कारखाना : कोणत्याही वस्तूवर प्रक्रिया करण्यासाठी किंवा विक्रीच्या वस्तू बनविण्यासाठी जेथे दहा किंवा जास्त कामगार लावून यांत्रिक शक्तीच्या मदतीने काम केले जाते किंवा जेथे यांत्रिक शक्ती न वापरता वीस किंवा अधिक कामगार असतात, त्या कर्मशालेला भारतीय कारखाना अधिनियमानुसार कारखाना म्हणतात.  

यंत्रयुग सुरू होण्यापूर्वी बहुतेक धंदे कौटुंबिक स्वरूपाचे किंवा खाजगी मालकीचे होते व तेथे सर्व कामे अंगमेहनतीनेच होत असत. यंत्रयुग सुरू झाल्यावर यंत्रे व यांत्रिक शक्तीच्या मदतीने काम होऊ लागले. ही साधने घेण्यास भांडवलाची जरूरी होती व भांडवलदारच ती घेऊ शकत असे. अशा भांडवलदार मग मजूर नोकरीला ठेवून त्यांच्याकडून काम करवून घेई व स्वतः इतर कामे बघत असे. अशा तऱ्हेने हळूहळू कारखाने अस्तित्वात आले. कामगाराचे शरीरिक श्रम कमी होऊन त्याला जास्त उत्पादन करता येऊ लागले. त्यामुळे कारखान्यात तयार होणारा माल पूर्वीपेक्षा स्वस्त मिळू लागला. यंत्रयुग सुरू झाल्यावर काही वर्षे कोणत्याही प्रकारचे सरकारी नियंत्रण नसल्यामुळे कारखान्यांचे मालक कामगारांच्या हिताकडे फारसे लक्ष देत नसत. बहुतेक कारखाने गावातील स्वस्त व गलिच्छ भागात असत. कारखान्यातील संवातन (हवा खेळती ठेवण्याची व्यवस्था, वायुवीजन) समाधानकारक नसे व यंत्रांची रचना व मांडणी बिनधोक नसे. कामगारांना दररोज बारा तास काम करावे लागे व त्यांच्या नोकरीचीही शाश्वती नसे. त्यामुळे कामगारांची स्थिती फार केविलवाणी होती.

कारखाना अधिनियम : कामगारांच्या स्थितीसंबंधी इंग्लंडमध्ये व भारतातही वर्तमानपत्रातून अनेक तक्रारी येऊ लागल्या. याच सुमारास म्हणजे १८७३ साली मेजर मुर यांनी मुंबईच्या कापड गिरणी उद्योगासंबंधी एक अहवाल प्रसिद्ध केला. त्यामध्ये कारखान्यात काम करणाऱ्या स्त्रिया व लहान मुलांच्या वाईट स्थितीसंबंधी बरीच माहिती होती. या सर्वांचा परिणाम होऊन हिंदुस्थान सरकारने १८८१ साली कारखान्यासंबंधीचे पहिले अधिनियम प्रसिद्ध केले. त्या अन्वये कारखान्यात काम करणाऱ्या मुलांचे कमीतकमी वय ८ वर्षे ठरविण्यात आले व त्यांच्या कामांचे तास ९ करण्यात आले. १९११ साली या अधिनियमातत सुधारणा होऊन कारखान्यातील सर्व लोकांना दर आठवड्याला एक दिवस सुट्‌टी मिळू लागली, स्त्रियांच्या कामाचे तास ११ करण्यात आले व त्यांना १ / तासाची मधील सुट्‌टी मिळू लागली. स्त्रियांना आणि मुलांना रात्रीची पाळी बंद केली गेली. लहान मुलांचे किमान वय ९ करण्यात आले व त्यांच्या कामाचे तास ७ केले गेले. १९३८– ४८ या काळात या अधिनियमात आणखी अनेक सुधारणा झाल्या व १९४९ पासून हल्ली चालू असलेले अधिनियम अंमलात आले. या अधिनियमांप्रमाणे लहान मुलांचे कमीतकमी वय १४ वर्षे करण्यात आले व त्यांच्या कामाचे तास ४ /२ ठरविण्यात आले. मोठ्या माणसाचे दररोजचे तास फारतर ९ व आठवडयाचे तास ४८ ठरविण्यात आले आणि त्यांना दर आठवड्याला एक याप्रमाणे महिन्यातून चार सुट्ट्या सक्तीच्या करण्यात आल्या.

या अधिनियमांप्रमाणे प्रत्येक कारखाना राज्य सरकारकडे नोंदवला पाहिजे व सरकारने केलेल्या नियमांचे कारखान्याच्या व्यवस्थापकाने योग्य पालन केले पाहिजे. प्रत्येक कारखान्यात काम करीत असलेल्या सर्व कामगारांची नोंद ठेवली पाहिजे आणि ती नोंद सरकारी पर्यवेक्षकाला केव्हाही पाहता आली पाहिजे. कारखान्याच्या कामासंबंधी दर सहामाही व वार्षिक अहवाल राज्य सरकारच्या मुख्य पर्यवेक्षक अधिकाऱ्याकडे पाठविला पाहिजे.

या अधिनियमात कारखान्यातील प्रकाश, संवातन, सुरक्षितता, आरोग्य व कल्याणकारी सेवा यासंबंधीचे नियम अंतर्भूत केलेले आहेत. सर्व कारखाना दररोज साफ करून स्वच्छ राखला पाहिजे व कारखान्यातील कचरा व सांडपाणी ठराविक जागी टाकले पाहिजे. माणसांना धोका पोहोचणार नाही अशा तऱ्हेने सर्व यंत्रसामग्री ठेवली पाहिजे. कारखान्यात संवातन चांगले असले पाहिजे व जरूर तेथे आग विझविण्याचे साहित्य तयार ठेवले पाहिजे. कामगारांसाठी अंग धुण्याची सोय, कपडे ठेवण्याची आणि वाळविण्याची जागा, विश्रांती घेण्याची जागा राखून ठेवली पाहिजे. स्त्रिया व पुरूष यांच्यासाठी स्वतंत्र पुरेशा मुताऱ्या व संडास बांधले पाहिजेत. पिण्याच्या शुद्ध पाण्याचा साठा ठेवला पाहिजे व प्राथमिक वैद्यकीय मदत मिळण्याची सोय केली पाहिजे. ज्या कारखान्यात ५० पेक्षा जास्त स्त्रिया काम करीत असतील तेथे ६ वर्षाखालील मुलांना संभाळण्यासाठी स्वतंत्र जागा ठेवली पाहिजे. प्रत्येक कामगाराला ठराविक मूळ पगार व महागाई भत्ता दिला पाहिजे. २५० पेक्षा जास्त कामगार असलेल्या कारखान्यात कॅंटीन ठेवले पाहिजे. कामगारांच्या प्रकृतीस अपायकारक होऊ शकणाऱ्या गोष्टी म्हणजे विषारी किंवा स्फोटक वायू, अम्ले, धूळ, विषाणू (व्हायरस), सूक्ष्मजंतू, जास्त किंवा कमी दाबाच्या हवेचे वातावरण, अतिशय जास्त किंवा कमी उजेड, फार जास्त किंवा फार कमी तपमान व आर्द्रता, अतिशय शारीरिक श्रम पडणारे काम या होत. यांपासून कामगारांचे नुकसान होणार नाही याबद्दल काळजी घेतली पाहिजे [àऔद्योगिक धोके].

कारखान्याची मालकी एका माणसाकडे, दोन किंवा अधिक भगिदारांमध्ये मर्यादित जबाबदारी असणाऱ्या भागधारकांच्या कंपनीकडे किंवा सरकारकडेही असू शकते. कारखान्याचा मालक कारखान्यातील मुख्य अधिकाऱ्याचे काम करू शकतो किंवा त्यासाठी दुसऱ्या माणसाची नेमणूक करू शकतो.


कारखान्याची जागा व इमारत : कारखान्याची जागा निवडताना कच्चा माल, इंधन, विद्युत् शक्ती, पाणी, रस्ते, कारागीर व मजूर मिळण्याची सोय पक्का माल विकण्याची बाजारपेठ, वाहतुकीची साधने अशा अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. यंत्रसामग्री बसवण्याच्या दृष्टीने व सामानाची ने आण करण्याच्या दृष्टीने कारखान्याची इमारत एकमजली ठेवणे सोईचे असते. परंतु पिठाचे, रंगाचे व काही रसायनांचे कारखाने अनेक मजली इमारतींत असतात. महाग व अपुऱ्या जागेमुळे यंत्रसामग्री असणाऱ्या कारखान्यांच्याही इमारती अनेक मजली कराव्या लागतात. अशा कारखान्यांत कच्चा माल यांत्रिक शक्तीने सर्वांत वरच्या मजल्यावर नेतात आणि तयार होणारा पक्का माल गुरुत्वाने खालच्या मजल्यावर येतो.

कोष्टक क्र. १. भारतातील कारखान्यांतील कामगारांची प्रतिदिनी संख्या 

राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश 

प्रतिदिनी कामगारांची सरासरी संख्या (हजारात) 

 

१९६९ 

१९७० 

अंदमान व निकोबार 

३ 

आंध्र प्रदेश

२५८

२५९

आसाम

८०

७८

उत्तर प्रदेश

३९९

४१९

ओरिसा

७१

७५

कर्नाटक

२६०

२७७

केरळ

२०५

२०७

गुजरात

४१५

४३८

गोवा, दमण व दीव

चंडीगढ

जम्मू व काश्मीर

११

तमिळनाडू

४२१

४४७

त्रिपुरा

दिल्ली

९२

९४

पंजाब

१०६

११७

प. बंगाल

८२३

८४०

पाँडिचेरी

१०

१२

बिहार

२६२

२७९

मणिपूर

मध्य प्रदेश

२१३

२१६

महाराष्ट्र

९७८

१,००३

राजस्थान

८३

८५

हरियाणा

८२

८९

हिमाचल प्रदेश

१०

११

कामगारांचे प्रशिक्षण : मोठ्या कारखान्यात काम करणाऱ्या तरुणांचे तांत्रिक ज्ञान वाढविण्यासाठी व त्यांना वरचा दर्जा मिळण्यास मदत व्हावी म्हणून शिक्षणक्रम आखलेले असतात. अशा शिक्षणाचे वर्ग कामाच्या वेळेनंतर भरवतात. अभियांत्रिकी विषयाचे शिक्षण घेत असलेल्या बाहेरच्या तांत्रिक विद्यालयातील आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळण्यासाठी मोठ्या कारखान्यात शिकाऊ उमेदवार म्हणून काम करण्याची सोय करतात [àकामगार प्रशिक्षण].

भारतातील कारखाने : भारतातील उद्योगाच्या १९६९ साली केलेल्या वार्षिक पाहणीनुसार भारतात १३,०८४ नोंदलेले कारखाने होते. या कारखान्यांत यांत्रिक शक्तीच्या मदतीने काम करणारे व ५० वा त्याहून अधिक कामगार असलेलले आणि यांत्रिक शक्ती न वापरणारे व १०० वा अधिक कामगार असणारे कारखाने यांचा समावेश आहे. ह्या कारखान्यांपैकी १२,६४८ कारखान्यांनीच आवश्यक ती माहिती पुरविली होती. या कारखान्यांचे भांडवल ९,८९४·५ कोटी रु. होते व त्यांत ४१·४ लक्ष कामगार होते. त्यांना देण्यात आलेले वेतन व इतर फायदे १,३३१·१ कोटी रु. इतके होते. या पाहणीनुसार सर्वांत जास्त कारखाने महाराष्ट्र, प.बंगाल, तमिळनाडू, गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार आणि कर्नाटक या राज्यांत होते. या सात राज्यांत मिळून माहिती पुरविणारे कारखाने ६७·५१%, भांडवल ६९·६९ % व कामगार ७२·८८% होते. 


१९७१ साली प्रत्येक दिवशी सरासरीने ५०·०३ लक्ष कामगार कारखान्यात काम करीत होते असा अंदाज आहे. १९६९ व ७० सालांतील राज्यवार कामगारांची प्रतिदिनी संख्या कोष्टक क्र.१ मध्ये दिलेली आहे.

कोष्टक क्र.२ मध्ये दरमहा ४०० रु. पेक्षा कमी वेतन असणाऱ्या कामगारांची वार्षिंक सरासरी मिळकत राज्यवार दिलेली आहे. यात रेल्वे कर्मशाला, खाद्यपदार्थ, पेये व तंबाखू तसेच कापडाच्या गाठी बांधणे आणि कापसातील सरकी काढणे या उद्योगांतील कामगारांच्या माहितीचा समावेश केलेला नाही. मात्र यात संरक्षणोपयोगी उद्योगातील कामगारांचा समावेश आहे.  

 कोष्टक क्र. १. भारतातील कारखान्यांतील कामगारांची वार्षिक सरासरी मिळकत (रुपयांमध्ये) 

राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश 

प्रतिदिनी कामगारांची सरासरी संख्या (हजारात) 

 

१९६९ 

१९७० 

अंदमान व निकोबार 

२,०२४

२,१७० 

आंध्र प्रदेश

२,०८८

२,११७

आसाम

२,३४०

२,३६३

उत्तर प्रदेश

२,२००

२,२९३

ओरिसा

२,१४३

२,८९९

कर्नाटक

२,०८८

२,८८१

केरळ

२,४६७

२,४१९

गुजरात

२,६४३

२,८२०

गोवा, दमण व दीव

२,०७५

२,३०५

जम्मू व काश्मीर

१,८०५

१,६३०

तमिळनाडू

२,४४२

२,५८३

त्रिपुरा

२,०१०

२,२२३

दिल्ली

३,०१३

२,८४५

पंजाब

२,०७०

२,१५९

प. बंगाल

२,६७५

२,७६१

पाँडिचेरी

२,४२७

बिहार

२,४८६

२,७१२

मध्य प्रदेश

२,९३९

२,९१२

महाराष्ट्र

२,९०३

३,०३०

राजस्थान

२,००३

२,४८६

हरियाणा

२,४३६

२,५९७

हिमाचल प्रदेश

२,५२१

२,६९१

  

पहा : औद्योगिक वैधक कामगार कल्याण कामगार कायदे कामगार संघटना कामाचे तास 

ओक, वा.रा.