न्यूबिया :आफ्रिका खंडातील ईशान्येकडील एका प्रदेशाचे प्राचीन नाव. न्यूबिया ही एक केवळ भौगोलिक संज्ञा आहे. या प्रदेशाचा विस्तार स्थूलमानाने नाईल खोऱ्यातील खार्टूमपासून उत्तरेस आस्वानपर्यंत व तांबड्या समुद्रापासून पश्चिमेस लिबियन वाळवंटापर्यंत होता. दक्षिणोत्तर सु. ९०० किमी. लांबीचा हा प्रदेश १६° ते २४° उ. अक्षांशांदरम्यान पसरला होता. सध्या याचा उत्तरेकडील काही भाग ईजिप्तमध्ये व उरलेला भाग सूदान प्रजासत्ताकात समाविष्ट झाला आहे. प्राचीन ईजिप्तचे फेअरो राजे त्याला कुश म्हणत, तर प्राचीन ग्रीक त्याचा इथिओपिया म्हणून नामोल्लेख करीत. त्याच्या नावाविषयी विद्वानांत मतैक्य नाही. ‘नॉब’ (गुलाम) या शब्दावरून न्यूबिया हे प्रदेशनाम रूढ झाले असावे किंवा ‘नोबॅटी’ या निग्रो लोकांच्या नावातील न्यूबी या अरेबिक स्वरूपावरून न्यूबिया हे नाव रूढ झाले असावे. हा प्रदेश निर्जन, रुक्ष व खडकाळ असून याचा बहुतेक भाग न्यूबिया या नावाने परिचित असलेल्या मरुभूमीच्या प्रदेशात मोडतो.
या प्रदेशात अश्मयुगातील अनेक अवशेष उपलब्ध असून, मानवी संस्कृतीच्या विकासाचे अनेक नमुने पाहावयास सापडतात. प्राचीन काळी ईजिप्त, ॲसिरिया वगैरे समृद्ध संस्कृती येथे नांदल्या. स्नेफ्रू या ईजिप्तच्या राजाने इ. स. पू. २६१३ मध्य या प्रदेशावर स्वारी केल्याचा सर्वप्रथम उल्लेख आढळतो. तत्पूर्वी या प्रदेशात रानटी टोळ्यांचे प्राबल्य होते. त्यानंतर पाचव्या व सहाव्या राजवंशांच्या कारकीर्दीत (इ. स. पू. २४९४–२१८१) ईजिप्तने या प्रदेशाशी राजनैतिक संबंध प्रस्थापित केले आणि पुढे ते अनेक वर्षे चालू होते. अकरा ते तेरा राजवंशांतील चार-पाच सम्राटांनी दक्षिण नाईलमधील व्यापाराला होणारा न्यूबियन लोकांचा उपद्रव बंद करण्यासाठी न्यूबियावर सातत्याने स्वाऱ्या करून सबंध प्रदेश ताब्यात घेतला आणि सरहद्दीच्या बंदोबस्तासाठी किल्ले बांधले. पुढे चौदा ते सतरा राजवंशांच्या कारकीर्दीत ईजिप्तवर मुख्यत्वे हिक्सॉस या रानटी लोकांचे वर्चस्व होते. त्यांचा अंमल न्यूबियावरही होता. पुढे न्यूबियाने हिक्सॉसांपासून स्वातंत्र्य मिळविले, पण अठराव्या घराण्यातील पहिल्या व दुसऱ्या थटमोझ राजांनी न्यूबियावर पुन्हा सत्ता स्थापन केली आणि खंडणी वसूल केली. यानंतर पहिल्या आमेनहोतेपने दक्षिणेत न्यूबियाच्या हद्दीत, तिसऱ्या प्रपाताच्याही पुढे सरहद्दी वाढविल्या. ईजिप्तवर धर्मसत्तेचे प्राबल्य वाढले. या काळात ॲसिरियाने काही वर्षे न्यूबियावर वर्चस्व प्रस्थापित केले, परंतु न्यूबियाने ईजिप्तमधील दुर्बल राजकीय अस्थिरतेचा फायदा घेऊन इ. स. पू. आठव्या शतकात नॅपाता येथे कुश हे स्वतंत्र राज्य स्थापन केले. थोड्याच वर्षांत न्यूबियाने ईजिप्तवर वर्चस्व स्थापून सर्व सत्ता काबीज केली. तसेच ॲसिरियाच्या वर्चस्वाखालील सिरियन प्रांतात न्यूबियन राजांनी बंड सुरू केले तेव्हा ॲसिरियाने ईजिप्तवर स्वारी करून हे घराणे नष्ट केले (इ. स. पू. ६६७). या वेळी कुश राजांनी नॅपाता येथून राजधानी मेरोई या ठिकाणी नेली. मेरोई ही राजधानी इथिओपियन लोकांनी हस्तगत केली (इ. स. पू. ३००). यानंतर ईजिप्त व न्यूबियावर रोमनांचा अंमल प्रस्थापित झाला. डायोक्लीशन याने न्यूबियात काही सुधारणा केल्या. यावेळी नोबॅटी या निग्रो जमातीने न्यूबियात वर्चस्व प्रस्थापिले. या जमातीच्या लोकांचा एतद्देशीय लोकांशी संकर होऊन त्यांनी एक समर्थ राज्य स्थापन केले आणि त्याची राजधानी डाँगोला येथे केली. इ. स. ६०० मध्ये या राज्याचे ख्रिस्तीकरण झाले आणि इथिओपियाच्या राज्याला ते जोडण्यात आले. त्याने मुसलमानांच्या अतिक्रमणाला सातत्याने प्रतिकार केला परंतु अखेरीस १३६६ मध्ये ते राज्य पराभूत झाले आणि न्यूबिया लहानलहान संस्थानांत विभागला गेला. ईजिप्तच्या मोहमद अलीने (१८२०–२२) सर्व लहान मोठी संस्थाने जिंकून एकत्र आणली आणि त्यांवर आपला एकछत्री अंमल बसविला. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस मॅदी पाशाच्या हस्तकांनी न्यूबियाचा बहुतेक भाग आपल्या अंमलाखाली आणला.
न्यूबिया ही जरी एक भौगोलिक संज्ञा असली, तरी या प्रदेशावर अनेक शतके ईजिप्तच्या फेअरो राजांचे वर्चस्व होते, त्यामुळे त्यांनी तेथे अबू सिंबेलसारखी भव्य मंदिरे, लहानमोठे पिरॅमिड व इतर अनेक वास्तू बांधल्या. त्यामुळे सांस्कृतिक दृष्ट्या या प्रदेशात अनेक सुधारणा झाल्या.
न्यूबिया प्रदेशातील लोक भिन्नभिन्न वंशांचे आढळून येतात. बहुसंख्य हॅमेटिक वंशाचे असले तरी निग्रो, अरब व तुर्की यांचेही अधिमिश्रण त्यांच्यात दिसून येते. बहुतेक सर्व मुसलमान आहेत. बर्बर लोक न्यूबियन भाषा व तिच्या अनेक बोलीभाषा बोलतात. ही भाषा आस्वान ते डाँगोला भागापर्यंत बोलली जाते. सध्या न्यूबियाचे बरेच रहिवासी चरितार्थासाठी ईजिप्त व सूदान या दोन्ही देशांचा आश्रय घेतात. येथील धर्माचे स्वरूप सुरुवातीपासून भिन्न असले, तरी विसाव्या शतकात इस्लाम धर्माचे प्राबल्य आढळते.
न्यूबिया वाळवंटामध्ये क्रिटेशसयुगीन वालुकाश्म व त्याखाली ग्रॅनाइट, नीस व शिस्ट यांचे स्फटिक थरस्वरूपात आढळतात. वर्षाकाठी पाऊस फारच कमी पडतो (१२५ मिमी.). न्यूबियन वाळवंट साधारणतः निर्जलीय असून तेथे वनस्पतीही क्वचित आढळतात. त्यामुळे मनुष्यवस्ती फारशी नाही. याचा काही भाग वाडी हॅल्फा-अबू हमाद लोहमार्गाने खार्टूमपर्यंत जोडला आहे. हा लोहमार्ग १८९७ च्या सूदान स्वारीच्या वेळी लॉर्ड किचेनरने बांधला.
पहा : ईजिप्त संस्कृति सूदान.
संदर्भ :Arkell, A. J. A History of the Sudan to A. D. 1821, London, 1955.
देशपांडे, सु. र.