हेमचंद्र : (१०८८–११७२). बाराव्या शतकातील एक थोर जैन ग्रंथकार. हेमचंद्रसुरी, सोमचंद्र, चांगदेव, चंद्रदेव आदी नावांनी त्यांचा निर्देष वाङ्मयेतिहासात आढळतो. त्यांचा जन्म सुसंस्कृत व सुशिक्षित कुटुंबात धंधूका (गुजरात) येथे झाला. त्यांच्या पूर्वायुष्याविषयी फारशी माहिती ज्ञात नाही तथापि त्याने देवचंद्र या गुरुंपाशी मौजीबंधनोत्तर अध्ययन केले आणि जैन दीक्षा घेतली. 

 

अभिधानचिन्तामणि हा समानार्थ शब्दांचा कोश आहे, त्यावर हेमचंद्राची स्वतःची टीका उपलब्ध आहे. या ग्रंथाची सहा कांडे व १,५४२ श्लोक आहेत. पहिल्या कांडाच्या पहिल्या काही श्लोकांत शब्दांचे तीन प्रकार असल्याचे सांगितले आहे. ते अस– रूढ (आखंडल इत्यादी), यौगिक( नीलकंठ इत्यादी) व मिश्र (गीर्वाण इत्यादी) . शब्दांची जुळणी सहा कांडांत स्थूलमानाने खालील विषयांना अनुसरून केली आहे : (१) जैनांच्या देवता, (२) हिंदूंच्या देवता, (३) मनुष्य लोक, (४) पशुपक्षी, (५) नरकलोक, (६) विशेषणे, निपात वगैरे. जयसिंह सिद्धराज (कार. १०९४–११४३) हा सोळंकी-चालुक्य वंशातील एक श्रेष्ठ व पराक्रमी राजा असून शिवोपासक होता, तरीसुद्धा त्याच्या दरबारात हेमचंद्रासारखे विद्वत जैन पंडित होते. त्याच्यानंतर गादीवर आलेल्या कुमारपाल (कार. ११४३–७२) राजास जैन धर्माची दीक्षा हेमचंद्राने दिली. 

 

अनेकार्थसंग्रहा ची सात कांडे व १८२९ श्लोक आहेत. पहिल्या सहा कांडांत क्रमाने एकस्वर असलेल्या शब्दापासून सहा स्वर असलेले शब्द दिले आहेत. साहजिकच दुसरे व तिसरे कांड (द्विस्वर व त्रिस्वर) बरीच मोठी आहेत. त्यामानाने इतर कांडे लहान आहेत. प्रत्येक कांडात आधी मुख्य शब्द घ्यायचा व मग त्याचे जितके अर्थ असतील ते सांगायचे अशी पद्धत स्वीकारली आहे. (उद्देश्यवचन पूर्व पश्चादर्थ प्रकाशनम्) प्रत्येक कांडांत शब्दंाचा क्रम अकारादी व क, ख इ. व्यंजनात असा ठेवला आहे, ह्या कोशावर हेमचंद्राचा शिष्य महेंद्रसुरि याने गुरूपदेशास अनुसरूनटीका लिहिली आहे. टीकेत शब्दांची व्युत्पती, लिंगनिर्णीत, विषयार्ध-प्रकाशन व दृष्टांत असे चार प्रकारचे विवेचन आहे. 

 

निघण्टुशेष हा कोश त्याच्या नावात सुचविल्याप्रमाणे पुरवणी स्वरूपात आहे. अभिधानचिंतामणि कोशां त तिर्यक्कांडांत वनस्पतिकाय ( श्लोक ११३१–१२०१) नावाचा भाग आहे त्याची निघण्टुशेष ही पुरवणी आहे. ह्या कोशाची देखील वृक्ष, गुल्म, लता, शाक, तृण व धान्य अशी सहा कांडे आहेत. 

 

देशीनाममाला हा ‘देशी’ शब्दांचा कोश आहे. संस्कृतोद्भव नसलेले किंवा संस्कृतोद्भव असूनही एखाद्या विशिष्ट अर्थी संस्कृत वाङ्मयातन आढळणारे शब्द हेमचंद्राच्या मते देशी होत. हे सर्व शब्द बहुतेक ऐतद्देशीय आर्येतर लोकांच्या बोलीभाषेतून प्राकृतांत आले. अशा प्रकारचे ‘अच्छमल्लो’ सारखे शब्द दुसरे कोशकार देशी मानतात पण हेमचंद्र तसे मानीत नाहीत. उलट डोला (सं. दोला), थेरो (सं. स्वविर) ह्यासारखे सहज संस्कृतोद्भव वाटणारे शब्द हेमचंद्रांने देशी म्हणून स्वीकारले आहेत. अशा तर्‍हेने एखादा शब्द देशी मानावयाचा की नाही ह्याविषयी मतभेद आहेत. जिथे एखाद्या शब्दाचे स्वरूप निश्चित नसेल तिथे हेमचंद्राने ‘बहुत-रपुस्तकप्रामाण्य’ आधारभूत मानून त्या शब्दाचे स्वरूप निश्चित केले आहे. कोशाचे एकंदर आठ वर्ग आहेत ते असे : अकारादी स्वरांनी सुरू होणाऱ्या शब्दांचा प्रथम वर्ग, नंतर क वर्गातील व्यंजनांनी सुरू होणाऱ्या शब्दांचा दुसरा वर्ग, नंतर च वर्ग ट वर्ग इत्यादी. प्रत्येक वर्गातील शब्दाची मांडणी आधी सर्वात कमी अक्षरांचे शब्द नंतर त्याहून अधिक अक्षरांचे शब्द अशा प्रकारची आहे. 

 

हेमचंद्राने विपुल ग्रंथ लेखन केले असून त्यात चार कोश आहे. ते असे : अभिधानचिंतामणि, अनेकार्थसंग्रह, निघण्टुशेष व देशीनाममाला, यांपैकी पहिले तीन संस्कृत भाषेत असून चौथा प्राकृत भाषेत आहे. नाट्यशास्त्रावर त्याने लिहिले नाही मात्र त्याचा शिष्य रामचंद्र याने त्याच्या मार्गदर्शनाखाली नाट्यदर्पण हा ग्रंथ लिहिला. हेमचंद्राने छंदोनुशान (११५०) हा संस्कृत, प्राकृत व अपभ्रंश छन्द-वृत्तांवर सविस्तर चर्चा करणारा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाद्वारे त्याने अपभ्रंशभाषा व साहित्य यांना पाठबळ व पावित्र्य मिळवून दिले आहे. यात त्याचा शास्त्रशुद्ध पद्धतीवर भर असून अपभ्रंश साहित्याच्या इतिहासातील तो एक मौलिक ग्रंथ आहे. त्याने हेमचंद्रनामक संप्रदाय (स्कूल) स्थापून शब्दानुशासन हा ग्रंथ अष्टाध्यायी च्या धर्तीवर लिहिला. त्यात प्रत्येकी चार पादांचा एक असे आठ अध्याय असून ४,५०० श्लोक आहेत. यातील शेवटचा अध्याय प्राकृत भाषाविषयक आहे तर काव्यानुशासन हा सूत्र आणि वृत्ती रूपात लिहिलेला ग्रंथ असून तो आठ प्रकरणांत विभागला आहे. तो त्याचास्वतंत्र ग्रंथ नसून ध्वनी, रस, गुणदोष आणि अलंकार यांची मम्मटानेजी चर्चा केली आहे, त्याचे हे भाष्य रूपांतर-संकलन होय. 

मेहेंदळे, म. अ.