नुक्ता: सगळ्या तऱ्हांच्या ⇨ बदकांचा समावेश ॲनॅटिडी या पक्षिकुलात केलेला आहे. नुक्ता हे एक बदकच असल्यामुळे त्याचाही या कुलात अंतर्भाव होतो. नुक्ता हे नाव इंग्रजी भाषेतही रूढ झालेले आहे. याचे शास्त्रीय नाव सार्किडऑर्निस मेलॅनोटॉस असे आहे.

हा पक्षी भारत, श्रीलंका व ब्रह्मदेश येथे, त्याचप्रमाणे आफ्रिकेत सहाराच्या दक्षिणेस आणि मॅलॅगॅसीमध्येही आढळतो. भारतातील सपाट प्रदेशात हा सगळीकडे सापडतो. मुबलक पाणी व झाडी याच्या जीवनाला आवश्यक असल्यामुळे सभोवार झाडी आणि काठावर दाट लव्हाळी असणाऱ्या लहानमोठ्या तलावांच्या काठी हा नेहमी राहतो. नेहमी यांची जोडपी किंवा कुटुंबे दिसून येतात. इतर बहुतेक बदकांप्रमाणे हा अर्धवट रात्रिंचर नसल्यामुळे भर दिवसा मोकळेपणी भटकताना किंवा उडताना दिसतो.

नुक्ता (नर)पाळीव बदकापेक्षा हा मोठा असतो. पाठीचा रंग काळा असतो पण त्यात निळ्या आणि हिरव्या रंगांची तकाकी असते. डोक्यावर आणि मानेवर चकचकीत काळे ठिपके असतात. शरीराचा खालचा भाग पांढरा असतो. डोळे तपकिरी आणि चोच काळी असते. नर आणि मादी यांच्या स्वरूपात फरक असतो. नर मादीपेक्षा आकारमानाने मोठा असतो व त्याच्या चोचीवर एक काळ्या रंगाचे मांसल गुळुंब (वाटोळी गाठ) असते. मादीचे रंग नराच्या इतके तकतकीत नसतात आणि तिच्या चोचीवर नराप्रमाणे गुळुंब नसते.

लागवड केलेले भात आणि रानटी तांदळाचे दाणे हे याचे मुख्य खाद्य होय. शिवाय विविध पाणवनस्पतींची मुळे, बी, कोंब त्याचप्रमाणे कृमी, पाणकिडे व त्यांचे डिंभ (अळ्या) हा खातो. हा जोराने आणि जलद गतीने उडू शकतो. नर व मादी जोडीने उडत असली, तर नर बहुधा पुढे आणि मादी त्याच्या मागे असते.

यांच्या प्रजोत्पादनाचा काळ जुलैपासून सप्टेंबरपर्यंत असतो. या दिवसांत नराच्या चोचीवरील गुळुंब वाढून बरेच मोठे होते. या काळानंतर ते पुन्हा पूर्ववत होते. यांचे घरटे बहुतकरून एखाद्या मोठ्या झाडाच्या ढोलीत काटक्या व गवत घालून तयार केलेले असते. कधीकधी ते फांद्यांच्या बुडाशीही बांधलेले असते. मादी ८–१२ अंडी घालते. ती तकतकीत हस्तिदंताच्या (पिवळसर) रंगाची असतात. अंडी उबविण्याचे काम मादी करते.

कर्वे, ज. नी.