नीरा : एक मधुर व उत्साहदायक पेय. ⇨ पामी या वनस्पती कुलातील (ताल कुलातील) झाडांच्या फुलोऱ्यांपासून किंवा शेंड्यांपासून मिळणारा हा रस आहे. ताड (बोरॅसस फ्लॅबेलिफर ), शिंदी (फिनिक्स सिल्व्हेस्ट्रिस ), माड (कोकॉस न्यूसिफेरा ) व भेर्ली माड (कॅरिओटा यूरेन्स ) या झाडांपासूनच मुख्यतः नीरा काढतात.

नीरा काढण्याची पद्धत : ताड, माड व भेर्ली माड या झाडांचे फुलोरे बाहेर पडल्यावर प्रथम काही दिवस त्यांचे लाकडी हातोडीने किंवा अन्य साधनाने वासरू आचळांना जसे ढुसण्या देते त्याप्रमाणे सौम्य मर्दन करतात. नंतर टोकास तिरका छेद देतात. फुलोऱ्यातून रस स्रवू लागतो व तो जमा करण्यासाठी छेदाखाली मडकी टांगून ठेवतात. रस आंबू नये यासाठी काही ठिकाणी (उदा., तमिळनाडूमध्ये) मडक्यांना आतील बाजूने विरविलेल्या चुन्याचा लेप देतात. त्यात कॅल्शियम ऑक्साइडाचे (CaO) प्रमाण सु. ५०% असावे लागते. चुन्याऐवजी लाखेचा किंवा पॅराफीन मेणाचा थर देणे किंवा मडक्याला धुरी देणे इ. पद्धती आहेत पण चुन्याचा उपयोगच जास्त परिणामकारक ठरला आहे. रस स्रवण्याचे प्रमाण दिवसापेक्षा रात्री जास्त असते म्हणून नीरा जमविण्यासाठी मडकी सूर्यास्तापूर्वी लावून ठेवतात व सूर्योदयापूर्वी काढून घेतात. नंतर रसात मिसळला गेलेला चुना तळाशी बसला म्हणजे नीरा ओतून घेतात. तिच्यामध्ये विरघळलेल्या रूपातही काही चुना असतो. तो काढून टाकण्यासाठी तिच्यात योग्य प्रमाणात सुपरफॉस्फेट मिसळतात. त्यामुळे कॅल्शियम फॉस्फेटाचा गाळ बनून तळाशी बसतो. तो फडक्याने गाळून काढून टाकतात. ही गाळलेली नीरा पेय म्हणून विकली जाते. ती चांगल्या स्थितीत टिकावी म्हणून सामान्य तापमानापेक्षा तापमान कमी राहील अशी योजना केलेल्या काचेच्या बरण्यांत किंवा निष्कलंक (स्टेनलेस) पोलादाच्या पिपांत साठवितात. अशी नीरा चोवीस तासांपर्यंत चांगली राहते.

 

शिंदीपासून नीरा काढण्यासाठी या झाडाच्या शेंड्याच्या पानांच्या खालच्या कोवळ्या बुंध्याला खाचा पाडतात व त्यांच्याखाली बांबूच्या पन्हळी खोचून बसवितात. त्यांतून पडणारा रस टांगलेल्या मडक्यांत जमवितात.

गुणधर्म : नीरा जवळजवळ वर्णहीन असून हिला विशिष्ट स्वाद व वास असतो. चवीला ती गोडसर असते. हिच्यामध्ये इक्षु-शर्करा (ऊसात असलेली नेहमीची साखर) १० ते १६% असते. तिच्याशिवाय फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम यांची लवणे प्रथिने आणि , , १२ ही जीवनसत्त्वे, आयसोनियाझीड हे औषधी द्रव्यही नीरेत असते. साखर हा घटक असल्यामुळे नीरा काही काळ ठेवल्यास आंबते, अल्कोहॉल व कार्बन डाय-ऑक्साइड निर्माण होतात आणि त्यामुळे तिचे ताडी या मादक पेयात रूपांतर होते. आंबण्याची क्रिया अशीच चालू ठेवल्यास ॲसिटिक अम्ल बनते. ते शिर्का (व्हिनेगर) म्हणून खाद्यपदार्थांत वापरता येते.

नीरा उत्साहवर्धक व पोषक असून पचनास साहाय्यकारी व सारक आहे. घशाची जळजळ, सांध्यांची सूज, जलोदर, तोंड येणे, नेत्र रोग यांवर ती गुणकारी आहे. १०० ग्रॅ. नीरेपासून ४५ कॅलरी उष्णता शरीरास मिळते. ताडी हे मद्य व ताडगूळ हे पदार्थ नीरेपासून तयार करतात [→ गूळ ताड मद्य].

उत्पादनाचे मोसम, प्रमाण व प्रदेश: तमिळनाडूमध्ये ताडापासून फेब्रुवारी ते मे व महाराष्ट्रात फेब्रुवारी ते मे यांशिवाय नोव्हेंबर व डिसेंबर या महिन्यांतही नीरा काढतात. सुरुवातीस नीरेचे प्रमाण कमी असते, ते पुढे वाढते व अखेरीस पुन्हा घटते. एका मोसमात एका झाडापासून सरासरी २९ किग्रॅ. नीरा मिळते.

माडापासून एप्रिलपासून आठ महिने नीरा काढतात. सामान्यतः दोन वर्षे नीरा काढल्यावर दोन वर्षे झाडाला नारळ येऊ देतात व त्यानंतर पुन्हा दोन वर्षे नीरा काढतात. अशी क्रिया आलटून-पालटून करतात. मोसमात एका झाडापासून सु. २३८ किग्रॅ. नीरा मिळते.

भेर्ली माडाची नीरा नोव्हेंबरपासून ८ ते १० महिने मिळते. एका मोसमात एका झाडापासून सरासरीने १,०९० किग्रॅ. नीरा मिळते.

नोव्हेंबर ते फेब्रुवारी या मोसमात शिंदीची नीरा काढली जाते. हिचे उत्पादन प्रमाण एका मोसमात दर झाडामागे सु. ७७ किग्रॅ. पडते.

भारतात जवळजवळ सर्व किनारपट्टी व शिवाय प. बंगाल, तमिळनाडू, त्रावणकोर, महाराष्ट्र आणि मलबार या प्रदेशांत नीरेचे उत्पादन जास्त होते.

संदर्भ : C. I. S. R. The Wealth of India, Industrial Products, Vol. IV, New Delhi, 1957.

जोशी, लीना