सुखात्मिका : (कॉमेडी). सुखात्म नाटयप्रकार. हलके फुलके सुखान्त कथानक, खेळकर विनोदी शैली, मुख्यत्वे मनोरंजनाच्या उद्दिष्टाने केली जाणारी निर्मिती ही या नाट्यप्रकाराची काही ठळक लक्षणीय वैशिष्ट्ये होत. ‘कॉमेडी’ला मराठीत सुखांतिका, सुखनाट्य हे अन्य पर्यायही वापरले जातात. शोकात्मिकेप्रमाणेच सुखात्मिकेचा उदयही प्राचीन ग्रीक संस्कृतीत झाला. इंग्रजीतील ‘कॉमेडी’ या शब्दाची व्युत्पत्ती ‘Komos’ व ‘Adein’ ह्या ग्रीक शब्दांशी निगडित आहे. ⇨डायोनायसस  ह्या ऋतुदेवाच्या उत्सवप्रसंगी त्याच्या भक्तगणांनी केलेले नृत्य म्हणजे म्हणजे Komos व Adein गायन. साहजिकच आद्य ग्रीक सुखात्मिका नृत्यगानयुक्त असत. जीवनातील उत्साह, आनंद व चैतन्य त्यांतून ओसंडून वाहत असे. जीवनाची ही चैतन्यपूर्ण लय सुखात्मिका पकडत असते, असे ⇨सुसान लँगर ने (१८९५– १९८५) म्हटले आहे. त्यामुळे आनंद व हास्य यांचा सुखात्मिकेत प्रकर्षाने आविष्कार घडतो. सुखात्मिका मानवी जीवनेच्छेचा, जीवन जगण्याच्या सकारात्मक प्रेरणेचा अनुभव देत असते. सुखात्मिका ही बव्हंशी आशावादी असते व जीवनाचे विधायक स्वरूप त्यातून व्यक्त होत असते. जीवनाचा विशुद्घ अनुभव देणे हा सुखात्मिकेचा स्थायी भाव असतो, असे लँगरने म्हटले आहे. सुखात्मिका ही प्रायः हास्योत्पादक असते व हास्याच्या अनेक प्रती व प्रकार तीत आढळतात. तरी केवळ हास्य वा विनोदनिर्मिती हे सुखात्मिकेचे एकमेव व्यवच्छेदक लक्षण मानले जात नाही. त्याहूनही माणसाचे विविध प्रकारचे स्वभाव व आचारविचार यांचेच सुखद नाटयदर्शन सुखात्मिकेत महत्त्वाचे मानले जाते. सुखात्मिकेत कित्येकदा दुःखाकडून सुखाकडे होणारा प्रवास दर्शविला जातो. तद्वतच जीवनातले ताण निर्माण करणारे प्रसंगही सुखात्मिकेत प्रेक्षकाला सुखद वाटावेत, अशा रीतीने चितारलेले असतात. मनोविनोदन हे सुखात्मिकेचे प्रमुख अंग खरे पण त्याचबरोबर व्यक्तिजीवनातील व समाजजीवनातील नानापरीची व्यंगे, विसंगती, दोष, उणिवा, दांभिकता यांचे कधी उपरोधाच्या, तर कधी विडंबनाद्वारे भेदक दर्शन घडवून त्या द्वारे अप्रत्यक्षरीत्या समाजसुधारणा, प्रबोधन घडवण्याचे उद्दिष्टही काही सुखात्मिकांतून साधले जाते. मानवी स्वभावाचे विविधरूपी प्रातिनिधिक नमुने सुखात्मिका रंगवत असते, असे बेर्गसाँने म्हटले आहे. व्यक्तीमधला लोभीपणा, स्वार्थ, लबाडी, भोळसटपणा, मूर्खपणा, दंभ, कपटीपणा, शारीरिक व्यंगे व कुरूपता, माणसाच्या हातून घडणाऱ्या चुका, असहिष्णुता, विसंगती ह्यांतील हास्यास्पदता सुखात्मिकेत विनोदाच्या माध्यमातून दर्शविली जाते. तथापि त्याचे एक विधायक स्वरूपही तीत दिसते. नैसर्गिक व मानवी व्यवस्था मूलतः शिवस्वरूप असते. अशी श्रद्घा प्रेक्षकांच्या ठायी निर्माण करणे, हेही तिचे एक उद्दिष्ट असते. त्यामुळे मानवी दोषांचा, चुकांचा, अविवेकी कृतींचा उदार स्वीकार करण्याची भूमिका सुखात्मिकेत कित्येकदा आढळते.

सुखात्मिका हा प्रामुख्याने नाटयप्रकार मानला जात असला, तरी सुखात्मता ही केवळ नाटकातच आढळणारा जीवनानुभवाचा विशिष्ट आकार नव्हे. कथा, कादंबरीसारख्या अन्य ललित साहित्यप्रकारांतही सुखात्म जीवनानुभवांचा आविष्कार घडत असतो. त्यामुळे सुखात्मिका ही संज्ञा त्यांनाही लागू पडते. उदा., मध्ययुगीन कथनपर काव्याला अनुलक्षून ही संज्ञा वापरली जात होती. सुखकारक व उत्कर्षाकडे जाणारा शेवट असलेल्या कादंबऱ्यांची गणनाही या संज्ञेने केली गेली. मात्र वाङ्‌मयप्रकार म्हणून प्राधान्याने नाटकाच्या संदर्भातच ती जास्त रूढ झाली.

इ. स. पाचव्या-सहाव्या शतकांत होऊन गेलेल्या एपिकार्मस ह्या ग्रीक कवीने लिहिलेल्या काही लघुनाट्यांमध्ये ग्रीक सुखात्मिकेचे पूर्वरूप शोधता येते. डोरियन बोलीभाषेत लिहिलेल्या त्याच्या काही प्रहसनवजा नाटयकृती अत्यंत त्रुटित स्वरूपात उपलब्ध आहेत. ग्रीसमध्ये एका दिवशी, एकाच नाटककाराच्या तीन शोकात्मिका सादर झाल्यानंतर एक विरूपिका सादर करण्याचा संकेत होता. त्या शोकात्मिकांमुळे निर्माण झालेले भावनात्मक ताण-तणाव नष्ट करून एक हलके फुलके वातावरण निर्माण करण्याचा हा प्रयत्न असे. यथावकाश ग्रीक सुखात्मिका विकसित होत जाऊन तिने परिपक्व रूप धारण केले. ग्रीक सुखात्मिकेचा विकास मुख्यतः अथेन्समध्ये घडून आला. ⇨ ॲरिस्टोफेनीस  (इ. स. पू. सु. ४४८–३८०) आणि ⇨मिनँडर ( इ. स. पू. सु. ३४२–२९२) ह्या ग्रीक नाटककारांनी ⇨टायटस मॅक्सियस प्लॉटस ( इ. स. पू. सु. २५४–१८४) व ⇨पब्लिशस टेरेन्शिअस एफर ( टेनेन्स, इ. स. पू. सु. १८५–१५९) ह्या रोमन नाटककारांनी सुखात्मिकेचे परिणत रूप घडविले. पुढे सुखात्मिका बहुरूपांनी समृद्घ झाली. [⟶ ग्रीक साहित्य लॅटिन साहित्य].

 

सुखात्मिकेची स्वरूपवैशिष्टये ही शोकात्मिकेच्या स्वरूपवैशिष्टयांशी त्यांची तुलना केल्यास जास्त स्पष्ट होतील. लोकप्रियतेच्या दृष्टीने विचार केला, तर शोकात्मिकेपेक्षा सुखात्मिकेकडे लोकांचा ओढा अधिक असणे स्वाभाविकच ठरते. माणसांचे दैनंदिन जीवन अनेक प्रकारच्या ताणतणावांनी आणि दुःखांनी ग्रस्त असते. त्यांच्या व्यक्तिगत जीवनातून, तसेच भोवतालच्या परिसरातून त्यांना सुखापेक्षा दुःखाचाच अनुभव अधिक येत असतो. माणसांच्या दुःखमय जीवनांचे, त्यांच्या उद्ध्वस्त आयुष्यांचे दर्शन घडविणाऱ्या शोकात्मिकेपेक्षा हलक्या फुलक्या, सुखद वातावरणात घेऊन जाणारी, जीवनाविषयीचा आशावादी आणि सकारात्मक दृष्टिकोन मनावर ठसविणारी, हसविणारी, रिझविणारी सुखात्मिकाच लोकांना अधिक आकर्षित करते.

 

मात्र, शोकात्मिकेचे आवाहन मुख्यतः मूलभूत मानवी भावभावनांना असल्यामुळे देशकालाच्या आणि भाषेच्या मर्यादांपलीकडे जाऊन ती जवळपास सर्वांच्याच हृदयात भिडते पण सुखात्मिकेचे आवाहन अनेकदा समाजाच्या विशिष्ट स्तरांतील लोकांसाठीच असते. समाजाच्या विशिष्ट स्तरांतले जीवनव्यवहार, त्यांच्याशी निगडित असलेल्या आचारविचारांतील औचित्य-विसंगती ह्यांचे दर्शन सुखात्मिका घडवीत असते. ते सामाजिक असते आणि त्याच्याशी संवादी अशी तिची भाषाही असते. ही भाषा समाजातील सर्वच स्तरांच्या परिचयाची वा निकटची नसल्यामुळे अशा सुखात्मिकांचा आस्वाद सर्वांना घेता येत नाही. शिवाय एखादी सुखात्मिका संबंधित समाजाच्या ज्या काळात निर्माण झालेली असते त्या काळातले, त्या समाजाचे वैशिष्ट्यपूर्ण सामाजिक-सांस्कृतिक संकेत त्या भाषेत असतात, त्या भाषेचा तो एक अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. त्यामुळे अनेकदा त्यांचे अनुवाद होणे कठीण असते. त्या भाषेच्या आधारे केलेल्या शाब्दिक कोट्याही अन्य भाषांमध्ये आणता येत नाहीत.

शोकात्मिका व सुखात्मिका हे जीवनाकडे पाहण्याचे दोन भिन्न दृष्टिकोन आहेत : पहिला गंभीर तर दुसरा खेळकर. वाचक वा प्रेक्षक यांचे नाटयवस्तूशी जे नाते कल्पिले जाते, त्यावर ते अवलंबून असतात. शोकात्मिकेत नायकाविषयी आदर व त्याच्या दुःस्थितीविषयी हळहळ वाटत असते तर सुखात्मिकेत त्याच्याविषयी दूरस्थ आपुलकी व त्याच्या कल्पित दुःस्थितीविषयी गंमत वाटत असते. शोकात्मिकेत माणसाच्या अलौकिक गुणांचे दर्शन असते, तर सुखात्मिकेत त्याच्या लौकिक दोषांचे दर्शन असते. शोकात्मिकेत दुःखाची अटळता दर्शविली जाते तर सुखात्मिकेत दुःख टाळता येईल असा दिलासा दिला जातो. सुखात्मिकेच्या मुळाशी जीवनोत्साह असतो व त्याची प्रवृत्ती नेहमीच मुक्ततेकडे असते. हा उत्साह, उल्हास, मुक्त आनंद सुखात्मिकेतील हास्याला जन्म देत असतो.


शोकात्मिकेत ज्यांची शोकात्म अखेर होते, अशा व्यक्ती आपल्या व्यक्तित्वांचे अनन्यसाधारणत्व जिद्दीने जपत असतात ते जपण्यासाठी परिस्थितीशी कोणतीही तडजोड करावयास त्या तयार नसतात. त्यासाठी स्वतःला येणारा एकाकीपणा, होणारा विनाश ह्यांची त्यांना पर्वा नसते. पण समाजातील सामान्य माणसांनाही ज्याचे त्याचे अनन्यसाधारण व्यक्तित्व असतेच ते जपण्याची त्यांची धडपडही असते पण हे करीत असतानाही दैनंदिन जीवनात आपल्या व्यक्तित्वाचा आपल्याला अनेकदा संकोच करावा लागतो, एकाकीपणा टाळून समाजात राहण्याची ती एक आवश्यकता आहे, ह्याचे भान त्यांना असते मात्र अशी माणसे तडजोडीचे जीवन जगत असताना माणूस हा समाजातील निरनिराळ्या व्यक्तींचे सामाजिक वर्तन, समाजात वावरताना त्यांच्या व्यक्तित्वांचे प्रकट होणारे वेगवेगळे पैलू निरखत असतो. समाजाचा घटक म्हणून आणि सामाजिक घटना म्हणून तो हे निरीक्षण करीत असतो. ह्या निरीक्षणातून निरनिराळ्या व्यक्तींच्या वर्तनांतील औचित्यविसंगती, विक्षिप्तपणा त्याच्या अनुभवास येतो ह्यातूनच हास्याचा जन्म होतो. औचित्यविसंगतीची जाणीव विविधभावसूचक असल्यामुळे तिचे आविष्कारही वेगवेगळ्या रूपांत होतात आणि त्यातून सुखात्मिकेचे वेगवेगळे प्रकार निर्माण होतात.

सुखात्मिकेचे प्रकार : विशुद्घ विनोदगर्भ सुखात्मिका हा सुखात्मिकेचा एक प्रकार. माणसाच्या स्वभावातील काही चिरंतन विसंगतींशी तो निगडित असतो. अशा विसंगतींतून माणसाचे माणूसपणच सिद्घ होत असते. अशा विसंगती–उदा., माणसामधला मूलभूत दुबळेपणा, त्याच्या अहंकाराची निरर्थकता इत्यादी–लक्षात आल्यावर माणूसच स्वतःला हसतो, पण हे हास्य निर्मळ असते. कोणत्याही कटुतेपासून मुक्त असते. जीवनाविषयीचा आशावाद प्रकट करणारी, माणसाला माणूस म्हणून स्वीकारणारी अशी ही सुखात्मिका असते.

उपहासप्रधान सुखात्मिका हा सुखात्मिकेचा दुसरा प्रकार. निकोप समाजजीवनाच्या औचित्यकल्पनेशी विसंगत असलेले लोकवर्तन आणि समजुती ह्यांचा काहींना राग येतो, तर काहींना त्यांची हास्यास्पदता जाणवून हसू येत असते. ही हास्यास्पदता ते उपहासाच्या वा ⇨ उपरोधाच्या, तसेच ⇨विडंबनाच्या रूपाने प्रकट करतात.त्यातूनच उपहासप्रधान सुखात्मिका निर्माण होते. अशा सुखात्मिकांचे लक्ष्य बनलेले जे उपहासविषय असतात, त्यांची मानवी जीवनावर प्रकाश टाकण्याची क्षमता जर अत्यंत मर्यादित असेल, तर त्या सुखात्मिकांचे वाङ्‌मयीन यशही सीमित राहते. उपहास हा सामाजिक दृष्टया अनिष्ट असलेल्या आचार-विचारांचा जसा होऊ शकतो, तसाच तो सामाजिकदृष्ट्या  इष्ट ठरणाऱ्या (उदा., सामाजिक सुधारणाविषयक नवे आचार-विचार) विचारांचाही होऊ शकतो तथापि अशा सुखात्मिका वाङ्‌मयीन महत्तेची फारशी उंची गाठू शकत नाहीत.

सुखात्मिकेचा तिसरा प्रकार म्हणजे ⇨प्रहसन   (फार्स) हा होय. ह्या प्रकारातील सुखात्मिकाही औचित्यविसंगतीचे दर्शन घडवीत असली, तरी तिच्यातील औचित्यविसंगती ढोबळ असतात. ही सुखात्मिका सतत योगायोगाचा आधार घेत असते. प्रेक्षक-वाचकही ह्या योगायोगांबद्दल फारशा शंका घेत बसत नाहीत. तसेच अशा प्रकारच्या सुखात्मिकेतून सखोल जीवनदर्शनाची अपेक्षाही नसते. प्रेक्षक-वाचक हे फक्त समोर येणाऱ्या घटनांमधील गंमत अनुभवीत असतात. सुखात्मिकांच्या कथानकात सखोल मूल्यविचाराला फारसे स्थान नसते. सुखात्मिकेच्या प्रकृतीला तो मानविण्यासारखा नसतो. सुखात्मिकांमधील व्यक्तिविचार हा मुख्यतः समाजातील विविध व्यक्तिमनांचा असतो. तेथे एकाकी व्यक्तिमन नसून समाजाचे मन किंवा सामूहिक मन असते. तसेच सुखात्मिकेत घटनांच्या कालानुक्रमापेक्षा अनेकदा प्रत्येक घटना हास्योत्पादक, सुखद करण्याकडे लेखकांचा कल असतो. सुखात्मिकेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ती कोणा एका व्यक्तीची नसते, तर अनेक व्यक्तींनी एकत्र येऊन ती घडविलेली असते. सुखात्मिकेतील माणसे एकाकी राहू शकत नाहीत. ती सर्वसाधारणांचा भाग असतात. त्यांचे दुबळेपणा हे सर्वसाधारणांचे दुबळेपण असते. काव्यात्मतेच्या दृष्टीने सुखात्मिकेचा विचार केला, तर सुखात्मिका आणि काव्यात्मता ह्यांच्यात जवळचे नाते नाही. हास्यनिर्मिती हे सुखात्मिकेचे उद्दिष्ट असल्यामुळे काव्यात्मता त्या उद्दिष्टांशी फारशी सुसंगत ठरत नाही.

पाश्चिमात्य सुखात्मिकेचे अनेक प्रकार काळाच्या ओघात ह्या नाट्यप्रकारच्या विकासक्रमात आकाराला आले. उदा., वैचारिक सुखात्मिका (कॉमेडी ऑफ आयडियाज) ह्या प्रकारच्या सुखात्मिकेत विनोदी शैलीने अनेक विषयांवर चर्चा केली जाते. ⇨जॉर्ज बर्नार्ड शॉ च्या मॅन अँड सुपरमॅन, डॉक्टर्स डायलेमा  अशा काही नाटकांची उदाहरणे ह्या संदर्भात दिली जातात. आचारविनोदिनी (कॉमेडी ऑफ मॅनर्स) म्हणजे सामाजिक चालीरीतींवर व आचार-विचारांवर आधारलेली विनोदी नाटके. ह्या सुखात्मिकाप्रकारात विशिष्ट सामाजिक संकेतांच्या चौकटीत वावरणाऱ्या स्त्री-पुरूषांच्या वर्तनातून आणि स्वभावातून हास्यनिर्मिती केली जाते. स्वभावातील तऱ्हेवाईकपणावर त्यात भर असतो. इंग्लंडमध्ये रेस्टोरेशन कालखंडात (१६६०– १७००) लिहिल्या गेलेल्या सुखात्मिका आचारविनोदिनीची उत्तम उदाहरण होत. तसेच शेरिडनचे स्कूल फॉर स्कँडल (१७७७), ऑस्कर वाईल्डचे लेडी विंडरमिअस फॅन (१८९२) ही सुद्घा काही उल्लेखनीय उदाहरणे आहेत. ‘कोम्मेदिआ देलार्ते ‘(Commedia del’arte) ह्या सुखात्मिकाप्रकारातील नाटके इटलीत सोळाव्या शतकात विकसित झाली. ही नाटके सादर करणारे गट यूरोपमध्ये ठिकठिकाणी–विशेषतः फ्रान्समध्ये–जात. ह्या नाटकांचा यूरोपीय नाटकांवर लक्षणीय प्रभाव पडला. प्रेमप्रकरणासाठी करावयाच्या उचापती हे सामान्यतः अशा नाटकांचे विषय असत. जेथे ही नाटके सादर केली जात, तेथील स्थानिक संदर्भ आणि परिस्थिती ह्यांचा उपयोग उत्स्फूर्त संवादांत करणे, हे ह्या नाटकांच्या सादरीकरणाचे एक लक्षणीय वैशिष्टय होते. मूकाभिनय, विदूषकगिरी, प्रहसन, संगीत ह्यांचे मिश्रण त्यांत असे. ⇨शेक्सपिअरच्या द कॉमेडी ऑफ एरर्स (१५९०) वर ह्या सुखात्मिकाप्रकाराचा काही संस्कार झालेला दिसतो. शेक्सपिअरच्या मिड्समर नाइट्स ड्रीम (१५९६), द मर्चंट ऑफ व्हेनिस (१५९६), ॲज यू लाइक इट (१५९९), ट्‌वेल्थ नाइट (१५९९) ह्या सुखात्मिका या नाट्यप्रकारचे परिणत, प्रगल्भ रूप दर्शविणाऱ्या आहेत. मानवी जीवनाचे सूक्ष्म चौफेर निरीक्षण, संस्मरणीय वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिरेखा, खोचक, बोचक तसेच खळखळून हसविणारा अव्वल दर्जाचा विनोद ही या सुखात्मिकांची वैशिष्टये त्यांना श्रेष्ठत्व बहाल करणारी आहेत. बेन जॉन्सन, ⇨मोल्येर, कार्लोगोल्दोनी ह्या नाटककारांवरही ‘कोम्मेदिआ देलार्ते’ ह्या प्रकारचा प्रभाव दिसतो. मोल्येरने वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिरेखाप्रधान सुखात्मिकांचा नवा साचा निर्माण केला. संशयकल्लोळ   (गो. ब. देवल), कवडीचुंबक (प्र. के. अत्रे) हे मोल्येरच्या सुखात्मिकांचे मराठी अवतार होत.


सुखात्मिकांचे आशय-विषय, रचनातंत्रे, शैलीविशेष यांना अनुसरून सुखात्मिकांचे अनेकविध प्रकार नाट्यसमीक्षकांनी मानले आहेत. उदा., कपटनाट्यावर आधारलेली वा कारस्थानप्रधान सुखात्मिका (कॉमेडी ऑफ इन्ट्रीग), प्रणयरम्य (रोमँटिक) सुखात्मिका, समस्याप्रधान सुखात्मिका, वृत्तीप्रधान सुखात्मिका (कॉमेडी ऑफ ह्यूमर्स), शोकसुखात्मिका (ट्रॅजिकॉमेडी), विषण्णगर्भ सुखात्मिका (ब्लॅक कॉमेडी) इत्यादी. कारस्थानप्रधान सुखात्मिका हा प्रकार मिनँडर, प्लॉटस, टेरेन्स, शेक्सपिअर, मोल्येर, काँग्रीव्ह इ. नाटककारांनी हाताळला आहे. या प्रकारच्या सुखात्मिकेत कथानकावर जास्त भर असून त्याची कौशल्यपूर्ण रचना, चातुर्याने केलेली गुंफण नाटकाची रंगत वाढवते. एकमेकांविरूद्घ रचलेली कटकारस्थाने, त्यासाठी केलेल्या खटपटी-लटपटी यांना कथानकात अग्रस्थान असते. अण्णासाहेब किर्लोस्करांचे सौभद्र   हे मराठीतील उत्तम उदाहरण. शिवाय त्यात प्रणयरम्य सुखात्मिकेचे रंगही मिसळले आहेत. प्रसंगनिष्ठ सुखात्मिका (कॉमेडी ऑफ सिच्युएशन) हा प्रकारही कथानकाच्या कौशल्यपूर्ण गुंफणीवर आधारलेला आहे. त्यात सामान्यतः पात्रांची त्रेधातिरपीट उडविणारे किंवा त्यांना हास्यास्पद बनवणारे प्रसंग असतात. स्वभावप्रधान सुखात्मिकेत (कॉमेडी ऑफ कॅरॅक्टर) पात्रांच्या स्वभावचित्रणातून विनोदनिर्मिती साधली जाते. शेक्सपिअरच्या सर्व सुखात्मिका या प्रकारात मोडतात. या प्रकारच्या सुखात्मिकेतील एकेक पात्राच्या ठिकाणी एकेक वृत्ती (उदा., आनंदी, शांत, चिडखोर, खिन्न) प्रबळ दर्शवून ⇨बेन जॉन्सन  (सु. १५७२–१६३७) या इंग्रज कवि-नाटककाराने वृत्तिप्रधान सुखात्मिका (कॉमेडी ऑफ ह्यूमर्स) हा प्रकार निर्माण केला. त्याचे एव्हरी मॅन इन हिज ह्यूमर  (१५९८) हे या प्रकारातील उत्कृष्ट आद्य नाटक मानले जाते. समाजामध्ये रूढ असलेल्या औचित्यसंकेतांचा भंग करणाऱ्या काही नमुनेदार व्यक्ती, प्रातिनिधिक व्यक्तिनमुने सुखात्मिकेत हमखास येतात परंतु त्याचबरोबर जीवनातील आनंदाचा शोध घेणाऱ्या, मूल्यांवर श्रद्घा असणाऱ्या व्यक्तीही सुखात्मिकेत रंगवल्या जातात. पु. ल. देशपांडे यांचे तुझे आहे तुजपाशी, तसेच वसंत कानेटकरांचे प्रेमा तुझा रंग कसा  या सुखात्मिकांमध्ये आनंदी प्रसन्न वृत्ती व मूल्यांवरील श्रद्घा यांचा सुखद प्रत्यय येतो. ह्याशिवाय कल्पनारम्य, भावनाप्रधान, विडंबनात्मक, उपरोधी, सामाजिक, कौटुंबिक इ. आशयविशेषांचे प्राधान्य दर्शविणारे अनेक सुखात्मिकाप्रकार कल्पिले गेले आहेत. ह्याशिवाय उच्च सुखात्मिका (हाय कॉमेडी) व निम्न सुखात्मिका (लो कॉमेडी ) असे सुखात्मिकेच्या दर्जाच्या भिन्न स्तरांवर आधारित प्रकारही मानले गेले आहेत. जॉर्ज मेरेडिथने द आयडिया ऑफ कॉमेडी  (१८७७) ह्या ग्रंथात उच्च दर्जाचा बौद्घिक विनोद हे ‘हाय कॉमेडी’चे प्रमुख लक्षण सांगितले आहे. ॲलन रेनॉल्ड्स टॉम्सन याने आपल्या द ॲनॅटॉमी ऑफ ड्रामा   या ग्रंथात प्रहसन आणि उच्च सुखात्मिका यांमधील सहा पायऱ्यांचा निर्देश करून त्या दोहोंमधील सीमारेषा स्पष्ट केल्या आहेत. उच्च सुखात्मिकेतील विषय अर्थपूर्ण व गंभीर असतो. तिचा वैचारिक, बौद्घिक व औपरोधिक विनोदनिर्मितीकडे कल असतो. व्यक्तिदर्शनाला प्राधान्य, घटना-प्रसंगांची वास्तवता व संभवनीयता, जीवनाशी प्रामाणिकता व साहित्यिक गुणसंपन्नता हे उच्च सुखात्मिकेचे काही ठळक गुणविशेष होत. या उलट निम्न सुखात्मिकेत उथळ शाब्दिक कोट्या , शारीर व्यंगे, अचकट विचकट हावभाव, धांगडधिंगा, अश्लील सूचकता, विदुषकी कसरती व हालचाली इत्यादींच्या दर्शनातून विनोद साधण्याचा प्रयत्न केला जातो. प्रहसनादी प्रकारांचा त्यात समावेश होतो व त्यांचा वाङ्‌मयीन दर्जा बव्हंशी सामान्य असतो.

 

आधुनिक काळात शोकात्मिका व सुखात्मिका या प्रकारांतील गुणविशेषांचे मिश्रण साधणारा शोक-सुखात्मिका (ट्रॅजि-कॉमेडी) हा प्रकारविकसित झाला. त्याचे मूळ प्राचीन रोमन नाटककार प्लॉटस याच्या नाट्यसंकल्पनेत आढळते. त्याने देव व शोकात्म नायक (शोकात्मिकेतील पात्रे), गुलाम (सुखात्मिकेतील पात्र) यांना बरोबरीचे स्थान असलेल्या नाटकांचा उल्लेख शोकात्म सुखात्मिका असा प्रथमतः केला. फ्रेंच नाटककार ⇨कोर्नेय (१६०६–८४) याने नायकाच्या मृत्यूने शेवट न होणारे गंभीर नाटक म्हणजे शोक-सुखात्मिका असे म्हटले. यावरून सामान्यतः सुखात्म शेवट असलेल्या गंभीर नाटकांचा निर्देश शोक-सुखात्मिका म्हणून केला जाऊ लागला. दुसऱ्या महायुद्घानंतर आधुनिक यूरोपीय नाटय व रंगभूमी क्षेत्रात उदयास आलेल्या ⇨मृषानाट्य (द थिएटर ऑफ द ॲब्सर्ड) ह्या प्रकारातील विषण्ण अनुलक्षून विषादगर्भ सुखात्मिका (डार्क वा ब्लॅक कॉमेडी) ही संज्ञा उपयोजिली जाऊ लागली. जीवनाचे वैयर्थ्य व असंगती यांचे चित्रण करणाऱ्या या नाटकांत गांभीर्य व विनोद यांचे विचित्र रसायन साधलेले असते. गंभीर आशयाची हास्यप्रचुर अभिव्यक्ती असलेल्या या नाटकांचा निर्देश शोकात्म प्रहसन (ट्रॅजिक फार्स) असाही केला जातो.

मराठीत अण्णासाहेब किर्लोस्कर (सौभद्र ), गोविंद बल्लाळ देवल (संशयकल्लोळ ), माधवराव जोशी (म्युनिसिपालिटी ), शं. प. जोशी (खडाष्टक ), आचार्य प्र. के. अत्रे (साष्टांग नमस्कार, लग्नाची बेडी ), पु. ल. देशपांडे (अंमलदार, तुझे आहे तुजपाशी ), वसंत कानेटकर (प्रेमा तुझा रंग कसा ), व्यंकटेश माडगूळकर (पति गेले ग काठेवाडी ) प्रभृती नाटककारांनी सुखात्मिका या प्रकारची समृद्घी व वैविध्य यांचे दर्शन घडविणारी यशस्वी नाटके लिहिली आहेत.

पहा : विनोद शोक-सुखात्मिका शोकात्मिका.

संदर्भ : 1. Davis, Jessica, Farce, London, 1978.

           2. Hirst, David L. Comedy of Manners, London, 1979.

           3. Merchant, Moelwyn, Comedy, London. 1972. 

           ४. कऱ्हाडे, सदा, सुखनाटयाचे साहित्यरूप, मुंबई, १९७४.  

           ५. गोकाककर, सु. गो. दुंडगेकर, ना. रा. सुखात्मिकेचे स्वरूप, पुणे, १९८६.  

           ६. राजाध्यक्ष, विजया रानडे, अशोक दा. संपा. हास्यविनोद-सुखात्मिका, मुंबई, १९९२.

कुलकर्णी, अ. र. इनामदार, श्री. दे.