न्यू फाउंडलंड बेट : कॅनडाच्या अगदी पूर्वेकडील न्यू फाउंडलंड प्रांताचा, उत्तरेकडील लॅब्रॅडॉर विभाग सोडून दक्षिणेकडील द्वीपरूप विभाग. क्षेत्रफळ १,१२,३०० चौ. किमी. त्यापैकी सु. १३,८३६ चौ. किमी. पाण्याखाली लोकसंख्या ४,९३,९३९ (१९७१). विस्तार ४६° ३६ उ. ते ५१° ३९ उ. अक्षांश आणि ५२° ३२ प. ते ५९° २७ प. रेखांश यांदरम्यान. हे बेट सर्वसामान्यपणे त्रिकोणाकृती असून याच्या दक्षिणेस व पूर्वेस अटलांटिक महासागर, ईशान्येस त्याचे बेल हे बेट, उत्तरेस बेल बेट सामुद्रधुनी व त्यापलीकडे प्रांताचा लॅब्रॅडॉर विभाग, पश्चिमेस विस्तृत सेंट लॉरेन्सचे आखात व नैर्ऋत्येस कॅबट सामुद्रधुनी आहे. किनाऱ्याजवळची ग्रे, फोगू, मीरशीन, सेंट जॉन व इतर अनेक बेटे यातच समाविष्ट आहेत. दक्षिणेकडील सेंट पीएर व मिकलॉन ही बेटे मात्र फ्रान्सची आहेत. अटलांटिकच्या पश्चिम किनाऱ्यावरील हे बेट मोक्याच्या जागी असून, यूरोप व अमेरिका यांमधील वाहतूक व संदेशवहन या दृष्टींनी ते महत्त्वाचे आहे. सेंट जॉन्स ही याची राजधानी आहे.

भूवर्णन : न्यू फाउंडलंड बेट उत्तर अमेरिकेच्या ॲपालॅचिअन या भूशास्त्रीय विभागातच मोडते. उत्तरेकडील ग्रेट नॉर्दर्न, दक्षिणेकडील ब्युरिन व आग्नेयीकडील ॲव्हलॉन या द्वीपकल्पांनी बनलेल्या सु. ३०० मी. उंचीच्या या ऊर्मिला पठारी प्रदेशाचा सर्वसामान्य उतार व ग्रेट नॉर्दर्न द्वीपकल्पातील लाँग रेंज पर्वताची दिशा नैर्ऋत्य–ईशान्य अशीच आहे. लाँग रेंज पर्वताची सरासरी उंची ७६० मी. असून त्याचे सर्वोच्च शिखर ग्रो मॉर्न ८०८ मी. उंच आहे. याचा पुष्कळसा प्रदेश कँब्रियनपूर्व कठीण खडकांचा असून, येथील शेकडो लहानमोठी सरोवरे, दलदली, पंकिल खळगे आणि यू आकाराच्या दऱ्या यांवरून याचे हिमक्षयित स्वरूप समजते. पूर्वीच्या प्रायः समतल प्रदेशाचे अवशेष सु. ६७० मी. उंचीवर दिसून येतात. ग्रँड, रेड इंडियन, सँडी, गँडर ही सरोवरे मोठी आहेत. बेटाचा किनारा अत्यंत दंतुर व दीर्घ आहे. पश्चिम किनाऱ्यापासून भूमी एकदम उंचावत जाते. किनारी प्रदेशाच्या निमज्‍जनामुळे प्लासेंशा, फॉर्चून, सेंट जॉर्जेस, बॉन, सेंट जॉन, व्हाइट, नोत्रदाम, बॉनव्हिस्ता, ट्रिनिटी, कन्सेप्शन, सेंट मेरीज, बे ऑफ आयलंड्स इ. अनेक आखाते, उपसागर व किनारी बेटे निर्माण झाली आहेत. किनारपट्ट्या डोंगराळ आणि उंचसखल आहेत. बेटाभोवती बराच विस्तृत समुद्रबूड जमिनीचा प्रदेश असून तेथील ग्रँड बँक्स हा उथळ समुद्रप्रदेश मासेमारीसाठी जगद्विख्यात आहे. पश्चिमवाहिनी हंबर आणि पूर्ववाहिनी एक्स्‌‌प्लॉइट्स, गँडर, टेरा नोव्हा या येथील प्रमुख नद्या आहेत. या नद्या व इतर अनेक प्रवाह जलविद्युत्‌निर्मितीस उपयुक्त आहेत.

हवामान :अक्षांश, लॅब्रॅडॉरचा थंड सागरी प्रवाह व प्रदेशाचे पठारी स्वरूप यांमुळे हवा थंड आणि खंडीय प्रभावाची आढळते. भोवतीचा बराच सागरी भाग हिवाळ्यात गोठलेला, तर उन्हाळ्यात हिमगिरी व धुके यांनी युक्त असून थंड प्रवाहामुळे उन्हाळा फारसा जाणवतच नाही. जानेवारीत उत्तरेस तपमान –९° से. व दक्षिणेस –४° से. आणि जुलैमध्ये उत्तरेस सु. १२° से. व दक्षिणेस सु. १४° से. असते. वृष्टी दक्षिणेकडे १५० सेंमी.पासून उत्तरेकडे ७५ सेंमी.पर्यंत आढळते. दक्षिणेस २०० सेंमी. व उत्तरेस ३०० सेंमी. जाडीचा थर होईल इतका हिमवर्षाव होतो. उत्तरेकडील समुद्रभाग वर्षातून पाच महिने गोठलेले असतात. फक्त अतिदक्षिणेकडील सागरी भाग मात्र कधीच गोठत नाहीत. कॅनडाच्या मुख्य भूमीवरून येणाऱ्या मध्यअक्षांशीय वादळांचा येथील हवामानावर बराच परिणाम होतो. त्याच्या दक्षिण भागात ओढली जाणारी गरम हवा दक्षिणेकडील प्रदेशात जास्त पाऊस पाडण्यास साहाय्यक होते. वादळांपूर्वी पूर्वेकडून व ईशान्येकडून लॅब्रॅडॉर प्रवाहावरून येणारे वारे किनारी भागातील उन्हाळा अधिक सौम्य करतात. वादळांनंतर वायव्येकडून आर्क्टिकची थंड हवा आणणारे वारे अक्षांश व समुद्रसान्निध्य यांपेक्षा जास्त प्रभावी ठरतात. दक्षिणेकडील व आग्नेयीकडील समुद्रावर गल्फ प्रवाहावरील उबदार हवा व लॅब्रॅडॉर प्रवाहावरील थंड हवा एकत्र मिसळल्यामुळे धुके निर्माण होते व त्यामुळे थंड प्रवाहाबरोबर येणाऱ्या हिमगिरींमुळे मासेमारी व वाहतूक या व्यवसायांवर प्रतिकूल परिणाम होतो.

वनस्पती : निम्म्याहून अधिक भाग वनाच्छादित आहे. जंगले प्रामुख्याने सूचिपर्णी वृक्षांची आहेत. येथील अरण्यात कॅनडा बाल्सम फर, व्हाइट स्प्रूस, ब्लॅक स्प्रूस, व्हाइट व यलो बर्च ही झाडे व अनेक कठीण लाकडाची झुडुपे व फळझाडे प्रामुख्याने आढळतात. बहुतेक जंगले गँडर व एक्स्‌‌प्लॉइट्स नद्यांच्या खोऱ्यांत आहेत. यांशिवाय इतरत्र शेवाळे भरपूर आढळते. आगी लागणे व त्यानंतरचे क्षरण यांमुळे काही भाग उजाड झाला आहे.

बेटावर वन्य प्राणी आणि जलचर विपुल आहेत. बीव्हर, कस्तुरी उंदीर, खोकड, लिंक्स व ऑटर हे प्रमुख फरधारी प्राणी उत्तरेकडील जंगलांत आढळतात. यांशिवाय मूस, कॅरिबू, काळी अस्वले, सील व ससे हेही प्राणी आढळतात. किनाऱ्यावर आणि जवळपासच्या बेटांवर सागरी पक्ष्यांचे थवे आढळतात. अनेत स्थलांतरी पक्षीही येथे येतात. टार्मिगन व स्नाइप अंतर्भागात आढळतात. बदके आणि हंस विपुल आहेत. पेरिग्रिन ससाणा, ऑस्प्रे व टकल्या गरुड हे शिकारी पक्षी आहेत. काही प्राण्यांची संख्या कमीकमी होत चालली आहे. नद्यांतून व सरोवरांतून ट्राउट व सामन मासे विपुल आढळतात. समुद्र विविझ मत्स्यसंपत्तीने समृद्ध आहेत.


इतिहास व राज्यव्यवस्था : इटालियन समन्वेषक जॉन कॅबट यांनी १४९७ मध्ये याचा शोध लावल्यानंतर पश्चिम यूरोपातून अनेक लोक येथे आले. सर हंफ्री गिल्बर्ट यांनी १५८३ मध्ये सेंट जॉन्स येथे वस्ती स्थापिली आणि बेटे इंग्लंडच्या शासनाखाली आणली. प्रथम त्याबद्दल इंग्लंड व फ्रान्समध्ये वाद झाले पण शेवटी १७१३ मध्ये ती इंग्लंडच्या ताब्यात आली. तथापि काही भागांत मासे मारण्याचे हक्क फ्रान्सकडेच राहिले. त्याबद्दलचे काही तंटे गेले शतकभर चालू होते. १८३२ पासून प्रातिनिधिक शासनव्यवस्था आली, परंतु राज्यपाल व कार्यकारी मंडळ विधानसभेला जबाबदार नव्हते. १८५५ चे संविधान १९३४ पर्यंत अंमलात होते. त्याअन्वये इंग्लंडच्या राजाने नेमलेला राज्यपाल व २७ निर्वाचित सदस्यांची विधानसभा व २४ ‌नियुक्त सभासदांची विधानपरिषद यांस जबाबदार असलेले कार्यकारी मंडळ कारभार पहात असे. १९२५ मध्ये स्त्रियांना मताधिकार मिळाला. १९१७ मध्ये न्यू फाउंडलंडला वसाहतीचा दर्जा मिळाला परंतु आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाल्यामुळे १९३४ मध्ये कारभार आयोगाकडे आला. दुसऱ्या महायुद्धात बॉटवुड येथे प्रचंड हवाईतळ स्थापन झाला. १९४० मध्ये काही भाग अमेरिकेस वापरण्यासाठी देण्यात आले होते. १९४८ मध्ये घेतलेल्या सार्वमतानुसार न्यू फाउंडलंड हा कॅनडाचा दहावा प्रांत म्हणून ३१ मार्च १९४९ रोजी मान्य झाला.

कॅनडाचा इतर प्रांतांप्रमाणेच येथील कारभार चालतो. १९७५ मधील निवडणुकांप्रमाणे न्यू फाउंडलंडच्या एकसदनी विधिमंडळात लॅब्रॅडॉरचे धरून एकूण ५१ सदस्य आहेत. न्यू फाउंडलंड प्रांताचे कॅनडाच्या सीनेटवर ६ व कॅनडाच्या लोसकभेवर ७ प्रतिनिधी आहेत. १९ वर्षांवरील सर्व स्त्री-पुरुष रहिवाशांना मताधिकार आहे. येथे स्थानिक स्वराज्याची प्रगती अगदी मंद झाली. सेंट जॉन्सची नगरपालिका १८८८ मध्ये स्थापन झाल्यानंतर १९३८ मध्ये दुसरी नगरपरिषद निघाली. १९७० नंतर बहुतेक वस्त्या नगरे किंवा ग्रामीण जिल्ह्यांचे भाग बनल्या आणि त्यांचा कारभार स्थानिक स्वराज्य खात्यामार्फत चालू झाला.

आर्थिक स्थिती : येथे शेतीचा व्यवसाय दुय्यम महत्त्वाचा असून मच्छीमारी व जंगलतोड करणारे लोक फावल्या वेळात शेती करतात. तसेच मासेमारीचा व शेतीचा मोसम उन्हाळ्यातच येत असल्याने शेतीकडे फारसे लक्ष देता येत नाही. येथील जमीन व हवा शेतीस फारशी अनुकूल नाही. सुपीक जमीन फक्त नद्यांच्या खोऱ्यांत व किनाऱ्यांवरील काही भागांत आढळते पण तेथूनही पाण्याचा निचरा फारसा होऊ शकत नाही. थोडीफार चांगली शेती फक्त पश्चिम किनाऱ्यावर व ॲव्हलॉन द्वीपकल्पावर सेंट जॉन्सजवळ होत असून तेथे एक शैक्षणिक कृषिक्षेत्रही आहे. बटाटे, सलगम व चारा ही मुख्य पिके असून ब्ल्यू बेरी व इतर स्थानिक फळांची निर्यात होते. जमीन सुधारण्याचे व काही वस्त्या स्थापन करण्याचे सरकारचे प्रयत्न चालू आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर युद्धावरून परत आलेल्या लोकांचे पुनर्वसन करण्याचे प्रयत्न झाले. १९६० मध्ये खेड्याखेड्यांतून वीज नेण्याची योजना कार्यान्वित झाली. न्यू फाउंडलंडमध्ये अन्नपदार्थ आणि पेये आयातच करावी लागतात.

अरण्यावलंबी उत्पादने महत्त्वाची आहेत. कॉर्नर ब्रुक व ग्रँड फॉल्स येथे वर्तमानपत्राचा कागद आणि लगदा तयार करणारे दोन मोठे कारखाने असून येथील सर्व उत्पादन निर्यात होते. तसेच येथे लायनर बोर्ड तयार करणारी एक गिरणीही आहे. याशिवाय शेकडो लहानमोठ्या लाकूड कापण्याच्या गिरण्या विखुरलेल्या असून, लाकूड मुख्यतः स्थानिक वापरासाठीच पुरते. पशुपालन व भाजीपाला यांचे उत्पादन व्यापारी पद्धतीने केले जाते. सेंट जॉन्स, कॉर्नर ब्रुक, ग्रँड फॉल्स येथे दुग्धोत्पादन व भाजीपाला उत्पादन होते. हंबर व कॉडरॉय नद्यांच्या खोऱ्यांत मांसासाठी गुरे, मेंढ्या, कोंबड्या पाळतात आणि भाजीपालाही करतात. अंड्यांना स्थानिक मागणी मोठी असल्यामुळे कुक्कुटपालन हा व्यवसाय वाढत आहे. खाणउद्योगही महत्त्वाचा आहे. लोखंड बेल बेटावर सेंट जॉन्सजवळ वॉबॅना येथे निघत असून ते नोव्हास्कोशातील सिडनी येथील पोलाद कारखान्यास निर्यात होते. जस्त, शिसे, तांबे व थोड्या प्रमाणात सोने यांच्या खाणी बकन्झ येथे आहेत. ब्युरिन द्वीपकल्पावर सेंट लॉरेन्स येथे कॅल्शियन फ्ल्युओराइडाच्या खाणी आहेत. चुनखडकाच्या खाणी अनेक ठिकाणी असून तो खडक सिडनी येथील पोलाद कारखान्यास निर्यात होतो व शेतीच्याही कामी येतो. पश्चिम किनाऱ्यावर जिप्समचे खाणकाम चालते. तसेच १९६० पासून बे व्हर्त येथे ॲस्बेस्टॉसही मिळू लागले आहे. खाणकाम व निर्मितिउद्योग यांस दुसऱ्या महायुद्धानंतर मोठीच चालना मिळाली आहे.

उद्योगधंदे : कॅनडाशी प्रांत म्हणून संलग्न होण्यापूर्वी मासेमारी व वर्तमानपत्राचा कागद या न्यू फाउंडलंडच्या मुख्य उद्योगांशिवाय काही छोटे उद्योगही येथे होते. १९४९ नंतर येथे उद्योगांची वेगाने वाढ झाली. या बेटावर सिमेंट, जिप्सम-भित्तितक्ते, बर्च तक्तपोशी, प्लायवुड, सुती कापड, औद्योगिक यंत्रसामग्री, चलच्चित्रपट, कातडी, रबरी व कातडी वस्तू इत्यादींचे कारखाने निघाले आहेत. एक तेलशुद्धीकरण कारखानासुद्धा निघाला आहे.


येथील मुख्य शक्तिसाधन जलविद्युत् हेच आहे. त्यासाठी नद्या व लहान प्रवाह यांचा उपयोग करतात. एक्स्प्लॉइट्स नदीवरील अनेक धबधबे, बिशप्स फॉल्स, डिअर लेक इ. ठिकाणी वीज उत्पादनकेंद्रे आहेत. यांशिवाय लॅब्रॅडॉर विभागातूनही वीज मिळते. बेटाचे मासेमारीपासून मिळणारे उत्पन्न सर्वांत जास्त असून वाळलेले, खारवलेले कॉड व इतर अनेक मासे महत्त्वाचे आहेत. उत्तरेकडे किनाऱ्यावर कॉड मासे व खोल पाण्यात सर्वत्र हॅडॉक, हॅलिबट, फ्लाउंडर व रोझफिश हे महत्त्वाचे मासे आहेत. तसेच हेरिंग, हेक, मॅकेरेल, कॅटफिश, पॉलॉक, ग्रे सोल, शेवंडा, स्मेल्ट, स्कॅलप, स्क्विड इ. मासे विपुल आहेत. चॅनल पोर्तोबॅस्क हे निर्यातीचे प्रमुख बंदर असून ग्रँड बँक, फॉर्चून, सेंट मेरीज ही मत्स्यप्रक्रियेसाठी प्रसिद्ध शहरे आहेत. व्हेल व सील यांची शिकारही थोडीबहुत चालते.

मासे खारविणे, गोठविणे, वाळविणे, त्यांची लोणची बनविणे व कॉड माशांचे तेल काढणे इ. व्यवसाय चालतात. खारविलेल्या व वाळविलेल्या माशांची मागणी वाढत असल्याने त्यांचे उत्पादन वाढत आहे. या व्यवसायांचे आधुनिकीकरण वेगाने होत आहे.

कन्सेप्शन उपसागरावरील मासेमारी केंद्र, न्यू फाउंडलंड.

वाहतूक व संदेशवहन : वाहतुकीमध्ये अर्थातच जलमार्ग महत्त्वाचे आहेत. कॅनडियन नॅशनल रेल्वे, रेल्वेचाच भाग म्हणून कॅबटच्या खाडीतून जहाजाने रोज वाहतूक करते. अनेक लहान बंदरे होड्यांच्या व जहाजांच्या साहाय्याने संपर्क राखतात. बेटावर मीटरमापी लोहमार्ग सर्व महत्त्वाची स्थळे जोडतात. लोहमार्गांची एकूण लांबी १,१६० किमी. आहे. सर्वच वसाहती आता रस्त्यांनी जोडल्या गेल्या आहेत. मुख्य बेटावरून एक महामार्ग जातो. कॅनडाच्या मुख्य भूमीशी जल, स्थल व वायू या मार्गांनी वाहतूक होते. बेटांतर्गत विमानवाहतूक नेहमीच चालू असते. सेंट जॉन्स, गँडर व स्टीव्हन्‌न्व्हिल येथे हवाई अड्डे असून गँडर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. डाक, तारायंत्र व दूरध्वनी या सोयी सर्वत्र आहेत. कॅनडियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनद्वारे आकाशवाणी व दूरचित्रवाणीचे कार्यक्रम प्रसृत होतात. हार्ट्‍‍स कंटेंट हे अटलांटिकमधून यूरोपला जाणाऱ्या सागरी तारांचे केंद्र आहे.

लोक व समाजजीवन : येथील सु. ७९·५% लोक मूळचे इंग्रज, सु. १७·५% आयरिश व बाकीचे स्कॉटिश, वेल्श, फ्रेंच व चॅनेल बेटांतील आहेत. लोकसंख्येच्या विशेष वाढीस एकोणिसाव्या शतकापासून सुरुवात झाली. कॉड मासेमारीचे महत्त्व व जहाजे सुरक्षित रहाणे, मासे वाळविणे आणि साठविणे यांसाठी योग्य जागा यांस अनुसरून ९,६०० किमी.च्या किनाऱ्यावर वस्त्या निर्माण झाल्या. ग्रँड बँक्स जवळ असल्याने ॲव्हलॉन द्वीपकल्पावरच वस्ती जास्त वाढली. ४०% लोकसंख्या या भागात व त्यातही २०% सेंट जॉन्स भागात आढळते. लहानलहान सु. १,३०० गावांत वस्ती विखुरलेली आहे. पुष्कळशी गावे ५०० पेक्षाही कमी वस्तीची आहेत. मूळ देशाविषयीची जाणीव व विखुरलेली गावे यांमुळे लोक मूळ देशातूनही नष्टप्राय झालेल्या जुन्याच चालीरीतींस चिकटून राहिले आणि त्यामुळे मासेमारीमध्येही सुधारणा झाली नाही. एकंदर सामाजिक जीवनात मूळची भाषा, वंश इत्यादींपेक्षा चर्चला विशेष महत्त्व असून रोमन कॅथलिक व अँग्लिकन चर्चचे प्रत्येकी १/३, तर युनायटेड चर्चचे १/४ अनुयायी आहेत. ठिकठिकाणच्या बोली भाषा अगदी भिन्नभिन्न आहेत. सुमारे ५०% लोक २५ वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. सध्या बरेच तरुण अमेरिकेत व कॅनडाच्या इतर भागांत स्थलांतर करू लागले आहेत.

शिक्षण : सात ते चौदा वर्षे वयाच्या मुलांस शिक्षण आवश्यक व निःशुल्क आहे. शिक्षणावर शासनाबरोबरच निरनिराळ्या ख्रिस्ती धर्मपंथांचाही प्रभाव आहे. १९७४-७५ मध्ये न्यू फाउंडलंड प्रांतात ७२३ शाळांतून १,५८,२९५ विद्यार्थी व ६,८६० शिक्षक होते. पहिल्या महायुद्धात कामास आलेल्या न्यू फाउंडलंडच्या सैनिकांच्या स्मरणार्थ सेंट जॉन्स येथे स्थापन झालेल्या मिमॉरिअल विद्यापीठात ९,६८२ पूर्णवेळ विद्यार्थी होते.

आरोग्य व सामाजिक सेवा :सेंट अँथनी येथे आंतरराष्ट्रीय ग्रेनफेल संस्थेमार्फत रुग्णालय चालविले जाते तसेच वैद्यकीय, शैक्षणिक, अनाथांकरिता व इतर सामाजिक सेवा पुरविल्या जातात. इतरत्र लहानलहान विखुरलेल्या वस्त्यांमुळे शासनाकडेच ही जबाबदारी आहे. आरक्षक दलालाही अशा वस्त्यांमुळे रॉयल कॅनडियन माउंटेड पोलीसदलाचे साहाय्य घ्यावे लागते. दूरचित्रवाणीमुळे व्यावसायिक नाट्यकला मागे पडली असली, तरी हौशी नाट्यकलेची लोकप्रियता वाढत आहे. सेंट जॉन्स येथे पूर्वी विसांहून अधिक छोटी वृत्तपत्रे निघत. आता तेथे दोन व कॉर्नर ब्रुक येथे एक अशी मोठी दैनिके निघतात. पाच साप्ताहिके प्रसिद्ध होतात.

दुसऱ्या महायुद्धामुळे बाहेरून आलेले सैनिक व इतर व्यावसायिक लोक, रेडिओ व दूरचित्रवाणी यांमुळे उत्तर अमेरिकेचा येथील प्रभाव वाढत आहे. सागरप्रेम व त्यास अनुसरून असलेली लोकगीते, लोककथा, पोवाडे इ. न्यू फाउंडलंडची सांस्कृतिक वैशिष्ट्ये टिकवून धरणे हा एक प्रश्नच झाला आहे. ही वैशिष्ट्ये केवळ स्मृतिरूप न राहता लोकजीवनाचा एक अविभाज्य भाग बनावा असा विद्यापीठ आणि लोककला परिषद (फोक आर्ट्‍‍स कौन्सिल) यांचा प्रयत्न आहे.

डिसूझा, आ. रे. कुमठेकर, ज. ब.