोनीझ यांच्यासमवेत १९४९सालचे शारीरक्रियाविज्ञान किंवा वैद्यक या विषयाचे नोबेल पारितोषिक विभागून मिळाले. 

 

हेस यांचा जन्म फ्राउनफेल्ट येथे झाला. सुरुवातीला ते नेत्रचिकित्सक होते (१९०६?१२). नंतर ते शारीरक्रियाविज्ञानाच्या अभ्यासाकडे वळले. त्यांनी प्रथम १९१२ मध्ये झुरिक विद्यापीठात फिजिऑलॉजिकल इन्स्टिट्यूटमध्ये आणि नंतर १९१५ मध्ये बॉन विद्यापीठात संशोधन साहाय्यक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. १९१७ मध्ये त्यांची झुरिक येथे शारीरक्रियाविज्ञानाचे प्राध्यापक झाले. ते फिजिऑलॉजिकल इन्स्टिट्यूटचे संचालक होते (१९१७?५१). त्यांना स्वायत्त तंत्रिका तंत्र यासंबंधीच्या संशोधनात रुची निर्माण झाली. मेंदूच्या खालच्या भागातून उगम पावणाऱ्या व संपूर्ण मेरुरज्जूत पसरल्या जाणाऱ्या तंत्रिका स्वयंचलितपणे चयापचय व उत्सर्जन या प्रक्रिया नियंत्रित करतात. तसेच या तंत्रिका तणावासारख्या गुंतागुंतीच्या उद्दीपन क्रियांच्या प्रतिक्रियेसाठी इंद्रियांच्या गटाला प्रवृत्त करतात. 

 

जाणीव जागृत असलेल्या मुक्तपणे विहार करणाऱ्या मांजरीच्या मेंदूतील विशिष्ट भागांना उद्दीपित करून किंवा नष्ट करून हेस यांनी असे शोधून काढले की, स्वायत्तपणे क्रिया करणारी जागा मेंदूच्या खालच्या भागात (लंबमज्जेत आणि पार-मस्तिष्कामध्ये), विशेषत: पारमस्तिष्काच्या अधोथॅलॅमस या भागात असते. त्यांनी इतक्या परिणामकारक व अचूक रीतीने नियंत्रण केेंद्राचे कार्य मापले होते की, कुत्र्याला पाहून मांजरीचे जे बाह्यवर्तन असते, तसे वर्तन मांजराच्या अधोथॅलॅमसमधील विशिष्ट बिंदूला उद्दीपित करूननिर्माण करता येते. त्यांनी ध्येय ध्येय मार्गदर्शक हालचालींच्या तंत्राचादेखील अभ्यास केला होता. त्याद्वारे त्यांनी अपेक्षित अपेक्षामूलक प्रेरक नियंत्रणानुसार इच्छानुवर्ती प्रेरक क्रिया सुरू करता येतात, ही संकल्पना प्रस्थापित केली. त्यांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांपैकी द बायोलॉजी ऑफ माइंड (१९६४) हे महत्त्वाचे आहे. 

 

हेस यांचे अस्कोना (स्वित्झर्लंड) येथे निधन झाले. 

वाघ, नितिन भरत