नीला : ज्या रक्तवाहिन्या हृदयाकडे अशुद्ध रक्त (ऊतक कोशिकांनी – समान रचना व कार्य असलेल्या पेशींच्या विविध समूहांतील पेशींनी – त्यांमधील ऑक्सिजन व इतर पदार्थ वापरल्यानंतर उरणारे) वाहून नेतात त्यांना नीला म्हणतात. याला अपवाद फुप्फुस नीलांचा असून त्या मात्र हृदयाकडे ऑक्सिजनमिश्रित म्हणजे शुद्ध रक्त वाहून नेतात.
नीलांची भीत्ती तीन स्तरांची मिळून बनलेली असते. अंतःस्तर म्हणजे आतला किंवा अवकाशिकेजवळचा (आतील पोकळी जवळचा) स्तर अंतःकला कोशिकांचा (खवल्यासारख्या कोशिकांचा) बनलेला असतो. मध्यस्तर स्नायूंचा व बाह्यस्तर संयोजी (जोडण्याचे कार्य करणाऱ्या) ऊतकांचा बनलेला असतो.
सर्वच नीलांची रचना सारखी असत नाही. अगदी छोट्या नीलांत तीन स्तर स्पष्ट दिसतही नाहीत, तर मोठ्या नीलांत बाह्यस्तरात संयोजी ऊतकाशिवाय स्नायु-ऊतकही असते. रोहिणी व नीला यांच्या भित्तिरचनेत स्थूलमानाने सारखेपणा असला, तरी त्यांमधील प्रमुख फरक म्हणजे नीला – भित्तीचा मध्यस्तर अत्यल्प स्नायु-कोशिका आणि अत्यल्प प्रत्यास्थी (लवचिक) ऊतक मिळून बनलेला असतो. या फरकामुळे नीलेतील रक्तदाब रोहिणीतील रक्तदाबापेक्षा पुष्कळच कमी असतो. तसेच त्या सहज फुगू शकतात आणि त्यांच्यामधील रक्तदाब कमी होताच त्यांचा निपात (अवकाशिका-भित्ती एकमेकींस येऊन भिडणे) सहज होतो.
सूक्ष्म नीलांना नीलिका म्हणतात व त्यांची सुरुवात सूक्ष्मवाहिन्या (केशवाहिन्या) एकत्र येऊन होते. नीलिकेचा व्यास २० – ३० मायक्रॉन (१ मायक्रॉन = १०–३ मिमी.) असतो. नीलिका-भित्तीचे स्तर निरनिराळे दिसतही नाहीत. ०·४ मिमी. व्यास असलेल्या नीलांच्या भित्तीतील मध्यस्तरातील स्नायु-कोशिका स्पष्ट दिसतात. मध्यम आकारमानाच्या नीलांच्या रचनेत अंतःस्तराच्या कोशिका रोहिण्यांच्या अंतःस्तर कोशिकांप्रमाणे अंतःकला कोशिकाच असल्या, तरी त्या आखूड व रुंद असतात. मध्यस्तरात संयोजी ऊतकाचा जाड थर, अधून मधून प्रत्यास्थी ऊतक-तंतू व काही स्नायुतंतू असतात.
रोहिण्यांच्या मानाने प्रत्यास्थी तंतू फारच कमी असतात. बाह्यस्तर उभे प्रत्यास्थी तंतू आणि अवकाशी (ज्यातील घटक दूर दूर असल्यामुळे पोकळसर असणारे असे) ऊतक मिळून बनलेला असतो. मोठ्या नीलांचा हाच स्तर मध्यस्तरापेक्षा अधिक जाड असून त्यात पुष्कळ उभे स्नायुतंतूही असतात. निम्न महानीला ज्या ठिकाणी हृदयास येऊन मिळते त्या ठिकाणी ही रचना अगदी स्पष्ट दिसते. याशिवाय प्रतिहारिणी नीलेच्या (उदरगुहेतील वरच्या भागामधील, अग्निपिंडाच्या मागील बाजूस असणाऱ्या व यकृतात जाणाऱ्या नीलेच्या) मोठ्या शाखा, बाह्य श्रोणिफलक नीला (ऊरुनीला – मांडीतील सर्वांत मोठी नीला – वंक्षबंधाच्या – मांडीच्या पुढील बाजूस असणाऱ्या तिरप्या बंधाच्या – खालून जाऊन श्रोणिगुहेत गेल्यानंतर तिलाच बाह्य श्रोणिफलक नीला म्हणतात), वृक्क (मूत्रपिंड) नीला, अयुग्म नीला (उदरगुहेत उजव्या बाजूला कटिभागाजवळ सुरू होऊन मध्य पटलाच्या उदरगुहा आणि छाती यांना विभागणाऱ्या स्नायुमय पटलाच्या – महारोहिणी छिद्रातून वर छातीत जाऊन ऊर्ध्व महानीलेस मिळणारी व जोडी नसलेली नीला) या मोठ्या नीलांची रचना अशीच असते. निम्न महानीलेच्या बाह्यस्तरातील पांढरे संयोजी ऊतकाचे तंतू डाव्या व उजव्या बाजूंस वळसे घालणाऱ्या सर्पिल जुडग्यांचे बनलेले असल्यामुळे श्वसन क्रियेच्या वेळी मध्यपटल वर-खाली होताना तिचा वरचा भाग लांब व आखूड सहज होऊ शकतो. त्यामुळे तीवर ताण पडत नाही.
हृदयात उघडणाऱ्या मोठ्या नीलाभागावर हृदयस्नायूंचा थर पसरलेला असतो. हृद्-नीला कोटराचा (हृदयातील बहुतेक सर्व अशुद्ध रक्त ज्या ठिकाणी वाहून येते त्या कोटराचा) संपूर्ण भागच हृद्स्नायूंनी वेष्टित असतो.
पुढील नीलांमध्ये स्नायुतंतूंचा अभाव असतो : (१) वारेतील मातेच्या भागातील नीला, (२) दृढतानिकेतील (मेंदू आणि मेरुरज्जू यांवरील तीन आवरणांपैकी सर्वांत बाहेरच्या आवरणातील) नीला कोटरे व मृदुतानिकेतील (मेंदू आणि मेरुरज्जू यांवरील आवरणांपैकी सर्वांत खालच्या आवरणातील) नीला, (३) जालपटलातील (नेत्रगोलाच्या आतील थरातील) नीला, (४) अस्थिमज्जेतील (लांब हाडांच्या केंद्रीय भागातील पोकळीत असलेल्या संयोजी ऊतकातील) नीला व (५) शिश्न व भगशिश्न [→ जननतंत्र] यांच्या उत्थानशील ऊतकातील रक्तधारी पोकळ्या तसेच शिश्नाच्या छिद्रिष्टकाय भागातील रक्तधारी पोकळ्या.
बहुतेक सर्व नीलांना झडपा असतात व त्यामुळे रक्त उलट वाहून जाऊ शकत नाही. रक्ताचा प्रवाह सतत एकाच दिशेने म्हणजे हृदयाकडेच वाहत राहील अशी व्यवस्था असते. प्रत्येक झडप अंतःस्तराच्या अर्धचंद्राकृती दुमडीपासून बनलेली असते. कोटाला किंवा जाकीटाला बाहेरून असणाऱ्या झाकण नसलेल्या खिशासारख्या त्या दिसतात. रक्त हृदयाकडे जातांना दोन्ही नीला भित्तीकडे दाबल्या जातात म्हणजे झडप उघडी असते. रक्त उलट येऊ लागताच खिसे भरून जाऊन त्यांच्या कडा एकमेकींस घट्ट भिडतात म्हणजे झडप बंद होते. बहुधा दोन झ़डपा एकमेकींसमोर असतात व ज्या ठिकाणी छोटी नीला मोठ्या नीलेस येऊन मिळते त्या ठिकाणी झडप असते. पाय व बाहूंच्या मोठ्या नीलांतून, विशेषेकरून पायांच्या नीलांतून, झडपा अधिक असतात. कारण तेथील रक्त गुरुत्वाकर्षाविरुद्ध वर चढावयाचे असते.
अतिशय छोट्या नीलांतून व महानीलांतून झडपा नसतात तसेच अंतस्त्यांच्या (उदर व छाती यांतील अवयवांच्या) नीला व केंद्रीय तंत्रिका तंत्राच्या [→ तंत्रिका तंत्र] नीला यांनाही झडपा नसतात. नीलांतील हृदयाकडे जाणारा रक्तप्रवाह काही विशिष्ट गोष्टींवर अवलंबून असतो. नीलिकांत येणारे रक्त केशवाहिन्यांतील रक्ताधिक्यामुळे आलेले असते. हातांच्या व पायांच्या खोल भागी असणाऱ्या नीलांवर त्यांच्या जवळील स्नायूंच्या आकुंचनाचा दाब पडून त्यांमधील रक्त दूध पिळल्यासारखे वर सरकवले जाते. हा स्नायुदाब नीलेतील रक्त दोन्हीकडे म्हणजे वर व खाली सरकवितो, परंतु झडपांमुळे ते खाली जाऊ शकत नाही. डोक्याकडून हृदयाकडे येणाऱ्या नीलांतील रक्तप्रवाहास गुरुत्वाकर्षणाची मदत होते. छातीच्या पोकळीतील ऋण दाब (वातावरणीय दाबापेक्षा कमी असलेला दाब) हृदयाजवळील महानीलांतील रक्त हृदयाकडे चोषून (ओढून) घेण्यास मदत करतो.
नीलांतील रक्तप्रवाहाचा वेग रोहिणीतील प्रवाहापेक्षा कमी असल्यामुळे नीलांचे प्रमाण अधिक असणे तसेच त्यांच्यात वाहिनीमीलनही असणे जरूर असते. संवादी नीलांचे आकारमानही रोहिणीपेक्षा मोठे असते. उदा., ऊरुनीला ही ऊरुरोहिणीपेक्षा मोठी असते. मोठ्या नीलांना तसेच मोठ्या रोहिण्यांच्या भित्तींना रक्तपुरवठा करण्याची स्वतंत्र व्यवस्था असते. या सूक्ष्मवाहिन्यांना ‘वाहिका-वाहिन्या’ म्हणतात. नीलांना रोहिण्यांप्रमाणेच तंत्रिका पुरवठाही असतो, परंतु तो अत्यल्प असतो. रोहिण्यांपेक्षा नीलांमध्ये वाहिनीमीलनाचे प्रमाण अधिक असल्यामुळे समपार्श्वी रक्ताभिसरण (एक मार्ग बंद झाल्यास दुसरा मार्ग सहज उपलब्ध होत असल्यामुळे रक्तप्रवाहात फारसा अडथळा न येणे) सहज प्रस्थापित होते.
नीलांसंबंधीच्या, रोगांपैकी ⇨ अपस्फीत नीला, ⇨ नीलाशोथ हे रोग महत्त्वाचे आहेत.
पहा : रक्ताभिसरण तंत्र हृदय.
संदर्भ : 1. Houssay, B. A. and others, Eds. Human Physiology, Tokyo, 1955.
2. Riedman, S. R. The Physiology of Work and Play, New York, 1956.
3. Warwick, R. and others, Eds. Gray’s Anatomy, Edinburgh, 1975.
सलगर, द. चि. भालेराव, य. त्र्यं.
“