नेचे : (लॅ. फिलिसिनी ). फुले, फळे व बीजे यांचा संपूर्ण अभाव दर्शविणाऱ्या परंतु आपल्या नाजूक व आकर्षक पानांमुळे बागेत निश्चित स्थान मिळविणाऱ्या वनस्पतींचा एक गट. भरपूर पाऊस व सावली यांना प्रिय असून यांचा प्रसार साधारणपणे जगभर आहे इंग्रजीत ‘फर्न’ या सामान्य नावाने ह्या गटातील कोणतीही वनस्पती ओळखली जाते. घनदाट जंगलांत यांचे वैपुल्य आढळते. थोड्या जाती लहान वृक्षाप्रमाणे असल्या, तरी बहुसंख्य जाती लहान झुडपे व रोपटी [→ ओषधी] आणि क्वचित वेली ह्या स्वरूपांत आढळतात. पृथ्वीवर ह्या वनस्पती डेव्होनियन कल्पापासून (सु. ४०–३६·५ कोटी वर्षांपूर्वीपासून) उपस्थित असल्याचे आढळते.
वनस्पतींच्या वर्गीकरणात या वनस्पतींचा समावेश वाहिनीवंत अबीजी वनस्पती विभागात [टेरिडोफायटामध्ये → वनस्पति, वाहिनीवंत अबीजी विभाग] केला जातो. वर्गीकरणाच्या एका नवीन पद्धतीप्रमाणे ट्रॅकिओफायटा (वाहक घटक व त्यांच्या विविध मांडणीचे प्रकार असलेल्या प्रगत वनस्पती) नावाच्या संघातील टेरोप्सिडा या उपसंघाचे [→ वनस्पतींचे वर्गीकरण] तीन वर्ग केले आहेत : फिलिसिनी (नेचे), जिग्नोस्पर्मी [→ वनस्पति, प्रकटबीज उपविभाग] व अँजिओस्पर्मी [→ वनस्पती, आवृतबीज उपविभाग].
यांपैकी फिलिसीनी वर्गात पुढील पाच गणांचा समावेश केलाजातो : (१) सीनॉप्टेरिडेलीझ (अतिप्राचीन विलुप्त म्हणजे सध्या अस्तित्वात नसलेले नेचे),(२) ऑफिओग्लॉसेलीझ (अहिजिव्ह नेचे), (३) मॅरॅटिएलीझ,(४) फिलिकेलीझ (खरे नेचे) व (५)हायड्रॉप्टेरिडेलीझ (जल नेचे). फिलिसिनी वर्गात सु. २८५ वंश व ९,००० जाती असून त्यांपैकी पहिल्या गणातील सु. २५ वंश व ६५जाती विलुप्त आहेत [→ सीनॉप्टेरिडेलीझ]. नेचांचे इतर काही विलुप्त व विद्यमान वंश उरलेल्या दोन ते पाच या गणांतील असून त्यांतील वंशांची व जातींची संख्या याबद्दल एकमत नाही. काही विलुप्तांचे जीवाश्म (शिळारूप अवशेष) आढळतात. कार्बॉनिफेरस कल्पात (सु. ३५–३१ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात) नेचांची संख्या खूप मोठी असून त्या काळाला ‘नेचांचे युग’ म्हटले जाते. अतिप्राचीन वंशांचा उगम तत्पूर्वी असलेल्या सायलोप्सिडा या प्रारंभिक वाहिनीवंत (पाणी आणि अन्नरसाची ने-आण करणारे शरीर घटक असणाऱ्या) वनस्पतींपासून [→ सायलोफायटेलीझ] झाला असावा तसेच या अतिप्राचीन नेचांपासून ⇨ बीजी नेचे (सायकॅडोफिलिकेलीझ किंवा टेरिडोस्पर्मी) यासारख्या किंवा त्यांच्या आधुनिक वंशजांसारख्या बीजी वनस्पतींचा उगम झालाअसावा, असे मानण्यास पुरावा आहे. अतिप्राचीन नेचांचा पहिला गण वगळून आणि बीजुककोशाचा (प्रत्येकी एका कोशिकेचे – पेशीचे –असे अनेक प्रजोत्पादक घटक एकत्र पिशवीसारख्या असलेल्या अवयवाचा) उगम, विकास पद्धती व संरचना ध्यानात घेऊन फिलिसिनी वर्गाचे (ए. एंग्लर व एल्. डील्स) यूस्पोरॅंजिएटी (स्थूल बीजुककोशी) व लेप्टोस्पोरॅंजिएटी (तनुबीजुककोशी) असे दोन उपवर्ग करतात अथवा सर्वच नेचांचे प्रायमोफिलिसीस (सीनॉप्टेरिडेलीझ), यूस्पोरँजिएटी व लेप्टोस्पोरँजिएटी असे तीन उपवर्ग अन्य वर्गीकरण पद्धतीत (ए. जे. स्मिथ) केलेले आढळतात. यूस्पोरॅंजिएटीत वर सांगितल्यापैकी प्रारंभिक नेचांच्या दुसऱ्या व तिसऱ्या गणांचा समावेश होत असून लेप्टोस्पोरॅंजिएटीत आधुनिक चौथ्या व पाचव्या गणांतील प्रगत नेचे (फिलिकेलीझ किंवा यूफिलिकेलीझ व हायड्रॉप्टेरिडेलीझ) अंतर्भूत होतात. जल नेचांतील पाच वंशाचे (मार्सिलिया, सॅल्व्हिनिया, ऍझोला, पिल्युलॅरिया व रेग्निलिडियम ) काही लक्षणात फिलिकेलीझ नेचांशी साम्य व त्यामुळे आप्तभाव दिसून येतात म्हणून त्यांचा समावेश काहींनी एका स्वतंत्र गणांत करण्याऐवजी दोन स्वतंत्र गणात किंवा दोन स्वतंत्र कुलांत (मार्सिलिएसी व सॅल्व्हिनिएसी) परंतु फिलिकेलीझ या एकाच गणात केला आहे (ए. जे. स्मिथ). या गणात बहुसंख्य व आधुनिक (लेप्टोस्पोरॅंजिएटी) नेचांचा अंतर्भाव असल्याने त्याची तपशीलवार माहिती व वर्गीकरण पुढे दिले आहे. पहिल्या तीन गणांचे व पाचव्याचे [→ जल नेचे] वर्णन अन्यत्र दिले आहे.
खरे नेच : (फिलिकेलीझ). या गणातील अनेक वनस्पती वाहिनीवंत वनस्पतींतील सापेक्षतः खालच्या दर्जाच्या परंतु क्रमविकासात (उत्क्रांतीत) यशस्वी ठरलेल्यांपैकी आहेत. त्यांचे सु. १७५ वंश व ७,५०० जाती आहेत. यांतील सर्वांत जुन्या जाती मध्य व उत्तर डेव्होनियन कल्पापर्यंत आढळतात तथापि त्यांची संख्या व जातींतील विविधता या दृष्टीने त्यांचे वैपुल्य नंतरच्या कार्बॉनिफेरस कल्पात दिसून येते. ही परिस्थिती जुरासिक कल्पापर्यंत (सु. १८·५–१५·५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळापर्यंत) साधारणपणे टिकली, तरी त्यानंतरच्या काळात संख्येत बरीच घट झाल्याचे आढळते. विद्यमान वंशांचे प्रतिनिधी मध्यजीव महाकल्पापूर्वीच्या (सु. २३ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात) खडकांत आढळत नाहीत. तथापि काही प्रमुख जातींचे अस्तित्व पुराजीव महाकल्पात (सु. ६० ते ४० कोटी वर्षांपूर्वीच्या काळात) असल्याचा पुरावा मिळतो. आजच्या जाती बव्हंशी उष्ण कटिबंधात आढळतात तथापि समशीतोष्ण हवामानातही बऱ्याच प्रमाणात आढळतात. बहुतेक जाती बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणाऱ्या) आहेत. काही थोड्या जाती पाण्यात किंवा दलदलीत तर अनेक रुक्ष जागी वाढतात. काही ‘पुनर्जीवी वनस्पती’ प्रमाणे (उदा., प्लीओपेल्टिस लेपिडोटा ) पावसाळी जीवनानंतर शुष्क होऊन राहतात [→ गुलाब, जेरिकोचा].
या गणातील वनस्पतींइतकी शारीरिक विविधता दुसऱ्या कोणत्याही गणात आढळत नाही. आकारमानात २·५ सेंमी. पासून ते २४ मी. उंचीच्या वृक्षापर्यंत अनेक प्रकार आढळतात. जीवनातील प्रमुख अवस्था बीजुकधारी म्हणजे सूक्ष्म प्रजोत्पादक घटक–बीजुके–असलेली वनस्पतीची अवस्था [द्विगुणित म्हणजे गुणसूत्रांची संख्या दुप्पट होणे → गुणसूत्र] असून मूळ, खोड व पाने हे मुख्य शाकीय (एरवी फक्त पोषणाचे कार्य करणारे पण येथे प्रजोत्पादनाचे वा त्याला मदत करण्याचे कार्य करणारे) भाग असतात. खोड आडवे किंवा सरळ (मूलक्षोड), भूमिस्थित (जमिनीखाली वाढणारे), खुंटासारखे किंवा ⇨ वृक्षी नेचाप्रमाणे जमिनीवर वाढणारे उंच आणि मोठे [→ सायकस] वा वेलीप्रमाणे (उदा. लायगोडियम) असून एकपद (सरळ एकटे) वा द्विशाखाक्रमी (पुनःपुन्हा दोनदा विभागलेले) असते. मुळे आगंतुक आणि त्यांची वाढ खोडाप्रमाणे असते. कित्येक नेचे लहान, नाजूक तर काही मजबूत (उदा. बाशिंग नेचा व पॉलिपोडियमाच्या काही जाती) ⇨ अपिवनस्पती (परजीवी नसलेल्या पण दुसऱ्या झाडांवर आधार घेणाऱ्या वनस्पती) आहेत. बहुतेक सर्व खरे नेचे आपल्या बहुधा संयुक्त, पिसासारख्या, नाजूक, लहानमोठ्या व विविध प्रकारच्या पानांमुळे आकर्षक असल्याने शोभेकरिता लोकप्रिय झाले आहेत. कोवळेपणी प्रथम ही पाने कलिकावस्थेत टोकापासून तळाकडे गुंडाळलेली (अवसंवलित) असतात त्यांची मांडणी एकांतरित (एकाआड एक) असते. उष्ण कटिबंधात ती बहुधा चिरहरित (सतत हिरवी) व समशीतोष्ण हवामानात वर्षायू (एक वर्षभर जगणारी) असतात.
जीवनचक्र: बीजुकांच्या साहाय्याने प्रजोत्पादन घडून येते. बीजुककोश (बीजुकांची पिशवी) नित्याच्या हिरव्या पानांवर (दलांवर किंवा दलकांवर) खालच्या बाजूस किंवा रूपांतरित पानांशी विविध प्रकारे संलग्न असून त्यांचे समूह (पुंज) बनतात व ते विशेष प्रकारे पुंजत्राणाने (पुंजावरील झाकणाने) आच्छादलेले किंवा नग्न (न आच्छादलेले) असतात. बीजुककोशाचे आवरण पातळ असून त्याचा स्फोट घडवून आणणारे वलय (विशिष्ट प्रकारे बनलेल्या घन आवरणाच्या कोशिकांचा थर, स्फोटकर वलय) व स्फोटाचा प्रकार यांत विविधता असते. बीजुक संख्येतही फरक असतो. ह्या सर्व लक्षणांचा नेचांच्या वर्गीकरणात उपयोग करतात. बीजुके रुजून स्वतंत्र द्विलिंगी गंतुकधारी (पुं-व स्त्री−प्रजोत्पादक कोशिका बनविणारी पिढी) बनतो व त्यानंतर त्यावर गोलसर रेतुकाशये (पुं−प्रजोत्पादक कोशिका असलेले अवयव) आणि चंबूसारखे अंदुककलश (स्त्री−प्रजोत्पादक कोशिका असलेले अवयव) निर्माण होतात. चलनशील (हालचाल करणारे) व बहुकेसली (अनेक केसासारखे जीवद्रव्याचे–कोशिकेतील जिवंत द्रव्याचे–धागे असलेली) रेतुके (पुं−प्रजोत्पादक कोशिका) पाण्याच्या साहाय्याने पोहत जाऊन अंदुकांशी (स्त्री−प्रजोत्पादक कोशिकांशी) एकरूप होतात (फलन) व रंदुके (संयुक्त कोशिका) बनतात त्यानंतर रंदुकाचा विकास गंतुकधारीतील अन्नपुरवठा घेऊन होतो. कित्येक नेचांमध्ये जीवनचक्रात बीजुकांच्या किंवा रंदुकांच्या मध्यस्थीशिवाय पुढची पिढी निर्माण होते. बीजुकांच्या उत्पत्तीशिवाय गंतुकधारी पिढी बनण्याच्या प्रक्रियेस ‘अबीजुकजनन’ म्हणतात.अंदुकाचे फलन न होता बीजुकधारी पिढी बनल्यास त्या प्रक्रियेस ‘अनिषेकजनन’ म्हणतात तसेच अंदुकाची मध्यस्थी न होता गंतुकधारीपासून बीजुकधारी निर्माण झाल्यास त्या प्रक्रियेस ‘शाकीय अगंतुकजनन’ म्हणतात.
रंदुकाची प्रथम समविभाजनाने [→ कोशिका] विभागणी होऊन त्याचे आठ सारखे विभाग होतात त्यानंतर समोरासमोर असलेल्या दोन-दोन कोशिकांच्या पुन:पुन्हा होणाऱ्या तशाच विभागणीने ‘पद (तळभाग) व आदिमूळ’ वनस्पतीच्या गर्भाच्या अक्षाचा खालचा भाग) आणि ‘दलिका व सूक्ष्म खोड’ असे प्रारंभिक अवयव बनतात [→ नेफ्रोलेपिस]. प्रत्येक जोडीतील अवयवांचा विकास आठ कोशिकायुक्त गर्भाच्या विशिष्ट कोशिकांपासूनच होतो. इतर अवयवांची पूर्ण वाढ होण्यास प्रथम पदाद्वारे अन्नपुरवठा होतो. पुढे आदिमूळाचा जमिनीशी संपर्क होऊन स्वतंत्रपणे अन्नशोषण होते,तसेच दलिकेचे पहिले साधे पान बनून प्रकाश संश्लेषण (प्रकाशाच्या साहाय्याने अन्ननिर्मिती) सुरू होते. यामुळे पुढे खोडाची वाढ होते व त्याच्यावर आगंतुक मुळे निर्माण होतात. त्यानंतर पहिली संयुक्त पर्णे येऊ लागतात, त्यांवर दले कमी असतात परंतु नंतर येणाऱ्या पानांवर क्रमाने दलसंख्या वाढते. अशा रीतीनेलहान स्वतंत्र बीजुकधारी (बीजुकांची निर्मिती करणारी स्वतंत्र पिढी) बनतो [→ नेफ्रोलेपिस]. पुढे हा स्वावलंबी बनतो व याप्रमाणे गंतुकधारी व बीजुकधारी यांचे एकांतरण (एकानंतर दुसरे असा क्रम) घडून येते. नेचांमध्ये अधश्चर (खोडाच्या तळापासून किंवा मुळापासून निघाणारे फुटले), तिरश्चर (मुख्य खोडाचे फुटवे), मूलक्षोड (जमिनीतील आडवे खोड), ग्रंथिक्षोड, कंदिका, पाने इत्यादींच्या साहाय्याने शाकीय प्रजोत्पादन घडून येते. [→ खोड एकांतरण, पिढ्यांचे]. नेचांच्या काही वंशांत गंतुकधारींचे अनेक प्रकारे ⇨ पुनर्जनन होते तसेच कित्येकांत ⇨ बहुगुणन आढळते.
खोड व मूळ यांच्या टोकाशी असलेल्या एका विभाजी कोशिकेपासून विभाजनाने [→ विभज्या] नवीन अवयवांची वाढ होते. खोडातील वाहक तंत्रांत रंभांची (मूळ व खोड यांतील वाहक घटकांनी बनलेल्या मध्यभागाची) विविधता बरीच आढळते. द्वितीयक वृद्धी (वनस्पतीची जाडी वाढणे) बहुधा नसते. शाखा–विवरे व पर्णविवरे असतात [→ रंभ शारीर,वनस्पतींचे]. पानांतील शिरांची मांडणी द्विशाखाक्रमी असते तथापि बाजूच्या जोडणाऱ्या शिरांमुळे अंशतः किंवा कधीकधी पूर्णतः जाळीदार मांडणीही आढळते भिन्न वंशांतील जातींत शारीरिक विविधता आढळते. तिचा तौलनिक अभ्यास होऊन नेचांच्या या गणात कोणती लक्षणे प्रारंभिक व कोणती प्रगत याबद्दल फारसे दुमत नाही त्यावरून कुले, वंश व जाती यांची प्रारंभिकता किंवा प्रागतिकता निश्चित केली जाते. पुढे दिलेल्या माहितीवरून ही बाब व नेचांतील क्रमविकासीय प्रवृत्ती ध्यानात येतील.
प्रारंभिक लक्षणे: (१) मोठी, संयुक्त, पिसासारखी व जाड पाने द्विशाखाक्रमी शिरांची मांडणी (२) खोडात आद्यरंभ (मध्यभागी असलेल्या भेंडाभोवती वाहक ऊतकांचा–कोशिकांच्या समूहांचा–संच) (३) बीजुककोश विखुरलेले व धारास्थित (पानांच्या किनारीजवळ) (४) सर्वच बीजुककोश एका वेळी पक्व होणे (५) स्फोटकर वलय टोकावर (६) पुंजत्राणाचा अभाव (७) सर्व बीजुके सारखी असण्याचा प्रकार बीजुकसंख्या मोठी (८) गंतुकधारी मध्यशीरयुक्त व मोठा (९) रेतुकाशये मोठी व जाड आवरणाची रेतुके असंख्य (१०) अंदुककलशाची मान (ग्रीवा) सरळ व तीत ग्रीवामार्ग−कोशिका.
प्रगत लक्षणे : (१) लहान व पातळ, संयुक्त वा साधी पाने शिरांची जाळीदार मांडणी (२) खोडात नलिकारंभ (भेंडाला वेढणारी वाहक ऊतकांची नलिका),बहुलाद्यरंभ (अनेक आद्यरंभ असणारे) इ.(३) बीजुककोशांचे निश्चित पुंज, पानांच्या मागील पृष्ठावर (४) बीजुककोश पक्व होण्याचा क्रम प्रथम तलवर्धी (नवीन बीजुककोश तळाजवळ व पक्व टोकाकडे आणि नंतर अग्रवर्धी (नवीन बीजुककोश टोकाजवळ व पक्व तळाकडे) (५) स्फोटकर वलय हळूहळू तिरपे किंवा उभे होत जाते (६) पुंजत्राणांची उपस्थिती पुन्हा शेवटी अभाव (७)बीजुक संख्या मर्यादित जल नेचांत भिन्न प्रकारची बीजुके (असमबीजुकत्व) (८) गंतुकधारी लहान व हृदयाकृती किंवा लांबट (९) रेतुकाशये लहान व त्यांचे आवरण तीन कोशिकांचे रेतुके फार कमी (१०) ग्रीवा वाकडी व आखूड दोन प्रकले (कोशिकेच्या कार्यावर नियंत्रण ठेवणारे गोलसर जटिल पुंज) असलेली एकच मार्गकोशिका.
इतिहास : नेचांचा शास्त्रीय अभ्यास सुरू होऊन आज सु. तीनशे वर्षे झाली. नीहेमिया ग्रू व मार्चेल्लो मालपीगी यांनी सतराव्या शतकात प्रथमच नेचांतील ऊतके (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांचे समूह) व त्यांचे प्रकार यांचा अभ्यास केला. अठराव्या शतकात कार्ल लिनियस यांनी बीजुकधारी पानांच्या माहितीवर आधारलेली वर्गीकरण-पद्धती अमलात आणली परंतु ती सदोष होती. पुढे जसजशी अधिक माहिती मिळत गेली तसतशी तिच्यात सुधारणा झाली. एकोणिसाव्या शतकारंभी बीजुकांच्या कार्यासंबंधी माहिती उपलब्ध झाली व १८५०मध्ये व्हिल्हेल्म होफ्माइस्टर यांनी प्रथमच नेचांतील जटिल जीवनचक्रांची माहिती मिळवून दिली. यामध्ये आढळणारे अलैंगिक प्रकारचे बदल हळूहळू समाविष्ट केले गेले. विसाव्या शतकारंभी कार्ल फोन गोबेल व फ्रेडरिक बॉवर यांनी प्रसिद्ध केलेल्या नेचांच्या संरचनाबद्दलच्या ग्रंथांमुळे वर्गीकरणात सुधारणा होऊ लागल्या. नंतर कृत्रिम संवर्धनाच्या तंत्राचा वापर करून व काही रसायनांचा व भिन्न प्रकाश−प्रमाणांचा उपयोग करून केलेल्या प्रयोगांमुळे नेचांच्या विकासाची अधिक माहिती उपलब्ध झाली. एकोणिसाव्या शतकात नेचांतील गुणसूत्रांच्या (आनुवंशिक लक्षणे एका पिढीतून पुढच्या पिढीत नेणाऱ्या सुतासारख्या सूक्ष्म घटकांच्या) अभ्यासास सुरूवात झाली व १९५० पासून त्यात झपाट्याने प्रगतीही झाली अधिक जातींची जीवनचक्रे व संरचना यांच्या अभ्यासाचा परिणाम वर्गीकरण अधिक बिनचूक करण्याकडे होऊ लागला आहे. नेचांतील रासायनिक पदार्थांचा उपयोग वर्गीकरणात होतो, तसेच काही कीटकनाशके व औषधे बनविण्यात होतो, असा अनुभव येत आहे.
भारतात महाराष्ट्रातील नेचासंबंधी सर्वप्रथम जे. ग्रॅहॅम (१८३९) यांनी पंचवीस जातींची वर्णने लिहिली त्यानंतर एच्. एम्. बर्डवुड (१८८६) यांनी माथेरान येथील बारा जातींचा उल्लेख माथेरानच्या पादपजातीत (प्रादेशिक वनस्पतीसमूहात) केला पुढे १८९७ मध्ये त्यांनी माथेरान आणि महाबळेश्वर येथील ३२ जातींचा समावेश तेथील वनस्पतींच्या यादीत केला. टी. आर्. एम्. मकफर्सन यांनी उ. कारवारातील ७५ नेचांची यादी प्रसिद्ध केली. यांशिवाय विल्यम हूकर, जी. एम्य स्मिथ, आर्. एच्. बेडोम, विल्यम ग्रे इत्यादींनी महाराष्ट्राच्याच काय पण भारताच्या बहुतेक सर्व भागांतील नेचांचा अभ्यास करून बरीच माहिती प्रसिद्ध केली आहे. ई. ब्लॅटर आणि जे. एफ्. आर्. द’ आल्मेइदा यांनी फर्न्स ऑफ बॉम्बे या पुस्तकात (त्या वेळच्या) मुंबई राज्यातील बहुतेक सर्व नेचांची सचित्र वर्णने दिली आहेत. पुणे विद्यापीठातील वनस्पतिशास्त्राज्ञ त्र्यं. शं. महाबळे व त्यांचे अनेक सहकारी यांनी पश्चिम घाट (सह्याद्री) व त्याच्या परिसरातील प्रदेश येथील नेचांचा सर्वांगीण अभ्यास करून महत्त्वाची माहिती संकलित केली आहे तसेच ह्या नेचांच्या उपलब्ध जीवाश्मांचा आणि विद्यमान जातींचा तौलनिक अभ्यास करून त्यांच्या जातिवृत्तासंबंधीचे निष्कर्षही काढले आहेत. मुंबई, पुणे व कलकत्ता येथील वनस्पति-संग्रहालयांत भारतीय नेचांचे सुकविलेले शेकडो नमुने आज पहावयास मिळतात.
लागवड : भारतातील पानझडी जंगलांत निसर्गतः नेचांचे प्रमाण बरेच कमी आहे येथे फक्त पावसाळ्यात काही जाती आढळतात परंतु कोरड्या ऋतुत त्यांचे फक्त भूमिस्थित भाग जिवंत राहतात. अधिक उंचीच्या प्रदेशांतील कमी तापमानामुळे अधिक जाती आढळतात आणि त्यांचा आयु:काल अधिक दीर्घ असतो परंतु सदापर्णी जंगलात नेचांची गर्दी जास्त असून विविधता व आयुःकाल सापेक्षतः अधिक असतात. दमट हवा, सावली, कमी तापमान, भरपूर पाऊस इ. परिस्थिती असलेल्या प्रदेशात नेचे विपुल आढळतात. लहानमोठ्या बागांतून आकर्षक स्वरूपवैचित्र्याकरिता नेचांची लागवड कुंड्या, वाफे, लोंबत्या टोपल्या इत्यादींत करतात. तेथे त्यांना वर सांगितल्याप्रमाणे नैसर्गिक परिस्थिती उपलब्ध करून दिल्यास त्यांची वाढ चांगली होते. सोसाट्याच्या वाऱ्यापासून संरक्षण, सौम्य प्रकाश, जमिनीत माफक ओलावा, भरपूर पालापाचोळ्याच्या खताचा पुरवठा आणि फार बदल होत नसलेले तापमान इत्यादींनी युक्त अशी परिस्थितीनेचांना अनुकूल असते. विविध नेचांची लागवड हा एक निर्भेळ आनंद देणारा छंद असून धंद्याच्या दृष्टीनेही लागवड फायद्याची ठरते. तुरे, हार, पुष्पपात्रातील मांडणी यांमध्ये नेचांची पाने आकर्षकपणात भर टाकतात. नेचांची अभिवृद्धी (लागवड) शाकीय भाग व बीजुके यांच्या साहाय्याने करतात.
वर्गीकरण : फिलिकेलीझ गणात समावेश असलेल्या खऱ्या नेचांच्या कुलांच्या संख्येबद्दल मतभेद आहेत. जी. एम्. स्मिथ यांच्या मते दहा कुले, शिवाय जल नेचांच्या दोन स्वतंत्र गणांतील (मार्सिलिएलीझ व सॅल्व्हिनिएलीझ) दोन कुले (मार्सिलिएसी व सॅल्व्हिनिएसी) आहेत. ए. जे. इम्स यांनी जल नेचांची दोन स्वतंत्र कुले फिलिकेलीझमध्ये समाविष्ट करून एकूण कुलसंख्या नऊ मानली आहे. याचा अर्थ इम्स यांच्या सात कुलांतील वंशांची विभागणी स्मिथ यांच्या दहा कुलांत झाली आहे. एच् जे. डिटमेर यांनी इम्स यांच्याप्रमाणेच सात कुले मानून त्यांचा अंतर्भाव फिलिकेलीझ अथवा नेचे गणामध्ये केला असून जल नेचांच्या पाच वंशांचा समावेश एका स्वतंत्र गणात (हायड्रॉप्टे रिडेलीझ) केला आहे. पॉलिपोडिएसी कुल सर्वांत मोठे असून त्यात सु. १५० वंश व ६,००० जातींचा समावेश आहे. ते सर्वांत प्रगत व अधिक प्रसार पावलेले असून त्यातील जातींच्या अभ्यासाने नेचांविषयी चांगली कल्पना येते. काही सामान्य वंशांची व काही जातींची विशेष माहिती पुढे दिली आहे. जल नेचांवर स्वतंत्र नोंद आहे [→ जल नेचे]. नेचांना शोभेखेरीज व्यावहारिक महत्त्व बरेच कमी आहे. आग्नेय आशियात काहींचे कोवळे खोड व पाने खातात काही जाती औषधी आहेत (उदा., मेल फर्न). कार्बॉनिफेरस कल्पातील कोळशाच्या निर्मितीत नेचांचा वाटा मोठा आहे.
नेचांच्या वर्गीकरणात साधारणपणे सर्व शारीरिक लक्षणे विचारात घेतली जातात हे खरे तथापि प्रजोत्पादक इंद्रिये विशेषेकरून लक्षात घेऊन पुढे दिल्याप्रमाणे फिलिकेलीझ गणातील सात प्रमुख कुले ओळखली जातात.
(१) ऑस्मुंडेसी: एक प्रारंभिक कुल. यामध्ये ऑस्मुंडा, टॉडिया आणि लेप्टॉप्टेरिस असे ३ वंश व एकूण सु. १९ जाती आहेत. त्यांचा प्रसार उष्ण व समशीतोष्ण प्रदेशात आहे. बीजुककोश यूस्पोरँजिएट व लेप्टोस्पोरँजिएट प्रकारचे [→ वनस्पति, वाहिनीवंत अबीजी विभाग] असून पुंज व पुंजत्राण नसतात काही अरुंद पानांच्या कडेवर बीजककोश चिकटलेले असून स्फोटकर वलये बीजुककोशाच्या टोकाकडे एका बाजूस आणि फक्त काही गोलसर कोशिकांची बनलेली असतात स्फोटरेषा उभी असते मोठ्या, हृदयाकृती व मध्य–शिरायुक्त गंतुकधारीवर मोठी रेतुकाशये असून बीजुकसंख्या जास्त असते.
परांडेकर, शं. आ.
ऑस्मुंडा : ऑस्मुंडेसी कुलातील तीन वंशांपैकी एक प्रमुख वंश हे वंशनाम एका केल्टिक देवतेचे नाव असून या नेचांना इंग्रजीत ‘शाही नेचा’ (रॉयल फर्न) या अर्थाचे नाव आहे. ह्यामध्ये सु. दहा जाती असून त्या उष्ण व समशीतोष्ण कटिबंधांत पसरल्या आहेत. भारतात दोन जाती जंगली अवस्थेत आढळत असून इतर काही बाहेरून आणून लावल्या आहेत. सापेक्षतः हे नेचे मोठे व जोमाने वाढणारे आणि कणखर शरीराचे असून त्यांची मुळे खोलवर जातात आणि पाने मोठी व भरभरीत असतात. तथापि त्यांची बागेत शोभेकरिता लागवड करतात. सूर्यप्रकाश, खोल ओलसूर जमीन व काही जातींना थोडी सावली फार मानवते. अत्यंत अनुकूल परिस्थितीत काहींची उंची २·५ मी.पर्यंत जाते. खोड आखूड, बळकट व पर्णतलांनी आणि तंतुमुळांनी झाकलेले असते. पाने संयुक्त, पिच्छाकृती (पिसासारखी) एकदा किंवा दोनदा विभागलेली, वंध्य व जननक्षम भाग (बीजुककोशधारक) स्वतंत्र किंवा एकाच पानाच्या पात्यात सामावलेला. बीजुककोश सवृंत (देठ असलेला) व अनाच्छादित असून त्यांची मांडणी परिमंजरीप्रमाणे [→ पुष्पबंध] असते. बीजुककोशावर टोकाशी एका बाजूस काही कोशिकांच्या समूहामुळे स्फोटकर वलय बनलेले असून तो कोश उभा तडकतो.
ऑस्मुंडा रिगॅलिस ही जाती सर्वत्र सामान्यपणे उघड्या आणि ओलसर ठिकाणी आढळते. भारतात ती गर्द जंगलात, उंच टेकड्यांवर प्रवाहांच्या काठाने (कारवार, कॅसलरॉक, अंबोली, महाबळेश्वर, कुमाऊँ, खासी इ.) वाढते. पाने ०·६–१·२ मी. व देठ ३०–४५ सेंमी. लांबटोकाकडे अनेक बीजुककोशधारक दले व दलके इतर दले व दलके हिरवी, दातेरी व शिरा द्विशाखी बीजककोश मोठे, तपकिरी पिंगट. जपानात कोवळ्या पानांवरचे केस लोकरीत मिसळून कापड व रेनकोटाकरिता वापरतात. अमेरिकेतील मनॉमनी इंडियन लोकांनी ऑ. सिनॅमोमियाच्या पानांचा उपयोग कढी व सार यांकरिता केला होता. ऑ. रिगॅलिसची मुळे पिच्छिल (श्लेष्मल), पौष्टिक, उत्तेजक व रक्तस्तंभक (रक्तस्राव थांबविणारी) असतात. या वनस्पतीचा रस आंत्र (आतड्याच्या) विकारावर पोटात देतात आणि संधिवातावर बाहेरून लावण्यास वापरतात. आमांश, मुडदूस, स्नायुदौर्बल्य इत्यांदीवर ही वनस्पती उपयुक्त असल्याचे आढळले आहे. ऑ. क्लेटोनियाना ही जातीही भारतात आढळते तिला वंध्य व जननक्षम पाने स्वतंत्र असतात. भारताच्या राजमहल टेकड्यांत (बिंद्रावनजवळ ऑस्मुंडाच्या जातीचे खोड, मुळे व पानांचे देठ यांचे जीवाश्म आढळले आहेत. त्यांना ऑस्मुंडाइट्स सहानीआय हे नाव दिले आहे.
मुजुमदार, शां. ब. परांडेकर, शं. आ.
(२) शिझीएसी : प्रारंभिक कुल. शिझीया, ऍनिमिया,लायगोडियम व मोहरिया असे ४ वंश व जाती सु. १६०. प्रसार सर्वत्र आहे. निश्चित पुंजांचा अभाव असून बीजुककोश मोठे व मोहरियाखेरीज इतरांत विशिष्ट दलांवर किंवा दलांच्या भागांवर आढळतात. स्फोटकर वलय माथ्यावर पुंजत्राण बहुधा नसते मोहरियात खाली वळलेल्या पानांच्या किनारीखाली बीजुककोश एकेकटे असून ते उभ्या रेषेवर तडकतात. बीजुकांशी संख्या मोठी असते.
परांडेकर, शं. आ.
ॲनिमिया : या वंशात सु. ९० जाती असून त्यांचा प्रसार बहुतांशी उष्ण कटिबंधात, विशेषतः द. अमेरिका, आफ्रिका, मॅलॅगॅसी आणि उत्तरेकडे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील फ्लॉरिडा व टेक्सासपर्यंत भारतात फक्त एकच जाती केरळ राज्यात आढळते. मूलक्षोड केसाळ व लहान पाने संयुक्त, पिच्छाकृती, एकदा अथवा दोनदा व अंशतः विभागलेली असतात. सर्वांत खालची दोन दले जननक्षम व शाखायुक्त परिमंजरीप्रमाणे असून त्यांना फक्त लांब देठ असतो पण पाते नसते. इतर दलांमध्ये शिरांची मांडणी जाळीदार किंवा मुक्त असते. बीजुककोश लहान, अनेक, स्वतंत्र, एकाच वेळी पक्व होणारे असून पुंजत्राण नसते. स्फोटकर वलय बीजुककोशाच्या माथ्यावर असून तो उभ्या रेषेत तडकतो. इतर सामान्य लक्षणे खरे नेचे या उपशीर्षकाखाली वर्णिल्याप्रमाणे असतात.
ॲनिमिया रोटुडिफोलिया : ही जाती मुख्यतः ब्राझीलमध्ये आढळते भारतात बागेत लावलेली आढळते. पानाचा देठ १५–२३ सेंमी. लांब व केसाळ पर्णाक्ष केसाळ व पाते चिवट शिरा पंख्याप्रमाणे पसरलेल्या. बीजुककोशधारी भाग व वंध्य भाग सु. २०–३० सेंमी. लांबी व तळाशी २·५−५ सेंमी. रुंद व त्याच्या टोकाशी कधीकधी मुळ्या फुटतात. जननक्षम भाग परिमंजरीप्रमाणे व २·५ X ७·५ सेंमी. आणि वर वर्णन केल्याप्रमाणे असतो.
आगाशे, श्री. ना.
लायगोडियम : (वेली नेचा इं. क्लाइंबिंग फर्न). सरळ व ताठ झाडांवर किंवा तशाच आधारावर चढत वाढणाऱ्या ह्या नेचांच्या वंशात एकूण सु. तीस ते चाळीस जाती (जे. सी. विलिस यांच्या मते फक्त तीन) आहेत व त्यांचा प्रसार उष्ण व उपोष्ण कटिबंधांत आहे. भारतात चार जाती (सर्सिनेटम, फ्लेक्सुओजम, जॅपोनिकम व मायक्रोफायलम) आढळतात व त्यांचा प्रसार इतर कित्येक नेचांप्रमाणे टेकड्यांवरील अथवा भरपूर पाऊस असलेल्या सखल प्रदेशातील जंगलांत आहे. त्यांच्या नाजूक सौंदर्यामुळे कित्येक जातींना शोभेकरिता बागेत स्थान मिळाले आहे. यांचे खोड भूमिस्थित व आडवे वाढणारे असून त्यापासून जमिनीवर पाने येतात. पानाला टोकाशी अमर्याद वाढ असून त्याचा अक्ष आधाराभोवती वेढे घालीत चढतो. त्या अक्षावरच्या बाजूच्या आखूड फांद्यांनाही प्रसुप्त टोके आणि द्वितीयक पर्णयुक्त फांद्या असतात. दले हस्ताकृती खंडित (हाताच्या बोटांप्रमाणे विभागलेली) किंवा पिच्छाकृती, अंशतः खंडित (विभागलेली) कधी पूर्णतः खंडित सिराविन्यास (शिरांची मांडणी) द्विशाखी (आ. ४) बीजुककोश एकाकी किंवा जोडीने, मोठ्या व एकमेकांना अंशतः झाकणाऱ्यापर्णखंडांच्या बगलेत असून त्यांची कणिशासारखी संरचना बनते. ही कणिशे स्वतंत्र जननक्षम दलावरच्या खंडावर कडेने असतात कधीकधी त्यांच्या विरळ रांगा सामान्य वंध्य दलांच्या कडेने असतात. खरे पुंजत्राण नसते. इतर सामान्य लक्षणे वर दिलेल्या शिझीएसी कुलाच्या वर्णनाप्रमाणे असतात. बीजुककोश उभे तडकतात, कारण स्फोटकर वलय टोकास मुकुटाप्रमाणे असते. बीजुके सु. १२८ इतर सामान्य लक्षणे ⇨ नेफ्रोलेपिसप्रमाणे असतात.
इंडोनेशियात लायगोडियम सर्सिनेटमचे देठ जखमांवर लावतात व त्यांच्या अक्षांच्या पट्ट्या करतात. ला. फ्लेक्सुओजम कफोत्सारक (कफ काढून टाकणारी) असून त्याची ताजी मुळे मोहरीच्या तेलात उकळून संधिवात, मुडपणे, इसब, खरूज, कापण्याने झालेल्या जखमा इत्यादींवर बाहेरून लावण्यास वापरतात. ला जॅपोनिकम ही वनस्पतीही कफोत्सारक असून चीनमध्ये हिचा काढा विरेचक (पोट साफ करणारा) व मूत्रल (लघवी साफ करणारा) या गुणांकरिता वापरतात. जावामध्ये ला. मायक्रोफायलमची कोवळी पाने खातात अतिसारात पानांचा काढा घेतात चर्मरोगांवर व सुजेवर पानांचे पोटीस बांधतात. पानांचे लांब तारेसारखे अक्ष वस्तू बांधण्यास व टोपल्या करण्यास वापरतात. ला. पामेटम ही जाती उ. अमेरिकेत नेचागृहात शोभेकरिता लावली जाते.
(३) ग्लायकेनिएसी: प्रारंभिक कुल. याचा उष्ण, उपोष्ण व द. समशीतोष्ण कटिबंध येथे प्रसार आहे. यातील ५वंशांपैकी डिक्रॅनोप्टेरिस सामान्य एकूण जाती सु. १६० आद्यरंभी मूलक्षोड, लांब व आडवे असून २–१५ मोठ्या बीजुककोशांचे पुंज द्विशाखाक्रमी, संयुक्त, पिसासारख्या पानांवर असतात पुंजत्राण नसते. बीजुकसंख्या मोठी बहुतेक जाती रुक्षताप्रिय स्फोटकर वलय बीजुककोशाभोवती काहीसे तिरपे असून स्फोटरेषा उभी असते.
डिक्रॅनोप्टेरिस : ग्लायकेनिएसी कुलातील एका वंशाचे नाव. याशिवाय (सी. क्रिस्तन्सन यांच्या मताप्रमाणे) चार अधिक वंशांचा याच कुलात हल्ली समावेश केला जातो. पूर्वी (डिल्स यांच्या माताप्रमाणे) ग्लायकेनिया हा एकच वंश या कुलात समाविष्ट असे अद्यापही काही शास्त्रज्ञ तसेच मानतात. डिक्रॅनोप्टेरिस वंशात सु. दहा जातींचा अंतर्भाव असून त्या पूर्वी ग्लायकेनिया वंशात वर्णिल्या होत्या. त्यांचा प्रसार उष्ण व उपोष्ण कटिबंधांत आहे. त्यांच्या पानांची विभागणी व आकार, बीजुककोशांची पुंजातील संख्या व शारीरिक संरचनेतील तपशील यांमध्ये भिन्नता आढळते. बहुतेक जाती रुक्ष ठिकाणी तणाप्रमाणे वाढतात. बागेत क्वचितच त्यांना स्थान मिळते. त्यांचे भूमिस्थित खोड आडवे द्विशाखाक्रमाने वाढते व त्यापासून जमिनीवर मोठी, आभासी, द्विशाखाक्रमी, संयुक्त, पिच्छाकृती पाने येतात. पानांचा देठ दुभंगून वाढत असताना बाजूस येणाऱ्या दोन नवीन दलांच्या देठांनी सतत वाढ चालू राहते मात्र प्रमुख देठांवर प्रसुप्त कलिका राहते नवीन देठावरही दुभंगण्यापूर्वी तशीच कलिका येते. अनेकदा याप्रमाणे विभागलेल्या अनेक मोठ्या पानांच्या परस्परांत गुंतण्यामुळे दाट जाळ्या बनतात. प्राथमिक देठ दुभंगण्याच्या वेळीच काही जातींत बाजूस दोन पिच्छाकृती दले येतात व पुढे याच प्रकारची पुनरावृत्ती होते यामुळे पानांना विशिष्ट आकार प्राप्त होतो. पानाच्या शेवटच्या शाखेवर एक द्विशाखी दल असते. प्रत्येक पिच्छाकृती दलावर अनेक जाडसर अपूर्ण पाली (खंड) असून त्यांच्या खालील बाजूस मध्यशीर व कडा यांच्यामध्ये उपशिरेवर मोठे बीजुककोश पुंज असतात. त्यावर पुंजत्राण नसते, फक्त काही केस किंवा खवले असतात. खंड लांबट असून उपशिरायुक्त व द्विशाखी असतात. बीजुककोश संख्येने कमी, जवळजवळ बिनदेठाचे, लंबगोल असून त्यावर स्फोटकर वलय पूर्ण व तिरपे असते ते उभे तडकतात व अनेक बीजुके बाहेर पडतात सर्व बीजुककोश एकाच वेळी पक्व होतात. गंतुकधारी मोठा, मांसल व मंदपणे वाढणारा असून त्यात अंतस्थित संकवक [→ कवक] असतो. रेतुकाशये सापेक्षतः मोठी असतात. इतर सामान्य शारीरिक लक्षणे व जीवनचक्रातील घटना ⇨ नेफ्रोलेपिसप्रमाणे असतात. खोडात काही जातींमध्ये आद्यरंभ व काहीत खंडितरंभ (विभागलेला वाहक भाग) असते.
डिक्रॅनोप्टेरिस लीनिऍरिस : (ग्लायकेनिया लीनिऍरिस). ही जाती भारतात सर्वत्र व श्रीलंका, जपान, अमेरिका, ऑस्ट्रेलिया,पॉलिनीशिया इ. प्रदेशांत आढळते. भरपूर सूर्यप्रकाशात ती चांगली वाढते व अनेकदा तिची सांघिक वाढ आढळते. पानांच्या दलांवरील खंड खाली निळसर हिरवे व त्यांवर दोन ते सातपर्यंत बीजुककोशांचे पुंज असतात पानांच्या पहिल्या विभागणीच्या वेळी दोन खंडित पार्श्वदले येतात. तसेच पुढेही वाढ चालू असताना प्रत्येकवेळी तशी दले येतात. मलेशियात पानांच्या लांब देठांपासून चटया, खुर्च्यांच्या बैठकी, दोऱ्या, टोप्या, लहान टोपल्या, पिशव्या, पट्टे इ. किरकोळ वस्तू करतात. खोडाच्या लाकडापासून लेखण्या करतात. खोड कृमिघ्न (कृमिनाशक) असून पाने मॅलॅगॅसीत दम्यावर वापरतात. पानांचा रस सूक्ष्मजंतुनाशक असतो. भारताच्या जुरासिक काळातील बिहार व मध्य प्रदेश येथील खडकांत ग्लायकेनिएसी कुलातील वनस्पतींच्या पानांचे काही जीवाश्म आढळले आहेत त्यांचा समावेश ग्लायकेनाइट्स वंशातील दोन जातींत केला गेला आहे.
(४)हायमेनोफायलेसी : (इं. फिल्मी फर्न्स). या कुलात वंश फक्त २ (हायमेनोफायलम व ट्रायकोमॅनीस ) व जाती सु. ३००–४००.विलिस यांच्या मते वंश ३४ व जाती ६०० असून ई. बी. कोपलॅंड यांनीही ३४ वंश मानले आहेत. वनस्पती फार लहान व नाजूक असून त्यांचा प्रसार उष्ण कटिबंधात विशेष आहे. पाने फार पातळ, विभागलेली व नाजूक असतात. बीजुककोश पुंज पानांच्या किनारीवर पेल्यासारख्या किंवा नळीसारख्या पुंजत्राणाने वेढलेले व लांबट बारीक दांड्यावर आधारलेले. स्फोटकर वलय पूर्ण व तिरपे बीजुककोशांचा विकास तलवर्धी. बीजुकांची संख्या सर्वसाधारणपणे मोठी असते.
ट्रायकोमॅनीस : या वंशातील सु. २५ जाती जगाच्या उबदार व ओलसर प्रदेशांत आढळतात त्यांपैकी भारतात सु. १२ आढळतात ओलसर खडकांवर वा कड्यांवर किंवा जंगली झाडांच्या सालीवर (अपिवनस्पतीप्रमाणे) कित्येक जाती वाढलेल्या दिसतात. बागेत शोभेकरिता लावतात. ट्रा. जवानिकम ही नाजूक जाती आसामात टेकड्यांवर आढळते. हिच्या रांगत्या जाड खोडापासून जमिनीवर पिसासारख्या विभागलेल्या संयुक्त पातळ पानांचा झुबका येतो व त्यावर वर कुलात वर्णन केल्याप्रकारचे बीजुककोश पुंज येतात. तेथील स्थानिक लोक सुकी पाने कांदा व लसणाबरोबर मिसळून त्यांचा धूर डोकेदुखीवर ओढतात.
ट्रा. चायनेन्स (स्फेनोमेरिस चायनेन्सिस) या जातीच्या पानांचा जपानात चहा करून पितात. हिचा प्रसार चीन, जपान, भारत, पॉलिनीशिया, मॅलॅगॅसी इ. भागांत आहे. स्फेनोमेरिस सुसाना ही भारतीय जाती जुनाट आंत्रशोथावर (आतड्यातील दाहयुक्त सुजेवर) मॉरिशसमध्ये पोटात घेतात. हायमेनोफायलम प्लुमोसम ही जाती द. अमेरिकेत स्वेदजनक (घाम आणणारी) व मूत्रल म्हणून वापरतात.
(५) डिक्सोनिएसी : या कुलात ९ वंश व सु. १५५ जाती आहेत. काही लहान, मूलक्षोडयुक्त जाती, परंतु काही वृक्षाप्रमाणे (उदा., डिक्सोनिया सिबोटियम) मोठ्या बीजुककोश पुंज धारास्थित स्फोटकर वलय तिरपे किंवा उभे बाहेरून पर्णधारा व खालून पुंजत्राण यामध्ये पुंज संरक्षित असतात बीजुककोश आडवे तडकतात आणि सु. ६४ बीजुके बाहेर पडतात [→ वृक्षी नेचे].
(६) सायथिएसी : हे वृक्षांच्या आकाराचे नेचे असतात म्हणून यांना ‘खरे वृक्षी नेचे’ म्हणतात. या कुलात एकूण वंश ३ (ॲल्सोफिला,सायथिया व हेमिटेलिया) व जाती सु. ४२५ आहेत. डिक्सोनिएसीचा यात समावेश केलेला कधीकधी आढळतो. बीजुककोश पुंजपानाच्या मागील पृष्ठावर तलवर्धी असून निदान पक्वावस्थेत पुंजत्राण नसते. तिरप्या रेषेवर स्फोटकर वलय असून सु. ६४ बीजुके असतात [→ वृक्षी नेचे].
(७) पॉलिपोडिएसी : नेचांतील सर्वांत मोठे व प्रगत कुल. यात एकूण वंश १५० आणि जाती सु. ६,००० असून त्यांचा प्रसार सर्वांत जास्त आहे. शोभेकरिता अनेक जाती लागवडीत आहेत (उदा., टेरिस, ॲडिअँटम, नेफ्रोलेपिस, ॲस्पिडियम, डव्हालिया इत्यादी). पाने विविध व सिराविन्यास (शिरांची मांडणी) दोन्ही प्रकारची (समांतर व जाळीदार) असून खोडांची अंतर्रचना विविध प्रकारची असते. क्वचित वाहिन्या असतात, वंध्य व जननक्षम पाने स्वतंत्र किंवा एकच बीजुककोश पुंजाचा आकार व पानांवरील मांडणी विविध, पुंजत्राणेही विविध पण कधी त्यांचा अभाव असतो. एका पुंजातील सर्व बीजुककोशांचा विकास एकाच वेळी नसतो याला ‘मिश्रपुंज’ म्हणतात. बीजुककोश लहान, लांब देठांचा व पातळ आवरणांचा (तनु बीजुककोश) असून स्फोटकर वलय उभे व अपूर्ण असते. स्फोट आडव्या रेषेत होतो व सर्वसाधारण ३२–६४ बीजुके विखुरली जातात. या कुलातील जिम्नॉप्टेरिस, चेलॅंथस इ. वंश आणि बाशिंग नेचा, मोरपंखी इ. विशिष्ट जाती यांसंबंधी विशेष माहिती खाली दिली आहे. याशिवाय या कुलातील नेफ्रोलेपिस या वंशावर दिलेली स्वतंत्र नोंदही पहावी.
परांडेकर, शं. आ.
ॲस्प्लेनियम: (इं. स्प्लीन वर्ट). या वंशात सु. २०० जाती (विलिस व क्रिस्तन्सन यांच्या मते ६५० जाती) समाविष्ट असून त्यांचा प्रसार सर्वत्र आहे. या वंशातील जातींच्या संख्येबद्दल वाद आहे, कारण लक्षणांच्या मर्यादा अनिश्चित आहेत. काही काटक व बऱ्याच नाजूक (म्हणून पादपगृहात – नियंत्रित परिस्थिती ठेवलेल्या काचगृहात) असतात. शोभेसाठी बागेत, कुंड्यांत किंवा वाफ्यांत लावतात. वनस्पती औषधीय असून पाने साधी (उदा., ॲ. नायडस), किंवा विभागलेली असून त्यातल्या शिरा मुक्त व बीजुककोश पुंज खालच्या बाजूस पुंजत्राणाने आच्छादलेले, रेषाकृती व शिरांच्या एका बाजूस असतात. काही जातींच्या (उदा., ॲ. बुल्बिफेरस वगैरे) पानांवर लहान कंदिका येतात, त्यामुळे शाकीय उत्पत्ती घडून येते. कित्येक जातींत अगंतुक जनन आढळते तसेच बहुगुणनही आढळते. काही जाती (उदा., ॲ., नायडस इं. बर्ड्स नेस्ट फर्न) अपिवनस्पती असून पानांच्या गुच्छात जमा झालेल्या कुजकट पदार्थांतून मुळांच्या साहाय्याने लावणे व पाणी शोषून घेतात. ॲ. कॅल्कंटम, ॲ. ल्युनुलॅटम, ॲ. लॅसिनिएटम या भारतीय जाती शोभेकरिता लावतात. ॲ.ऍडिसअँटम-नायग्रम, ॲ. रुटा म्युरॅरिया,ॲ ट्रायकोमॅनीस, ॲ. फॅल्कॅटम इ. जाती औषधी आहेत. ॲ. एस्क्युलेंटम (ॲथिरियम एस्क्युलेंटम = ॲनिसोगोनियम एस्क्युलेंटम) ही भारतात सर्वत्र सु. ९०० मी. उंचीपर्यंत आढळते तिची पाने ०·९–१·८ मी. लांब असून कोवळेपणी ती कच्ची किंवा शिजवून खातात त्यामध्ये ४% प्रथिन, ८% कार्बोहायड्रेटे (बव्हंशी सेल्युलोज) आणि ८६% पाणी असते. ॲ. मॅक्रोफायलम ही पूर्व आशियाई (फिलिपीन्स) जाती मूत्रदोषावर वापरतात, कारण ती तीव्र मूत्रल आहे. न्यूझीलंडमधील ॲ. ऑब्च्युसेटम या जातींची मुळे चर्मरोगावर वापरतात.
या सर्व वनस्पतींच्या मुळांना भरपूर पाणी लागते. हिवाळ्यात दमट हवामानात या तपकिरी होतात सावलीची आवश्यकता असते. इतर सामान्य लक्षणे ‘खरे नेचे’ ह्या उपशीर्षकाखाली दिलेल्या वर्णनाप्रमाणे असतात.
जमदाडे, ज. वि. परांडेकर, शं. आ.
चेलॅंथस : (इं. हेअरी लीप फर्न). या वंशाला विशिष्ट प्रकारच्या पण ओठासारख्या पुंजत्राणामुळे हे ग्रीक नाव पडले आहे. या वंशात. सु. ६०−७० यांच्या मते १३०) असून त्या बहुवर्षायू आहेत व रुक्ष प्रदेशांत खडकाळ जागी वाढतात. त्यांचा प्रसार उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधांत असून भारतात काही जाती उंच टेकड्यांवर व भरपूर पाऊस असलेल्या सखल प्रदेशांत (कोकण, कारवार, गोवा इ.) सामन्यपणे आढळतात. महाराष्ट्रात तीन जाती विशेषकरून आढळतात. सर्वच जाती बहुधा केसाळ व लहान ओषधीय वनस्पती असून त्यांच्या भूमिस्थित खोडांपासून लहान, साधारण जाड व पिसासारखी विभागलेली संयुक्त पाने झुबक्यांनी येतात. दले समोरासमोर किंवा एकाआड एक, बिनदेठाची किंवा फार लहान देठाची आणि अंशतःच पुन्हा विभागलेली दलकेही बहुधा तशीच. शिरांची टोके मुक्त व तेथे पानाच्या कडेने, खालच्या बाजूस असलेले व खंडित पुंजत्राणाने प्रथम झाकलेले, गोलसर बीजुककोश पुंज संरक्षित असतात. काही जातींत पानाच्या खालच्या बाजूस पांढऱ्या किंवा पिवळट भुकटीचा पातळ थर असतो. हे पुंजत्राण म्हणजे पानांच्या पात्याची कडा खाली वळल्यामुळे बनते. इतर सामान्य लक्षणे नेफ्रोलेपिस नेचाप्रमाणे असतात. चेलॅंथस फॅरिनोजा, चे.आल्बोमार्जिनॅटा आणि चे. टेन्युइफोलिया या महाराष्ट्रातील तीन सामान्य जातींपैकी पहिली आफ्रिका, अमेरिका, फिलिपीन्स, जावा, अरबस्तान इ. प्रदेशांत व तिसरी चीन, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पॉलिनीशिया आणि मलेशिया येथेही आढळते. चे. फॅरिनोजाच्या क्रायसोफिला ह्या प्रकारात पानांची मागील बाजू पिवळी असते. चे. टेन्युइफोलियाच्या पानांवर कसलीही भुकटी नसते पण चे. फॅरिनोजा व चे. आल्बोमार्जिनॅटा या दोन्ही जातींत पानांवर मागील बाजूस पांढरी भुकटी असते. चे. आल्बोमार्जिनॅटाच्या पानांवरचे पुंजत्राण झालरीसारखे असते व पानांवर विपुल खवले असतात. जादुटोणा व दृष्ट लागणे यांपासून झालेल्या परिणामांवर चे. टेन्युइफोलियाच्या मुळांपासून बनविलेल्या पदार्थांचा संथाळ जमातीतील लोक उपयोग करतात.
जिम्नॉप्टेरिस : (इं. नेकड फर्न). या वंशात सु. सहा जाती (विलिस यांच्या मते पाच) अंतर्भूत असून त्यांचा प्रसार अमेरिकेतील उष्ण प्रदेशात व आशियात आहे. भारतात बहुतेक उंच टेकड्यांवर व दाट जंगलात त्या आढळतात. या जाती लहान असून त्यांच्या भूमिस्थित खोडापासून लहान, केसाळ, साधी किंवा संयुक्त व पिसासारखी आणि बहुधा दोन प्रकारची (वंध्य व जननक्षम) पाने येतात. काही पाने संकुचित व जननक्षम आणि इतर हिरवी, पसरट व वंध्य काहींत सर्वच पाने अंशतः वंध्य व अंशतः जननक्षम असतात. वंध्य पात्यात उपशिरांचे जाळे असून त्यांचे लहान कूपक (बंदिस्त जागा) बनलेले असतात. मुख्य शिरा कधी फार अस्पष्ट असतात सर्वांत लहान शिरा मोकळ्या असतात. तसेच काहींच्या वंध्य पानांच्या टोकांपासून नवीन वनस्पती निर्माण होतात. बीजुककोशपुंजाच्या रांगा शिरांबरोबरच असून पानांच्या कडा चेलॅंथसप्रमाणे वळलेल्या नसतात. त्यावर पुंजत्राण नसते (त्यावरून वर दिलेले इंग्रजी नाव पडले आहे). इतर सामान्य लक्षणे नेफ्रोलेपिसच्या वर्णनात दिल्याप्रमाणे असतात.
परांडेकर, शं, आ.
टेरिस : या वंशातील जातींची संख्या सु. २८० (लॉरेन्स यांच्या मते २५०) आहे. विलिस यांनी हा वंश टेरिडेसी कुलात घातला असून सु. २५० जाती अंतर्भूत केल्या आहेत, तर इतर काहींनी ६० जातींचा समावेश केला आहे. टेरिस हे वंशनाम पानांच्या पंखासारख्या आकारावरून दिले आहे. या वंशाचा प्रसार विशेषेकरून उष्ण कटिबंधात जास्त आहे. न्यूझीलंड, टॅस्मानिया, जपान व उत्तर अमेरिका या प्रदेशांत काही जाती विखुरलेल्या आहेत. हे नेचे आकारमानाने लहान असून शोभेकरिता काही जाती बागेत लावतात. मूलक्षोड लहान, बहुलाद्यरंभी व क्वचित केसाळ असते. पाने संयुक्त, पिसासारखी पण दले विविध प्रकारे अंशतः किंवा पूर्णतः विभागलेली व काहीशी चिवट, गुळगुळीत व क्वचित केसाळ असतात. दलांच्या दोन्ही कडांवर बीजुककोशपुंज अखंडपणे रेघेसारखे पसरलेले असून त्यांचे संरक्षण खाली वळलेल्या दलाच्या पात्याच्या किनारीने केले जाते, हा आभासी पुंजत्राण होय. कधीकधी शिरेच्या बाजूनेही पुंजत्राणाचा पदर वाढतो. कधी वंध्य व जननक्षम पाने स्वतंत्र असतात. बीजुकांचे कवच गुळगुळीत, खरबरीत किंवा शिल्पयुक्त असते. दलातील बाजूच्या शिरामुक्त असतात. भारतात अनेक जाती जंगलात आढळतात.
टेरिस लॉंफिगोलिया ही लहान जाती भारतात सर्वत्र व जगातही अनेक देशांत आढळते. बागेत शोभेकरिता लावतात.
टेरिस ॲक्विलीना (टेरिडियम ऍक्विलीनम) या जातीला ब्रेक किंवा ब्रॅकन असे इंग्रजी नाव असून उत्तर ध्रुवाजवळचा प्रदेश सोडून जगात सर्वत्र ही सापडते. श्रीलंकेत आणि मलेशियात ६२०–२,४८०मी. उंचीवर व महाराष्ट्रात सह्याद्रीच्या माथ्यावरही आढळते. खोड (मूलक्षोड) जाड व जमिनीत बरेच आडवे पसरते त्यावर ०·६–२·६ मी. उंच, पिसासारखी पण अनेकदा विभागलेली संयुक्त त्रिकोणी पाने येतात. अंतिम दलके २·५ ते ४ सेंमी. गुळगुळीत किंवा केसाळ आणि पातळ व चिवट असतात. पुंजत्राण दुहेरी असून त्याचा एक भाग आतून आलेला (दलकाच्या खालच्या बाजूने वाढलेला) व एक वर वर्णन केल्याप्रमाणे बाहेरचा आभासी असतो. इतर सामान्य लक्षणे ‘खरे नेचे’ या उपशीर्षकाखाली वर्णिल्याप्रमाणे असतात. न्यूझीलंडमध्ये हा नेचा माओरी लोक खाण्याकरिता वापरतात. याचे मूलक्षोड स्तंभक (आकुंजन करणारे) व कृमिनाशक असते. खोड व पाने यांचा काढा प्लीहा (पानथरी) व आतडे यांच्या जुन्या तक्रारीवर देतात. वसंत ऋतूत जपानात कोवळा पाला शिजवून खातात. गुरे व घोडे यांना ही वनस्पती विषारी असते.
डव्हालिया : डव्हालिएसी कुलातील परंतु काहींच्या मते पॉलिपोडिएसी कुलातील या वंशात सु. ४० जाती असून डव्हाल ह्या स्विस वनस्पतिविज्ञांच्या नावाचा उपयोग हे वंशनाम बनविण्यात केला आहे. कित्येक जाती दाट जंगलात आढळतात. काही बागेत साध्या किंवा लोंबत्या कुंड्यांत लावतात. त्यांचा प्रसार विशेषकरून उष्ण व उपोष्ण कटिबंधात आहे. भारतात डव्हालिया बुलॅटा ही जाती सामान्यपणे आढळते. सह्याद्री, तमिळनाडूच्या पश्चिमेच्या डोंगराळ भाग, हिमालय, नेपाळ ते भूतानमध्ये ६२०–१,८६० मी. उंचीपर्यंत श्रीलंका, ब्रह्मदेश, मलेशिया, जपान, चीन इ. प्रदेशांत सापडते. यातील इतर काही जाती बहुतेक अपिवनस्पती आहेत. त्यांचे जमिनीतील मूलक्षोड आडवे पसरणारे, लांबट, खवल्यासारख्या केसांनी आच्छादलेले व बहुलाद्यरंभी असते. पाने बहुधा अनेकदा पिसासारखी विभागलेली, सु. ०·३ मी. लांब, चिवट व खरबरीत असून शिरांची मांडणी मुक्त असते. बीजककोशांचे पुंज पानांच्या कडांवर व शिरांच्या टोकांशी पेल्याप्रमाणे असून त्यांवर तळाशी व बाजूस चिकटलेले पण वर उघडे असे पुंजत्राण असते. बीजुके अर्धगोल, पारदर्शक आणि गुळगुळीत असतात.
इतर सामान्य लक्षणे आणि जीवनक्रम ‘खरे नेचे’ या उपशीर्षकाखाली दिलेल्या वर्णनाप्रमाणे असतात.
नेफ्रोडियम : या वंशात समाविष्ट असलेल्या वनस्पती लहान औषधी व स्थलवासी असून त्यांचा समावेश काहींनी ड्रायॉप्टेरिस वंशात केला आहे. पाने पिसासारखी व दले अशंतः विभागलेली असून त्यांतल्या काही उपशिरा परस्परांशी जोडलेल्या असतात बीजुककोशांचे पुंज गोल असून पुंजत्राण मूत्रापिंडाकृती असते. [प्रस्तुत नोंदीतील लेडी फर्न (ॲथिरियम ) व ॲस्प्लेनिएसी ही उप उपशीर्षके तसेच ‘नेफ्रोलेपिस’ ही स्वतंत्र नोंद पहावी]. ते कधी कधी नसते. नेफ्रोडियम मोले (सायक्लोसोरस सबट्युबिसेन्स ) ही जाती उष्ण व उपोष्ण कटिबंधांत सर्वत्र आढळते. भारतात सर्वत्र १,८०० मी. पर्यंत व सह्याद्रीच्या परिसरात सामान्यपणे दिसते. हिचे मूलक्षोड उभे किंवा प्रसर्पी (आडवे वाढणारे असून पाने (०·३–१ मी.), पिसासारखी आणि दले (१०–१५ X १·८ सेंमी.) अंशतः विभागलेली तळाजवळची दले बहुधा–हसित (ऱ्हास पावलेली) किंवा कानाच्या पाळीसारखी असतात. दलांची पाती नरम व उपशिरा पिसासारख्या पसरलेल्या आणि बीजुककोशांचे पुंज शिरांच्या खालील बाजूस असतात. इतर सर्वसामान्य लक्षणे आणि जीवनक्रम आरंभी दिलेल्या व नेफ्रोलेपिसच्या वर्णनात दिल्याप्रमाणे असतात. नेफ्रोडियम एस्क्युलेंटमच्या मूलक्षोडाचा उपयोग नेपाळात खाण्यास करतात.
आगाशे, श्री. ना.
पॉलिपोडियम : ई. बी. कोपलॅंड या नेचेतज्ज्ञांच्या मते ह्या शोभिवंत, ओषधीय वनस्पतींच्या वंशात सु. ७५ जाती (क्रिस्तन्सन यांच्या मते ५० जाती) आहेत. त्यांचा प्रसार सर्वत्र असून विशेषकरून त्या उत्तर गोलार्धात व अमेरिकेच्या उष्ण प्रदेशात आढळतात बहुतेक अपिवनस्पती आहेत. मूलक्षोड आडवे पसरत वाढणारे, बहुलाद्यरंभी व खवलेदार असते. पाने अशंतः किंवा पूर्णपणे विभागलेली (संयुक्त), पिसासारखी असून शिरांची मांडणी द्विशाखी असते. कधी उपशिरा परस्परांस चिकटलेल्या (जाळीदार) असतात, तेथे कूपक निर्माण होऊन त्यात सर्वांत लहान शीर दिसते. बीजुककोशपुंज गोल व पुंजत्राणहीन असून त्यात वंध्यतंतू बहुधा नसतात असल्यास ते लांबट किंवा तारकाकृतीत असतात. हे पुंज दलांच्या पात्यांच्या खालील पृष्ठभागांवर लहान शिरांच्या टोकास असतात. स्फोटकर वलय बीजुककोशाच्या भोवती पण उभे असून बीजुक द्विपार्श्व (दोन बाजू असलेले) असते व ते आडवी चीर पडून तडकते. पॉलिपोडियम व्हल्गेर ही जाती औषधी आहे. मूलक्षोड पित्तवर्धक व रेचक असते. पॉ. क्वर्सिफोलियमची कोवळी पाने श्रीलंकेमध्ये गरीब लोक खातात. काही जाती बागेत शोभेकरिता लावतात. पॉ. लॅन्सेओ लॅटम ही जाती आसामात, निलगिरी टेकड्यांत व सह्याद्रीच्या दक्षिण भागात आढळते. द. आफ्रिकेत या नेचाचा काढा सर्दीवर व घसा बसल्यावर देतात. मेक्सिकोत कंडूवर पानांचा चहा पितात.पूर्वीच्या पॉलिपोडियमवंशातील काही जाती ड्रिनॅरिया, पॉलिस्टिकम आणि प्लीओपेल्टिस या स्वतंत्र वंशांत हल्ली समाविष्ट केलेल्या आढळतात.
आगाशे, श्री. ना. परांडेकर शं. आ.
प्लीओपेल्टिस : या वंशातील अनेक जातींत पानांवरच्या गोलसर व छत्राकृती खवल्यांमुळे लॅटिन नाव पडले आहे. एकूण जाती सु. ४०असून उष्ण कटिबंधातील प्रदेशात त्यांचा प्रसार विशेष (परंतु मलेशियाव पॉलिनीशियात कमी) आहे. भारतात डोंगराळ भागात काही जाती आढळतात. महाराष्ट्रात टेकड्यांवरील जंगलांत काही जाती अपिवनस्पती म्हणून वाढतात. ह्यांचे मूलक्षोड लहान आणि खवल्यांनी आच्छादलेले असून आधारावर सरपटत वाढते. पाने साधी, दोन्ही टोकांस निमुळती, बहुधा अखंडित (क्वचित खोलवर विभागलेली) असून शिरांचे जाळे असते त्यात कूपक व सुट्या शिरा असतात. उन्हाळ्यात गुंडाळून राहिलेली काहींची पाने पावसात पुन्हा पसरून हिरवी बनतात. बीजुककोश पुंजगोल पानांच्या खालच्या बाजूस बहुधा मध्यशिरेच्या दोन्ही बाजूंस एक किंवा दोन रांगांत किंवा विखुरलेले असतात काहींत पानांवर छत्राकृती खवल्यासारखे केस असतात. काही जाती बागेत साध्या कुंड्यांत किंवा लोंबत्या कुंड्यांत लावतात. मलेशियात प्ली.लाँगिसिमा जातीची कोवळी पाने व कोंब शिजवून किंवा कच्ची खातात. मेक्सिकोत कंडूवर प्ली. लॅन्सेओलॅटा (पॉलिपोडियम लॅन्सेओलॅटम ) च्या पानांचा चहा पितात. प्ली. नायग्रिकेन्स ही जाती बोर्निओत खाण्यात आहे.
मुजुमदार, शां. ब.
बाशिंग नेचा : (वांदर बाशिंग सं. अश्वकातरी क. मरचप्परिके लॅ. ड्रिनॅरिया क्वर्सिफोलिया ). पॉलिपोडिएसी कुलातील व ड्रिनॅरिया वंशातील एक जाती. या वंशात सु. वीस जाती असून त्यांचा प्रसार मुख्यतः पूर्व भारतात आहे. त्यांचे खोड जाडजूड, आखूड व मांसल असते. पाने द्विरूप (दोन प्रकारची) व ताठर असून बहुधा काही लहान व काही मोठी, हिरवी व बीजुककोशधारक असतात. वंध्य पाने असल्यास ओकच्या पानांप्रमाणे व जननक्षम पाने क्वचित साधी, बहुधा पिसासारखी अशंतः किंवा पूर्णपणे विभागलेली सिराविन्यास जाळीदार आणि बीजुकोश पुंज लहान, गोलसर व असंख्य असतात पुंजत्राण नसते [→ नेफ्रोलेपिस]. बीजुककोश आडव्या रेषेवर तडकून बीजुके बाहेर पडतात. बाशिंग नेचा ही जाती सर्व भारतात, टेकड्यांवर (आंबोली, सावंतवाडी इ.) व सखल प्रदेशातील भरपूर पाऊस असलेल्या ठिकाणी, खडकांवर किंवा इतर वृक्षांवर अपिवनस्पतीप्रमाणेच वाढलेली आढळते. हिची लहान वंध्य पाने तळाशी कुजकट पदार्थ जमवून राखण्याचे कार्य करतात, तर जननक्षम पाने लांब देठाची, मोठी (६०सेंमी.–२·५ मी. लांब), खंडयुक्त, पातळ किंवा जाड असून त्यावर बीजुककोश पुंज विखुरलेले असतात. खोडावर पिंगट लालसर खवले (केस) असतात. खोड पौष्टिक, कडू व स्तंभक असते. त्याचा अर्क सूक्ष्मजंतुविरोधी असतो. मलेशियात सुजेवर त्याचे पोटसी बांधतात. ही वनस्पती क्षय, खोकला, जीर्ण ज्वर इ. विकारांत उपयुक्त असते तसेच ही बागेत शोभेकरिताही लावतात. लागवडीत ती अधिक जाडजूड व ताठर होते.
परांडेकर, शं. आ.
ब्लेक्नम : या वंशात सु. २२० जाती (लॉरेन्स यांच्या मते १८० जाती) समाविष्ट आहेत. ब्लेक्नम व लोमॅरिया असे दोन वंश काहींनी मानलेले आहेत. त्यांचा प्रसार मुख्यतः दक्षिण गोलार्धात असून भारतात फक्त ब्लेक्नम ओरिएंटल ही जाती महाबळेश्वर, कॅसलरॉक, कारवार, अंबोली वगैरे ठिकाणी आढळते. ब्ले. ऑक्सिडेंटेल, ब्ले. कार्टिलॉ ग्निथम इ. काही जाती बागेत लावलेल्या आढळतात. या नेचांचे खोड क्वचित भूमिस्थित, आडवे वाढणारे किंवा बहुधा शाखाहीन व उभे सरळ वाढणारे असते. त्यावर पातळ व काळे खवले असतात. पाने बहुतांशी पिसासारखी किंवा अंशतः तशी अथवा क्वचित द्विगुणपिच्छाकृती आणि ब्ले. ऑक्सिडेंटेलमध्ये २२ X ४५ सेंमी. असून दले ८–१५ सेंमी. लांब व २·५ सेंमी.हून कमी रुंद असतात. सर्व दले सारखी किंवा दोन प्रकारची, पाते चिवट, लांबट व कडा सरळ किंवा दातेरी असतात. बीजुककोशांचे पुंज दलाच्या मध्यशिरेशी समांतर व जवळ आणि दोन्ही बाजूंस पण खालच्या पृष्ठभागावर असतात. पुंजत्राण एका बाजूस चिकटलेले व दुसऱ्या बाजूस (मध्यशिरेकडे) वळलेले असते. बीजुके सहसा गुळगुळीत, मूत्रपिंडाकृती किंवा गोल असतात. ब्ले. ओरिएंटेलचे खोड चीनमध्ये मूत्रविकार व कृमी यांवर वापरतात. जपानात कोवळी पाने खातात. ही जाती मोठी असून पाने ०·३–०·९ मी. X १५–३० सेंमी. आणि दले १०–२० सेंमी X १·८ सेंमी. असतात. सर्वांत खालची दले फार लहान असतात. ही जातीही बागेत लावतात [→ नेफ्रोलेपिस].
आगाशे, श्री. ना.
मेडन हेअर फर्न : (लॅ. ॲडिअँटम कॅपिलस–व्हेनेरिस). ही बहुवर्षायू नाजूक ओषधी उत्तर समशीतोष्ण कटिबंधात, ऑस्ट्रेलियात, श्रीलंकेत व भारतात सर्वत्र सहसा थंड व ओलसर जागी आढळते. बागेत पानांच्या शोभेकरिता कुंड्यांत लावतात दोन-तीन प्रकार सामान्य आहेत. ॲडिअँटम वंशात सु. १९० जाती असून त्यांचा प्रसार मुख्यतः उष्ण कटिबंधीय अमेरिकेत आहे त्या सर्वांनाच ‘मेडन हेअर (कन्याकेश)’ हे नाव देतात. भारतात नऊ जाती आढळतात. मूलक्षोड लहान व जमिनीत सरपटत वाढणारे असून त्यावर अनेक लहान केसासारखे खवले असतात. पाने संयुक्त, एकाआड एक, निदान दोनदा किंवा तीनदा पिसासारखी विभागलेली असतात. देठ खवलेदार, केसाप्रमाणे काळे व चकचकीत असल्याने त्या अर्थाचे इंग्रजी नाव पडले आहे. ॲडिअँटम हे लॅटिन वंशनाम पानांवर पाणी टिकून न राहण्याच्या लक्षणावरून पडले आहे. ॲ. कॅपिलस-व्हेनेरिस या जातीची पाने दोनदा किंवा तीनदा विभागलेली, १५−२० सेंमी. लांब, पानाची दले किंवा दलके तिरपी व तळाशी लहान पाचरीप्रमाणे परंतु एकंदरीने पंख्याप्रमाणे व टोकाकडे गोलसर आणि कमीअधिक विभागलेली (खंडयुक्त) असतात. बीजुककोशांचे पुंज दलकांच्या किनारीकडने पण खालच्या बाजूस पसरलेले असून त्यावर पानांची कडा वळलेली असते तिचे कार्य पुंजत्राणाप्रमाणे असते. खरे पुंजत्राण नसते. बीजुककोश पुंजांचा आकार लांबट गोलसर वा मूत्रपिंडासारखा असतो. बीजुककोश, बीजुके व जीवनक्रम आरंभी वर्णिल्याप्रमाणे असतात. ही वनस्पती आर्तवजनक (मासिक पाळी सुरु करणारी) असून जुनाट श्वासविकारांवर गुणकारी असल्याने चहाप्रमाणे देतात. इतर काही भारतीय जाती (ॲ. पेडॅटम, ॲ. कॉडेटम,ॲ. व्हेनुस्टम इ.) शामक (शांत करणाऱ्या), कफोत्सारक व पौष्टिक आहेत. भारतातील कार्बॉनिफेरस कल्पाच्या खालच्या थरात ॲडिअँटाइट्स नावाचे जीवाश्म आढळले आहेत. त्यांचे ॲडिअँटम वंशाशी साम्य आहे [→ नेफ्रोलेपिस].
मुजुमदार, शां. ब. परांडेकर, शं. आ.
मेल फर्न : (इं. वुड फर्न लॅ. ॲस्पिडियम फिल्सि–मॅस, ड्रायोप्टेरिस फिलिक्स–मॅस). ही ओषधीय वनस्पती शोभेकरिता बागेत कुंड्यांतून लावतात. हिच्या वंशात (ड्रायोप्टेरिस ) सु. १९० जाती असून त्यांचा प्रसार जगभर आहे. मेल फर्न विदेशी व औषधी जाती आहे इतकेच नव्हे, तर तिच्या वंशातील इतर जातीही कमी अधिक प्रमाणात कृमिनाशक आहेत व जगभर त्यांचा तसा उपयोग करतात. भारतात हिमालयाच्या परिसरात चार-पाच जाती आढळतात शिवाय एक जाती (ड्रा. डेंटॅटा = सायक्लोसोरस डेंटॅटस ) सपाट प्रदेशात व सु. १,८०० मी. उंचीपर्यंत डोंगराळ भागात आढळते. मेल फर्न वनस्पती युरोप, कॅनडा व संयुक्त संस्थानांतील कोलोरॅडो येथे आणि ब्रिटनमध्ये सामान्यपणे आढळते. हिच्या पातळ खवल्यासारखे केस असलेल्या, जाड पण लहान मूलक्षोडापासून फिकट हिरवी, दोनदा विभागलेली, पिसासारखी संयुक्त पाने (०·३–१ मी.) झुबक्यांनी येतात. पानांच्या विविधतेमुळे साधारणतः तीन उपजाती ओळखतात. दलकांच्या मागच्या पृष्ठभागांवर बीजुककोशांचे गोलसर पुंज असून त्यांवर प्रथम मूत्रपिंडाकृती पुंजत्राणांचे आच्छादन असते. दलकातील शिरांची मांडणी द्विशाखी असून पुंज शिखर वा त्यांच्या टोकांस असतात शिरा पूर्णपणे मुक्त किंवा फक्त सर्वांत खालच्या जुळलेल्या असतात. इतर सामान्य लक्षणे आरंभी दिल्याप्रमाणे असतात. खोड व पर्णतल यांपासून पट्टकृमिनाशक तेल काढतात. भारतातील ड्रायोप्टेरिसाच्या पाच जातींपासून हे तेल मिळते ड्रा. डेंटॅटाच्या दलांपासून थंड पाण्यात काढलेला अर्क सूक्ष्मजंतुनाशक (स्टॅफिलोकॉकस ऑरियस – नाशक) असतो. कॅलोमेलसह तेलाचा वापर केल्यास ते उत्तम रेचकही ठरते.ईथरमध्ये विरघळारे अम्लीय पदार्थ फिलिसीन या नावे ओळखतात. हेच प्रमुख कृमिनाशक द्रव्य आहे औषधात तेच योग्य प्रमाणात असते त्यामुळे हानिकारक ठरत नाही. ते कोश, गोळ्या, चपट्या गोळ्या या स्वरूपांत देतात. पशुवैद्यकातही ते वापरतात.
आगाशे, श्री. ना. परांडेकर, शं. आ.
मोरपंखी : (मण्यारशिखा, मोरशेंडा, मोरशिखा, भुईताड सं. मयूर शिखा लॅ. ॲक्टिनीऑप्टेरिस डायकॉटोमा ). नेचांपैकीच असलेल्या या लहान ओषधीचा प्रसार भारतात सर्वत्र ९३० मी. उंचीपर्यंत शिवाय श्रीलंका, उ. आफ्रिका, इराण, काबूल इ. ठिकाणी आहे. ॲक्टिनॉप्टेरिस (ॲक्टिनीऑप्टेरिस) ह्या या जातीच्या वंशात एकूण पाच जाती असून त्यांचा प्रसार आफ्रिका व आशिया खंडांतील उष्ण भागात आहे. जुनाट भिंती व खडकाळ जागी ती विशेषेकरून आढळते. अगदी लहान पंख्यासारखी पाने असल्याने भुईताड हे सार्थ नाव तिला पडले आहे तसेच थोडीफार मोराच्या तुऱ्यासारखी दिसत असल्यामुळे मराठी आणि संस्कृत नावे त्या अर्थाची आहेत. किरणाप्रमाणे पानांचे खंडित भाग पसरलेले दिसतात. त्यावरून लॅटिन वंशनाव पडले आहे. याच्या मूलक्षोडापासून जमिनीवर लहान ताठर पानांचा (७–१५ सेंमी.) झुबका येतो लांब देठावर सूक्ष्म खवले असून २–५ सेंमी. रूंद पाते हस्ताकृती व थोडेफार द्विशाखाक्रमाने विभागलेले असते. पात्याच्या प्रत्येक खंडाच्या मागील बाजूस धारासमीपस्थ (किनारीजवळ) बीजुककोशांच्या रांगा असतात व त्यांवर रेषाकृती पुंजत्राण असते इतर सामान्य शारीरिक लक्षणे आरंभी व नेफ्रोलेपिस यात वर्णिल्याप्रमाणे असतात. ही वनस्पती रक्तस्तंभक व कृमिघ्न आहे. पित्त, कफ व अतिसार यांचा नाश करते. मुतखड्यावर मूळ तांदळाच्या धुवणात वाटून पितात. शोभेकरिता कुंडीत लावून शीतगृहात किंवा बैठकीच्या खोलीत ठेवतात.
ठोंबरे, म. वा.
लेडी फर्न : नेचांच्या ॲथिरियम वंशाला हे सामान्य इंग्रजी नाव दिलेले असून या वंशातील एकाच जातीलाही (ॲथिरियम फिलिक्स–फेमिना) हेच नाव वापरलेले आढळते. ही जाती उत्तर अमेरिकेत, यूरोपात व आशियात सामान्यपणे ओलसर ठिकाणी आढळते. भारतात हिमालयात १,०६०–४,०३० मी. उंचीपर्यंत, सिक्कीम ते गढवाल, मध्य भारत, सह्याद्रीवर, अबु पहाडावर, पूर्व घाटात व कारवारच्या जंगलात आढळते. ॲस्प्लेनियम फिलिक्स–फेमिना या लॅटिन नावानेही ती ओळखतात. ॲथिरियम वंशात सु. १२० (लॉरेन्स यांच्या मते १८०) जाती असून त्यांचा प्रसार सर्वत्र आहे. ह्या वनस्पती शोभेकरिता बागेत कुंड्यांत लावतात अनेक प्रकार, उपलब्ध आहेत. लेडी फर्नचे मूलक्षोड खवलेदार, लहान व उभे वाढणारे असून त्यावर अनेक खवलेदार देठांचा संयुक्त आणि पिसासारख्या पानांचा झुबका असतो. पाने दोनदा किंवा तीनदा पिच्छाकृती विभागलेली, ०·३–१·२५ मी. लांब असून दलांवरील खालची दलके अंशतः व विभागलेली दातेरी असतात ती पातळ व नाजूक असल्याने स्त्रीत्वदर्शक इंग्रजी नाव पडले असावे. ॲथिरियम वंशात बाजूच्या शिरामुक्त असून बीजुककोशाचे पुंज काहीसे वाकडे व कधी घोड्याच्या नालाप्रमाणे दिसतात. लेडी फर्न या जातीत ते दलकावर दोन रांगांत व लांबट गोलसर पुंजत्राणांनी झाकलेले असतात (त्यावरून ॲथिरियम हे नाव). काही प्रकारांत पुंज गोलसर आणि विखुरलेले असतात. इतर सामान्य लक्षणे सुरुवातीस दिलेल्या वर्णनाप्रमाणे असतात. काही इंग्रज कवींनी लेडी फर्नचे सौंदर्य काव्यात वर्णिले आहे. याचे मूलक्षोड औषधाकरिता (कृमिनाशक) मेल फर्नऐवजी वापरतात.
आगाशे, श्री. ना.
टेंप्स्किया : मध्यजीव महाकल्पात आढळणाऱ्या एका महत्त्वाच्या वृक्षी नेचाचा जीवाश्म वंश. क्रिटेशस कल्पात (सु. १४–९ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात) विशेषतः वायव्य अमेरिकेत व मेरिलॅंडमध्ये अनेक जातीचे जीवाश्म आढळतात. हे वालुकामय, सु. ४·५–६·२० मी. लांब व अनेक सेंमी. (सु. ४० सेंमी.) व्यासाच्या स्तंभाची संरचना होत. बहुधा हे स्तंभ शंकूसारखे किंवा मुद्गलासारखे असून त्यांच्या टोकास असंख्य पाने होती. शारीर दृष्ट्या ह्या स्तंभात अनेक खाडे, त्यांच्या फांद्या व त्यांपासून निघालेली आगंतुक मुळे एकत्र बांधल्याप्रमाणे दिसतात. वास्तविक एका खोडाच्या अनेक द्विशाखाक्रमाने बनलेल्या फांद्या व आगंतुकमुळे समांतर वाढून दोरखंडाप्रमाणे रचना बनते आणि तिला आभासी खोड म्हणतात. टॉडिया बार्बरा (ऑस्मुंडेसी) व जावातील हेमिटेलिया केन्युलेटा(सायथिएसी) ह्या विद्यमान नेचांत प्रकार आढळतो. व्यक्तिगत खोडात नलिकारंभ [नळीसारखा रंभ → रंभ]. शिवाय मध्यत्वचा, अंतस्त्वचा, परिरंभ, प्रकाष्ठ, परिकाष्ठ, भेंड इ. नित्य ऊतके [→ ऊतके, वनस्पतींतील] असतात. पानांच्या तळाच्या जीवाश्मांवरून खोडावर एकाच बाजूस त्यांच्या दोन रांगा असाव्यात असे दिसते. काही जातींत तरी खोडात अरसमात्रता (तारकाकृती) व सरळ वाढ होती, कारण आभासी खोडाच्या बाह्यपृष्ठाजवळच्या बाजूकडे खोडातून पर्णलेश (पानांना जोडणारे लहान वाहकवृंद) गेलेले आढळतात परंतु काहींत हे पर्णलेश बहुतांशी एकाच दिशेत गेले असल्याने त्या जाती आडव्या पडून वाढत असाव्यात असे दिसते. उंच सरळ जातींत आधार मुळे असून त्यांत द्विसूत्र (दोन वृंदांचे) प्रकाष्ठ दिसते. शिझीएसी, लोक्सोमिएसी व ग्लायकोनिएसी या कुलांशी ह्या वंशाचे साम्य असून प्रत्यक्ष अंतर्भाव एक स्वतंत्र टेंप्स्किएसी कुलात केला जातो. या वंशाचे आधुनिक नेचांशी असलेले आप्तभाव अनिश्चित आहेत.
परांडेकर, शं. आ.
पहा : ऑफिओग्लॉसेलीझ जल नेचे नेफ्रोलेपिस पुरावनस्पति विज्ञान बीजीनेचे मॅरॅटिएलीझ वनस्पती, अबीजी विभाग वृक्षी नेचे सायलोफायटेलीझ, सीनॉप्टेरिडेलीझ.
संदर्भ : 1. Andrews, H. N. Studies in Palaeobotany, New York, 1961.
2. Arnold, C. A. An Introduction to Palaeobotany, New York, 1947.
3. Beddome, R. H. Ferns of Southern India, New Delhi, 1969.
4. Blatter, E. D’ Almeida, J. F. R. The Ferns of Bombay, Bombay, 1922.
5. Bower, F.O. The Ferns, 3 Vols. Cambridge, 1923-28.
6. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vols. I-X New Delhi 1948-76.
7. Dittmer, H. G. Phylogeny and Form in Plant Kingdom, New York, 1964.
8. Eames, A. J. Morphology of Vascular Plants Lower Groups, New York, 1964.
9. Foster, A. S. Gifford, E. M. Comparative Morphology of Vascular Plants, Bombay, 1962.
10. Kirtikar, K. R. Basu, B. D. Indian Medicinal Plants, 4 Vols. New Delhi, 1975.
11. Lawrence, G. H. M. Taxonomy of Vascular Plants, New York, 1965.
12. Smith G. M. Cryptogamic Botany, Vol. II. Tokyo, 1955.
13. Sporne, K. R. The Morphology of Pteridophytes, London, 1966.
14. Surange, K. R. Indian Fossil Pteridophytes, New Delhi, 1966.
१५. पदे, शं. दा. वनौषधि गुणादर्श, पुणे, १९१३.
“