ड्रोस्ट-ह्युत्सहोफ, आनेट फोन : (१० जानेवारी १७९७–२४ मे १८४८). श्रेष्ठ जर्मन कवयित्री. जन्म वेस्टफेलिया येथे एका कॅथलिक उमराव घराण्यात. आयुष्यातील बहुतेक काळ तिने एकांतवासात घालविला शिक्षणही खाजगी रित्या घेतले.
गेडिश्ट (१८३८, इं. शी. पोएम्स) हा तिचा पहिला काव्यसंग्रह. तथापि तिच्या मरणोत्तर प्रसिद्ध झालेल्या दस गाइस्टलिश यार (१८५१, इं. शी. द स्पिरिच्यूअल यीअर) ह्या संग्रहातील कवितांत तिच्या प्रतिभेचे विशेष परिपक्व रूप प्रत्ययास येते.
उत्कट धर्मभावना आणि सूक्ष्मवास्तव निसर्गचित्रण ही आनेटच्या कवितेची लक्षणीय वैशिष्ट्ये. वेस्टफेलियाच्या भूप्रदेशाची विविध रंगरूपे आपल्या कवितांतून तिने सचेतन केली आहेत. वास्तववादाची पूर्वरूपे तिच्या कवितेत आहेतच तथापि आधुनिक माणसाची परिवेदना आणि अस्वस्थ आत्मशोध तीतून अनुभवास येतात. एकोणिसाव्या शतकातील श्रेष्ठ धार्मिक कवितेत तिच्या कवितांचा अंतर्भाव होत असला, तरी आपले भावजीवन सर्वस्वी कॅथलिक धर्मश्रद्धेच्या चौकटीत बसविण्याच्या प्रयत्नात तिच्या मनाचा झालेला कोंडमाराही लक्षात आल्यावाचून राहत नाही.
डी युडेनबूख (१८४२, इं. भा. द ज्यूज बीच १९५८) ह्या तिच्या कथेतून तिच्या समर्थ गद्यशैलीची आणि सखोल मानशास्त्रीय दृष्टीची प्रचीती येते. श्रेष्ठ जर्मन कथांत ह्या कथेची गणना केली जाते. मेअर्सबुर्क येथे आनेटचे निधन झाले.
कुलकर्णी, अ. र.
“