हेरात : अफगाणिस्तानमधील याच नावाच्या प्रांताच्या राजधानीचे ठिकाण व इतिहासप्रसिद्ध शहर. लोकसंख्या ४,३६,३०० (२०१३अंदाजे) . हे अफगाणिस्तानच्या पश्चिम भागात, हिंदुकुश पर्वताच्या पारोपामिसस रांगेच्या दक्षिणेस, सस.पासून ९२२ मी. उंचीवर, हरी रूद नदीकिनारी वसलेले आहे. हेरातला पूर्वी हेराइव्हा म्हणत. इ. स. पू. सहाव्या शतकापासून हे अस्तित्वात आहे असे म्हणतात. हे शहर अलेक्झांडरद ग्रेट याच्या आधिपत्याखाली होते. अरबांनी ते इ. स. ६६० मध्ये जिंकल्यानंतर ते मुस्लिमांचे केंद्र बनले. इराण-भारत या जुन्या व्यापार-मार्गावरील व चीन, मध्य आशिया आणि यूरोप या काफला मार्गावरीलहे मोक्याचे स्थान असल्याने यास विशेष महत्त्व होते. १२२२ मध्येमंगोल चंगीझखानने हे उद्ध्वस्त केले होते. तैमूरलंगने १३९३ मध्ये हे जिंकले होते. याचे वंशज शहारूख व हुसेन यांच्या कारकीर्दीत त्यांची राजधानी हेरात येथे होती. येथे टिमुरिड्झ सत्ता दीर्घकाळ राहिली. यांच्या कारकीर्दीत येथे अनेक कवी, विद्वान, संगीतज्ञ, शिल्पकार झाले होते व हेरातचे सांस्कृतिक व वैज्ञानिक महत्त्व वाढलेले होते. १५०७ मध्ये हे उझबेकच्या अखत्यारीत होते. तद्नंतर हे १८६३ मध्ये अफगाणिस्तान-मध्ये समाविष्ट होईपर्यंत इराण व अफगाणिस्तान यांच्या आधिपत्यात आलटून-पालटून होते. रशिया व ब्रिटन यांमध्ये अफगाणिस्तानमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी स्पर्धा होती. याची झळ या शहरासही पोहोचली होती. अफगाणिस्तानच्या अंतर्गत वादात १९७९ मध्ये रशियन सैन्य हेरात येथे आलेले होते. १९९५ मध्ये हे तालिबानींच्या ताब्यात होते. 

 

हेरात सुपीक नदीखोऱ्यात वसलेले असून हे खोरे फळांसाठी विशेष प्रसिद्ध आहे. पूर्वीपासूनच हेरात येथे आसमंतातील कृषिमालाची(बाजारपेठ असून येथे हस्तव्यवसाय (रेशीम, लोकर, उंटाच्या केसांच्या वस्तू, रग), सुती कापड, सूत गिरण्या, तांदूळ, पीठ, तेल गिरण्या इ. उद्योग चालतात. हे काराकुल मेंढीची लोकर, मौरी गालिचे, सुकामेवा यांच्या व्यापारात अग्रगण्य आहे. हे रस्त्यांनी इतर मोठमोठ्या शहरांशी जोडलेले असून येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ व सैनिकी तळ आहे. इराणमधीलखाफ ते हेरात असा लोहमार्ग बांधणी प्रस्ताव २००७ मध्ये मंजूर झाला असून लोहमार्ग बांधणी सुरू आहे. 

 

येथे हेरात विद्यापीठ आहे. येथे मस्जीद इ जामी किंवा फ्रायडे मशीद (१२००), १४०४ ते १५०७ मधील गोहर शद्राणी, जामी कवी व तत्त्वज्ञ ख्वाजा अब्दुल अन्सारी यांच्या कबरी, हेरात संग्रहालय, जिहाद संग्रहालय, पार्क इ तराकी, पार्क इ मिलन इ. वास्तू व उद्याने आहेत. 

अमृते, विद्याधर