हेजॅझ : सौदी अरेबियातील एक इतिहासप्रसिद्ध विभाग.क्षेत्रफळ सु. ३,८८,००० चौ. किमी. हेजॅझ विभागाच्या पश्चिमेस तांबडा समुद्र, पूर्वेस नेज्द व दक्षिणेस असीर हे सौदी अरेबियाचे विभाग वउत्तरेस जॉर्डन देश आहे. हेजॅझ विभाग तांबडा समुद्र किनाऱ्यावर अकाबा आखातापासून दक्षिणेकडे सु. १,१३० किमी. व समुद्र किनाऱ्यापासूनपूर्वेस अंतर्गत भागात सु. १६० किमी. ते ३२० किमी. पर्यंत विस्तारलेला आहे. भूतपूर्व हेजॅझ राज्य म्हणून व इस्लाम धर्मीयांत पवित्र मक्का व मदीना या शहरांमुळे हा विभाग प्रसिद्ध आहे.
हा विभाग पर्वतीय असून यातील समुद्रकिनारी असलेला अरुंद मैदानी भाग तिहामा म्हणून ओळखला जातो. हेजॅझचा अंतर्गत भाग पर्वतीय असून, पर्वतीय भागाची सरासरी उंची ६०० मी. ते ९०० मी. दरम्यान आहे तर काही ठिकाणी ती सु. १,८५० मी. ते २,७०० मी. दरम्यान आढळते. येथील हवामान सामान्यतः उष्ण व कोरडे असते. मे ते सप्टेंबर हाकालावधी अति उष्णतेचा असतो. या भागात मरूद्याने व वाडी (पाण्याचे हंगामी स्रोत) आढळतात. अशा ठिकाणी गहू, बार्ली, मका इ. पिके घेतली जातात व खजुराचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. तसेच येथे उंट, घोडे, शेळ्या, मेंढ्या यांचे पालन करण्यात येते.
हेजॅझचा उत्तर भाग इ. स. पू. सहाव्या शतकाच्या प्रारंभी बॅबिलो-नियात समाविष्ट होता व नंतर तो नाबाटीअन साम्राज्यात (इ. स. पू. १०० ते इ. स. २००) समाविष्ट झाला. नंतर तो १२५८ पर्यंत बगदादच्या खलिफाच्या व तद्नंतर ईजिप्तच्या अखत्यारित होता. इ. स. १५१७ मध्ये हा विभाग तुर्कांनी जिंकून घेतला व येथील कारभार हुसेन घराण्यातील मक्केच्या शेरीफाकडे दिला. एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी वहाबीमुस्लिमांनी येथील पवित्र शहरावर हल्ले केले. दळणवळणाच्या सुविधेसाठी दमास्कस-मदीना या लोहमार्गाची बांधणी केली (१९००–०८). पहिल्या महायुद्धावेळी १९१६ मध्ये शेरीफ हुसेन इब्न अलीने तुर्की सत्तेविरुद्धबंड करून ब्रिटिशांच्या साहाय्याने स्वतःस हेजॅझचा राजा म्हणून घोषित केले. १९२४ मध्ये नज्दचा सुलतान इब्न सौदशी तंटा होऊन शेरीफहुसेन इब्नची येथील सत्ता संपुष्टात आली. इब्न सौदने १९२६ मध्येस्वतःस हेजॅझचा राजा म्हणून घोषित केले. १९३२ मध्ये इब्न सौदच्या नेतृत्वाखाली हेजॅझ, नेज्द आणि इतर जिल्ह्यासह सौदी अरेबिया राज्याची निर्मिती करण्यात आली.
येथील अर्थव्यवस्था सोन्याचे खाणकाम, खनिज तेल साठे, खनिज तेल शुद्धीकरण प्रकल्प व पोलाद उद्योग यांमुळे उत्तरोत्तर विकास पावत गेली. समुद्रकिनारी मासेमारी चालते. येथून खजूर, लोकर, कातडी यांची निर्यात होते. जेद्दा, यान्बू ही या भागातील प्रमुख बंदरे असून जेद्दा येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.
येथे बहुसंख्य लोक अरब मुस्लिम आहेत. या विभागातील इस्लाम धर्माची पवित्र धार्मिक स्थळे मुहम्मद पैगंबरांची जन्मभूमी मक्का व मुहम्मद पैगंबरांची कबर असलेले मदीना ही शहरे इस्लाम धर्मीयांत प्रिय आहेत. दरवर्षी हजारो हज यात्रेकरू या शहरांस भेट देतात. याशिवाय उन्हाळ्यातील आश्रयस्थान म्हणून ताइफ शहर प्रसिद्ध आहे.
गाडे, ना. स.
“