तंबोरा

तंबोरा : भारतीय संगीतपद्धतीतील गायन–वादनात आधारस्वर सारखा छेडण्याचे तंतुवाद्य ‘तुंब’ किंवा ‘तुंबरू’ यांपासून तंबोरा हे नाव आले असावे. त्यास ‘तानपुरा’, ‘तंबुरा’ ही अन्य नावेही आहेत. हे वाद्य नवव्या शतकानंतर वापरात आले असावे. या वाद्याचे प्रमुख भाग पुढीलप्रमाणे होत : (१) कोरीव लाकडी अर्धगोलाकार (तंजावर–प्रकारात) किंवा कापलेला पाऊण भोपळा (मिरज–प्रकारात), त्यावरील फुगीर, ध्वनिरंध्रे असलेली लाकडी पाटी म्हणजे नादपट, (२) त्याला गळ्याने जोडलेली पोकळ लाकडी दांडी, (३) तिच्या वरच्या टोकाजवळच्या, तारांच्यासाठी दोन हस्तिदंती अटी, (४) तारा मिळविण्याकरिता दांडीवर दोन व बाजूंना एकेक अशा चार खुंट्या, (५) तारा खाली गुंतविण्यासाठी हस्तिदंती अचल तारदान, (६) लाकडी किंवा हस्तिदंती घोडी, (७) सूक्ष्म स्वरमेलनासाठी तारदान व घोडीमधील तारांतील ओवलेले सरकते मणी आणि (८) स्वर–अनुरणनासाठी घोडीवर, तारांखाली घातलेले कापूस किंवा लोकरीचे धागे (जव्हारी किंवा जिव्हाळी). यांशिवाय तंजावर–प्रकारात सोप्या स्वरमेलनासाठी सरकती घोडी वापरतात. तंबोरा उभा किंवा आडवा ठेवून वाजवितात. वादनक्रमाप्रमाणे पहिली तार पंचमाची, पंचमवर्ज्य रागासाठी मध्यमाची, क्वचित निषादाची असते तर दुसरी आणि तिसरी षड्जाची व चौथी मंद्र–षड्जाची असते. मधल्या बोटाने पहिली तार तर्जनीने बाकीच्या तारा छेडतात. मिरज, रामपूर, लखनौ, तंजावर, त्रिवेंद्रम, म्हैसूर ही या वाद्याची प्रमुख निर्मितीकेंद्रे आहेत. साततारी, आठतारी आणि आपोआप वाजणारा स्ववादित तंबोरा ही याची आधुनिक रूपे होत.

गोंधळेकर, ज. द.