नीळ : (हिं. नील गु. गळी क. ओले नीली सं. नीला, नीलिका, रंगपत्री, रंगपुष्पी इं. इंडियन इंडिगो प्लँट लॅ. इंडिगोफेरा टिंक्टोरिया कुल लेग्युमिनोजी उपकुल पॅपिलिऑनेटी). हे रंगद्रव्य ज्यापासून काढतात ते क्षुप (झुडूप) नीळ याच नावाने ओळखले जाते. ते मूळचे आशियातील आहे पण आफ्रिकेतील जंगलातही आढळते. मध्य अमेरिकेत काही जातींपासून नीळ काढीत असत. त्याचा अंतर्भाव इंडिगोफेरा या वंशात असून भारतात या वंशातील सु. चोपन्न जाती नमूद आहेत त्या ⇨ ओषधी, क्षुपे आणि उपक्षुपे असून त्यांपैकी काही हिरवे खत, रंग, वैरण इत्यादींकरिता लागवडीत आहेत. भारतात चार जाती प्रामुख्याने निळ्या रंगाकरिताच पूर्वी पिकविल्या गेल्या असून त्यांपैकी काही हल्लीही पिकवितात. इं. टिंक्टोरिया या जातीच्या झुडपाची लागवड फार पूर्वी चीनमध्ये, भारतात व सिंधमध्ये निळ्या रंगाकरिता मोठ्या प्रमाणावर होत असे. आशिया खंडात सु. ४,००० वर्षांपूर्वीपासून निळीचे उत्पादन होत आले आहे. नैसर्गिक रीत्या निळा रंग तयार करण्याच्या पद्धतींचा उल्लेख प्राचीन संस्कृत ग्रंथांत आला आहे. भारतात नीळ कशी तयार करीत, याचे वर्णन मार्को पोलो यांनी केले आहे. पी. डायस्कॉरिडीझ व प्लिनी यांच्या लिखाणात निळीचा उल्लेख आढळतो. तेराव्या शतकानंतर निळीचा वापर यूरोपमध्ये जलद वाढला होता. भारताकडे जाण्याचा समुद्रमार्ग सापडल्यानंतर भारतातून निळीची मोठ्या प्रमाणावर निर्यात होऊ लागली, एकोणिसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत निळीची (रंग) भारतातून फार मोठी निर्यात होत असे परंतु १८८३ सालानंतर रासायनिक विक्रियेने अनेक कृत्रिम रंग मिळविणे शक्य झाल्यापासून निळीची लागवड, रंगाचे उत्पादन व निर्यात बरीच कमी झाली. भारतात १८९६-९७ मध्ये सु. ६७,५५६ हेक्टरात निळीची लागवड आणि ८४,३५,००० किग्रॅ. रंगाचे उत्पादन झाले होते परंतु १९५५-५६ मध्ये फक्त ४,२४० हेक्टरात लागवड व १,३०,००० किग्रॅ. उत्पादन झाले. सध्या आंध्र प्रदेश व तमिळनाडू येथे जास्तीत जास्त लागवड होत असून हिरवे खत आणि रंग यांकरिता निळीची एक भिन्न जाती (इं. सुमात्राना ) वापरतात. पहिल्या व दुसऱ्या महायुद्धाच्या काळात कृत्रिम निळीचा तुटवडा भासू लागल्याने इं. आरेक्टा ही जाती अधिक रंगद्रव्याच्या दृष्टीने फायदेशीर म्हणून बिहारमध्ये लागवडीत होती. वर उल्लेखिलेल्या अनेक जातींपैकी सु. वीस भारतात भिन्न ठिकाणी रंग, खत, चारा यांकरिता आणि भूमिसंरक्षणाकरिता इतर पिकांमधून लावल्या जातात.
इं. टिंक्टोरिया : भारतात सर्वत्र आढळणारी ही बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) जाती निळीकरिता प्रथम वापरली होती, तथापि नंतर सुमात्राना, आरेक्टा व सफ्रुटिकोझा या जातींचा विशेष वापर सुरू झाला. टिंक्टोरिया या जातीची उंची १·२०–१·८० मी. असून फांद्या कोनीय व त्यांवर पातळ रुपेरी लव असते. पाने एकाआड एक, संयुक्त व पिसांसारखी (२·५–७·५ सेंमी.) असून दलांच्या ९–१३ जोड्या असतात दले आयत, संमुख (समोरासमोर), खाली केसाळ, पातळ व वाळविल्यावर काळसर होतात लहान, लाल आणि असंख्य फुलांच्या मंजऱ्या पानांच्या बगलेत नोव्हेंबर-डिसेंबरात येतात. फुले पतंगरूप ध्वजक (मोठी पाकळी), दोन बाजूंच्या पंखांसारख्या पाकळ्या (पक्ष) आणि एक नावेसारखी (नौकातल) जोडपाकळी केसरदले द्विसंध (९ + १) ऊर्ध्वस्थ एक किंजदलाचे किंजमंडल [→ फूल]. शिंबा (शेंगा) २-३ सेंमी. लांब, बारीक, सरळ किंवा किंचित वाकड्या असून बिया ८–१२ असतात. इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ लेग्युमिनोजी कुलातील (शिंबावंत वनस्पती कुलातील) पॅपिलिऑनेटी उपकुलात वर्णिल्याप्रमाणे असतात.
निळीची पाने यकृतदाह, डांग्या खोकला, दमा, फुप्फुसांचे व मूत्रपिंडाचे विकार, हृदय धडधडणे, प्लीहावृद्धी (पानथरी आकारमानाने लहान होणे), यकृतापवृद्धी, जलशोफ (पाणी साचून सूज येणे) इत्यादींवर उपयुक्त असतात. कुत्र्याच्या विषाने झालेल्या जलसंत्रसावर [→ अलर्क रोग ] पानांचा सु. ५० ग्रॅ. रस तितक्याच दुधाबरोबर देतात व रस जखमेवर लावतात मुळाचा काढा अश्मरीवर (शरीरात काही विशिष्ट इंद्रियांमध्ये खडे झाल्यावर) व फांट (थंड पाण्यात भिजवून काढलेला रस) आर्सेनिक विषावर उतारा असून नीळ (रंग) लहान मुलांच्या बेंबीवर लावल्यास मलोत्सर्ग होतो नीळ गुरांच्या जखमेवर लावतात. भाजणे, पोळणे, कीटकदंश इत्यादींवर निळीचा लेप गुणकारी आहे. हा नैसर्गिक रंग इराणी गालिचे व बुरणूस यांकरिता वापरतात. गुरांना याचा पाला आवडत नाही. द. भारतात कॉफीच्या मळ्यांत व भातखाचरांत हिरव्या खताकरिता किंवा भूमिसंरक्षणाकरिता ही झाडे लावतात.
नवीन लागवडीसाठी बिया वापरतात. या वनस्पतीची वाढ होण्यास ओलसर व गरम हवामान आणि हलकी निचऱ्याची जमीन लागते. दर हेक्टरी ५,४०० किग्रॅ. पाला (पहिल्या तोडणीत) व २७ किग्रॅ. सुकी नीळ मिळतात सु. ४५० किग्रॅ. पाल्यापासून सु. १८ किग्रॅ. नीळ-लगदा मिळतो हेक्टरी दरवर्षी सु. ५५० किग्रॅ. नीळ-लगदा हे प्रमाण योग्य समजतात. निळीचे ७·५ सेंमी. घन आकाराचे ठोकळे बाजारात पाठवितात. नीळ काढून घेतल्यावर राहिलेल्या चोथ्याचा उपयोग तृणधान्ये, गळिताची पिके, ऊस, तंबाखू इ. पिकांकरिता खत म्हणून करतात.
⇨ षोड (आयसॅटीस टिंक्टोरिया) या वनस्पतीच्या पानांपासून पूर्वी यूरोपात निळा रंग तयार करीत असत.
रंजकद्रव्य म्हणून वापरण्यात येणाऱ्या निळीचे रासायनिक सूत्र C16H10O2N2 असे आहे. ती इंडिगो ब्ल्यू, इंडिगोटीन या नावांनीही ओळखली जाते. तिचा रंग गडद निळा असून ती चूर्ण स्वरूपात मिळते. तिचा वितळबिंदू ३९०°—३९२° से. आहे क्लोरोफॉर्म, ॲनिलीन, नायट्रोबेंझीन इ. विद्रावकांत (विरघळविणाऱ्या पदार्थांत) ती विरघळते निर्वातात तापविल्यास संप्लवित होते (घनरूपातून एकदम वायुरूपात जाते) व तिच्या वाफा गडद लाल असतात. निळीची संरचना खालील सूत्रात दिल्याप्रमाणे आहे. ॲडॉल्फ फोन बेयर यांनी १८७८ मध्ये तिची संरचना निश्चित केली व प्रथम तिचे संश्लेषण केले (कृत्रिम रीतीने तयार केली). सध्या के. ह्यूमान यांनी शोधून काढलेल्या पद्धतीने ॲनिलीन व नॅप्थॅलीन यांच्यापासून ती तयार करतात.
क्षारीय (अल्कलाइन) सोडियम हायपोसल्फेट विद्रावातील निळीचा लगदा पाण्यात मिसळतात. त्यामुळे विद्राव्य इंडिगोटीन व्हाइट मिळते. अशा विद्रावात कापड भिजवून त्याचा हवेशी संपर्क आणल्यास कपड्याला निळा रंग येतो.
हल्ली निळीचा उपयोग कापड रंगविण्यासाठी, छपाईची शाई तयार करण्यासाठी, निळीपासून बनविण्यात येणाऱ्या इतर पदार्थांसाठी कच्चा माल म्हणून, धुलाईत व रंगलेपांत करतात.
जीन्स या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पाटलोणीचे कापड (ब्ल्यू डेनिम) रंगविण्यात निळीचा उपयोग फार मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्याने सु. एक शतकानंतर निळीच्या निर्यातीला अकल्पित ऊर्जितावस्था प्राप्त झाली आहे. जीन्सखेरीज शर्ट, जाकिटे, स्कर्ट इत्यादींकरिताही ब्ल्यू डेनिम हे कापड वापरण्यात येत आहे. मार्च ते जून १९७६ या फक्त ५ महिन्यांच्या काळात सु. ४५ लक्ष रु. किंमतीची नीळ मुंबईतील कारखानदारांनी निर्यात केली. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या चतुर्थात सु. ९ कोटी रु. किंमतीची नैसर्गिक नीळ-व्यापारात फार घट झाली. विकसनशील देशांमध्ये भारत हा एकटाच नैसर्गिक व कृत्रिम नीळ बनविणारा देश आहे. १९७६ साली भारतात १२,००० टन नीळ तयार झाली.
संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. V, New Delhi, 1959.
2. Fieser, L. F., Fieser, M. Organic Chemistry, Bombay, 1962.
परांडेकर, शं. आ. कारेकर, न. वि.
“