न्यूअर्क : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील न्यू जर्सी राज्याच्या एसेक्स परगण्याचे मुख्य ठिकाण व प्रवेश बंदर आणि राज्यातील सर्वांत मोठे शहर. हे न्यूयॉर्क शहराच्या पश्चिमेस सु. १४ किमी. पसेइक नदीच्या डाव्या तीरावर, न्यूअर्क उपसागरावर वसले आहे. उपनगरांसह लोकसंख्या २०·१९ लक्ष (१९७४). हे राजमार्ग, लोहमार्ग, जल व हवाई वाहतुकीचे केंद्र असून पूर्व किनाऱ्यावरील वितरण केंद्र आहे. न्यूअर्क एअरपोर्ट हा देशातील आद्य विमानतळांपैकी एक आहे (१९२८). हे १६६६ मध्ये प्युरिटनांनी रॉबर्ट ट्रीट याच्या नेतृत्वाखाली स्थानिक रेड इंडियनांच्याकडून घेतलेल्या जमिनीवर वसविले. याचे मूळ नाव पेसायक टाउन होते, ते मिलफर्ड असे झाले इंग्‍लंडमधील न्यूअर्क ऑन ट्रेंटहून आलेल्या अब्राहम पीअरसन याच्या सन्मानार्थ याचे न्यूअर्क असे नामकरण झाले. १८३६ मध्ये यास शहराचा दर्जा प्राप्त झाला. शहरातील कृष्णवर्णीय लोकसंख्येचे प्रमाण १९५० मधील १७ टक्क्यांवरून १९७० च्या पुढे ५० टक्क्यांवर वाढले. १९७० मध्ये केनेथ ए. गिब्सन हे न्यूअर्कचे पहिले कृष्णवर्णीय महापौर म्हणून निवडले गेले. येथील उद्योगांची सुरुवात कातडी बूट बनविण्यापासून झाली व थोड्याच काळात हे कातडी वस्तू उत्पादनाचे व चर्मशोधनाचे केंद्र बनले. न्यूअर्क हे अमेरिकेतील अग्रेसर निर्मितिउद्योगकेंद्रांपैकी एक असून येथे इलेक्ट्रॉनीय उपकरणे, कटलरी, रंग, रसायने, पेये, मांस डबाबंद करणे, दागदागिने, फोटोफिल्म, पेपरबोर्ड असे हरतऱ्हेचे उत्पादन होते. येथे अनेक विमाकंपन्यांची प्रधान कार्यालये आहेत. न्यूअर्ककडे आकृष्ट झालेल्या अनेक संशोधकांमध्ये चामडे बनविण्याची प्रक्रिया (१८१८), तसेच वर्धनीय ओतीव लोखंड तयार करण्याची प्रक्रिया (१८२६) यांसंबंधी पेटंट मिळविलेला सेथ बॉइडन, चलत् चित्रपटांसाठी लवचिक फिल्म शोधून काढून तिचे पेटंट मिळविलेला रेव्हरेंड हॅनिबल गुडविन, विद्युतीय माप उपकरणांचा संशोधक एडवर्ड वेस्टन इत्यादींचा समावेश होतो. रट्‍गर्झ विद्यापीठाशी संलग्‍न महाविद्यालये, मुलांकरिता न्यूअर्क अकादमी, शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालय, न्यूअर्क अभियांत्रिकी महाविद्यालय, सेटन हॉल विद्यापीठाची (रोमन कॅथलिक) शाखा, एसेक्स काउंटी महाविद्यालय इ. शैक्षणिक संस्था आहेत. एडमंड क्लॅरेन्स स्टेडमन हा प्रसिद्ध कवी आणि स्टीव्हेन क्रेन हा प्रसिद्ध कादंबरीकार, कवी व लघुकथालेखक हे न्यूअर्क येथे होऊन गेले. मिलिटरी व वॉशिंग्टन पार्क, जपानी चेरींसाठी प्रसिद्ध असलेले ब्रँच ब्रुक उद्यान, प्रार्थनागृह व दोन शतकांपूर्वीचे धर्मोपदेशकाचे निवासस्थान म्हणून प्रसिद्ध असलेले प्‍लूम हाउस (१७१०), ट्रिनिटी कॅथीड्रल (१७४३), पहिले प्रेसबिटेरियन चर्च (१७९१) इ. प्रेक्षणीय वास्तू आहेत.

लिमये, दि. ह.