निर्यमक कविता : संस्कृत काव्य बहुतेक सारे यमकरहितच असते. तेव्हा त्या काव्यचर्चेत निर्यमक कवितेचा वेगळा असा उल्लेख येऊच शकत नाही. मराठी कवितेने प्रारंभापासून, बहुधा प्राकृत कवितेच्या द्वारे, यमकाचा स्वीकार केला. निर्यमक कवितालेखनाचा प्रयत्न अलीकडेच एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात झाल्यापासून काव्यविचारात त्याची चर्चा येऊ लागली. मराठीत अंत्ययमकासच प्राधान्य असल्याने निर्यमक कविता म्हणजे अंत्ययमकरहित कविता असाच तिचा अर्थ असतो. यमकरचनेवर कितीही प्रभुत्व असले, तरी इष्टार्थ सहज प्रसादपूर्णपद्धतीने व्यक्त करण्यास किंचित का होईना तिचा अडथळा होतो, हे तत्त्वतः तरी मान्य करावे लागेल. त्यातून वामन, मोरोपंत इ. पंडित कवींनी यमक साधनाचा अतिरेक केल्यामुळे त्याविरुद्ध प्रतिक्रिया केव्हा तरी होणे अपरिहार्य होते. ती प्रथमतः घंटय्या नायडू यांच्या मैना या काव्यामध्ये प्रकट झाली. तथापि तिचे स्फुरण इंग्रजी निर्यमक कवितेच्या परिचयातून झाले असावे स्वतंत्रपणे नव्हे. पुढे विसाव्या शतकाच्या प्रारंभी प्रख्यात कवी ⇨ एकनाथ पांडुरंग रेंदाळकर यांनी आपल्या कवितेमध्ये तिचा विशेष पुरस्कार केला. मात्र त्यांनी आपली स्फूर्ती संस्कृत काव्यावरून घेतली होती. कारण त्यांच्यावर पहिले संस्कार संस्कृत कवितेचे झाले होते. कवितेच्या बाल्यावस्थेत तिला यमकाचे आकर्षण असणे स्वाभाविक असते पण ती प्रौढ झाली की यमकासारख्या बाह्य शब्दालंकारांची तिला गरज भासू नये, असे त्यांचे मत होते. त्यांनी आपल्या बऱ्याच संस्कृत वृत्तात्मक कवितेत आणि क्वचित मात्रारचनेमध्येही निर्यमक रचना केली परंतु गीतरचनेमध्ये तिचा स्वीकार केला नव्हता. त्यामुळे त्यांचा निर्यमक कवितेचा पुरस्कार निर्भेळ राहिला नाही व या रचनेस फारसा पाठिंबा मिळाला नाही, उलट त्यांना बराच विरोधही झाला. पुढे रविकिरणमंडळाच्या काळात निर्यमक कविता फारशी लिहिली गेली नाही मात्र तदनंतर ⇨ मुक्तच्छंदाचा पुरस्कार करणाऱ्या कवी अनिल व वा. ना. देशपांडे यांनी तिचा यशस्वीपणे आश्रय करून दाखविला. मुक्तच्छंद जसजसा लोकप्रिय होत गेला, तसतशी निर्यमक कविताही वाढीस लागली आणि आधुनिक मुक्तच्छंदाच्या जमान्यात गीत नसलेली बहुसंख्य मराठी कविता निर्यमकच लिहिली जात आहे. हे निर्भेळ तत्त्वनिष्ठेने झाले, असे मात्र म्हणता येत नाही. तीमध्येही यमक मधूनमधून डोकावतेच. तथापि हे यमकसाधन फार अनियमितपणे व मुक्तपणे झाले असल्याने ती निर्यमक असल्यासारखीच आहे.

निर्यमक कविता म्हणजे इंग्रजीमधील ‘ब्लँक व्हर्स’ असे मात्र सर्वार्थाने म्हणता येणार नाही. ब्लँक व्हर्सही निर्यमक असते हे मात्र खरे. तिचा आश्रय दीर्घ कथात्मक कवितेकरिता शेक्सपिअरप्रभृतींपासून कित्येक कवींनी फार पूर्वीपासून केलेला होता. मिल्टनच्या पॅरडाइस लॉस्टमध्ये तशी रचना आहे. त्याचा आदर्श वि. दा. सावरकर यांनी डोळ्यांपुढे ठेवला आणि आपल्या गोमांतक या काव्याच्या उत्तरार्धामध्ये त्यांनीच नाव दिलेल्या ‘वैनायक’ वृत्तामध्ये तशा रचनेचा आश्रय केला. ही रचना निर्यमक असली, तरी ‘मुक्त’ नाही. एका विशिष्ट स्वरूपाच्या ‘धवलचंद्रिका’ या जातीमध्येच त्यांनी ही रचना केली आहे. या रचनेत ठराविक चरणांचे श्लोक वा कडवी नाहीत. इष्टार्थाचा अर्थदृष्ट्या एक परिच्छेद झाला, की तीमधील एकेक खंड वा कडवे संपते. त्यातील पंक्तिसंख्या ठरलेली नसते. ब्लँक व्हर्समध्येही प्रामुख्याने ‘आयॅम्बिक’ वृत्ताची रचना असते. या वैनायक वृत्तरचनेचा उपयोग ना. ग. जोशी यांच्यासारख्या फारच थोड्या कवींनी केला. दीर्घ कथात्मक कवितेस साकी, चंद्रकांत, हरिभगिनी इ. सयमक वृत्तरचनेचाच उपयोग बहुधा होत राहिला. लवरचक मुक्तच्छंदाचा अवतार झाल्याने ही निर्यमक रचना लोप पावल्यासारखीच दिसते.

जोग, रा. श्री.