चवचव : (चौचौ इं. चो चो, चायोटे लॅ सेशियम इड्‌यूल, कुल-कुकर्बिटेसी). ही बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) जाडजूड वेल मूळची अमेरिकेतील असून श्रीलंकेमध्ये (१८८४) व इतर उष्ण व उपोष्ण कटिबंधांतील देशांत लागवडीत आली आहे. भारतात ही वेल श्रीलंकेतून आलेली असून दार्जिलिंग, सहारनपूर, बंगलोर आणि महाराष्ट्रात उंच टेकड्यांच्या भागात पिकवतात. सामान्य शारीरिक लक्षणे कुकर्बिटेसी  कुलातल्याप्रमाणे पाने काकडीच्या पानांसारखी, फळांचा रंग व आकार मोठ्या पेरूप्रमाणे असतो. (आकृतीकरिता कुकर्बिटेसी ही नोंद पहावी). वेस्ट इंडिज मध्ये भाजी करून व मेक्सिकोमध्ये शिजवून किंचा चकत्या करून तळून खातात. साखर व लिंबाचा रस घालून फोडी शिजवून खातात. याची लठ्ठ आणि पिठूळ मुळे भाजून किंवा रताळ्यासारखी उकडून भाजी करून खातात.

क्षीरसागर, ब, ग.

या वेलीला चांगली निवाऱ्याची आणि कसदार बागायती जमीन लागते. जमिनीत आळी करून त्यांच्यामध्ये भरपूर शेणखत घालतात. आळ्यात प्रत्येकी एकेक सबंध फळ पुरतात. फळात एकच बी असते. त्यातून निघालेला वेल वाढू लागला म्हणजे आधार देऊन त्याला मांडवावर चढवितात. त्याची वाढ फार झपाट्याने होते. बी उगवून आल्यापासून तीन-चार महिन्यांत त्याला फळे येऊ लागतात. फळे अर्धा ते एक किग्रॅं. वजनाची असतात. ती वर्षभर येतात.

पाटील, ह. चिं.