हेंप उद्योग : कॅनाबिस प्रजातीतील काही वनस्पतींची लागवड तंतू (परिकाष्ठ तंतू) किंवा बिया (३०% तेल असलेल्या आणि खाद्यान्न असलेल्या) यांच्या उत्पादनाकरिता करतात. अशा वनस्पतींना हेंप म्हणतात. या वनस्पतीची गल्लत मारिजुआना आणि चरस (हशिश) यांचे उत्पादन करणाऱ्या कॅनाबिस प्रजातीतील वनस्पतींशी काही वेळा होते. तथापि, हेंपकरिता लागवड करण्यात येणाऱ्या वनस्पतीत अत्यल्प प्रमाणात टीएचसी (टेट्राहायड्रोकॅनाबिनॉल) हा मादक पदार्थ असतो. इतर प्रजातीतील वनस्पतींपासूनही हेंपसारखे तंतू मिळतात. कॅनाबिस सॅटिव्हा या वनस्पतीच्या तंतूंची इतर वनस्पतींच्या तंतूंशी तुलना केली जात असल्यामुळे तिला खरे हेंप म्हणण्यात येते. इतर प्रकारांना ज्या ठिकाणी उत्पादन होते, त्या ठिकाणाचे नाव उपपद म्हणून वापरण्यात येते. उदा., इंडियन हेंप, जबलपूर हेंप, बनारस हेंप इत्यादी. ताग या वनस्पतीला कोलकाता हेंप असेही म्हणतात. इंडियन हेंप हा बहुधा कॅनाबिस सॅटिव्हा या वनस्पतीपासून मिळतो. हेंपपासून कागद, कापड, जैवनिम्नीकरण योग्य प्लॅस्टिके, आरोग्या-साठी खाद्ये, इंधन इ. गोष्टींचे उत्पादन होत असल्यामुळे या वनस्पतीला औद्योगिक हेंप असेही म्हणतात. 

 

हेंप फार पूर्वीपासून माहीत असलेल्या आरंभीच्या पिकांपैकी एक पीक आहे. हेंपचे मूलस्थान मध्य आशिया असून चीनमध्ये इ. स. पू. २८०० पासून ती तंतूंकरिता लागवडीत असल्याची नोंद आहे. इ. स. पू. पहिल्या शतकाच्या उत्तरार्धापासून भूमध्य सामुद्रिक प्रदेशांत लागवड करण्यात येत होती. मध्ययुगात संपूर्ण यूरोपात तिचा प्रसार झाला. चिलीमध्ये तिची लागवड पंधराव्या शतकात करण्यात आली, नंतर ती संपूर्ण उत्तर अमेरिकेत पसरली. 

 

तंतूंकरिता करण्यात येणाऱ्या लागवडीतील हेंपची झुडपे २-३ मी. उंचीपर्यंत वाढतात. या वर्षायू वनस्पतीची लागवड बियांपासून केली जाते. वाळूमिश्रित आणि पाण्याचा चांगला निचरा असणाऱ्या जमिनीत पिकाची चांगली वाढ होते. पीक उभे असताना दरमहा ५–७.५ सेंमी. पाऊसपुरेसा असतो. त्यांची लागवड जवळजवळ करीत असल्यास त्यांना ????? फ्लॅक्स प्रमाणे शेंड्यालाच पाने व फांद्या येतात. बियांकरिता किंवा बियांच्या तेलाकरिता किंवा त्यांपासून मादक द्रव्ये तयार करण्याकरिता हेंपची लागवड करण्यात येते, तेव्हा झुडपांमध्ये अंतर ठेवण्यात येते. त्यामुळे तिला पुष्कळ फांद्या आणि बियांच्या शेंगा येतात. 

 

हेंप झुडपाची पाने साधी असून हस्ताकृती असतात. फुले लहान हिरवी–पिवळसर असतात. वनस्पतीची पूर्ण वाढ झाल्यावर अधिकतर उत्पादन प्राप्त होते. पूर्ण वाढ झाल्याची खूण म्हणजे फुलांचा पूर्ण बहर येतो आणि परागकण सहज गळून पडतात. तसेच खोडाच्या खालच्या पानांचा रंग पिवळसर होऊ लागतो. वनस्पती बऱ्याचदा उपटून बाहेर काढत असले, तरी तिची कापणी जमिनीपासून वर २-३ सेंमी. अंतरावर करतात. लागवडीनंतर ९०–१०० दिवसांनी वनस्पती कापणीयोग्य होते. 

 

हेंप खोडापासून धागा काढण्याच्या पद्धतीत स्थानपरत्वे पुष्कळ फरक आढळून येतात. काही ठिकाणी फ्लॅक्सप्रमाणे दवाच्या साहाय्याने कांड्या कुजवितात, तर काही ठिकाणी हिमाच्या साहाय्याने ही क्रिया घडविण्यात येते. सर्वसाधारणपणे ⇨ तागा प्रमाणे हेंपच्या कांड्या कापल्या-बरोबर किंवा उन्हात वाळविल्यानंतर डबक्यांत बुडवून ठेवतात. कुजणेपूर्ण होण्यास किती वेळ ठेवणे योग्य याचेही एक तंत्र असते. कांड्यांपासून तंतू सहज काढता येऊ लागले की, कुजण्याची क्रिया पूर्ण झाली असे समजतात. ही क्रिया पूर्ण न झाल्यास त्यापासून मिळणारे तंतू तोकडेअसतात, तर ही क्रिया जास्त झाल्यास त्यापासून मिळणारे तंतू कमजोर होतात. म्हणून योग्य कालावधीत क्रिया घडविणे याला फार महत्त्व असते. 

 

हेंपच्या कांड्या योग्य तर्‍हेने कुजल्यानंतर त्या हवेत किंवा शुष्कन यंत्रांनी वाळविण्यात येतात. अशा वाळलेल्या कांड्यांपासून हाताच्या साह्याने तंतूंना चिकटलेली साल काढण्यात येते किंवा यंत्राच्या साह्याने कांड्या पिचवून त्यांपासून साल व तंतू वेगळे करण्यात येतात. फ्लॅक्सप्रमाणे लोखंडी दात्यांच्या फण्यांच्या साह्याने विंचरून सालीपासून तंतू निराळे करता येतात. यानंतर हाताने तंतू स्वच्छ केल्यानंतर ते मऊ करण्याकरिता त्यांना लाकडी हातोड्यांनी किंवा यंत्रांच्या साहाय्याने कुटण्यात येते. हे तंतू फ्लॅक्सपेक्षा कमी लवचिक असून पिवळसर, हिरवट, गर्द तपकिरी किंवा करड्या रंगाचे असतात. त्यांना क्वचितच रंग दिला जातो. अशा तंतूंच्या जुडीची लांबी १००–२०० सेंमी. असते आणि ते सायसल तंतूंच्या ३/४ पट बळकट असतात. म्हणजेच दोर तयार करण्याकरिता हेंपचे सायसलच्या खालोखाल महत्त्व आहे. या धाग्यांचा वापर रजया, रग, दोरखंड, कॅन्व्हास आदी बनविण्यासाठी करतात. इटलीत हेंपवर विशेष प्रक्रिया करून लिननसारख्या दर्जाचे कापड बनविले जाते. एकोणिसाव्या शतका-पूर्वी हेंपला दोर व पोती बनविण्याकरिता पुष्कळ मागणी असे. तथापि ताग, कापूस, सायसल इ. उपयोगात येऊ लागल्यापासून हेंपचे महत्त्व कमी झाले. 

 

हेंप तंतूमधील कोशिकांची लांबी ०.५–५.५ सेंमी. एवढी असूशकते. तथापि, त्यांची सरासरी लांबी १.९० सेंमी. असते. त्यांचा आकार लंबवर्तुळ पृष्ठभागावर जोड असल्यासारखा खडबडीत तडे गेलेला वकाही ठिकाणी फुगलेला असतो. त्यांचा आडवा छेद बहुकोनी परंतुगुळगुळीत कडांचा असतो. त्याचा व्यास १६–५० मायक्रॉन (१ मायक्रॉन = १०?४ सेंमी.) असतो, तर कोशिकांची टोके बोथट असून काही वेळा तेथे शाखा फुटलेल्या दिसतात. हे तंतू सेल्युलोज व लिग्नोसेल्युलोज यांचे बनलेले असतात. या तंतूंवरील रंगाची छटा लिग्नोसेल्युलोजामुळे आलेली संभवते. 


 

अनेक वेळा फ्लॅक्स व हेंप यांमधील फरक कळू शकत नाही.तथापि, पुढील गुणधर्मांवरून त्यांची परीक्षा केली जाते : (१) हेंपच्या कोशिकांची टोके बोथट असून त्यांपासून शाखा निघालेल्या असतात. फ्लॅक्सच्या कोशिकांमध्ये असे कधीही दिसत नाही. (२) आयोडीन--सल्फ्युरिक अम्ल या विक्रियाकारकाच्या क्रियेमुळे कोशिकांची स्तरमय रचना व हिरवी जांभळी छटा दिसते, तर फ्लॅक्सवर त्यामुळे निळा रंगयेतो. (३) हेंपचे तंतू फ्लॅक्सएवढे पारदर्शक नसतात आणि कोशिकां-मधील पोकळी सहज दिसत नाही. (४) त्यांचे आडवे छेद सूक्ष्मदर्शकातून अगदी वेगळे दिसतात. 

 

हेंप पिकाचे उत्पादन खाद्य आणि अखाद्य पदार्थांकरिता केले जाते. हेंपचे पोषणासंबंधी अनेक फायदे माहीत झाल्यामुळे अनेक नवीन खाद्यपदार्थांमध्ये हेंप बिया आणि त्यांचे तेल यांचा वापर करण्यातयेतो. उदा., पास्ता हा इटालियन पदार्थ, टॉर्टिल्ला हा गोल मेक्सिकनपाव, सॅलडसाठी वापरायचा सॉस, स्नॅक पदार्थ आणि गोठविलेले डेझर्ट( जेवणानंतर खायचा गोड पदार्थ) . हेंप मिल्क पेयामध्ये ओमेगा-३ आवश्यक वसाम्ले आणि प्रथिने मिळतात. हेंप तेलाचा वापर पोषकद्रव्ये आणि आरोग्याला हितकारक पदार्थ यांमध्ये केला जातो. नैसर्गिक तंतू म्हणून हेंप तंतूंचे मोठ्या प्रमाणात उत्पादन कापड उद्योग आणि मोटारगाडी उद्योगातील संमिश्र द्रव्ये यांमुळे होत आहे. 

 

हेंप बियांचा वापर प्रत्यक्षपणे खाद्यपदार्थांतील घटकद्रव्य म्हणून केला जातो. बियांपासून तेल काढतात. बिया पक्ष्यांच्या खाद्यातही वापरतात. कॅनडामधून अमेरिकेला (अ. सं. सं) हेंप बियांच्या पदार्थांचा पुरवठा सर्वाधिक केला जातो. हेंप बियांमध्ये सु. ४५% तेल, ३५% प्रथिन आणि १०% कार्बोहायड्रेटे व १०% तंतू असतात. 

 

हेंप वृंत्ताचा बाहेरील पृष्ठभाग म्हणजे हेंप परिकाष्ठ असून यापासून सर्वांत लांब तंतू मिळतात आणि त्यांचा वापर कापडाकरिता करतात. हेंपमधील वृंत्ताच्या आतील काष्ठ भागापासून कमी लांबीचे तंतू मिळतात आणि ते अतिशय शोषक असल्यामुळे पाळीव प्राण्यांच्या बिछान्याकरिता उत्कृष्ट असतात. मौल्यवान बाह्य हेंप तंतू आतील तंतूंपासून वेगळे करण्या-करिता विशेष यंत्रसामग्रीची आवश्यकता असते. हेंप तंतूंपासून तयार करण्यात येणारे काही सर्वसामान्य उत्पादने म्हणजे सिगारेटचा कागद, कागदी चलन (नोटा), तांत्रिक निस्यंदक आणि आरोग्यास हितावह अशा वस्तू, तसेच चित्रकलेचे कागद आणि चहाच्या पिशव्या. कार आणि ऊष्मीय निरोधन यांकरिता प्लॅस्टिक संमिश्र द्रव्ये ही इतर महत्त्वाची उत्पादने आहेत. प्रसिद्ध यूरोपियन कंपन्या (उदा., मर्सिडिज-बेंझ आणि बीएम-डब्ल्यू) कारचे आतील भागांकरिता (दरवाजांची तावदाने आणि चालका-समोरील विविध प्रकारचे फलक) हेंपचा वापर करतात. अमेरिकनमोटार उद्योग पुरवठादारांनी हेंपपासून मजबूत, हलके आणि तुलनात्मक स्वस्त असे संमिश्र द्रव्यांचे भाग तयार करण्यास सुरुवात केली आहे.चीन हा देश हेंप कापड उद्योगाकरिता अमेरिकेला हेंप तंतूंचा जास्तीतजास्त पुरवठा करतो. 

 

हेंप बियांच्या तेलाची मागणी आरोग्य सुरक्षित राखणाऱ्या पदार्थां-करिता जलद वाढत आहे. धावन द्रव (शांपू), ओष्ठ मलम, अनुकूलक द्रव्य, साबण आणि केस काढण्याची उत्पादने यांमध्ये वापरण्यात येणारी उत्तम अशी घटकद्रव्ये हेंप तेलापासून तयार करतात. 

 

जागतिक हेंप उत्पादन : सर्व जगभर हेंपसंबंधी संशोधन व विकास होत असून त्यांचा वापर होणाऱ्यावीन गोष्टींत वाढ होतआहे. अमेरिकेची संयुक्त संस्थाने व इतर ३० पेक्षा अधिक देशांनी औद्योगिक हेंपची वाढ आणि प्रक्रिया चालू ठेवली आहे. कॅनडा, जर्मनी, इंग्लंड आणि फ्रान्स हे हेंप उत्पादन करणारे अग्रेसर देश आहेत. 

 

भारतात पहिली वार्षिक आंतरराष्ट्रीय हेंप परिषद न्यू दिल्ली येथे१ मार्च २०१५ रोजी झाली. ही परिषद भारतीय औद्योगिक हेंप संघटना (IIHA) या संस्थेने वर्ल्ड ॲसोसिएशन फॉर स्मॉल अँड मेडियम एंटरप्रायझेस (WASME), यूरोपियन इंडस्ट्रियल हेंप ॲसोसिएशन (EIHA), हेंप फूड्स (ऑस्ट्रेलिया) आणि हेंप एज यांच्या सहकार्याने भरविण्यात आली. या परिषदेत खालील कार्यक्रमांच्या सूचीप्रमाणे विचारविनिमय झाले

 

(१) संपूर्ण जगातील औद्योगिक हेंपची सांख्यिकीय सामग्री, (२) इंडियन इंटरनॅशनल हेंप ॲसोसिएशन (खखकअ) या संस्थेचे कार्य वविकास, (३) भारताच्या आर्थिक आणि कृषी विकास यांकरिता औद्योगिक हेंप, (४) पारंपरिक पीक विरुद्ध नवीन पीक, (५) औद्योगिक हेंप तंतू, बांधकाम आणि खाद्यान्न, (६) औद्योगिक हेंपच्या वैद्यकीय वापराचे फायदे, (७) बहुद्देशीय वाटाघाटींचे महत्त्व, (८) हेंप अर्थव्यवस्थेमध्ये शासनाने घेतलेल्या उपायांची भूमिका. 

वाघ, नितिन भरत