नेफेलीन : (नेफेलाइट). फेल्स्पॅथॉइड गटातील सर्वांत सामान्य खनिज. स्फटिक षट्कोणी, प्रसूच्याकार [→ स्फटिकविज्ञान]. हे बहुधा संपुजित, संहत व जडवलेल्या कणांच्या रूपात आढळते. ग्रिजाप्रमाणे चमक असलेल्या संपुजित प्रकाराला इलिओलाइट म्हणतात.⇨पाटन (1010) स्पष्ट. कठिनता ५·५–६. वि. गु. २·५५–२·६५. चमक स्वच्छ स्फटिकांची काचेसारखी संपुंजित प्रकारची चमक व स्पर्श ग्रिजाप्रमाणे. रंगहीन, पांढरे वा पिवळे संपुजित प्रकार करडा, हिरवा वा तांबूस. पारदर्शक ते दुधी काचेप्रमाणे पारभासी. रासायनिक संरचना (Na, K) (AlSiO4) पोटॅशियम अत्यल्प असते. हे हायड्रोक्लोरिक अम्लात सहज विरघळते. नेफलिनात सहज बदल होऊन त्यापासून झिओलाइट, सोडालाइट, शुभ्र अभ्रक, केओलीन इ. खनिजे तयार होतात. हे विरळाच आढळते व विशेषतः सोडियम विपुल व अल्प सिलिका असणाऱ्या शिलारसापासून बनणाऱ्या पातालिक (खोल जागी तयार झालेल्या) अग्निज खडकांत (उदा., नेफेलीन सायेनाईट, फेनोलाईट) व अलीकडच्या काळात बाहेर पडलेल्या लाव्ह्यात (उदा., व्हीस्यूव्हिअसचा लाव्हा, नेफेलीन बेसाल्ट) अभ्रक, गार्नेट, सॅनिडीन इ. खनिजांच्या जोडीने आढळते. संपुंजित व भरड प्रकार अधिक जुन्याखडकांत आढळतो. रशिया (कोला द्वीपकल्प), नॉर्वे, द. आफ्रिका, कॅनडा इ. देशांत हे आढळते. भारतात हे शिवानमलई, कोईमतूर, विशाखापटनम्, किशनगढ (राजस्थान) व जुनागढ येथील नेफेलीन सायेनाइट खडकात आढळते. काच व मृत्तिका उद्योगांत कधीकधी हे फेल्स्पारांऐवजी वापरतात. चामडे, कापड, लाकूड, रबर व तेल या उद्योगांत तसेच रशियात पोटॅशियम, ॲल्युमिना व सिमेंट तयार करतानाही हे वापरतात. अम्लात हे ढगाळ होते म्हणून ढग अर्थाच्या ग्रीक शब्दावरून १८०० साली आर्. जे. हॉय यांनी नेफेलीन हे नाव दिले आहे. ग्रिजासारखी चमक असल्याने चरबी (तेल) अर्थाच्या ग्रीक शब्दावरून संपुंजित प्रकारचे इलिओलाइट हे नाव पडले आहे.
पहा : फेल्स्पॅथॉइड गट.
ठाकूर, अ. ना.