वेळूची ढाल

ढाल : शस्त्राघातापासून संरक्षण करण्याचे साधन. ढाल गेली सु. ६००० वर्षे प्रचारात आहे. ⇨ चिलखत  व शिरस्त्राण या शरीरसंरक्षक साधनांच्या वर्गात ढाल मोडते. सर्व शरीराचे रक्षण करू शकेल एवढी मोठी व मजबूत ढाल असेल, तर तिच्यामुळे मात्र झटपट हालचाल करणे जिकिरीचे ठरते परंतु ती जर फार हलकी व लहान असेल, तर संरक्षण करण्यास ती अपुरी पडते. शिवाय एका हातात ढाल असल्यामुळे दुसऱ्या एकाच हाताने केलेले आघात जोरदार होत नाहीत. अंगावर पूर्ण चिलखत वा कवच असल्यास ढालीची गरज भासत नाही. पंधराव्या शतकापासून यूरोपात बंदुकी-तोफांचा वापर सुरू झाल्यावर ढालींची उपयुक्तता संपुष्टात आली. पौर्वात्य देशांत व भारतात मात्र अठराव्या शतकाअखेरही ढालीचा वापर चालू राहिला. ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात ढाली नव्हत्या.

लाखेचे रोगण दिलेली कातडी ढाल.

कठीण पृष्ठभाग, ढाल धरण्यासाठी पकड व ढालीचा सांगाडा असे ढालीचे तीन भाग पडतात. तिचे आकारही निरनिराळे असतात. उदा., चौकोनी, अर्धगोलाकार, दुकोनी अर्धगोलाकार, त्रिकोणी, इंग्रजी आठ (8) या अक्षराकारयुक्त असलेली, सपाट (फलक) असे ढालीचे विविध आकार आढळतात. प्रत्येक आकारामागे कोणते तरी वैशिष्ट्य आहे. प्राचीन काळी ढालीचा पृष्ठभाग (आघातरोधकासाठी) गेंडा, कासव, हत्ती, बैल, वाघ या जनावरांची कातडी, लाकूड, बांबू, वेत व धातूंचे पत्रे यांचा वापर केला जात असे. हल्ली मात्र प्लॅस्टिक पत्रे, वेत, बांबू यांचाही वापर होऊ लागला आहे. पोलीसी ढाली बहुधा यांच्याच बनविलेल्या असतात. ⇨ तलवारीच्या वारामुळे कातडे, बांबू किंवा वेत एकदम दुभंगत नाही. माराचा वेग जिरवून घेण्याची क्षमता त्यांच्यात असते तसेच तांबे–पितळ या धातूंतही ती क्षमता आढळते.

कोफ्तगारी नक्षी केलेली पोलादी ढाल.

ढाल पंजात धरता यावी म्हणून तिला गादीसारख्या नरम चामडी मुठी ठेवतात. ती खांद्यावर लटकविण्यासाठी तिला पट्टे असतात. ढालीचा सांगाडा लाकडी, बांबूचा वा धातूचा असतो. सांगाड्यावर पृष्ठावरण चढविले जाऊन त्यात वररोगण लावण्यात येते, तसेच या पृष्ठभागावर शंक्वाकार गुटणेदेखील ठोकतात. हा पृष्ठभाग जितका गुळगुळीत आणि ढाळदार असेल तितके शस्त्रास्त्रांचे आघात निसटते होतात. यामुळेच मराठ्यांच्या गुळगुळीत ढालींवर गोळी आदळली, तर ती निसटून उडून जाई. लांब, चौकोनी व अर्धगोलाकार स्वरूपाच्या वा तत्सम लांब ढालीमुळे योद्ध्याचे गळ्यापासून पावलापर्यंत शरीररक्षण होते. अशी ढाल बिनचिलखती पायदळ सैनिकांसाठी असते. ढालीच्या खोबणींतून भाले पुढे घुसविता येतात. ढालींची तटबंदीदेखील उभी करता येते. घोडेस्वार हा चिलखतधारी असल्यामुळे त्याच्या ढाली आकाराने लहान असतात, त्यामुळे अशा ढालींपासून फक्त त्याच्या तोंडाचेच रक्षण होऊ शकते. ढालीचा पृष्टभाग त्रिकोणी व टोकदार ठेवल्यास त्यावरून शस्त्रांचे वार घसरतात. मात्र हे वार चुकविण्यासाठी लहान ढालीला फिरवावे लागते. ॲसिरियन सैनिक (इ. स. पू. १०००–६००) इरल्याच्या आकाराच्या ढाली वापरीत. अशा अवजड लांब व आकाराने मोठ्या ढाली वाहण्यास व धरण्यास त्याकाळी लढाऊ सैनिकांबरोबर साहाय्यक ठेवले जात असत. वेढ्याच्या कामासाठी धातूचा पत्रा लावलेल्या लाकडाच्या लांबरुंद ढालीही प्राचीन काळी वापरात होत्या. अशा फलक ढालींचा वापर शिवाजी महाराजांच्या सेनेने वेढ्यांच्या वेळी केल्याचे उल्लेख कागदोपत्री सापडतात. सामूहिकपणे डोक्यावर पुढे, मागे व बाजूला ढाली धरून चालताना नरदुर्ग किंवा कूर्मव्यूह रचता येतो. रोमन योद्धे वेढ्यासाठी असा कूर्मव्यूह वापरीत. महाभारतातदेखील कूर्मव्यूहाचे उल्लेख आहेत.

गेंड्याच्या कातड्याची ढाल

सोन्याचा मुलामा दिलेली लोखंडी ढाल.

प्राचीन काळात ढालीचा वापर होत असे.वैदिक वाङ्‌मय, अर्थशास्त्र  वा महाभारतादी प्राचीन साहित्यात चर्म्, शरावर, खेटक, फलक, फलरू या नावांनी ढालीचे उल्लेख केलेले आहेत. अजिंठा लेण्यांत त्रिकोणी, अर्धवर्तुळाकार, चौकोनी व लहान गोल (घोडेस्वार) ढालींची चित्रे आढळतात. अर्धवर्तुळाकार चौकोनी ढाली ॲसिरियन सैनिकही वापरीत असत. मोगलकालीन ढालीची माहिती आईन-इ-अकबरीत मिळते. बादशाहाचे अंगरक्षक ‘चिरवा’ व ‘तिलवा’ ढाली वापरीत. ‘फरी’ ही लहान ढाल वेत किंवा बांबूंची केलेली असे. ‘खेडा’ ढाल द्वंद्वयुद्धासाठी वापरण्यात येई. पन्नास रुपये ते चार मोहोर अशी ढालींची किंमत त्या काळी पडे. सांबर, रेडा, नीलगाय, हत्ती व गेंडा यांच्या कातड्याचा उपयोगही ढालीसाठी केला जाई. ढालींना रोगण देऊन त्यावर नक्षीकाम करण्यात येई. तसेच ढालीच्या पृष्ठभागावर पितळेचे टोकदार गुटणेही लावीत. अफताबे आलम्, रोशनी आलम्, सायरे आलम् अशी विविध नावे औरंगजेबाच्या ढालींना दिलेली आढळतात. गंगाजमनी नक्षीकामासाठी राजपूती ढाली प्रसिद्ध आहेत. मराठ्यांच्या ढाली गेंड्यांच्या कातड्याच्या असत. त्यांचा पृष्ठभाग अतिशय गुळगुळीत असे.  शिखांचे गुरू गोविंदसिंग यांच्या शस्त्रनाममालेत ढालीचा उल्लेख नसला, तरी शीख खालसा गेंडा आणि रेडा यांच्या कातडीच्या ढाली वापरीत. गुजरात आणि सियालकोट येथील ढाली सैनिकांना फार प्रिय असत.


भारतात गोल ढालींचाच अधिक वापर असे. या ढालींचा व्यास ३६ ते ६५ सेंमी. पर्यंत असे. ढालीवर गंगा-जमना किंवा कोफ्तगारी नक्षीकाम केलेले असे. तसेच सोनेरी फुले व शिकारींची चित्रेही काढलेली असत. सुमेरियन सैनिक (इ. स. पू. सु. ३०००) शरीराच्या उंची इतकी लांब व वर निमुळती असलेली ढाल वापरीत, तर ॲसिरियन सैनिक इंग्रजी आठ (8 या अक्षराच्या आकाराची व लांब चौकोनी अर्धवर्तुळाकार इरल्यासारखी, अथवा त्रिकोणी गोल अशा विविध आकारांच्या ढाली वापरीत आणि खालचा भाग दुकोनी, तर वरील भाग अर्धवर्तुळाकार पसरट असलेल्या आकाराची ढाल ईजिप्तमध्ये वापरण्यात येई. हिटाइटी सैनिकही इंग्रजी आठ (8) या अक्षराच्या आकाराची ढाल वापरीत असत.

 

प्राचीन ग्रीक ‘हॉपलॉन’ नावाच्या चौकोनी, ‘ऑस्पिस’ नामक गोल व ‘सॅकोस’ नावाच्या लंबवर्तुळाकार ढाली वापरीत, तर रोमन सैनिक लोखंडाच्या व पितळेच्या गोल आणि चौकोनी ढालींचा वापर करीत. गॉल सैनिकांच्या ‘पाव्हॉय’ नावाच्या ढाली इतक्या प्रचंड असत, की त्यांचा छोट्या होड्यांसारखा उपयोग होत असे. इ. स. आठव्या ते पंधराव्या शतकापर्यंत नॉर्वे, इंग्लंड व इतर यूरोपीय देशांत पतंगाकार ढालीचा वापर होई. त्या काळी ढालीचे निमुळते टोक जमिनीत रोवून ढाल-तट उभारीत. चीन-जपानमध्ये वेताच्या ढालींचा उपयोग केला जाई, तर मोगल, तुर्क या मध्य आशियाई देशांतील घोडेस्वारांच्या ढाली कातड्याच्या व रोगण लावलेल्या असत.

 

यूरोपात योद्ध्यांना पारितोषिक म्हणून राजेलोक चांदी-सोन्याच्या पत्र्यांवर सुंदर नक्षीकाम केलेल्या ढाली देत असत. भारतामध्येही हर्षकालात पारितोषिक म्हणून ढाल देण्याचा प्रकार प्रचलित होता.

 

दीक्षित, हे. वि.