तवकीर : (आरारूट हिं. तिकोरा, तिल्हूरू, तिखुर, क. तवकिल–दहिट्टु, कूवे सं. तवक्षीर इं. त्रावणकोर स्टार्च). ह्या नावाने बाजारात मिळणारा पिठूळ पदार्थ ज्या वनस्पतीपासून काढतात, तिचे इंग्रजी नाव ईस्ट इंडियन ॲरोरूट व लॅटिन नाव कुर्कुमा अंगुस्तीफोलिया असून तिचा समावेश झिंजिबरेसी ह्या एकदलिकित कुलात केला जातो. ही सु. ४० सेंमी. उंचीची लहान, अनेक वर्षे जगणारी ओषधी [→ ओषधि] हळदीप्रमाणे दिसते व त्याच वंशातील असल्याने अनेक शारीरिक लक्षणे तशीच व कदली गणात वर्णिल्याप्रमाणे आहेत [→ सिटॅमिनी]. हिचा नैसर्गिक प्रसार मध्य हिमालयी भाग, मध्य भारतातील डोंगराळ भाग, प. बिहार, उ. बंगाल ते महाराष्ट्र व दक्षिण भारत या प्रदेशांत आहे. ही थोड्या प्रमाणात लागवडीत आढळते. हिचे जमिनीत वाढणारे जाडजूड खोड अगर गड्डा (मुलक्षोड) लहान असून त्याचा गाभा पांढरा असतो. पाने आखूड देठाची, लांबट, भाल्यासारखी, तळाशी निमुळती व प्रकुंचित (निमुळत्या टोकाची) असतात. हिला पिवळीजर्द फुले दाट वासंतिक कणिशात येतात. नंतर गुळगुळीत गोड आठळी फळे येतात. गड्डा शामक आणि पौष्टिक असून त्यातील स्टार्च ⇨आरारूटऐवजी वापरतात त्याला त्रावणकोर स्टार्च म्हणतात. तो पचनास हलका व पौष्टिक असून अतिसार, संग्रहणी, आमांश इ. विकारांत त्याची पेज देतात तो मुलांना मानवतो.
हिच्या लागवडीकरता थंड व ओलसर हवामान लागते आणि सु. ४५० मी. पर्यंतच्या उंचीवर लागवड करतात. साधारणपणे शरद ऋतूच्या शेवटी हिचे गड्डे पेरतात व मधूनमधून कोरडी हवा असेल त्या वेळी पाणी देतात. जानेवारीपर्यंत नवीन गड्डे तयार होऊन पीक उपलब्ध होते. तमिळनाडूत हेक्टरी सु. पाच हजार किग्रॅ. गड्डे प्रयोगादाखल केलेल्या लागवडीत उपलब्ध झाले आहेत. हे गड्डे प्रथम स्वच्छ धुऊन त्यांचा लगदा करतात आणि तो पुनःपुन्हा धुऊन व कापडातून गाळून स्टार्च वेगळा करतात. त्यानंतर कडक उन्हात वाळवून त्याचे पीठ करतात, ते सु. १२·५% भरते. या पिठातील कण मोठे, लांबट, दंडगोलाकृती किंवा पेरूच्या आकाराचे असून पचनास सुलभ असल्याने लहान मुले व दुबळी माणसे यांना फार उपयुक्त असते त्यामध्ये तांदळाचे, रताळ्याचे किंवा ⇨टॅपिओकाचे पीठ मिसळून (भेसळ करून) विकले जाते.
परांडेकर, शं. आ.