हेर्बार्ट, योहान फ्रेडरिक : (४ मे १७७६–१४ ऑगस्ट १८४१). एक जर्मन तत्त्वज्ञ व ख्यातकीर्त शिक्षणतज्ज्ञ. त्यांचा जन्म ओल्डनबर्ग योहान फ्रेडरिक हेर्बार्टयेथे सुशिक्षित कुटुंबात झाला. सुरुवातीचे शिक्षण जन्मगावी घेऊन पुढील शिक्षण त्यांनी येना विद्यापीठात ⇨ योहान गोटलीप फिक्टे या त त्त्व ज्ञा च्या हाता-खाली घेतले (१७९४). पुढे त्यांनी स्वित्झर्लंडमधील इंटरलाकेन येथे ट्यूटर म्हणून १७९७–१८०० दरम्यान अध्यापन केले. तिथे ते ⇨ योहान पेस्टालोत्सी या स्विस शिक्षणतज्ज्ञाच्या संपर्कात आले आणि त्यांच्या शिक्षणविषयक विचारांनी प्रभावित झाले. इ. स. १८०२ मध्ये गटिंगेन विद्यापीठात त्यांना नोकरी मिळाली. पुढे त्याच विद्यापीठात त्यांना पदोन्नती मिळून ते असाधारण (एक्स्ट्राऑर्डिनरी) प्राध्यापक झाले (१८०५). अलेक्झांडर हंबोल्ट या मुत्सद्दी बॅरनच्या शिफारशीवरून त्यांना कोनिसबर्ग येथे शिक्षणशास्त्रशाखेत महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले (१८०८). त्या ठिकाणी त्यांनी अध्यापनशास्त्राची पाठशाळा (सेमिनरी) १८३३ पर्यंत चालविली. २४ वर्षे कोनिसबर्गला वास्तव्य करून हेर्बार्ट पुन्हा गटिंगेन विद्यापीठात परतले आणि तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक म्हणून रुजू झाले (१८३३). 

 

हेर्बार्ट यांचा असा दृढ विश्वास होता की, शिक्षण हे नीतिशास्त्र आणि मानसशास्त्र यांच्याशी निगडित आहे. नीतिशास्त्र शिक्षणाची सर्वंकष उद्दिष्टपूर्ती करते. विशुद्ध चारित्र्य घडविण्यासाठी त्याची नितांत आवश्यकता आहे आणि मानसशास्त्र हे उद्दिष्ट साध्य करण्याचे योग्य साधन होय.त्यांनी शिक्षणाची सांगड मानसिक रचनेशी घातली आहे. हेर्बार्ट शैक्षणिक सिद्धान्ताकडे तत्त्वज्ञानाद्वारे वळले कारण येना येथे त्यांनी जर्मन चिद्वादाचा अभ्यास फिक्टेच्या हाताखाली केला होता. सदाचरण हे शिक्षणाचे उद्दिष्ट आहे या कांट व फिक्टे यांच्या मतांशी ते सहमत होते. विशुद्ध नैतिकता हे शिक्षणाचे सार आहे मानसिक प्रक्रियांना चालना देणेआणि व्यक्तिमत्त्वविकास या एकाच नाण्याच्या दोन बाजू होत यालाच हेर्बार्ट ‘अध्यापनात्मक शिक्षण’ म्हणतात. त्यांची संकल्पना पूर्णतः नैतिक अधिष्ठानावर म्हणजे अंतर्मनाचे स्वातंत्र्य या कल्पनेवर आधारित आहे. म्हणून शैक्षणिक तत्त्वसरणीत पद्धतशीर परीक्षा पद्धतीला महत्त्व असूनतीत शिक्षणाचा हेतू, उद्दिष्ट, मार्ग आणि अध्यापन यांचा साकल्याने विचार झाला पाहिजे आणि शिक्षणतज्ञ व अध्यापक यांनी तत्संबंधी मार्गदर्शनकेले पाहिजे. या चौकस अध्यापनाला ते व्यवहार्य शिक्षण म्हणतात कारण ते अध्यापनशास्त्रीय शैक्षणिक प्रश्नांशी निगडित असते. अखेरहेर्बार्ट म्हणतात, ‘शिक्षणाचा मार्ग संश्लेषित, विश्लेषणात्मक आणिस्पष्टीकरणात्मक असावा ‘. हेर्बार्टची शैक्षणिक विचारसरणी तर्कशास्त्र, सत्ताशास्त्र, सौंदर्यशास्त्र, मानसशास्त्र व शिक्षणशास्त्र या सर्वांना सामावून घेणारी व्यापक अशी आहे. 

 

मनुष्याची मानसिक अवस्था ही प्राथमिक संवेदनांच्या घटकांचे प्रकटीकरण असते, असे हेर्बार्ट मानतात. त्यांना ते मेंटल फोर्सीस म्हणतात आणि लॉकच्या म्हणण्यानुसार त्या केवळ कल्पना नसतात. त्यांच्या आंतरसंबंधांचा अभ्यास मनाला गती देतो आणि न्यूटोनियन मेकॅनिक्स-प्रमाणे त्याचे गणितीय सूत्रात प्रकटीकरण करता येते. कल्पना विशुद्ध असतीलच असे नाही. त्या एकमेकींशी संघर्षही करतील. या पायावर( बेस) हेर्बार्ट यांनी अनुप्रयुक्त मानसशास्त्राची एक शाखा म्हणून शिक्षणशास्त्राची सैद्धांतिक मांडणी विकसित केली. त्यांच्या या उपपत्तीस ‘हेर्बार्टीयनिझम’ हे नाव प्राप्त झाले असून त्याचा प्रभाव एकोणिसाव्या शतकातील शिक्षणपद्धतीवर पडला होता. प्रथम त्यांच्या कल्पना जर्मनीत प्रसृत झाल्या व त्यानंतर त्या अमेरिकेत प्रविष्ट झाल्या. 

 

हेर्बार्ट यांनी मुख्यत्वे जर्मन भाषेत लेखन केले. त्यांच्या सर्व ग्रंथांचेइंग्रजीत अनुवाद झाले असून त्याच्या आवृत्त्याही प्रकाशित झाल्याआहेत. त्यांचा तत्त्वज्ञान-मानसशास्त्र यांच्यावरील विवेचनाचा मुख्यग्रंथ म्हणजे Psychologie als Wissenschaft nev gegründet auf  Erfahrung Metaphysik und Mathematik(दोन खंड, १८२४-२५). त्याचे इंग्रजी भाषांतर सायकॉलॉजी ॲज अ सायन्स न्यूली बेस्डऑन एक्सपिरिअन्स, मेटॅफिजिक्स अँड मॅथॅमॅटिक्स या शीर्षकार्थाने झालेआहे तर शिक्षणविषयक त्यांची सैद्धांतिक मांडणी Pestaiggi’s&gt idee eines ABC der Anschauung(१८०२, इं. भा. पेस्टालोत्सिज आयडिया ऑफ ॲन एबीसी ऑफ सेन्स पर्सेप्शन) या द्विखंडात्मक ग्रंथात मिळते. त्यांच्या मते, शिक्षणाच्या पुढील पाच पायऱ्या असतात : तयारी करणे, मांडणी करणे, जुळवून घेणे, सामान्यीकरण आणि उपयोजन. पेस्टालोत्सीने अंमलात आणलेल्या शैक्षणिक पद्धतीला हेर्बार्टने शास्त्रीय बैठक दिली. नव्या माहितीने व कल्पनांनी ज्ञान समृद्ध होणे ही सबोधक्रिया होय. पहिल्या कल्पनांमध्ये नवीन भर पडणे हे शिक्षणाने साध्य होते. अध्यापन ही कला आहे. नव्यकल्पना अशा पद्धतीने प्रतिपादन केल्या पाहिजेत की, अहंतत्त्व त्यांना खेचून घेईल. शिक्षणात उपजत शक्तीवरभर देण्याऐवजी अध्यापनावर भर द्यावा, ही तत्त्वे हेर्बार्ट यांनी मांडली व मानव्यविद्या व तंत्र आणि विज्ञान यांचा समन्वय साधण्यावर भर दिला. त्यामुळे अध्यापनशास्त्रात अनुभवसिद्ध तत्त्वे मांडणारे हेर्बार्ट हे पहिले तत्त्वज्ञ होत. म्हणूनच आधुनिक शास्त्रशुद्ध अध्यापनशास्त्राच्या जनकांपैकी ते एक मानले जातात. 

 

संदर्भ : Dunkel, H. B., Herbart and Herbartianism : An Educational Ghost Story, Chicago, 1970. 

खंडकर, अरुंधती