नीव्हिअस, नीअस : (सु. २७० – सु. २०१ इ. स. पू.). प्राचीन रोमन कवी इटलीतील कॅप्युआ येथे त्याचा जन्म झाला असावा. तथापि रोममध्येच त्याने आपले बरेचसे जीवन व्यतीत केले. पहिल्या प्यूनिक युद्धात नीव्हिअसने भाग घेतला होता. ह्या युद्धातील अनुभवांच्या आणि रोमसंबंधी मौखिक परंपरेने उपलब्ध झालेल्या माहितीच्या आधारे त्याने Bellum Punicum हे आपले राष्ट्रीय महाकाव्य रचिले. आज ते त्रुटित स्वरूपात उपलब्ध आहे. व्हर्जिलचे ⇨ ईनिड व क्विन्टन्स एनिअसचे ⇨ आन्नालेस ह्या दोन लॅटिन महाकाव्यांवर नीव्हिअसच्या उपर्युक्त महाकाव्याचा प्रभाव पडल्याचे म्हटले जाते. आपल्या महाकाव्यासाठी नीव्हिअसने ग्रीकमधील हेक्झॅमीटरचा वापर करण्याऐवजी लॅटिनमधील ‘सॅटर्निअन’ ह्या छंदाचा वापर केला, हे लक्षणीय आहे.
नीव्हिअसने काही नाटकेही लिहिली तथापि त्याचे नाट्यलेखनही अंशतःच उपलब्ध आहे. त्याच्या अनेक नाटकांची केवळ शीर्षकेच मिळतात. ग्रीक नाट्यकृतींचा आदर्श समोर ठेवूनच त्याने काही सुखात्मिका – शोकात्मिका लिहिल्या. लॅटिन साहित्यात रोमन इतिहासावरील नाट्यलेखनाचा (Fabula praetexta) आरंभ केल्याचे श्रेय नीव्हिअसला दिले जाते. आपल्या नाटकांतून रोममधील राजकारण आणि दैनंदिन जीवन ह्यांवर भाष्य करीत असताना नीव्हिअसमधला प्रभावी उपरोधकार अनेकदा प्रकट झाला आणि रोमच्या ‘कॉन्सल’ला दुखविणाऱ्या एका उपरोधपूर्ण विधानाबद्दल त्याला तुरुंगवासाची सजाही झाली होती. पुढे रोम सोडून उटिका येथे त्याला जावे लागले. तेथेच तो निधन पावला.
कुलकर्णी, अ. र.