नौपार्श्व : (अरित्र, पपिस). दक्षिण खगोलातील एक तारकासमूह. पूर्वीच्या नौका (आर्‌गो नेव्हिस) या समूहाचे टॉलेमी यांनी नौकातल (कॅरिना), नौशीर्ष (व्हेला), होकायंत्र-दिग्दर्शक (पिक्सिस) व अरित्र (पपिस) असे चार विभाग केले. नौपार्श्वाच्या उत्तरेस शृंगाश्व, पश्चिमेस बृहल्लुब्धक, दक्षिणेस नौशीर्ष आणि पूर्वेस होकायंत्र व वासुकी असे तारकासमूह आहेत. विशेषतः व्याधाच्या पूर्वेस व आग्नेयीस आणि अगस्तीच्या उत्तरेस हा समूह पाहता येतो. याची व्याप्ती साधारण क्रांती –१०° ते –५०° व होरा ६ ते ८ ता. [→ ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति] अशी आहे. यामध्ये २ प्रतीचे [→ प्रत] तीन व ५ प्रतींपर्यंतचे पुष्कळ अधुंक तारे आहेत. आकाशगंगेचे विषुववृत्त यातून जाते. यांशिवाय याच्या क्षेत्रात दुर्बिणीतून दिसू शकणारे अनेक युग्मतारे, चल तारे, तारकागुच्छ व अभ्रिका आहेत. उदा., उत्तरेकडे एनजीसी २४३७ हा सुंदर तारकागुच्छ, त्याच्याही उत्तरेस एनजीसी २४३८ ही अनियमित बिंबाभ्रिका व दक्षिणेस ३ ते ४ अंश अंतरावर एनजीसी २४४० ही तेजस्वी निळसर बिंबाभ्रिका आहे. यातच झीटा हा अतितप्त व प्रमुख श्रेणीचा तारा आहे [→ तारा]. १९४२ मध्ये या समूहात नोव्हा पपिस हा नवतारा (ज्याची तेजस्विता अचानकपणे अनेक पटींनी वाढते असा तारा) आढळला होता. हा तारकासमूह हिवाळ्यामध्ये उत्तर गोलार्धातील प्रदेशांत दिसतो.

ठाकूर, अ. ना.