मायक्रोक्‍लीन : फेल्सार गटातील व पोटॅशियमयुक्त फेल्सारांपैकी एक खनिज. याचे स्फटिक त्रिनताक्ष असून यामध्ये ⇨ ऑर्थोक्‍लेजाप्रमाणे साधे व पुनरावृत्त यमलन (जुळे स्फटिक बनण्याची क्रिया) आढळते [→ स्फटिकविज्ञान]. याचा पातळ छेद ध्रुवणकारी सूक्ष्मदर्शाकाने जात्य निकोलाखाली [→ खनिजविज्ञान] पाहिल्यास दुहेरी यमलनामुळे बहुतकरून जाळ्यासारखी रचना दिसते. अशा तऱ्हेने वैशिष्ट्यपूर्ण यमलनामुळे हे इतर फेल्स्पारांहून वेगळे ओळखता येते. स्फटिक, पाटनक्षम [→ पाटन]राशी व वेडेवाकडे कण या रूपांत हे आढळते. पेग्मटाइट खडकात याची व क्वॉर्ट्‌झची आंतरवृद्धी (एकमेकांमध्ये वाढ) होऊन आलेखी रचना निर्माण झालेली आढळते. तसेच याची व अल्बाइटाची आंतरवृद्धी होऊन पर्थाइट व मायक्रोपर्थाइट ही खनिज रूपे तयार होतात. ⇨ पाटन : (001) स्पष्ट, (010) चांगले. हे ठिसूळ असून यात विभाजनतलेही असतात [→ खनिजविज्ञान]. कठिनता ६–६·५. वि. गु. २·५५–२·६३. चमक काचेसारखी. रंग पांढरा, करडसर पांढरा ते पिवळसर, कधीकधी तांबडा, मांसाप्रमाणे गुलाबी व हिरवा. हिरव्या प्रकाराला ⇨ अमेझॉन स्टोन म्हणतात. दुधी काचेप्रमाणे पारभासी ते पारदर्शक. रा. सं. KAISi3O8. यात पोटॅशियमाच्या जागी सोडियम येऊन सोडा मायक्रोक्‍लीन बनते व सोडियमाचे प्रमाण पोटॅशियमापेक्षा जास्त झाल्यास ॲनॉर्थोक्‍लेज तयार होते. ऑर्थोक्‍लेजाप्रमाणे हे सिकत (सिलिकेचे प्रमाण जास्त असलेल्या) अग्निज खडकांमध्ये (उदा., ग्रॅनाइट, पेग्मटाइट इ.) व फेल्स्पॅथिक वालुकाश्मात तसेच अशा खडकांपासून बनलेल्या अर्कोज खडकात आढळते. याच्या जोडीने बहुधा ऑर्थोक्‍लेज आढळते.

इटली, नॉर्वे, मॅलॅगॅसी, अमेरिका इ. देशांत याचे साठे असून अमेरिकेत पेग्माटाइटांच्या मोठ्या भित्तींतून हे खनिज काढण्यात येते. भारतात बिहार, मध्य प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, पंजाब व राजस्थान येथे फेल्स्पारे आढळतात. महाराष्ट्रात हे खनिज ऑर्थोक्‍लेजाच्या जोडीने रत्नागिरी जिल्हात आढळते. मायक्रोक्‍लिनाचा उपयोग पोर्सलीन, काच, विटा, बांधकाम, अपघर्षक (घासून व खरवडून पृष्ठ गुळगुळीत करणारे पदार्थ) इत्यादींमध्ये केला जातो तसेच ते मृत्तिका उद्योगात वापरतात. अमेझॉन स्टोन शोभिवंत कामांसाठी वापरला जातो. मायक्रोक्‍लिनाच्या दोन पाटनपृष्ठांमधील कोन ९० अंशांहून वेगळा असल्याने थोडे कललेले या अर्थाच्या ग्रीक शब्दांवरून याचे मायक्रोक्‍लीन हे नाव पडले आहे.

पहा : फेल्स्पार गट.

ठाकूर, अ. ना.