नेअगेली, कार्ल व्हिल्हेल्म फोन : (२६ मार्च १८१७–१० मे १८९१). स्विस वनस्पतिशास्त्रज्ञ. कोशिकांचा (पेशींचा) उगम, वनस्पतींची वाढ व वनस्पति-शारीर यासंबंधी त्यांनी महत्त्वाचे संशोधन केले. त्यांचा जन्म झुरिकजवळील किल्खबेर्क येथे झाला. त्यांचे शिक्षण जिनीव्हा व झुरिक येथे होऊन १८४० साली ते पदवीधर झाले. त्यानंतर त्यांनी वनस्पतींच्या सूक्ष्म संरचनेचा अभ्यास केला. प्रथम ते झुरिक येथे आणि नंतर जर्मनीतील ब्राइस्गाऊ (१८५२) व म्यूनिक (१८५८) येथेही वनस्पतिविज्ञानाचे प्राध्यापक झाले होते.अबीजी वनस्पतींच्या प्रमुख कुलांतीलवनस्पतींच्या कोशिकांत प्रकलाचे (कोशिकेतील कार्यांवर नियंत्रण ठेवणाऱ्या जटिल गोलसर पुंजाचे) अस्तित्व तर त्यांनी सिद्ध केलेच, शिवाय प्रकल सर्वच वनस्पतींत असल्याचेही त्यांनी प्रतिपादिले. जीवद्रव्याचा [जिवंत कोशिकाद्रव्याचा → जीवद्रव्य] शोध त्यांनी व ⇨ हुगो फोन मोल यांनी स्वतंत्रपणे लावला. शैवले, शेवाळी, यकृतका (लिव्हरवर्ट्स),फुलझाडे इत्यादींपैकी अनेक वनस्पतींतील वृद्धीच्या तंत्रांचे नेअगेली यांनी अन्वेषण केले तसेच नेचांच्या रेतुकाशयांचा (नर प्रजोत्पादक कोशिका म्हणजे रेतुके निर्मिणाऱ्या अवयवांचा) व रेतुकांचा शोधही त्यांनी लावला. उच्च दर्जाच्या वनस्पतींच्या शारीरविषयक [→ शारीर, वनस्पतींचे] माहितीत विभज्या [वनस्पतीच्या वाढीस जबाबदार असणाऱ्या कोशिका →विभज्या] व स्थायी (कायम झालेल्या) ऊतकांतील (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या समूहांतील) भेद त्यांनी स्पष्ट केला. स्टार्चच्या कणांची संरचना, त्यांचा विकास व त्यांचे प्रकार त्यांनी विशद केले. आनुवंशिकता ‘इडिओप्लाझम’नावाच्या द्राव्याद्वारे चालू असते, अशी एक कल्पना त्यांनी मांडली होती. ⇨ ग्रेगोर योहान मेंडेलयांच्या कार्यातील मर्म नेअगेली यांना न कळल्याने मेंडेल यांनी मांडलेल्या आनुवंशिकतेच्या उपपत्तीला नेअगेली यांनी महत्त्व दिले नाही. कोशिकावरणाची ‘श्लेषिका उपपत्ती’(साखळ्यांप्रमाणे कमीजास्त लांबीचे सेल्युलोज रेणूंचे संघ म्हणजे श्लेशषिका समांतरित प्रकारे मांडलेले असतात असे प्रतिपादणारी उपपत्ती) नेअगेली यांनी मांडली असून आवरणाची जाडी कणाधानामुळे (जुन्या कणांत नवीन कण बसून) होते, असे त्यांचे मत होते. १८४४–८३ या काळात त्यांनी अनेक संशोधनपर निबंध प्रसिद्ध केले. ते म्यूनिक येथे मृत्यू पावले.
पहा : ऊतके, वनस्पतींतील कोशिका.
जमदाडे, ज. वि.