न्यूमोनिया : फुप्फुसाच्या दाहयुक्त सुजेला न्यूमोनिया अथवा फुप्फुसशोथ म्हणतात. या विकृतीचे निरनिराळे प्रकार असून काही नेहमी आढळणारे व काही क्वचित आढळणारे आहेत.
वर्गीकरण : न्यूमोनियाचे वर्गीकरण पुढील दोन विभागांत करतात : (१) विशिष्ट न्यूमोनिया आणि (२) शोषणजन्य न्यूमोनिया. विशिष्ट न्यूमोनिया विशिष्ट रोगोत्पादक सूक्ष्मजंतूमुळे होतो. उदा., न्यूमोकोकायजन्य, स्टॅफिलोकोकायजन्य न्यूमोनिया वगैरे. शोषणजन्य न्यूमोनियामध्ये श्वसन तंत्राच्या (संस्थेच्या) विकृतीमुळे कमी रोगोत्पादक शक्ती असलेले सूक्ष्मजंतू फुप्फुसशोथ उत्पन्न करतात. नावाप्रमाणे हे सूक्ष्मजंतू श्वसन तंत्राच्या वरील भागातून अंतःश्वसनाच्या वेळी खालच्या भागातील वायुकोशात शोषले जातात व तेथे शोथ उत्पन्न करतात. या प्रकारात थुंकीच्या तपासणीत पुष्कळ वेळा कोणतेही सूक्ष्मजंतू आढळत नाहीत. मुखगुहा आणि श्वसन तंत्राचा वरचा भाग यांत नेहमी वास्तव्य करणारे हिमोफायलस इन्फ्ल्यूएंझी आणि स्ट्रेप्टोकॉकस न्यूमोनी यांसारखे सूक्ष्मजंतू या प्रकारच्या फुप्फुसशोथास कारणीभूत असतात. अनेक व्हायरस उदा., रिकेट्शिया बर्नेटी, मायकोप्लाझ्मा न्यूमोनी वगैरे न्यूमोनियास कारणीभूत असू शकतात. व्हायरसजन्य न्यूमोनिया विशिष्ट प्रकारात गणला जातो. वरील प्रकारांशिवाय न्यूमोनियाचे तीव्र व चिरकारी (दीर्घकालीन) असे प्रकारही ओळखतात. उदा., न्यूमोकोकायजन्य न्यूमोनिया तीव्र प्रकारात व क्षयरोगजंतुजन्य न्यूमोनिया चिरकारी प्रकारात मोडतात.
न्यूमोनियाच्या सर्व प्रकारांमध्ये न्यूमोकोकायजन्य न्यूमोनियाचे प्रमाण सर्वांत जास्त असल्यामुळे त्या प्रकाराचे अधिक वर्णन या नोंदीत केले आहे.
न्यूमोकोकायजन्य न्युमोनिया : या प्रकाराला ‘तीव्र खंडीय न्यूमोनिया’ असेही म्हणतात. कारण यामध्ये फुप्फुसातील एका किंवा अधिक खंडांचा शोथ असतो. फ्रेंकेल सूक्ष्मजंतू (ए. फ्रेंकेल या जर्मन वैद्यांच्या नावाने ओळखले जाणारे सूक्ष्मजंतू) किंवा न्यूमोकोकाय या नावाने ओळखरे जाणारे सूक्ष्मजंतू बहुधा रोगास कारणीभूत असतात. ५ ते ६०% लोकांत सर्व प्रकारचे न्यूमोकोकाय श्वसनमार्गाचे कायमचे रहिवासी असतात परंतु श्वसन मार्गातील श्लेष्मास्तराचा (बुळबुळीत थराचा) स्राव, आत शिरणाऱ्या व बाहेर पडणाऱ्या हवेच्या प्रवाहांचा वेग वा दिशा आणि सकेसल कोशिकांच्या (पेशींच्या) केसांची हालचाल यांमुळे फुप्फुसांचा या सूक्ष्मजंतूंच्या संक्रामणापासून बचाव होतो. या रोधकांची क्रियाशीलता बिघडली आणि शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी झाली म्हणजे न्यूमोकोकाय बिंदुक स्वरूपात वायुकोशापर्यंत सहज पोहोचतात व शोथास सुरुवात करतात.
संप्राप्ती : सर्व जगभर आढळणारा हा रोग वर्षाच्या कोणत्याही ऋतुकालात आढळतो. सर्वसाधारणपणे उत्तम शारीरस्वास्थ्य असणाऱ्या तरुणवयीन स्त्री-पुरुषांत त्याचे प्रमाण जास्त आढळते, मात्र तो कोणत्याही वयात होण्याचा संभव असतो. रोगाचे प्रवृत्तीकर नक्की कारण सांगणे कठीण असले, तरी अती थंडी, अती थकवा, छातीच्या भित्तीचे इजा, संवेदनाहारक औषधांचा वापर (शस्त्रक्रियेकरिता वगैरे), अल्कोहॉल विषवाधा इत्यादींचा समावेश प्रवृत्तीकर कारणांत होतो.
विकृतिविज्ञान : विकृतिविज्ञानाच्या दृष्टीने रोगाच्या चार अवस्था असतात पहिल्या जवळजवळ ४८ तास टिकणाऱ्या अवस्थेला ‘रक्ताधिक्यावस्था’ म्हणतात. या अवस्थेत वायुकोशातील केशवाहिन्यांतील रक्ताचे प्रमाण वाढते, न्यूमोकोकाय सूक्ष्मजंतूंचे प्रमाण वाढते आणि स्राव मात्र अल्प असतो. त्यापुढील व ७२ तास टिकणाऱ्या अवस्थेला ‘लाल यकृतीभवनावस्था’ म्हणतात. यात निःस्राव वाढून कोश भरून जातात. फुप्फुसांची दृढता यकृताप्रमाणे बनते आणि रक्ताधिक्यामुळे फुप्फुसाचा विकृत भाग लाल दिसतो. त्यानंतरच्या ७२ तास टिकणाऱ्या अवस्थेला ‘भुरकट यकृतीभवनावस्था’ म्हणतात. या अवस्थेत कोशिकाधिक्य असलेला निःस्राव वाढून रक्तवाहिन्या दाबल्या जातात. त्यामुळे विकृत भाग लालऐवजी भुरकट दिसतो. यापुढील चौथ्या अवस्थेस ‘शमनावस्था’ म्हणतात. या अवस्थेत कोशिकांचे प्रमाण भरपूर असलेला निःस्राव आणि रक्तातील प्रतिपिंडे (सूक्ष्मजंतू वा त्यांची विषे यांना रोध करणारे पदार्थ) मिळून न्यूमोकोकायचा मोठ्या प्रमाणावर नाश करतात. हळूहळू काही निःस्राव अवशोषिला जातो व काही कफ म्हणून बाहेर टाकला जातो. त्यानंतर फुप्फुस बहुधा पूर्वावस्थेत येते.
अधिककरून उजवे फुप्फुस आणि बहुधा खालच्या बाजूचे खंड या रोगाने पछाडले जातात. रोगट भागावरील परिफुप्फुसातही (फुप्फुसाच्या भोवतील आवरणातही) शोथ उत्पन्न होतो. तसेच परिफुप्फुसगुहेत थोडाफार निःस्राव गोळा होतो. कालांतराने हे परिणामही पूर्ण बरे होतात.
लक्षणे : रोगाची सुरुवात नेहमी अकस्मात, जोरदार थंडी वाजून येण्याने किंवा लहान मुलात उलट्या किंवा आकड्या येऊ लागून होते. शारीरिक तापमान वाढू लागून काही तासांतच ते ३९°-४०° से.पर्यंत जाते. अस्वस्थता, भूक मंदावणे, डोकेदुखी, अंगदुखी ही लक्षणे उद्भवतात. खोकला सुरुवातीपासूनच असतो. कधीकधी खोकल्यामुळे छातीत अधिक वेदना होतात, म्हणून रोगी खोकला दाबण्याचा प्रयत्न करतो. श्वसनगती दर मिनिटास मोठ्या माणसात ३० ते ४० आणि लहान मुलात ५० ते ६० पर्यंत वाढते. लहान मुलात नाकपुड्यांची जोरदार स्पष्ट हालचाल दिसते. नाडीची गती वाढते परंतु रक्तदाब कमी होतो. ४८ तासांनंतर खोकल्याबरोबर कफ बाहेर पडू लागतो. प्रथम तो चिकट, घट्ट व लालसर असतो व पुढे रोगाच्या प्रगतीबरोबर तो पांढरा, पिवळा किंवा पुवासारखा बनतो. ऑक्सिजनन्यूनतेमुळे चेहरा व नखे निळसर दिसू लागतात. कधीकधी, विशेषेकरून मद्यासक्ती असलेल्या रोग्यात उन्मत्त वायू (असंबद्ध बडबड व हालचाली करणे) होतो.
प्रतिजैव (अँटिबायॉटिक) औषधांच्या शोधापूर्वी या रोगाचे स्वरूप पुढीलप्रमाणे असावयाचे. वाढलेले तापमान एकसारखे टिकून राहून सर्वसाधारणपणे सातव्या दिवशी ज्वर एकदमच बारा तासांत कमी होई. कधीकधी पाचव्या तर कधी नवव्या दिवशीही ज्वर असा कमी होई. या ज्वर उतरण्याला ‘संकटावस्था’ म्हणत. एका दृष्टीने ही अवस्था व्याधिसीमाच असे. कारण तेव्हापासून सर्व लक्षणांचा जोर कमी होऊन रोग्यास आराम पडू लागे.
प्रतिजैव औषधांमुळे २४ ते ४८ तासांतच ज्वर कमी होऊन (३७° से.) रोग्यास बरे वाटू लागते. श्वसनगती आणि नाडीची गती नेहमीच्या इतक्या होतात. मात्र खोकला, छातीतील वेदना आणि कफ कमी होण्यास काही दिवस लागतात.
निदान : रोगलक्षणांवरून आणि छातीच्या वैद्यकीय तपासणीवरून रोगनिदान करणे बहुधा सोपे असते. रक्त तपासणी उपयुक्त असते. पांढऱ्या रक्तकोशिकांची नेहमीची दर घ. मिमी. रक्तातील ५,००० ते ८,००० असणारी संख्या ३०,००० ते ४०,००० पर्यंत वाढल्याचे आढळते. त्यामध्ये ९०% कोशिका बहुरूपकेंद्रक प्रकारच्या (ज्याचे केंद्रक–कोशिकेच्या कार्यावर नियंत्रण ठेवणारा जटिल पुंज–खोल पाळी असलेल्या किंवा अनेक केंद्रके असल्यासारखे ज्यांचे खंड पडलेले आहेत अशा प्रकारच्या) असतात. छातीची क्ष-किरण तपासणी १२ ते १८ तासांच्या आत केल्यास संशयास्पद रोग्यामध्येही उपयुक्त ठरते.
उपद्रव : उपद्रवांची विभागणी तीन विभागांत करता येते. (१) फुप्फसासंबंधी उपद्रव : (अ) एका खंडातून दुसऱ्या खंडात रोग फैलावणे. (आ) विलंबित शमनावस्था : यामध्ये रोग नेहमीप्रमाणे १५ दिवसांत बरा न होता अधिक काळ टिकून राहतो. अशा वेळी फुप्फुसाचा इतर रोग (उदा., कर्करोग वगैरे) असण्याची शक्यता असते. (२) हृदय आणि रुधिराभिसरणासंबंधी उपद्रव : (अ) परिसरीय रुधिराभिसरण निष्फलता (बंद पडणे), (आ) न्यूमोकोकायजन्य हृदंतस्तरशोथ (हृदयाच्या आतल्या स्तराचा शोथ) किंवा परिहृदशोथ (हृदय ज्यात असते त्या पटलाच्या पिशवीसारख्या भागाचा शोथ). (३) तंत्रिका तंत्रासंबंधी (मज्जासंस्थेसंबंधी) उपद्रव : मस्तिष्कावरणशोथ (मेंदूच्या आवरणाचा शोथ). नव्या प्रतिजैव औषधांमुळे उपद्रवांचे प्रमाण बरेच कमी झाले आहे.
चिकित्सा : पेनिसिलीन हे या रोगावरील अत्यंत गुणकारक औषध आहे मात्र ते देण्यापूर्वी रोग्यास प्रतिजैव सुग्राह्यता नसल्याची खात्री करून घ्यावी. स्फटिकीय पेनिसिलीन-जी ३ लाख एकक दर बारा तासांस किंवा बेनेथामीन पेनिसिलीन, प्रोकेन पेनिसिलीन आणि बेंझिल पेनिसिलीन यांचे मिश्रण एकच मात्रा स्नायूतून अंतःक्षेपणाने (इंजेक्शनाने) देतात. त्यांशिवाय फिनॉक्सिमिथिल पेनिसिलीन तोंडाने देतात. १२ ते २४ तासांत रोगाचा जोर कमी होतो परंतु प्रतिजैव औषधे कमीत कमी चार दिवस सुरू ठेवणे जरूर असते. वर सांगतल्याप्रमाणे सुग्राह्यता आढळल्यास एरिथ्रोमायसीन, ॲम्पिसिलीन, टेट्रासायक्लीन वगैरे औषधे देतात. विश्रांती व शुश्रूषा महत्त्वाच्या असतात. ऑक्सिजनन्यूनता आढळल्यास ऑक्सिजन देतात [→ प्रतिजैव पदार्थ].
काही महत्त्वाचे प्रकार : स्टॅफिलोकोकायजन्य न्यूमोनिया : स्टॅफिलोकॉकस पायोजेनीस या सूक्ष्मजंतूचा संसर्ग फुप्फुसापर्यंत दोन प्रकारे पोहोचू शकतो : (१) प्रत्यक्ष आणि (२) अप्रत्यक्ष किंवा रक्तवाहित संक्रामण. पहिला प्रकार बहुधा इन्फ्ल्यूएंझाचा उपद्रव म्हणून उद्भवतो. दुसऱ्या प्रकारात शरीरात इतरत्र या सूक्ष्मजंतूंचा प्रादुर्भाव अगोदरच झालेला असतो. उदा., अस्थिमज्जाशोथ (हाडाच्या पोकळीतील मऊ कोशिकासमूहासहित असणारी हाडाची दाहयुक्त सूज). थुंकी तपासणीत व प्रयोगशाळेतील संवर्धनात स्टॅफिलोकोकाय आढळतात. विशेष म्हणजे ते पेनिसिलिनामुळे नाश पावत नाहीत. रोगाचा हा प्रकार गंभीर असून मृत्यूचे प्रमाण बरेच असते. एरिथ्रोमायसीन, क्लोक्सासिलीन वगैरे औषधे देतात.
फ्रीटलेंडर न्यूमोनिया अथवा क्लेबसिएल्ला न्यूमोनिया : क्लेबसिएल्ला न्यूमोनी नावाच्या सूक्ष्मजंतूमुळे होणाऱ्या या रोगाला जर्मन विकृतिवैज्ञानिक कार्ल फ्रीटलेंडर यांचे नाव देण्यात येते. हे सूक्ष्मजंतू त्यांनीच प्रथम अलग मिळविळे आणि तेही त्यांच्याच नावाने ओळखले जातात. अतिशय गंभीर स्वरूपाचा हा न्यूमोनियाचा प्रकार अत्यल्प प्रमाणात आढळतो. थुंकी तपासणी आणि क्ष-किरण तपासणी यांची निदानास मदत होते. स्ट्रेप्टोमायसीन, क्लोरँफिनिकॉल किंवा टेट्रासायक्लीन ही औषधे देतात. मृत्यूचे प्रमाण अधिक असते.
व्हायरसजन्य न्यूमोनिया : काही व्हायरस फुप्फुस ऊतकास (समान रचना व कार्य असणाऱ्या कोशिकांच्या समूहास) रोगजनक असतात. सूक्ष्मजंतुजन्य न्यूमोनियापेक्षा या प्रकारात कित्येक दिवस अगोदरच रोग्यास ज्वर येतो व विषरक्तता (व्हायरसांपासून तयार झालेली विषे रक्तात मिसळून रक्तपरिवहनाद्वारे शरीराच्या सर्व भागांत पसरल्यामुळे निर्माण होणारी अवस्था) झालेली असते. फुप्फुसविषयक लक्षणे नंतर दिसू लागतात. या प्रकारात सुरुवातीपासूनच भयंकर डोकेदुखी, अस्वस्थता व भूक मंदावणे ही प्रमुख लक्षणे आढळतात. छातीच्या साध्या तपासणीत कधीकधी कोणतेही लक्षण आढळून येत नाही आणि न्यूमोनिया असल्याचे फक्त क्ष-किरण तपासणीत प्रथम समजते. रक्तातील पांढऱ्या कोशिकांची संख्या वाढलेली नसते. पेनिसिलीन निरुपयोगी ठरते. रोग बहुतकरून स्वयंमर्यादित स्वरूपाचा असतो.
शोषणजन्य न्यूमोनिया : या न्यूमोनियाचे चार उपप्रकार आहेत. (१) तीव्र ब्राँकोन्यूमोनिया : या उपप्रकारात छोट्या श्वासनलिका आणि वायुकोश दोहोंना शोथ येतो. लहान मुलात गोवर किंवा डांग्या खोकल्यानंतर हा रोग उद्भवण्याची शक्यता असते. दोन्ही बाजूंच्या फुप्फुसांना विकृती होते. प्रौढ व्यक्तीमध्ये तीव्र श्वासनलिकाशोथ किंवा इन्फ्ल्यूएंझानंतर हा रोग उद्भवण्याची शक्यता असते. अगदी लहान मुलात तसेच वयस्कर व्यक्तीत मृत्यूचे प्रमाण अधिक असते.
(२) सौम्य शोषणजन्य न्यूमोनिया: नासाकोटरशोथ, चिरकारी पडसे इ. श्वसनमार्गाच्या वरच्या भागातील रोग असणाऱ्या व्यक्तीत या उपप्रकारचा न्यूमोनिया होण्याचा संभव असतो. रोगास कारणीभूत असणारे सूक्ष्मजंतू कमी तीव्र असल्यामुळे हा रोगप्रकार सौम्य असतो.
(३) अधःस्थितिक न्यूमोनिया : वृद्धावस्थेत किंवा काही महिने टिकणाऱ्या आजारामुळे अंथरुणास खिळून पडावे लागल्यामुळे हा उपप्रकार संभवतो. एकसारखे पडून राहिल्यामुळे खोकल्याबरोबर कफोत्सारण (श्वासनलिका व वायुकोशातील स्राव बाहेर पडण्याची क्रिया) नीट होत नाही. त्याशिवाय गुरुत्वाकर्षणामुळे रक्त विशिष्ट भागाकडेच अधिक साचते. फुप्फुसाच्या छोट्या छोट्या भागांत रोगास नकळतच सुरुवात होते आणि रोग वाढून रोगी दगावतो. मृत्यूच्या कारणांपैकी या प्रकारचा न्यूमोनिया हे एक प्रमुख कारण असते. इलाजामध्ये प्रतिबंधात्मक इलाज फार महत्त्वाचे असतात. वृद्धांना अधिक काळपर्यंत आणि जरूरीपेक्षा जास्त वेळ अंथरुणात पडून राहण्याची सक्ती करू नये. फार काळपर्यंत अंथरुणात पडून राहणे अपरिहार्य असल्यास वारंवार अंगस्थिती बदलणे आणि अधून मधून खोल श्वासोच्छ्वास करावयास लावणे उपयुक्त असते.
(४) शस्त्रक्रियापश्च न्यूमोनिया : या उपप्रकारात शस्त्रक्रिया केल्यानंतर, विशेषेकरून उदरगुहेवरील शस्त्रक्रियेनंतर, वेदनांच्या भीतीने किंवा प्रत्यक्ष वेदनांमुळे श्वसनक्रिया नीट होत नाही. परिणामी घट्ट स्राव एखाद्या श्वासनलिकेत गोळा होतो. त्यापासून प्रथम फुप्फुसनिपात (हवारहित धोकादायक अवस्था) होतो व नंतर न्यूमोनिया होतो. शस्त्रक्रियेच्या वेळी वापरलेली संवेदनाहारक औषधे शस्त्रक्रियेनंतर देण्यात आलेली रक्त, लवणद्राव (सलाइन) इ. द्रव्ये जादा प्रमाणात गेल्यास फुप्फुसांच्या क्रियाशीलतेवर विकृत परिणाम होण्याचीही शक्यता असते.
अभ्यंकर, श. ज. भालेराव, य. त्र्यं.
पशूंतील न्यूमोनिया : वर वर्णिलेले मनुष्यमात्रांमध्ये दिसून येणारे न्यूमोनियाचे सर्व प्रकार कमीअधिक प्रमाणात पशूंमध्ये आढळून येतात. सांसर्गिक रोगाने पछाडलेल्या पशूंची ताकद कमी झालेल्या अवस्थेमध्ये आधीच श्वसन तंत्रात वास्तव्य करीत असलेल्या सूक्ष्मजंतूंचा जोर होऊन अनेकदा न्यूमोनिया झाल्याचे दिसून येते. तीव्र खंडीय न्यूमोनिया, खंडकीय न्यूमोनिया व चिरकारी तंत्वीय आंतरकोशिकीय न्यूमोनिया असे न्यूमोनियाचे प्रकार सरसहा आढळून येतात. विकृतिविज्ञान या परिच्छेदात वर वर्णन केलेल्या फुप्फुसातील ऊतकात होणाऱ्या बदलाच्या सर्व अवस्था पशूंमध्येही दिसून येतात. स्ट्रेप्टोकॉकस, हीमोफायलस, कॉरिनिबॅक्टिरियम इ. वंशांमधील अनेक सूक्ष्मजंतूंच्या फुप्फुसावरील आक्रमणामुळे तीव्र खंडीय न्यूमोनिया होतो. घोड्यामधील कंठपीडन रोग व सेंबा, गायीगुरांतील क्षयरोग, डुकरामधील डुकरांचा ताप व क्षय आणि कुत्र्यामधील डिस्टेंपर या सांसर्गिक रोगांमध्ये खंडकीय न्यूमोनिया होत असल्याचे दिसून येते.
मायकोप्लाझ्मा मायकॉइडिस या सूक्ष्मजंतूमुळे होणारा गायीगुरांत आणि मेंढ्यांमध्ये आढळून येणारा संसर्गजन्य परिफुप्फुस व फुप्फुसशोथ हे सांसर्गिक न्यूमोनियाचे प्रकार वैशिष्ट्यपूर्ण असून त्यामुळे काही देशांमध्ये बरीच जनावरे दगावतात. क्लेबसिएल्ला न्यूमोनी या सूक्ष्मजंतूमुळे वासरांमध्ये व कोकरांमध्ये न्यूमोनिया झाल्याचे आढळून आले आहे.
डुकरामध्ये होणाऱ्या इन्फ्ल्यूएंझा या रोगाच्या रोगकारक व्हायरसाप्रमाणे दिसणाऱ्या परंतु स्वतंत्र अस्तित्व असलेल्या एका व्हायरसामुळे डुकरांमध्ये, तसेच वासरांना आणि कोकरांना व्हायरसामुळे होणारे न्यूमोनियाचे प्रकार, मेदी व जग्सिक्टे हे मेंढ्यांना होणारे चिरकारी स्वरूपाचे न्यूमोनियाचे प्रकार, तसेच ॲस्परजिलस फ्युमिगेटस या कवकामुळे (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतीमुळे) कोंबड्यांना होणारा न्यूमोनिया हे विशिष्ट स्वरूपाचे आहेत.
यांशिवाय जंतासारख्या काही परजीवींच्या जीवनचक्रातील अळी अवस्था किंवा काही लहान परजीवी फुप्फुसात शिरल्यामुळे होणाऱ्या न्यूमोनियाच्या प्रकारांना परजीवीजन्य न्यूमोनिया म्हणतात. डिक्टिओकॅलस व्हिव्हिपॅरस या गायीगुरांतील परजीवीची अंडी त्यांच्या फुप्फुसात उबविली जातात, तर शेळ्या व मेंढ्यांमध्ये प्रोटोस्ट्राँगॅलस रुफेसेन्स हे परजीवी श्वासनलिका व फुप्फुसामध्ये राहातात. त्यामुळे फुप्फुसातील ऊतकाचा क्षोभ होऊन खंडीय न्यूमोनिया होतो. या प्रकारच्या न्यूमोनियात खोकला असतो पण खोकल्याचा आवाज दबल्यासारखा होतो. गायीगुरांमध्ये परजीवीच्या जोडीला कॉरिनिबॅक्टिरियम पायोजेनीस हे सूक्ष्मजंतू अनेकदा असल्यामुळे फुप्फुसामध्ये गळवे होऊन त्यामुळे न्यूमोनियाची तीव्रता वाढते. फुप्फुसातील या परजीवींच्या अस्तित्वामुळे त्याच्या तंत्वीय ऊतकाच्या सांगाड्याला सूज येते व चिरकारी तंत्वीय आंतरकोशिकीय न्यूमोनिया होतो. फुप्फुसातील सूक्ष्म श्वासनलिका व रक्तवाहिन्यांच्या भित्तींवर तंत्वीय ऊतकाची वाढ होऊन वायुकोश आकुंचन पावतात. दमा झाल्यासारखा कष्टश्वासोच्छ्वास हे प्रमुख लक्षण दिसून येते. ताप सहसा असत नाही पण फुप्फुसातील ऊतकाचा मोठ्या प्रमाणावर नाश झाल्यामुळे जनावर खंगत जाऊन मरण पावते.
अति-उच्च ताप, जलद श्वासोच्छ्वास, नाडीचा वेग वाढणे, सर्वांग थरथर कापणे, अंगावर रोम उभे राहणे ही सुरुवातीची लक्षणे सर्व पशूंमध्ये दिसून येतात. चोवीस ते अठ्ठेचाळीस तासांनी श्वासोच्छ्वास धाप लागल्यासारखा होतो. खोकला फारसा असत नाही पण जनावराला कामाला जुंपल्यास खोकल्याच्या उबळी येतात. घोड्यांमध्ये हे विशेषकरून दिसून येते. नाकावाटे प्रथम पाण्यासारखा पण नंतर श्लेष्मायुक्त पांढरा पिवळा पुवासारखा उत्सर्ग येत राहतो. फुप्फुसाचा कोथ (नाश होऊन सडू लागणे) होऊ लागल्यावर उत्सर्गाला कुजट घाण येऊ लागते.
न्यूमोनिया झाला असला, तरी घोडा सहसा खाली बसत नाही. गायीगुरे मात्र ज्या बाजूच्या फुप्फुसामध्ये दुखत असते त्या बाजवूर पडून राहतात, कुंथतात व दात खातात. कुत्री व डुकरे न्यूमोनिया झाल्यावर कायमच आडवी पडतात. मात्र फुप्फुसगुहेमध्ये निःस्राव साचला, तर पुठ्ठ्यावर बसतात. मनुष्यामध्ये दिसून येणारी संकटावस्था पशूमध्ये दिसून येत नाही पण पाचव्या दिवसापर्यंत ज्वर कमी होणे, भूक लागणे इ. सुधारणा दिसून येऊन जनावर बरे होण्याच्या मार्गाला लागते.
पशूंना न्यूमोनिया झाल्यावर करण्याच्या उपायांची रूपरेषा मनुष्यमात्राप्रमाणेच आहे. पेनिसिलीन, प्रोकेन पेनिसिलीन, एरिथ्रोमायसीन, टेट्रासायक्लीन वगैरे प्रतिजैव औषधांची अंतःक्षेपणे देतात. विश्रांती व इतर लाक्षणिक उपाययोजना करतात. पातळ औषधे पाजणे सहसा टाळतात कारण पाजताना औषध श्वासनालात गेले, तर उपायाऐवजी अपाय होण्याचाच संभव अधिक असतो.
दीक्षित, श्री. गं.
संदर्भ : 1. Blood, D. C. Hendersen, J. V. Veterinary Medicine, London, 1971.
2. Davidson, S. McLeod, J., Eds. The Principles and Practice of Medicine, Edinburgh, 1973.
3. Miller, W. C. West, G. P. Black’s Veterinary Dictionary, London, 1962.
4. Reimann, H. A. Pneumonia, Springfield, 1954.
5. Scot, R. B., Ed. Price’s Textbook of the Practice of Medicine, London, 1973.
6. Vakil, R. J., Ed. Textbook of Medicine, Bombay, 1969.
“