न्यूयॉर्क शहर : हे सुप्रसिद्ध शहर अमेरिकेच्या ईशान्य किनाऱ्यावर न्यूयॉर्क राज्यात हडसन नदीमुखाशी वसले आहे. ते अनेक बेटे व किनारी प्रदेश मिळून बनले असून त्याचे स्थान ४०° ४२′ ४५″ उत्तर व ७४° ०′ २३″ पश्चिम व क्षेत्रफळ ८३१ चौ.किमी. आहे. लोकसंख्या ७८,९५,५६३ (१९७०). शहराची दक्षिणोत्तर लांबी ५८ किमी. व पूर्व-पश्चिम रुंदी २६ किमी. असून, समुद्रसपाटीपासून सरासरी उंची १६ मी. आणि सर्वोच्च उंची १२४ मी. आहे. पूर्व किनाऱ्यावरील समशीतोष्ण कटिबंधीय स्थानामुळे हवामानावर खंडीय व सागरी प्रभाव आढळतो. हिवाळ्यात पश्चिमेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे तपमान – १७° से.पर्यंत कमी होते व उन्हाळ्यात ते ३२·२° से. पेक्षाही वाढते. पाऊस वर्षभर पडतो व त्याची सरासरी १०६ सेंमी. आहे. वर्षाकाठी ७६ सेंमी. हिमवृष्टी होते. हवामान सामान्यतः आर्द्र असते पण त्यात खंडीय वाऱ्यांनी अचानक बदल होतात. न्यूयॉर्कचे एकूण पाच नगरविभाग (बरो) आहेत. (१) मॅनहॅटन-मॅनहॅटन बेटावर हा नगरविभाग असून त्याचे क्षेत्रफळ ५७·९१ चौ.किमी. व लोकसंख्या १५,३९,२३३ (१९७०) आहे. या बेटाच्या पश्चिमेस हडसन नदी, पूर्वेस ईस्ट नदी, दक्षिणेस न्यूयॉर्कचा उपसागर व उत्तरेस हार्लेम नदी आहे. या विभागातच वेल्फेअर, रॅडल्स व वॉर्ड्झ ही अन्य बेटे आहेत. हा भाग न्यूयॉर्कचे नागरी केंद्र आहे. उंच इमारती, टाइम स्क्वेअर, फिफ्थ ॲव्हेन्यू, वॉल स्ट्रीट, ग्रिनिच व्हिलेज, चायनाटाउन, हार्लेम, चेल्सी व ईस्ट साइड हे प्रसिद्ध भाग मॅगहॅटनवरच आहेत. (२) ब्रुकलिन – हा लाँग आयलंड द्वीपाचा नैर्ऋत्य भाग होय. त्याचे क्षेत्रफल ३०१ चौ. किमी. व लोकसंख्या २६,०२,०१२ (१९७०) आहे. बंदर म्हणून वापरता येणारी ३२९ किमी. लांबीची जलसीमा या भागात आहे. न्यूयॉर्क नेव्ही शिपयार्ड हा जहाजबांधणी कारखाना येथेच आहे. (३) क्वीन्स – हा लाँग आयलंड बेटाचा पश्चिम भाग होय, त्याचे क्षेत्रफळ ३०१ चौ. किमी. व लोकसंख्या १९,८७,१७४ (१९७०) आहे. त्याच्या उत्तरेस व पश्चिमेस ईस्ट नदी, नैर्ऋत्येस ब्रुकलिन, दक्षिणेस अटालांटिक महासागर व पूर्वेस नॅसॉ परगणा हे आहेत. साउथ ब्रदर बेट व जमेका उपसागरातील काही बेटे या विभागात येतात. हा मुख्यतः मध्यमवर्गीय निवासी भाग आहे. (४) ब्राँक्स – हा भाग न्यूयॉर्क राज्याच्या मुख्य भूमीचे भूशिर असून मॅनहॅटनच्या ईशान्येस हार्लेम नदीपलीकडे आहे. त्याचे क्षेत्र १०७ चौ. किमी. व लोकसंख्या १४,७१,७०१ (१९७०) आहे. सिटी, हार्ट व रिकर्झ ही द्वीपे या भागातच समाविष्ट आहेत. (५) रिचमंड-स्टेटन द्वीपावर न्यूयॉर्क उपसागरापलीकडे मॅनहॅटनच्या नैर्ऋत्येस हा भाग असून त्याचे क्षेत्रफळ ११० चौ. किमी. व लोकसंख्या २,९५,४४३ (१९७०) आहे. न्यूयॉर्क शहरामधील सर्वोच्च ठिकाण टोड हिल (१२४ मीटर) या भागातच आहे. १९६० साली हे बेट ब्रुकलिनशी पुलाने जोडण्यात आले व तेव्हापासून या भागाच्या विकासाचा वेग वाढला आहे. इतर भागांच्या तुलनेने ह्या भागात लोकसंख्या कमी आहे.
न्यूयॉर्क हे जगातील सर्वांत श्रीमंत शहर समजले जाते. महत्त्वाचे बंदर, औद्योगिक व व्यापारी केंद्र आणि दळणवळण केंद्र आहे. न्यूयॉर्कची अर्थव्यवस्था वैविध्यपूर्ण असून मोठ्या उद्योगांप्रमाणेच छोटे उद्योगही महत्त्वाचे आहेत. १९७० साली शहरात ४० लाख कामगार होते पैकी नगरसेवांमध्ये तीन ते सात लाख लोक होते. सर्वसामान्यतः ३० लाख लोक किंवा कामागारांपैकी ७५% लोक सेवाव्यवसायांत होते. बँका व जहाजबांधणी हे व्यवसाय प्रमुख असून त्यांची प्रत्येकी वार्षिक उलाढाल ८,००० कोटी डॉलरची होती. त्याखालोखाल कापडव्यवसाय महत्त्वपूर्ण आहे. छपाई आणि प्रकाशन हे व्यवसायही महत्त्वाचे असून त्यांत १,२०,००० लोक होते. अन्य व्यवसायांचा विचार करता ८ लाख लोक कारखान्यांत, ७·५ लाख घाऊक व किरकोळ व्यापारात, ४·७ लाख अर्थसंस्थांमध्ये व ३·३ लाख वाहतूक व्यवसायात होते. शहरातील बरेच उद्योग शहराबाहेर जात आहेत, तसेच यांत्रिकीकरण आणि कंपन्यांचे विलिनीकरण यांमुळेही रोजगार कमी होत असून बेकारी वाढत आहे.
ह्या शहराची जागा सर्वप्रथम १५२४ मध्ये इटालियन दर्यावर्दी जोव्हान्नी व्हेर्रात्सानो याने नोंदलेली आढळते. हेन्री हडसन याने १६०९ मध्ये डच वेस्ट इंडिया कंपनीसाठी ह्या भागात सफर करून, ही जागा वसाहतीसाठी व बंदरासाठी आदर्श असल्याची शिफारस केली. पुढे १६२६ मध्ये न्यूयॉर्कची जागा इंडियन लोकांकडून विकत घेऊन डचांनी न्यू ॲम्स्टरडॅम या गावाची स्थापना केली. १६६४ पर्यंत येथे डचांचेच राज्य होते. यॉर्क परगण्याच्या ड्यूकने १६६४ मध्ये पाठविलेल्या आरमाराने हे शहर जिंकले आणि ते न्यूयॉर्क बनले. अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धाची सुरुवात १७७५ मध्ये येथेच झाली आणि १७८९ साली जॉर्ज वॉशिंग्टन यांनी अध्यक्ष म्हणून येथेच अधिकार ग्रहण केले. १७९६ पर्यंत न्यूयॉर्क अ. सं. सं.च्या राजधानीचे ठिकाण होते. १८०० साली शहराची वस्ती ६०,००० होती. न्यूयॉर्क–बफालो यांना जोडणारा ईअरी कालवा निर्माण होताच १८२५ नंतर शहराचा विकास झपाट्याने झाला. १८८३ साली ब्रुकलिन हा भाग न्यूयॉर्कशी जोडणारा पूल तयार झाला व त्यानंतर ब्रुकलिन, ब्राँक्स, क्वीन्स आणि स्टेटन द्वीप यांच्या एकत्रीकरणाने आजचे न्यूयॉर्क शहर बनविण्यात आले. १८९८ पासून न्यूयॉर्कच्या सीमा बदललेल्या नाहीत. शहराचा कारभार महापौर, अंदाजमंडळ व नगर परिषद यांद्वारे चालतो. महापौराची निवड चार वर्षांसाठी प्रत्यक्ष मतदानाने होते. महापौर उपमहापौराची नियुक्ती आणि भिन्न खातेप्रमुखांच्या नेमणुका करतो. अंदाजपत्रकही तोच तयार करतो. नगरपरिषद ही विधिसभा असून तिचा अध्यक्ष व ३७ सभासद प्रत्यक्ष निवडणुकीने निवडले जातात. अंदाजमंडळ अर्थसंकल्पाविषयीचे आणि त्याच्या कार्यवाहीचे निर्णय घेते. महापौर, नगरपरिषदेचा अध्यक्ष, नियंत्रक आणि पाच नगरविभागांचे अध्यक्ष त्याचे सभासद असतात. न्यूयॉर्क शहरावर सामान्यतः डेमॉक्रॅटिक पक्षाचा प्रभाव आहे. शहराचे वार्षिक अंदाजपत्रक ८,००० कोटी डॉलरचे असते.
शहरातील सर्व शिक्षणसंस्थांमधून पूर्वप्राथमिक ते माध्यमिक स्तरापर्यंत ११,५०,००० विद्यार्थी ७०,००० शिक्षक व ४१,००० प्रशासन कर्मचारी आहेत. एकूण १,२१० इमारतींमधून या शाळा असून शिक्षणावर वार्षिक खर्च १५० कोटी डॉलर आहे. शहराचे ३१ शैक्षणिक जिल्हे पाडण्यात आले असून त्यांचा कारभार निवडून आलेली मंडळे चालवितात. शाळांबरोबरच अंध-अपंगशाळा व अनेक व्यवसायशाळा आहेत.
न्यूयॉर्क सार्वजनिक विद्यापीठ शिक्षण अधिक मोठ्या प्रमाणात आहे व त्यासाठी १९७३ साली ४४ कोटी डॉलर खर्च करण्यात आले. सु. एक लाख विद्यार्थी वरिष्ठ महाविद्यालयांत, तर ५०,००० कम्युनिटी महाविद्यालयांत असून १५,००० पदव्युत्तर वर्गांत आहेत. न्यूयॉर्क महानगरपालिकेच्या सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क या विद्यापीठाची ब्रुकलिन, सिटी, हंटर व क्वीन्स अशी चार कला महाविद्यालये व ब्राँक्स कम्यूनिटी कॉलेज व क्वीन्सबरो कम्यूनिटी कॉलेज अशी दोन कम्यूनिटी महाविद्यालये, यांशिवाय २६ खाजगी उच्च शिक्षणसंस्था शहरात असून त्यांत महाविद्यालये, विद्यापीठे व तंत्रज्ञान संस्थांचा समावेश आहे. त्यांत १७५४ साली स्थापन झालेले कोलंबिया विद्यापीठ अतिशय जुने व ग्रंथालयासाठी प्रसिद्ध आहे. त्यामध्ये १९७५–७६ साली २४,१७७ विद्यार्थी व ३,४६७ प्राध्यापक होते. न्यूयॉर्क विद्यापीठाची स्थापना १८३१ साली झाली असून त्यामध्ये ४०,८१३ विद्यार्थी व ३,३८० प्राध्यापक होते. फोर्डहॅम विद्यापीठात १४,२६६ विद्यार्थी आणि १,०५८ प्राध्यापक, युनिव्हर्सिटी ऑफ द सिटी ऑफ न्यूयॉर्कमध्ये २,६३,७३१ विद्यार्थी आणि १६,५३४ प्राध्यापक होते, न्यूयॉर्क तंत्रनिकेतन संस्थेमध्ये (१८५४) ४,६०६ विद्यार्थी आणि ४१५ प्राध्यापक होते. फोर्डहॅम विद्यापीठ मध्ययुगीन अभ्यासासाठी, तर न्यूयॉर्क विद्यापीठ कलाभ्यासासाठी, रॉकफेलर विद्यापीठ जीवशास्त्र संशोधनासाठी, ज्यूल्यार्ड संगीत अभ्यासासाठी प्रसिद्ध आहे. मौंट सेंट व्हिन्सेंट महाविद्यालय, लाँग आयलंड विद्यापीठ, मॅनहॅटन महाविद्यालय, न्यू स्कूल फॉर सोशल रिसर्च, स्टेटन बेटावरील नोत्रदाम महाविद्यालय, सेंट जॉन विद्यापीठ व सेंट जोसेफ विद्यार्थिनी महाविद्यालय, येशिव्हा विद्यापीठ, वॅगनर महाविद्यालय, ब्रुकलिन विधिसंस्था, न्यूयॉर्क विधिसंस्था, न्यूयॉर्क वैद्यकीय महाविद्यालय, ब्रुकलिन तंत्रनिकेतन व प्रॅट संस्था या काही अन्य प्रमुख शिक्षणसंस्था आहेत.
न्यूयॉर्क शहर वैद्यकीय सेवा आणि सुविधा यांसाठी प्रसिद्ध आहे. पालिकेचे आरोग्य व इस्पितळ महामंडळ चालविते. ८० ऐच्छिक इस्पितळांतून अल्प दराने वैद्यकीय सेवा पुरविल्या जातात. शिवाय ३५ अन्य इस्पितळे मुख्यतः श्रीमंतांसाठी उपलब्ध आहेत. यांशिवाय न्यूयॉर्क राज्य सरकार शहरात ६ इस्पितळे व २२ आरोग्य केंद्रे चालविते. मोठी लोकवस्ती व सर्व प्रकारच्या वैद्यकीय संशोधनासाठी उपलब्ध सेवा यांमुळे हे शहर वैद्यकीय शिक्षणाचे व संशोधनाचे प्रमुख केंद्र बनले आहे. न्यूयॉर्क विद्यापीठ, बेल्व्ह्यू मेडिकल सेंटर, न्यूयॉर्क हॉस्पिटल, कॉर्नेल मेडिकल सेंटर, कोलंबिया प्रेसबिटेरियन मेडिकल सेंटर, येशिव्हा-ॲल्बर्ट आइन्स्टाइन, मौंट सिनाई व रूझवेल्ट हॉस्पिटल या वैद्यकीय संस्था विशेष प्रसिद्ध आहेत. या प्रचंड शहरासाठी रोज ४९१·४ कोटी लिटर पाणी लागते व ते काही प्रमाणात ५०० किमी. अंतरावरूनही आणावे लागते. न्यूयॉर्क हे अमेरिकेतील अन्य शहरांच्या तुलनेत, शिकागो सोडल्यास, बरेच अस्वच्छ शहर आहे. शहरात दररोज २६,००० टन उकिरडा निर्माण होतो व त्याची वासलात लावण्यासाठी १७,००० कर्माचारी खपत असतात आणि त्यासाठी २ कोटी डॉलरपेक्षा जास्त खर्च येतो.
न्यूयॉर्क हे अमेरिकेचे प्रमुख दळणवळण व वाहतूक केंद्र आहे. ते जगातील एक प्रमुख बंदर असून एकूण बंदरातील जलसीमा ९३० किमी. लांबीची आहे. हे बंदर नैसर्गिक असून कधीही गोठत नाही. त्यामुळे वर्षभर स्वस्त जलवाहतूक उपलब्ध होते. पंचमहासरोवरांशी व सेंट लॉरेन्स सी वे या जलमार्गाशी न्यूयॉर्क स्टेट बार्ज कॅनॉल या कालव्याने जोडले आहे. बंदरातून ९ लोहमार्ग, १७० जहाजमार्ग, ४१ विमानमार्ग व ५०० ट्रक कंपन्या वाहतूक सांभाळतात.
हवाई वाहतूक तीन प्रमुख विमानतळांवरून होते. जॉन एफ्.केनेडी हा सर्वांत मोठा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. तसेच ला ग्वार्डिया हा दुसरा विमानतळ आहे. हे दोन्ही विमानतळ क्वीन्स भागात आहेत. तिसरा विमानतळ न्यूअर्क, हा न्यू जर्सी येथे आहे. शहरात दोन हेलिकॉप्टर तळही आहेत. ग्रँड सेंट्रल टर्मिनल व पेनसिल्व्हेनिया स्थानक ही दोन प्रमुख लोहमार्ग केंद्रे आहेत. या केंद्रांवरून एकूण १० कोटी प्रवाशांनी १९६० मध्ये प्रवास केला होता. पोर्ट ऑथॉरिटी बस स्थानक हे जगातील एक सर्वांत मोठे बसस्थानक या शहरात आठव्या चौकात आहे. शहरात एकूण ६२ पूल आणि चार बोगदे आहेत. जॉर्ज वॉशिंग्टन पूल (१९३१) सर्वांत महत्त्वाचा असून तो न्यूयॉर्क व न्यू जर्सी यांस जोडतो. त्याखालोखाल हेन्री हडसन पूल (१९३८), ट्रायबरो, ब्रुकलिन, विल्यम्सबर्ग, क्वीन्सबरो, ब्राँक्स, व्हाइटस्टोन हे अन्य महत्त्वाचे पूल आहेत. क्वीन्स मिटाउन बोगदा १९४० साली खोदण्यात आला असून तो मॅनहॅटन व क्वीन्स भाग जोडतो. शिवाय ब्रुकलिन बॅटरी, हॉलंड व लिंकन हे अन्य बोगदे शहराचे भिन्न भाग जोडतात. यांशिवाय बेटांवर जाण्यासाठी २४ तरीमार्ग आहेत.
भुयारी लोहमार्ग हे न्यूयॉर्कचे एक वैशिष्ट्य आहे. एकूण ३७९ किमी. लांबीचे भुयारी लोहमार्ग असून त्यांद्वारे वर्षाकाठी १३० कोटी प्रवासी ये-जा करतात. बससेवा ८५४ किमी. लांबीच्या मार्गांवर उपलब्ध आहे. शहरातच उच्च प्रतीचे १०,००० किमी. लांबीचे रस्ते आहेत. वेस्ट साइट हाय वे, ईस्ट रिव्हर ड्राइव्ह हे शहरातील प्रमुख रस्ते आहेत तर हेन्री हडसन पार्क वे, न्यू इंग्लंड एक्स्प्रेस वे, हचिन्सन रिव्हर पार्क वे आणि सॉ मिल रिव्हर पार्क वे हे प्रमुख रस्ते न्यूयॉर्क शहर मुख्य भूमीशी जोडतात. प्रतिदिनी १० लाखांपेक्षा जास्त लोक न्यूयॉर्क शहरात कामानिमित्त सकाळी येतात व रात्री परततात.
न्यूयॉर्कमधील वृत्तपत्रांची संख्या कमी होत आहे. प्रमुख दैनिकांत न्यूयॉर्क न्यूज ह्या दैनिकाचा खप १९ लाख व रविवारचा २८ लाख आहे. न्यूयॉर्क टाइम्स वृत्तपत्राचा रोजचा खप ८ लाख व रविवारचा १४ लाख आहे. शिवाय न्यूयॉर्क पोस्ट (४,८९,०००), लाँग आयलंड प्रेस (२,८०,७००), स्टेटन आयलंड ॲड्व्हान्स, वॉलस्ट्रीट जर्नल (१४·०६ लाख प्रती) ही वृत्तपत्रेही येथे प्रसिद्ध होतात. शहरात सात दूरचित्रवाणी व ३६ आकाशवाणी केंद्रे आहेत.
न्यूयॉर्क हे जगातील सर्वांत मोठ्या शहरांपैकी एक असून १९३० सालापर्यंत त्याची वाढ झपाट्याने झाली. १८०० साली लोकसंख्या केवळ ६०,००० होती, ती १९०० साली ३४,३७,२०२ झाली १९३० साली ६९,३०,४४६ होती, ती १९५० साली ७८,९१,९५७ इतकी वाढली पण १९६० मध्ये ती कमी झाली (७७,८१,९८४). १९७० मध्ये ती थोडी वाढून ७८,९५,५६३ इतकी झाली. म्हणजेच १९५० ते १९७० पर्यंत प्रत्यक्ष शहराची वाढ फारशी झालेली दिसत नाही. अशीच प्रवृत्ती लंडन, टोकिओ या शहरांतही आढळते. शहराच्या सभोवती उपनगरांची खूप वाढ झालेली आहे. त्या भागास स्टॅडर्ड मेट्रपॉलिटन स्टॅटिस्टिकल एरिया म्हणतात. शहरासह एकूण भागाचे क्षेत्रफळ ९,६३४ चौ. किमी. असून लोकसंख्या १,१५,७१,८९९ (१९७०) होती. न्यूयॉर्कची वांशिक व राष्ट्रीय विविधता फार मोठी आहे. सुरुवातीस हे डच शहर होते. इंग्रज, इटालियन, स्पॅनिश, ज्यू आणि त्यानंतर निग्रो व प्वेर्त रीकन लोकांचे एकच मिश्रण येथे झाले आहे. मंगोलियनवंशीय व अन्य आशियाई लोकही शहरात खूपच असून सु. १९ लाख ज्यू लोकांची वस्ती आहे. १९६० ते १९७० या काळात गौरवर्णियांची संख्या सु. ५,९२,००० नी कमी झाली, तर गोरेतरांची संख्या ७,०५,००० नी वाढली. तीत प्वेर्त रीकोवासी व निग्रो लोकांची संख्या जास्त आहे. शहराच्या वस्तीचे निरीक्षण करता ३/४ गौरवर्णियांच्या भागात ९०% लोक गौरवर्णीय आहेत व गोरेतरांच्या ३/४ भागात ९०% लोक गोरेतर आहेत. गौरवर्णीय व गोरेतर यांची अशाप्रकारे जवळजवळ पूर्ण विभागणी झालेली दिसते. दाट वस्ती, गलिच्छ वस्त्या, वांशिक विद्रोह यांतून न्यूयॉर्कचे व्यक्तिमत्त्व निर्माण झाले आहे. शहरात अनेक प्रकारची गुन्हेगारी वाढत असून तीमुळे सुरक्षितता धोक्यात येत आहे. १९७१ साली शहरात ३३,०१५ पोलीस होते, पण ही संख्या गतवर्षीपेक्षा १,५०० नी कमी होती. कारण अपुऱ्या निधीमुळे निवृत्त पोलिसांच्या जागी नवी भरती केली नव्हती. वाढते गुन्हे व निदर्शने यांमुळे न्यूयॉर्क शहर गुन्हेगारी व अव्यवस्था यांबाबत अमेरिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
ज्याप्रमाणे व्यापार, दळणवळण, उद्योग यांसाठी न्यूयॉर्क शहर महत्त्वाचे आहे, त्याचप्रमाणे न्यूयॉर्कचे कलाजीवन व सांस्कृतिक व्यक्तिमत्त्वही भारदस्त आहे. कलाजीवनात नाट्य, संगीत व कलावीथी महत्त्वाच्या आहेत. ब्रॉडवे या भागात ३३ प्रमुख नाट्यगृहे ४१ ते ५५ रस्त्यांच्या दरम्यान आहेत तर ग्रिनिच भागात आणखी २९ नाट्यगृहे आहेत. न्यूयॉर्क फिलार्मानिक वाद्यवृंद हा देशातील उत्कृष्ट वाद्यवृंदांपैकी एक आहे. लिंकन सेंटर फॉर पर्फॉर्मिंग आर्ट्स, रेडिओ सिटी संगीत सभागृह, द अमेरिकन प्लेस थिएटर, ॲक्टर्स स्टुडिओ थिएटर व न्यूयॉर्क शेक्सपिअर फेस्टिवल कं. ह्या संस्था कलाविश्वात प्रसिद्ध आहेत. लिंकन सेंटर फॉर पर्फॉर्मिंग आर्ट्स या केंद्रात मेट्रपॉलिटन ऑपेरा, फिलार्मानिक वाद्यवृंद, न्यूयॉर्क स्टेट थिएटर, ज्यूल्यार्ड स्कूल ऑफ म्यूझिक, व्हिव्हियन ब्यूमाँत थिएटर व संगीत ग्रंथालय आहे. कार्नेगी हॉल, ब्रुकलिन संगीत अकादमी, जॉफ्रे बॅले नृत्यसंस्था या अन्य संस्थाही महत्त्वाच्या आहेत.
शहरात तीसहून अधिक वस्तुसंग्रहालये आहेत. त्यांपैकी मेट्रपॉलिटन म्यूझीयम ऑफ आर्ट हे संग्रहालय (१८७०) जगप्रसिद्ध आहे. त्यातील ईजिप्त, मध्यपूर्वी, ग्रीक व रोमनकालीन संग्रह केवळ अजोड आहेत. चित्र, पुरातनवस्तू, शिल्प, शस्त्रे, पोषाख इत्यादींचे संग्रहही चांगले आहेत. यांशिवाय म्यूझीयम ऑफ मॉडर्न आर्टमध्ये आधुनिक कलासंग्रह, व्हिटनी म्यूझीयम ऑफ अमेरिकन आर्टमध्ये अमेरिकन कलासंग्रह व परंपरा जतन केली आहे. अमेरिकन म्यूझीयम ऑफ नॅचरल हिस्टरी या संग्रहालयात (स्था. १८६९) प्राकृतिक विज्ञानाची प्रगती संगृहीत केली असून उत्तम ग्रंथालय व संशोधनसोयही आहे. त्याच्या शेजारीच हेडेन खगोलालय आहे. म्यूझीयम ऑफ द सिटी ऑफ न्यूयॉर्कमध्ये शहराच्या विकासाचे आरेखन व संग्रह दिसतो, तर चेस मॅनहॅटन बँक म्यूझीयम ऑफ मनीमध्ये जगातील नाणी व चलने यांचे ७५,००० पेक्षा जास्त नमुने आहेत. इतर वस्तुसंग्रहालयांत फ्रिक कलेक्शन, सॉलोमन आर. गुगेनहाइम म्यूझीयम प्रसिद्ध आहेत.
न्यूयॉर्क प्राणि-उद्यान (ब्राँक्स प्राणिसंग्रहालय) हे जगातील सर्वोत्कृष्ट प्राणिसंग्रहालय समजले जाते. नैसर्गिक परिस्थितीमध्ये वन्यजीवनदर्शन हे या संग्रहालयाचे वैशिष्ट्य आहे. जवळच वनस्पति-उद्यान असून ते १८९१ पासून संरक्षित आहे. प्रतिवर्षी २५ लाख लोक या संग्रहालयास व उद्यानास भेट देतात. शहरात १४,३२५ हे. भागात बगीचे असून ८१५ क्रीडांगणे व ८ समुद्रचौपाट्या आहेत. सेंट्रल पार्क हा बगीचा ३४० हे. क्षेत्राचा असून तेथे टेनिस, जलतरण इ. खेळांच्या सोयीही आहेत.
न्यूयॉर्कमध्ये अनेक उत्कृष्ट ग्रंथालये आहेत. न्यूयॉर्क पब्लिक लायब्ररी या ग्रंथालयाच्या २०० शाखा शहरभर विखुरल्या असून प्रमुख ग्रंथालय बेचाळिसाव्या रस्त्यावर पाचव्या चौकात आहे. यांशिवाय मॉर्गन ग्रंथालय व कोलंबिया विद्यापीठाचे ग्रंथालयही प्रसिद्ध आहे.
मॅडिसन सक्वेअर गार्डन हे जगप्रसिद्ध क्रीडागृह होय. मुष्टियुद्ध, हॉकी, बास्केटबॉल या खेळांचे सामने येथे होतात. राजकीय सभांसाठीही ते प्रसिद्ध आहे. यँकी स्टेडियम हे फुटबॉल व बेसबॉलचे क्रीडागार आहे. न्यूयॉर्क यँकी (बेसबॉल), न्यूयॉर्क जायंट (फुटबॉल), रेंजर्स (आइस हॉकी) व निकरवॉकर्स (बास्केटबॉल) संघ हे राष्ट्रीय पातळीवरील प्रसिद्ध संघ आहेत. फॉरेस्ट हिल क्रीडागार टेनिससाठी प्रसिद्ध असून तेथे दरवर्षी होणारी आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धा जगातील एक प्रतिष्ठित स्पर्धा मानली जाते. क्वीन्स भागात ‘ॲक्विडक्ट’ हे घोड्यांच्या शर्यतीचे प्रसिद्ध मैदान आहे.
न्यूयॉर्क हे आधुनिक युगातील शहर असल्यामुळे जुन्या वास्तुशिल्पांचे नमुने तेथे फारसे नाहीत व जे आहेत, त्यांत ‘फ्रॉन्सिस टॅव्हर्न’ (१७१९) आणि ‘डाइकमान हाउस’ ह्या अनुक्रमे जॉर्जियन व डच वास्तु-शैलीतील इमारतींचा अंतर्भाव होतो. लेफर्ट्स होमस्टेड, बाउन हाउस, किंग मॅन्शन ह्या अन्य उल्लेखनीय जुन्या इमारती होत. आधुनिक गगनचुंबी इमारतींसाठी न्यूयॉर्क ख्यातनाम आहे. उदा., वर्ल्ड ट्रेड सेंटर (११० मजले), एंपायर स्टेट (१०२ मजले), ख्राइस्लर इमारत (७७ मजले), चेस मॅनहॅटन (७१ मजले), सिक्स्टी वॉल टॉवर्स (६६ मजले), वुलवर्थ (६० मजले). दुसऱ्या महायुद्धानंतर न्यूयॉर्कमध्ये काच व ॲल्युमिनियम ह्यांचा वास्तुशिल्पात प्राधान्याने वापर करण्याचे नवे तंत्र विकसित झाले असून, यूनोची इमारत, लीव्हर इमारत, सीग्रॅम इमारत, युनियन कार्बाइड आणि पॅनॅम इमारत या अशा तंत्राचा वापर करून बांधण्यात आलेल्या काही उल्लेखनीय इमारती आहेत. न्यूयॉर्कमधील विविध प्रार्थनामंदिरांच्या इमारतीही प्रेक्षणीय आहेत उदा., सेंट पॅट्रिक्स कॅथीड्रल, सेंट जॉन द डिव्हाइन कॅथीड्रल, सेंट पॉल्स चॅपल, ट्रिनिटी चर्च, टेंपल ऑफ इमान्यूएल इत्यादी. स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा, प्रिझन शिप हुतात्मा स्मारक, सोल्जर्स अँड सेलर्स आर्क, जनरल ग्रँटचे राष्ट्रीय स्मारक ह्या शिल्पाकृतीही प्रसिद्ध आहेत.
यूनोची मुख्य कचेरीही न्यूयॉर्क शहरातच ४२ ते ४८ व्या रस्त्यांपर्यंतच्या भागात आहे व तेथे महासभागृह, सचिवालय, परिषदगृह व ग्रंथालय ह्यांच्या इमारती आहेत. ह्या भागाचे सामान्य प्रशासन मात्र यूनोद्वारेच चालते.
डिसूझा, आ. रे.
“