नीत्शे, फ्रीड्रिख व्हिल्हेल्म : (१५ ऑक्टोबर १८४४ – २५ ऑगस्ट १९००). एक अत्यंत प्रभावी जर्मन तत्त्ववेत्ता. देकार्त, लायप्निट्स, कांट यांच्याप्रमाणे नीत्शेने तर्कबद्ध, तात्त्विक दर्शन रचलेले नाही. नव्या मूल्यांची प्रस्थापना आणि उद्‌घोष करणारा प्रेषित ही त्याची भूमिका होती. ह्या नवीन जीवनदृष्टीतून त्याने प्रस्थापित जीवनसरणी, साहित्य आणि संगीत, धार्मिक आणि नैतिक मूल्ये ह्यांचे मार्मिक आणि परखड परीक्षण केले आहे. एक उत्कृष्ट शैलीकार जर्मन गद्यलेखक म्हणूनही तो प्रसिद्ध आहे.

नीत्शेचा जन्म प्रशियामधील रकन या गावी झाला. त्याचे वडील एक ल्यूथरन धर्मगुरू होते आणि आई एका ल्यूथरन धर्मगुरूची मुलगी होती. नीत्शे चार वर्षांचा असताना त्याच्या वडिलांना वेड लागले आणि हीच आपत्ती पुढे नीत्शेवर आली. ह्या वेडातच त्याच्या वडिलांना मृत्यू आला आणि नीत्शेचे संगोपन त्याच्या आईने केले. घरात त्याच्या आईशिवाय आजी, दोन अविवाहित आत्या व बहिण असे स्त्रीराज्य होते. स्त्रियांविषयी काहीशी खोचक आणि तुच्छतेचा भाव व्यक्त करणारी जी वृत्ती नीत्शेच्या लिखाणातून प्रकट होते, तिचे मूळ ह्या अनुभवात असणे शक्य आहे.

फ्रीड्रिख व्हिल्हेल्म नीत्शेनीत्शेचे शिक्षण शूल्प्‌फॉर्ट (फॉर्ट) येथील विख्यात शाळेत झाले आणि ग्रीक व लॅटिन या अभिजात भाषांचे आणि त्यांतील साहित्याचे चोख आणि व्यापक ज्ञान त्याने येथे संपादन केले. नंतरच्या विद्यार्थिदशेत बॉन आणि लाइपसिक येथील विद्यापीठांत तो होता. लाइपसिक विद्यापीठात असताना शोपेनहौअरच्या तत्त्वज्ञानाशी आणि रिखार्ट व्हाग्‌नर याच्या संगीताशी त्याचा परिचय झाला. त्याच्या विचारांवर आणि वृत्तीवर ह्या दोन प्रतिभावंतांचा खोल आणि स्थायी प्रभाव पडलेला आढळतो. ऑक्टोबर १८६७ पासून वर्षभर तो लष्करी सेवेत होता पण त्याचा हा बहुतेक काळ घोड्यावर चढताना झालेल्या दुखापतीतून उद्‌भवलेल्या आजारीपणात गेला. लाइपसिकला परतल्यानंतर परत ग्रीक भाषेच्या आणि कांटच्या तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाकडे तो वळला. १८६९ मध्ये पीएच्.डी. च्या पदवीसाठी आवश्यक असलेला प्रबंध न लिहिताही लाइपसिक विद्यापीठाने त्याला ती पदवी दिली आणि बाझेल येथील विद्यापीठात उपप्राध्यापक म्हणून, प्रसिद्ध पंडित फ्रीड्रिख रिचेल (१८०६ – ७६) याच्या खास शिफारसीमुळे, त्याची नेमणूक झाली. १८७० च्या फ्रँको-प्रशियन युद्धामध्ये वैद्यकीय शुश्रूषापथकात त्याने स्वयंसेवक म्हणून काम केले. ह्याच वर्षी नीत्शे पूर्ण प्राध्यापक झाला.

नीत्शेची ग्रंथरचना जर्मन भाषेत असून त्याच्या बहुतेक ग्रंथांची इंग्रजीत भाषांतरे झालेली आहेत. येथे भाषांतरित ग्रंथनामे वापरली असून प्रकाशनवर्षे मात्र मूळ जर्मन ग्रंथांची आहेत. नीत्शेचे पहिले आणि अत्यंत प्रभावशाली ठरलेले पुस्तक, द बर्थ ऑफ ट्रॅजेडी आउट ऑफ द स्पिरिट ऑफ म्यूझिक १८७२ मध्ये प्रसिद्ध झाले. ग्रीक जीवनाकडे आणि कलेकडे पाहण्याचा रूढ दृष्टिकोन पार बदलून टाकणाऱ्या ह्या पुस्तकात नीत्शेने दोन प्रवृत्तींमध्ये भेद केला आहे. संयम, सुसंवाद, प्रमाणबद्धता ह्यांवर भर देणारी ‘अपोलोनियन’ प्रवृत्ती आणि साऱ्या मर्यादांना झुगारून देण्याच्या दुर्दम्य ओढीत व्यक्त होणारी ‘डायोनायसियन’ प्रवृत्ती. मद्य पिऊन झिंगलेल्या, उन्मादक संगीताच्या साथीवर बेभान नृत्यात रंगून डायोनायसस देवतेचा उत्सव साजरा करणाऱ्या भक्तांमध्ये ही प्रवृत्ती मुक्तपणे प्रकट झालेली असते. डायोनायसियन आणि अपोलोनियन प्रवृत्तींच्या समन्वयातून, उच्छृंखल, उत्सर्जक प्रवृत्तींना विवेकशील प्रमाणबद्ध आकार दिल्यानेच सत्त्वपूर्ण, सौष्ठवपूर्ण निर्मिती होऊ शकते असे नीत्शेचे म्हणणे आहे. त्याच्या पूर्वीच्या संशोधकांनी ग्रीक जीवनातील डायोनायसियन प्रेरणेचे स्थान आणि कार्य ओळखले नव्हते. ह्या भूमिकेचा नीत्शेने पुढे विकास केला, पण ती कधी सोडली नाही.

नीत्शेने आपली चार ‘मेडिटेशन्स’ (चिंतने) १८७३ – ७६ ह्या कालावधीत एकामागून एक प्रसिद्ध केली. चौथे चिंतन ⇨ रिखार्ट व्हाग्‌नरवर होते. त्या युगातील सर्वश्रेष्ठ संगीतकार, शोपेनहौअरच्या तत्त्वज्ञानाचा संगीतातून आविष्कार करणारा प्रतिभावंत कलाकार म्हणून नीत्शेची व्हाग्‌नरवर निष्ठा होती आणि त्या दोघांचा जिव्हाळ्याचा स्नेहही होता. पण नीत्शे स्वतः शोपेनहौअरच्या विरक्तिवादी तत्त्वज्ञानापासून दूर सरत होता. शिवाय व्हाग्‌नरने जर्मन सत्ताधाऱ्यांशी जुळवून घेण्यात आपल्या मूल्यांशी केलेली प्रतारणा, त्याचा संकुचित जर्मन राष्ट्रवाद, ज्यूद्वेष यांचा नीत्शेला तिटकारा आला. ह्या गोष्टींमुळे १८७८ च्या सुमारास ही मैत्री संपुष्टात आली. पुढे १८८८ मध्ये प्रसिद्ध केलेल्या द केस ऑफ व्हाग्‌नर ह्या पुस्तकात नीत्शेने व्हाग्‌नरवर हल्ला चढविला आहे.

नीत्शेच्या पुढील पाच पुस्तकांत त्याने सूत्रबद्ध शैलीचा अवलंब केला आहे. ह्यूमन, ऑल-टू-ह्यूमन (१८७८), मिक्स्ड ओपिनियन्स अँड फोरिझम्स (१८७९), द वाँडरर अँड हिज शॅडोज (१८८०), द डॉन : रिफ्लेक्शन्स ऑन मॉरल प्रेजुडिसेस (१८८१) आणि द जॉयफुल विझ्‌डम (१८८२) ही ती पाच पुस्तके होत. दस स्पोक जरथुश्त्र (३ भाग, १८८३–८४) ह्या पुस्तकात नीत्शेचे परिपक्व तत्त्वज्ञान मांडलेले आढळते. बियाँड गुड अँड ईव्हिल (१८८६) आणि टोवर्ड अ जीनिलॉजी ऑफ मॉरल्स (१८८७) ह्या पुस्तकांतून नीत्शेच्या भूमिकेचे अधिक पद्धतशीर विवरण केलेले आढळते. नीत्शे कॉन्ट्रा व्हाग्‌नर (१८८८) द ट्‌वाय्‌लाइट ऑफ द आयडल्स (१८८९), द अँटी क्राइस्ट (१८९५), आणि एक्से होमो (१९०८) ही नीत्शेची अखेरची पुस्तके होत. द विल टु पॉवर (२ खंड, १९०६) ह्या नावाने प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात नीत्शेची १८८४–८८ ह्या अवधीत केलेली टिपणे संगृहीत आहेत.

नीत्शे कविताही करीत असे. द जॉयफुल विझ्‌डम, जरथुश्त्र ह्या पुस्तकांत काही कविता अंतर्भूत करण्यात आल्या आहेत आणि स्वतंत्र संग्रहरूपानेही त्या प्रसिद्ध झाल्या आहेत.

नीत्शेच्या तत्त्वज्ञानात ‘बलाची, प्रभुत्वाची इच्छा’ ह्या संकल्पनेला मध्यवर्ती स्थान आहे. बलाची इच्छा ही सर्व मानवी वर्तनामागील मूलभूत प्रेरणा असते एवढेच नव्हे, तर सर्व सजीव सृष्टीत आणि अचेतन निसर्गातसुद्धा ही प्रेरणा आढळते, असा त्याचा सिद्धांत होता. सर्वच सचेतन आणि अचेतन अस्तित्वात ही प्रेरणा असते हा तत्त्वमीमांसक सिद्धांत नीत्शेने एक ‘गृहीतक’ म्हणून स्वीकारला होता तो सिद्ध करण्याचा पद्धतशीर प्रयत्न त्याने केलेला नाही आणि त्याची गंभीरपणे दखल घेण्याचेही कारण नाही. पण मानवी वर्तनाविषयीचे ‘गृहीतक’ म्हणून नीत्शेने त्याचा पद्धतशीरपणे विकास केलेला आढळतो. ह्या सिद्धांताप्रमाणे बलाची इच्छा ही माणसाची मूलभूत आणि सर्वंकष प्रेरणा असते, माणसाला केवळ बल किंवा शक्ती तिच्या स्वतःसाठी पाहिजे असते, इतर गोष्टी त्याला बल वाढविण्याची साधने म्हणून पाहिजे असतात. वरवर पाहता भिन्न भासणाऱ्या मानवी प्रेरणांच्या अनेक रूपांमागे बलेच्छा कशी दडलेली असते आणि तिचीच ही भिन्न रूपे आहेत असे त्यांच्याकडे पाहता कसे लक्षात येते हे नीत्शेने मोठ्या मार्मिक रीतीने दाखविले आहे.

पण नीत्शेला अभिप्रेत असलेले बलाचे स्वरूप यथार्थपणे ध्यानी येण्यासाठी त्याच्या विचारांत महत्त्वाचे स्थान असलेल्या आणखी दोन संकल्पनांचा परिचय करून घेतला पाहिजे. एक संकल्पना म्हणजे प्रेरणेच्या उन्नयनाची संकल्पना. नीत्शेला जे बल किंवा प्रभुत्व अभिप्रेत आहे ते इतरांवर आक्रमण करून त्यांना पादाक्रांत करणारे बल नव्हे, तर माणसाला स्वतःवर प्रभुत्व देणारे बल. स्वतःच्या बेबंद वासनांना काबूत ठेवणाऱ्या, आत्मवश अशा व्यक्तीच्या ठिकाणी खरे बल असते. दुसरी संकल्पना ही ‘असूये’ ची संकल्पना होय. जे दुबळे असतात ते सबळांच्या स्वाभाविक, उस्फूर्त चैतन्यशीलतेची, कृतिशीलतेची, दृढतेची असूया करतात आणि खऱ्याखुऱ्या साफल्यापासून वंचित झाल्यामुळे एका सबळावर एक काल्पनिक सूड उगवतात सबळांचा जीवनमाग त्यांना खऱ्याखुऱ्या कल्याणापासून वंचित करीत असतो अशा समजुतीने ते स्वतःचे समाधान करून घेतात. जे चांगले, सत्त्वशील आहे त्याची जीवनात स्थापना करणे हे त्यांच्या नीतीचे साध्य नसते, तर जे वाईट आहे ते टाळणे हे त्यांचे साध्य असते. ह्यासाठी क्षीण, सौम्य, आपले स्वत्व परहितात विलीन करणारा जीवन मार्ग ते स्वीकारतात. ही गुलामांची नीती होय. उलट जे प्रभू असतात त्यांची नीती जे चांगले,ऊर्जस्वल असेल त्याच्या प्रतिष्ठापनेला आपले साध्य मानते. नीत्शेच्या म्हणण्याप्रमाणे पारंपरिक नीती ही प्रभुनीती आणि दासनीती ह्या दोहोंचे एक विचित्र मिश्रण असते.


जीवनाला, दुःखाला, वेदनेला, एकटेपणाला न घाबरता, इतरांची असूया न करता, आपल्या विकारवासनांना वश न होता त्यांना दृढपणे नियंत्रित करून स्वतःच्या स्वभावाला त्याचे स्वतःचे रूप देणे, स्वतःची जीवनशैली घडविणे व निर्मितीत आनंद मानणे हा उत्तम जीवनमार्ग होय. ह्या मार्गाने जगणाऱ्याला नीत्शे अतिमानव म्हणतो. सॉक्रेटिस, ज्यूलियस सीझर, गटे ही अतिमानवाची उदाहरणे होत. अनेकांना वाटते त्याप्रमाणे अतिमानव म्हणजे मानवजातीमधून भावी काळात उत्क्रांत होणारी एक अधिक श्रेष्ठ जाती नव्हे. अतिमानव म्हणजे एका विशिष्ट रीतीने जगण्याची शक्ती असलेला माणूस. जगात ईश्वर नाही हे सत्य पुरतेपणे जाणल्यावर माणसाच्या जीवनाला त्याने स्वतःच अर्थ दिल्याशिवाय काही अर्थ असत नाही हे उघड होते. स्वतःच्या दुबळेपणाविरुद्ध आणि इतरांविषयी वाटणाऱ्या असूयेविरुद्ध ठामपणे उभे राहून आणि स्वतःला निर्मितिशील बनवून जो माणूस असा अर्थ स्वतःच्या जीवनाला देऊ शकतो तो अतिमानव असतो. अतिमानव स्वतःला कठीणपणे वागवितो इतरांना नव्हे. इतरांविरुद्ध आक्रमण करणारा, झुंडीचे नेतृत्व करण्यात धन्यता मानणारा माणूस दुबळा असतो, आपल्या दुबळेपणाचा तो इतरांवर सूड उगवीत असतो. नाझी राज्यकर्त्यांनी नीत्शेच्या तत्त्वज्ञानाचा, विशेषतः संदर्भापासून तोडलेल्या त्याच्या अनेक वचनांचा, नाझी विचारप्रणालीला पाठिंबा मिळविण्यासाठी वापर केला असला, तरी नीत्शे वंशवादी, झुंडवादी नव्हता. तो राष्ट्रवादीही नव्हता. तो ‘चांगला यूरोपियन’ होता. वृत्तीचे जे काठिन्य, जी दृढता त्याला अभिप्रेत होती तिचा त्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला एक भाग म्हणजे विवेकशक्तीने सिद्ध केलेली सत्ये मनोमन मान्य करून त्यांच्याशी सुसंगतपणे जगण्याची कुवत हा होय.

तत्त्वमीमांसा आणि ज्ञानमीमांसा ह्या तत्त्वज्ञानाच्या परिचित क्षेत्रांविषयी नीत्शेने पद्धतशीरपणे विचार मांडलेले नाहीत. त्याचा एक विशेष उल्लेखनीय सिद्धांत म्हणजे त्याच घटनांचे चिरंतन पुनरावर्तन होत राहते हा होय. जे काही घडले असेल ते बऱ्याच कालावधीनंतर अनिवार्यपणे परत घडणार व परत परत घडत राहणार. ह्याचे कारण असे, की विश्वात जे वस्तुजात आहे त्याचे अंतिम घटक सान्त असतात व जे आहे किंवा घडते ती कित्येक अंतिम घटकांची एक रचना असते. तेव्हा काल जर अनन्त असेल, तर हीच रचना कधी ना कधी परत घडून येणे अटळ आहे. नीत्शेने हा सिद्धांत सिद्ध करण्याचा कसोशीने प्रयत्न केलेला नाही आणि त्याचा उपयोग त्याने आपल्या नैतिक दृष्टिकोनाला पुष्टी देण्यासाठी केला आहे. जे घडते ते तसेच परत परत घडून येणार असेल, तर काळाच्या प्रवाहात जे घडते त्याला अर्थ उरत नाही. तेव्हा मानवी जीवनालाही, त्याच्यात ज्या घटना घडून येतात त्यांच्यामुळे, अर्थ प्राप्त होत नाही, तर आपल्या निर्मितीशील वृत्तीमुळे त्याला अर्थ प्राप्त होतो.

नीत्शे नास्तिक होता आणि कोणत्याही धार्मिक पंथाचा अनुयायी नव्हता पण आपल्या नैतिक दृष्टिकोनातून पारंपारिक धर्मांचा परामर्ष त्याने घेतला आहे. स्वतः येशू ख्रिस्त निर्मळ आणि शुद्ध वृत्तीचा पण जीवनपराङ्‌मुख होता तथापि रूढ ख्रिस्ती धर्मात सबळांची असूया सर्वत्र आढळते असे त्याचे म्हणणे आहे. तुलनेने जुन्या करारातील ज्यू धर्म आणि हिंदु धर्म कित्येक बाबतीत खऱ्या अर्थाने बलोपासक आहेत व म्हणून श्रेष्ठ ठरतात असेही त्याने म्हटले आहे. पण अस्पृश्यांना हिंदू धर्मात मिळणारी वागणूक मानवतेवरील अत्याचार होय, असेच त्याचे मत होते.

विज्ञानाचा उदय झाल्यावर आणि पारंपारिक जीवनमार्ग ढासळून पडल्यानंतर ‘जीवनाचा अर्थ काय?’ ही जी समस्या माणसापुढे उभी राहते, तिला नीत्शे कोणतीही तडजोड न करता प्रामाणिकपणे सामोरा गेला ह्याच्यात त्याचे वैशिष्ट्य आहे. राइनर मारीआ रिल्के (१८७५–१९२६) आणि श्टेफान गेओर्ग (१८६८–१९३३) ह्यांच्यासारखे कवी, टोमास मान (१८७५–१९५५), आंद्रे मोर्वा (१८८५–१९६७) ह्यांसारखे कादंबरीकार, आल्बेअर काम्यू (१९१३–६०), पाउल टिलीख (१८८६–१९६५), मार्टिन बूबर (१८७८–१९६५) यांसारखे तत्त्वचिंतक यांच्यावर नीत्शेच्या विचारांचा खोल परिणाम आढळून येतो.

संदर्भ : 1. Hollingdale, R. G. Nietzsche : The Man and His Philosophy, Baton Rouge, 1965.

   2. Kaufmann, Walter, Trans. &amp Ed. Basic Writings of Nietzsche, New York, 1966.

   3. Kaufmann, Walter, Trans. &amp Ed. The Portable Nietzsche, New York, 1954.

रेगे, मे. पुं.