ड्रॉइझेन, योहान गुस्टाफ : (६ जुलै १८०८–१९ जून १८८४). प्रसिद्ध जर्मन इतिहासकार व मुत्सद्दी. ट्रेप्टो (पॉमेरेनीया) येथे प्रशियन कुटुंबात जन्म. त्याचे वडील सेनादलात धर्मगुरू होते. त्याच्या वयाच्या आठव्या वर्षी ते वारले. त्यामुळे ड्रॉइझेन पोरका झाला. त्याचे पुढील शिक्षण त्याच्या मित्रांनी केले, बर्लिन विद्यापीठातून पदवी घेतल्यावर त्याने काही दिवस शिक्षकाचे काम केले व नंतर त्याने डॉक्टरेटकरिता Geschichte Alexander des Grossen (१८३३) हा प्रबंध लिहिला. त्यामुळे तो कील विद्यापीठात प्राध्यापक झाला (१८४०–४८). इथे त्याचा प्राचीन इतिहासाशी संबंध तुटला व तो अर्वाचीन इतिहासात गोडी घेऊ लागला. पुढे त्यास येना विद्यापीठ (१८५१–५५) व नंतर बर्लिन विद्यापीठ (१८५९) येथे इतिहासाचा प्राध्यापक म्हणून नियुक्ती मिळाली. त्याने श्लेस्विग-होल्श्टाइन प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केला. यावर त्याने १८५० मध्ये Die Herzogthumer Schleswig-Holstein und das Konigreich Danemark Seit dem Jahre (१८०६) हे पुस्तक लिहिले. १८४८ च्या क्रांतीनंतर तो त्याच साली फ्रँकफुर्ट संसदेचा सभासद झाला. त्यानंतर त्याची संविधान समितीचा सचिव म्हणून नियुक्ती झाली. तथापि तत्कालीन राजकारणात त्याच्या प्रशियन देशभक्तीस फारसा वाव मिळाला नाही. म्हणून तो पुन्हा अध्यापनाकडे वळला. प्रशियाच्या नेतृत्वाखालील जर्मनीच्या एकीकरणाचा तो एक प्रभावी पुरस्कर्ता होता. प्राध्यापकपदावरून निवृत्त झाल्यावर उर्वरित आयुष्य त्याने प्रशियाचा राजकीय इतिहास लिहिण्यात व्यतीत केले. त्याचा Geschichte der Preussischen Politik (१४ खंड, १८५५–८६) हा ग्रंथ म्हणजे प्रशियाच्या तत्कालीन राजकीय स्थितीचे सम्यक दर्शन होय. मात्र तो अपूर्णच राहिला.

देशपांडे, सु. र.