निवह प्राणि : प्राणी हे प्रामुख्याने स्वतंत्रपणे जीवन जगतात. अन्नभक्षण, हालचाल इ. क्रिया ते वैयक्तिकपणे करतात. निवह प्राणिवर्गात अनेक प्राणी एका जिवंत पदार्थाने अगर भागाने एकमेकांना चिकटलेले राहून जीवन जगतात. तसेच अलैंगिक प्रजननामुळे किंवा मुकुलनामुळे (शरीरावर अंकुरासारखे बारीक उंचवटे येऊन त्यांपासून नवीन प्राणी तयार होण्यामुळे) या समुहातील प्राण्यांच्या संख्येत सतत वाढ होत जाऊन या प्राण्यांचा एक मोठा समूह निर्माण होतो. प्राणिसृष्टीत प्रोटोझोआ, पोरिफेरा, सीलेंटेरेटा, पॉलिझोआ व ट्यूनिकेटा या समुद्रात आढळणाऱ्या अनेक प्राणि वर्गांत निवह प्राण्यांची उदाहरणे आढळतात.
प्रोटोझोआ संघामध्ये बहुसंख्य प्राणी एककोशिकीय (शरीर फक्त एकाच पेशीचे असलेले) असून स्वतंत्रपणे जीवन जगतात. याच संघात कार्केशियम (आ. १) या नावाचा एक निवह प्राणी आढळतो. झाडाच्या फांदीवर ज्याप्रमाणे अनेक पाने चिकटलेली असतात त्याचप्रमाणे देठासारख्या एका जिवंत भागाने अनेक कार्केशियम प्राणी एकमेकांना चिकटून राहतात. याच प्राटोझोआ संघातील काही निवह प्राणी निर्माण होण्याची पद्धत मोठी विचित्र आहे. एका मूळ जीवकाचे (वसाहतीतील व्यक्तिगत प्राण्याचे) अपूर्ण विभाजन होते. यामुळे निर्माण झालेले दोन जीवन एकमेकांपासून सुटे न होता चिकटून राहतात. व्हॉर्टिसेलासारखे प्राणी फसवे समूह करतात. हे अनेक प्राणी एकमेकांना निर्जीव दांड्यासारख्या भागाने चिकटलेले आढळतात. म्हणून व्हॉर्टिसेला हा खरा निवह प्राणी म्हणता येत नाही.
पोरिफेरा या प्राणिसंघात मोडणारे स्पंज जातीचे प्राणी परस्परांना जिवंत भागांनी जोडलेले असतात म्हणून स्पंज हे निवह प्राणी म्हणून ओळखले जातात.
सीलेंटेरेटा या प्राणिसंघात अनेक निवह प्राणी आढळतात. क्लॅव्ह्युलॅरिया (आ. २) हा प्राणी आपल्या शरीरापासून गवताच्या काडीसारखा एक तिरश्चर (खोडासारखी वाढ) तयार करतो. हा भाग पृष्ठभागावर पसरतो व त्यावर ठरावीक अंतरावर पुर्वंगके (वसाहती करून राहणाऱ्या प्राण्यांपैकी व्यक्तिगत प्राणी पॉलिप) तयार होतात. हा पुर्वंगक म्हणजेच एक संपूर्ण प्राणी होय. पुर्वंगके तिरश्चरापासून वेगळी केली, तरी जिवंत राहू शकतात. अल्सिओनियम (आ. ३) या नावाचे प्राणी एकमेकांना चिकटलेले असतात व त्यांचे बाह्यावरण एकच असते. ओबेलिया या निवह प्राण्यात बहुरूपता आढळते. एकाच जातीच्या प्राण्याची तो करीत असलेल्या निरनिराळ्या कार्यांनुसार रूपे बदलतात. त्यांच्या शरीराच्या अवयवात बरेच बदल घडून येतात. अशा प्रकाराला बहुरूपता अशी संज्ञा आहे. ओबेलियाच्या समूहात काही प्राणी फक्त प्रजोत्पादन करतात. या प्राण्यांना संस्पर्शक (स्पशेंद्रिय), मुख इ. अन्नग्रहण करणारे अवयव नसतात. जीवनाला आवश्यक असणारा अन्नरस या प्राण्यांना त्याच समूहातील इतर प्राण्यांशी जोडलेल्या जिवंत भागावाटे मिळतो.
मिलिपोरा या प्राण्यातही बहुरूपता आढळते. गवताच्या काडीसारख्या भागावर जठर जीवक (निवहाचे पोषण करणारा, मुख व संस्पर्शक असलेला व्यक्तिगत प्राणी) व मंडलरक्षी जीवक (निवहाचे रक्षण करणारा व्यक्तिगत प्राणी) चिकटलेले असतात. या वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांचा त्यांच्या आधारभूत भागाच्या साहाय्याने सूक्ष्म नलिकांवाटे परस्परांशी संबंध असतो.
पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर (आ. ४) या नावाच्या प्राण्यात बहुरूपता आढळते. या प्राण्याला पाण्यात तरंगणारा व हवेने युक्त असा फुगीर वातप्लव (वायुकोश किंवा हवेने भरलेली पिशवी) असतो. याशिवाय संरक्षक आणि आक्रमक असे मंडलरक्षी जीवक, पोषण जठर जीवक आणि प्रजोत्पादक जीवक (निवहातील प्रजोत्पादन करणाऱ्या व्यक्ती) असे निरनिराळ्या आकारांचे सूक्ष्म प्राणी असून ते एकमेकांना एका जिवंत भागामुळे जोडलेले असतात. या सर्वांचा मिळून एक निवह प्राणी तयार होतो व त्याला पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर असे म्हणतात.
पॉलिझोआ या प्राणिसंघातील ⇨एक्टोप्रॉक्टावर्गातील प्राण्यांपैकी क्रिसिया (आ. ५) या नावाचा एक प्राणी आहे. हा एक निवह प्राणी असून त्याच्या लांब व अरुंद अशा भागात फक्त स्त्री-युग्मकाची (अचर स्त्रीजनन काशिकेची) निर्मिती होत असते. या प्राण्याच्या शरीरावरील इतर सर्व अवयव नष्ट झालेले असतात परंतु या प्रजोत्पादक भागाला आवश्यक असणारा अन्नरस शरीराच्या इतर भागांपासून मिळतो. ब्युग्युला (आ. ६) हा एक निवह प्राणी आहे. या प्राणीसमूहात एव्हिक्युलॅरियम या नावाचा पक्ष्याच्या डोक्यासारखा आकार असलेला भाग असलेले प्राणी असतात. त्यांचे प्रमुख कार्य म्हणजे या प्राणिसमूहाचे शत्रूपासून संरक्षण करणे हे असते. या विशिष्ट कार्यामुळे त्यांचे शरीर इतर सामान्य संस्पर्शक असणाऱ्या प्राण्यांपेक्षा वेगळे दिसते.
⇨ट्युनिकेटा या उपसंघात अपृष्ठवंशी (पाठीचा कणा नसलेल्या) प्राण्यांपेक्षा उच्च दर्जाच्या प्राण्यांचा समावेश होतो. डिप्लोसोमा व ऑसिडियन या वर्गांतील बॉट्रिलस आणि पेरोफोरा हे निवह प्राणी आहेत. पेरोफेरा या प्राण्याला एक समाईक तिरश्चरासारखा भाग असून त्याला अनेक फांद्या फुटतात व प्रत्येक फांदीच्या टोकावर एक प्राणी असतो. बॉट्रिलस या प्राण्याच्या डाव्या व उजव्या बाजूंना प्राणी तयार होऊन या प्राण्यांच्या दोन्ही बाजूंना पुन्हा दोन नवे प्राणी उत्पन्न होतात. ही क्रिया सतत चालू राहिल्याने काही दिवसांनी एका समान आवरणाखाली असंख्य प्राणी तयार झाल्याचे आढळते.
निवह प्राणी हे पाण्यात समूहाने राहत असल्याने त्यांचा फायदा होतो. ते अलैंगिक प्रजनन करतात व परस्परांना जोडलेल्या अवस्थेत राहतात. हे प्राणी दुर्बल असले, तरी प्रतिकूल परिस्थितीशी इतर बलिष्ठ प्राण्यांपेक्षा संघटितपणे झगडू शकतात. काही निवह प्राणी आपल्या शरीरातून चिकट स्राव टाकत असतात. हा स्राव काही काळाने घट्ट बनला की, या प्राण्यांच्या शरीरावर एक संरक्षक कवच निर्माण होते (उदा., प्रवाळ प्राण्याचे किंवा ट्युनिकेट प्राण्यांचे संरक्षक बाह्यावरण) पंरतु फोरोनिस जातीचे प्राणी फसवे समूह करतात. त्यांच्या शरीराचे भाग एकमेकांना जोडलेले नसतात. प्रत्येक प्राणी स्वतंत्र असतो. याउलट निवह प्राणी परस्परांना एका जिवंत भागाने जोडलेले असल्याने अन्नरस परस्परांना पुरवू शकतात.
निवह प्राण्यांच्या उत्पत्तीसंबंधी संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांना असे आढळले आहे की, प्रोटोझोआ प्राणिसंघातील काही एकपेशीय प्राणी स्वतंत्रपणे जीवन न जगता परस्परांना चिकटून राहू लागले. क्रमविकासाच्या (उत्क्रांतीच्या) काळात या साध्या एककोशिकिय प्राण्यांच्या समूहापासून इतर उच्च प्रकारचे प्राणिसमूह तयार होऊन ते निवह प्राणी या नावाने ओळखण्यात येऊ लागले. एकूण प्राणिसृष्टीत निवह प्राण्याचे स्थान बरेच खालचे असले, तरी आपणास असे म्हणता येईल की, मधमाश्या, मुंग्या इ. कीटक किंवा मनुष्यासारख्या कुटुंबवत्सलउच्चवर्गीय प्राण्यात आढळणाऱ्या कार्य विभाजन, समाजजीवन व कुटुंबसंस्था यांचे बीज या निवह प्राण्यांतच आढळते.
संदर्भ : 1. Borradaile, L. A. Potts, F. A. The Invertebrata, Bombay, 1962.
2. Hyman, L. H.The Invertebrates : Protozoa through Ctenophora, Vol.I., New York, 1940.
रानडे, द. र.
“