नू : गो-कुलातील कॉनोकीटीस वंशाचे हे सस्तन प्राणी आफ्रिकेत आढळतात. यांच्या दोन जाती आहेत : एक काळा नू आणि दुसरा निळा नू. काळ्या नूचे शास्त्रीय नाव कॉनोकीटीस नोऊ आहे. निळ्या नूपेक्षा हे काहीसे लहान असून यांचे शेपूट पांढरे असते. काळे नू जवळजवळ लुप्त (निर्वंश) झालेले आहेत पण काही प्राणी नैर्ऋत्य आफ्रिकेच्या संरक्षित प्रदेशात शिल्लक आहेत. निळ्या नूचे शास्त्रीय नाव कॉनोकीटीस टॉरिनस असून या जातीचे प्राणी टांगानिका आणि केन्यापासून खाली दक्षिणेकडे आढळतात. निळ्या नूची दोन भिन्नतादर्शक रूपे दिसून येतात. एकाला काळी दाढी असून तो दक्षिण आफ्रिकेत आढळतो आणि दुसऱ्याला पांढरी दाढी असून तो पूर्व आफ्रिकेत आढळतो.

निळ्या नूच्या शरीराची (डोक्यासकट) लांबी १·५–२ मी. असते शेपूट ३५–५५ सेंमी. लांब खांद्यापाशी उंची १–१·३ मी. असते नराचे वजन २३०–२७५ किग्रॅ. असते. नर आणि मादी या दोहोंनाही मजबूत शिंगे असून ती आत वळलेली असतात. शरीराचा रंग करडा असून त्यात निळसर छटा असते. मान आणि खांदा यांवर फिक्कट तपकिरी पट्टे असतात. शेपूट, खांदे आणि डोके यांवर लांब काळे केस असतात.

हे प्राणी उघड्या, गवताळ आणि जवळपास भरपूर पाणी असणाऱ्या सपाट प्रदेशात राहतात. हे संघचारी असून यांचे २०—५० जणांचे कळप असतात. बहुधा वयस्क मादी कळपाची पुढारी असते. अवर्षणाच्या काळात यापेक्षाही मोठाले कळप करून पाण्याच्या शोधार्थ ते दूरवर भटकत जातात. सकाळच्या आणि संध्याकाळच्या थंड वेळी ते चरतात आणि दुपारी सावलीत विश्रांती घेतात. हे प्राणी फार सावध असतात. चरण्याच्या किंवा विश्रांतीच्या वेळी काही प्राणी पहारा करतात. धोक्याचे काही चिन्ह दिसताच पहारेकरी फुरफुरून कळपाला इशारा देतात व सगळा कळप वेगाने दूर धावत जाऊन आसरा घेतो.

जून महिना हा यांच्या प्रजोत्पादनाचा काळ असतो. ८-९ महिन्यांच्या गर्भावधीनंतर मादीला एकच पिल्लू होते. ते एक आठवड्याचे झाल्यावर गवत खाऊ लागते पण सु. सात-आठ महिने ते आईबरोबरच राहते.

या प्राण्याच्या कातडीपासून उत्तम चामडे तयार करतात आणि शेपटीवरील केसांच्या चवऱ्या करतात.

यार्दी, ह. व्यं.