ड्युरँट, विल्यम जेम्स : (५ नोव्हेंबर १८८५– ). लोकप्रिय अमेरिकन इतिहासकार व शिक्षणतज्ज्ञ. विल ड्युरँट या नावाने तो प्रसिद्ध आहे. नॉर्थ ॲडॅम्स (मॅसॅचूसेट्स) येथे जन्म. सेंट पीटर्स महाविद्यालय व कोलंबिया विद्यापीठ यांतून एम्. ए. व पुढे पीएच्.डी. ही पदवी (१९१७). सुरुवातीस काही दिवस त्याने न्यूयॉर्क जर्नल या वृत्तपत्राचा वार्ताहर म्हणून काम केले (१९०७). १९०७–११ या काळात तो प्राध्यापक होता. फेरेर विद्यालयात त्याने अधिक मोकळ्या वातावरणात शिक्षण देण्याचा प्रयोग केला (१९११–१३) व लेबर टेम्पल विद्यालयात संचालकाची नोकरी धरली (१९२१–२७). या विद्यालयाने प्रौढ शिक्षणाच्या प्रसारात मोठेच कार्य केले आहे. १९१४ पासून प्रेसबिटेरियन चर्चमध्ये त्याने तत्त्वज्ञानाचा इतिहास व साहित्य यांवर व्याख्याने दिली. त्यांतूनच त्याला द स्टोरी ऑफ फिलॉसॉफी (१९२६) या ग्रंथाची कल्पना सुचली. या ग्रंथाने त्याला लोकप्रियता लाभली व भरपूर पैसा मिळाला, त्यामुळे उर्वरित आयुष्य त्याने लेखनकार्यास वाहून घेतले. १९१३ मध्ये एडा कॉफमन (एरिअल ड्युरँट) या तरुणीशी त्याने विवाह केला. तिने लेखनकार्यात त्यास मौलिक साहाय्य केले. त्याने द स्टोरी ऑफ सिव्हिलिझेशन  या ग्रंथमालेस अवर ओरिएंटल हेरिटेज (१९३५) या प्रथम खंडाने सुरुवात केली आणि पुढे क्रमाने द लाइफ ऑफ ग्रीस (१९३९), सीझर अँड क्राइस्ट (१९४४), द एज ऑफ फेथ (१९५०), द रेनेसान्स (१९५३), द रिफॉर्मेशन (१९५७), द एज ऑफ रीझन बिगिन्स (१९६१), द एज ऑफ लूई द फोर्टिन्थ (१९६३), द एज ऑफ व्हॉल्तेअर (१९६५) आणि रूसो अँड रेव्हल्यूशन (१९६७) हे दहा खंड प्रसिद्ध केले. यांपैकी शेवटचे चार खंड एरिअल ड्युरँट हिला सहलेखिका म्हणून घेऊन पूर्ण केले. रूसो अँड रेव्हल्यूशन  या ग्रंथास पुलिट्झर पारितोषिक मिळाले. यानंतर त्याने द लेसन्स ऑफ हिस्टरी (१९६८), इंटरप्रिटेशन्स ऑफ लाइफ : अ सर्व्हे ऑफ कंटेंपररी लिटरेचर (१९७०) ही दोन पुस्तके लिहिली. याशिवाय द मॅन्शन्स ऑफ फिलॉसॉफी (१९२९), ॲडव्हेंचर्स इन जीनिअस (१९३१), फिलॉसॉफी अँड द सोशल प्रॉब्लेम तसेच ट्रँझिशन (कादंबरी १९२७) वगैरे ग्रंथ प्रसिद्ध केले. त्याने स्टोरी ऑफ सिव्हिलिझेशन  या ग्रंथमालेच्या तयारीसाठी जगातील बहुतेक सर्व महत्त्वाच्या देशांना भेटी दिल्या प्राचीन अवशेष व वास्तू पाहिल्या आणि प्रचंड साहित्यसाधने गोळा केली. सहजसुंदर व सुबोध भाषाशैली, आकर्षक मांडणी, वेधक निवेदन, जिवंत व्यक्तिचित्रण आणि संवेदनशील दृष्टी यांमुळे त्याचे इतिहासलेखन लोकप्रिय ठरले आणि त्याच्या ग्रंथांच्या अनेक आवृत्या निघाल्या. आधुनिक टीकाकार व समीक्षक त्यास इतिहासकार म्हणून मान्यता देतात परंतु त्याने काढलेली ऐतिहासिक अनुमाने प्रमाणभूत मानीत नाहीत. कारण समीक्षकांच्या दृष्टीने त्याने वापरलेली ऐतिहासिक साधने ही दुय्यम प्रतीची आहेत. विवाद्य मुद्यांवर तो आपले मत व्यक्त करीत नाही आणि संश्लेषक दृष्टीचा त्याच्यात अभाव आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

देशपांडे, सु. र.