निबंध : आधुनिक गद्यलेखनाचा एक प्रकार. ‘निबंध’ या संस्कृत शब्दाचे अनेक अर्थ आहेत. त्यांपैकी ‘एकत्र बांधणे’ किंवा ‘रचणे’ हे अर्थ या लेखनप्रकाराशी अधिक जुळतेमिळते आहेत. एकेकाळी भूर्जपत्रांवर लेखन केले जाई व अशी भूर्जपत्रे एकत्र करून बांधत. लक्षणेने एखाद्या विषयासंबंधी संगतवार रचलेले वा उभारलेले मध्यम व्याप्तीचे लेखन म्हणजे निबंध, असे म्हणता येईल. अगदी छोटे गद्यलेखन टीपा, टिप्पणी किंवा टिपण म्हणता येईल. अगदी मोठे लेखन व्याप्तीलेख, प्रबंध वा ग्रंथही म्हणता येईल. व्याप्तीदृष्ट्या या दोहोंच्या मध्ये कुठेतरी निबंध हा प्रकार बसू शकेल. एखाद्या विषयासंबंधी प्रतिपाद्य समाधानकारकपणे कसे मांडता येईल, यावर लेखनाची व्याप्ती अवलंबून असते. त्यामुळे टिपा-टिपाणे आणि प्रबंध-ग्रंथ या दोहोंमध्ये कुठेतरी बसणाऱ्या निबंधलेखनातही ठराविक व्याप्ती आढळत नाही. काही निबंध लहान, तर काही दीर्घ असू शकतात. लेखनामागील उद्दिष्टही त्याची व्याप्ती तसेच ठेवण या घटकांवर परिणाम करतेच. टीपा-टिपणे, निबंध, प्रबंध, ग्रंथ यांसारख्या प्रत्येक लेखनप्रकाराचा घाट लेखनविषयक भूमिकेवर अवलंबून असतो.

संस्कृतमध्ये गद्यपद्यात्मक ग्रंथरचनेला सामान्यपणे प्रबंध असे म्हटले जाते. पुढे आख्यानात्मक अथवा कथात्मक काव्याला प्रबंधकाव्य म्हटले जाऊ लागले. आधुनिक परिभाषेत सामान्यपणे पीएच्. डी.साठी केलेल्या संशेधनात्मक लेखनास प्रबंध म्हटले जाते. संस्कृतात निबंध ही संज्ञा असली तरी, आधुनिक अर्थाने जी निबंधरचना अभिप्रेत आहे ती संस्कृतात नाही. ⇨ धर्मनिबंधांसारख्या बहुतांशी गद्यप्रकारातील लेखनात हिंदू लोकांना आचार, व्यवहार, प्रायश्चित्ते इत्यादींसंबंधी मार्गदर्शन करणारे विवेचन केलेले आढळते. स्मृतिग्रंथांवरील टीका हासुद्धा निबंधलेखनाचाच एक प्रकार म्हणता येईल.

पश्चिमी साहित्यात निबंध हा लेखनप्रकार सोळाव्या शतकाच्या शेवटीशेवटी उदयास आला. त्याचा जनक ⇨ माँतेन (१५३३–९२) हा फ्रेंच लेखक मानला जातो. इंग्लिशमध्ये ‘एसे’ अशी संज्ञा आहे व ती फ्रेंच संज्ञेवरून आलेली आहे. एसे या संज्ञेचा शब्दश: अर्थ ‘प्रयत्न करणे’ असा आहे. इंग्रजीमध्ये निबंधवजा गद्यलेखनाला ‘काँपोझिशन’, ‘आर्टिकल’ अशाही संज्ञा आढळतात. पूर्वी ‘डिस्‌कोर्स’ असाही शब्द वापरत. इंग्रजीतील ‘ट्रीटिज’ संज्ञेला मराठीत प्रबंध म्हटल्याचे दिसते व तिची व्याप्ती निबंधाहून मोठी असते. इंग्रजीतील ‘मोनोग्राफ’ या प्रकारातील लेखनही एखाद्या विषयावरील संक्षिप्त पण सर्वांगीन माहिती देणारे असते. मराठीत त्याला व्यक्तिलेख असे सामान्यपणे म्हटले जाते. इंग्रजीत ‘रिसर्च पेपर’ (मराठी शोध-निबंध किंवा शोध-लेख) हाही गद्यलेखनाचा प्रकार असून तो संशोधनविषयक प्रतिपादनास लावण्यात येतो.

माँतेनप्रणीत निबंधात लेखकाच्या आत्माविष्काराला किंवा आत्मनिष्ठेला प्रधान्य होते. तथापि बेकनसारख्या लेखकांनी इंग्रजीत जो निबंधप्रकार रूढ केला, तो अधिक वस्तुनिष्ठ, विश्लेषणात्मक आणि तर्कशुद्ध मांडणीचा होता. सामान्यपणे आपण ज्याला निबंध म्हणतो, त्यात एखाद्या विषयाचे वस्तुनिष्ठ दृष्टीने केलेले विवेचन महत्त्वाचे असते. आत्मनिष्ठ निबंध हा माँतेनने स्वत:च म्हटल्याप्रमाणे, लेखकाच्या आत्मचित्रणासारखा असतो. माँतेनच्या या आत्मनिष्ठेच्या बीजाचाच विकास पुढे एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस ⇨ लघुनिबंध, ललित निबंध, काव्यात्म निबंध किंवा गद्य काव्य यांच्या स्वरूपात झाला. इंग्रजीत या प्रकारास ‘पर्सनल एसे’ म्हणतात. पश्चिमी साहित्यात आत्मनिष्ठा आणि वस्तुनिष्ठा या दोहोंचे प्रभाव निबंधलेखनावर सारख्याच प्रमाणात राहिल्याचे दिसून येते. अब्राहम काउली, बेकन, मेकॉले, कार्लईल, जी. के. चेस्टरटन, सॅम्युएल जॉन्सन, स्टील, ॲडिसन, चार्ल्स लँब, ए. जी. गार्डनर अशी इंग्रजी साहित्यातील निबंधकारांची परंपरा पाहिली, तरी तीत हे दोन्हीही प्रकार प्रभावी राहिल्याचे आणि पुष्कळदा एकमेकांत मिसळून गेल्याचे दिसून येते.

निबंध म्हणजे ‘तर्कशुद्ध रीतीने केलेली, बुद्धीला आवाहन करणारी, आपले सिद्धांत साधार सप्रमाण मांडणारी, इतिहास, अनुभव, अवलोकन यांच्या पायावर उभारलेली विचारप्रधान रचना’, अशी व्याख्या डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे यांनी आपल्या ‘निबंधरचना आणि राष्ट्ररचना’ या निबंधात (पराधीन सरस्वती, १९६२) केली आहे. तथापि, ही व्याख्या निबंध, प्रबंध, ग्रंथ या सर्वच प्रकारांचा अंतर्भाव करणारी आहे, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या मतानुसार वरील लक्षणांनी युक्त अशी २०/२५ पृष्ठांपर्यंतची रचना म्हणजे निबंध, त्याहून मोठी रचना (३००–४०० पृष्ठांपर्यंतची) म्हणजे ग्रंथ व या दोहोंच्या मध्ये बसणारा प्रकार म्हणजे प्रबंध होय.

वरील व्याख्येनुसार विचारप्रतिपादन किंवा विचारप्रर्वतन करणे हा निबंधलेखनाचा हेतू असतो, असे दिसेल. व्यापक अर्थाने या हेतूच्या पूर्ततेसाठी एखादा विषय घेऊन त्या विषयाची अंगोपांगे आणि अर्थपूर्णता विशद करण्याचा प्रयत्न निबंधकार करतो. निबंधाला अर्थातच अविषय असा कोणताच नाही. अगदी तात्कालिक किंवा प्रासंगिक महत्त्वाच्या प्रश्नांसंबंधी वृत्तपत्रातून येणारे संपादकीय लेख किंवा इतर लेख यांनाही निबंध म्हणता येतील. साहित्यसमीक्षात्मक लेखही निबंध म्हणता येतील. राजकीय, सामाजिक, धार्मिक, ऐतिहासिक, तात्विक, वैज्ञानिक विषयांवरील एका विशिष्ट मर्यादेत विवेचन करणारे लेखही निबंध म्हणता येतील. वैचारिक पातळीवर असा काही विषयांचा परामर्श घेतला जातो, त्याचप्रमाणे व्यक्तिविषयक शब्दचरित्रेही निबंध म्हणता येतील. विनोदी लेख हेही एका दृष्टीने विनोदी निबंधच ठरतात. तेव्हा निबंधप्रकारात विषयाला कसल्याच मर्यादा नसतात कोणत्याही विषयाची तर्कसंगत, सप्रमाण, वस्तुनिष्ठ अशी मध्यम स्वरूपात केलेली मांडणी निबंधात महत्त्वाची असते.

अशी मांडणी अनेक अंगांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरू शकते. उदा., निबंधाचा मथळा, त्याचा प्रारंभ, त्यातील मुद्दे, उदाहरणे वा दाखले, आलंकारिकता, खंडनमंडनाची वा युक्तिवादाची पद्धत, विनोदस्थळे इत्यादी. ‘दोन शब्दांत दोन संस्कृती’ (वि. दा. सावरकर), ‘गडकऱ्यांचा महान दोष व महान गुण’ (वा. ल. कुलकर्णी), ‘मुख्यार्थाची कैफियत’ (रा. श्री. जोग), ‘जातीच्या हरळीचे मूळ’ (श्री. म. माटे) यांसारखी निबंधशीर्षके आकर्षक व अर्थपूर्ण वाटतात.

उपोद्‌घात-उपसंहारवजा मजकुरांनी निबंधातील विवेचनाचा अनुक्रमे परिचय व सारांश देण्याचा प्रयत्नही काही निबंधात आढळतो. दीर्घ निबंधात उपसंहाराची वा सारांशनिवेदनाची जोड दिल्यास वाचकाच्या दृष्टीने ते उपयुक्त ठरते. निबंधाला खरा घाट त्यातील मुद्देसुद मांडणीमुळेच लाभतो. एखाद्या विषयाच्या अंगोपांगांची क्रमाक्रमाने उकल करीत जाणारा व लेखनाचे प्रतिपाद्य परिणामकारकपणे मनावर ठसविणारा निबंध स्वत:चा एक स्वयंभू घाट धारण करीत असतो. तथापि केवळ विषयाच्या अंगोपांगांची संयुक्तिक उकल करून हा घाट प्राप्त होईलच असे नाही तर त्याला ओघवते प्रतिपादन, त्यातील सुबोधता व सुस्पष्टता, मार्मिक दृष्टांतादी अलंकार, चपखल युक्तिवाद,नर्म विनोदस्थळे, वेधक भाषाशैली, विचारांचे नावीन्य व एकूण अभिव्यक्तीचे स्वारस्य इत्यादींनी डौल प्राप्त होतो. या सर्वांचा परिणाम म्हणून निबंधाला विचारसौंदर्याचा घाट प्राप्त होतो.


निबंधसाहित्यात निबंधकाराच्या व्यक्तिमत्त्वालाही अर्थातच महत्त्व असते. त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा त्याने निवडलेले विषय, त्यांची केलेली मांडणी आणि त्याची भाषाशैली यांवर उमटलेला असतो. याचा अर्थ निबंध हा प्रकृतीने वस्तुनिष्ठ लेखनप्रकार असला,तरी त्यात लेखकाच्या आत्मनिष्ठेचे दर्शन सूचकपणे घडतेच. शैलीसारख्या किंबहुना निबंधातून सूचित झालेल्या मतांसारख्या गोष्टींवरून हे दर्शन घडते. कोणतेही लेखन हे पूर्णपणे वस्तुनिष्ठ असणे अशक्य आहे. अगदी ऐतिहासिक वा वैज्ञानिक विषयांवरील लेखनही, अल्प प्रमाणात का होईना, लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाचे निदर्शक ठरते.

आधुनिक निबंधसाहित्य हे गद्यातच असते. तथापि गद्यसाहित्याचा उदय होण्यापूर्वी सगळेच लेखन पद्यातून होत असे. आपल्याकडे महाभारतातील राजधर्मासारखे (शांतिपर्व) प्रकरण हे पद्यातील निबंधसाहित्य म्हणता येईल. रामदासांनी लिहिलेली काही प्रकरणे – उदा., राजधर्म, सेवकधर्म – यांचे स्वरूप स्थूलमानाने निबंधवजाच म्हणता येईल. इंग्रजीत अठराव्या शतकात अलेक्झांडर पोप या कवीने ‘ॲन एसे ऑन क्रिटिसिझम’ व ‘ॲन एसे ऑन मॅन’ या नावांच्या कविताच लिहिलेल्या आहेत व त्यांत विचारप्रर्वतनालाच महत्त्व आहे. तेव्हा गद्य आणि पद्य ही माध्यमे निबंधाच्या हेतूशी संवादी असली, तरी प्रत्यक्षात मात्र निबंध साहित्यप्रकाराचा सोळाव्या शतकानंतरचा जो इतिहास आहे, तो गद्यातील निबंधासंबंधीचाच आहे.

निबंधसाहित्याचा उदय पश्चिमेकडे सोळाव्या शतकाच्या अखेरीस झाला. आधुनिक भारतीय भाषांत इंग्रजी भाषासाहित्याच्या परिचयाने एकोणिसाव्या शतकात हा प्रकार रुजला. ज्या परिस्थितीत निबंधप्रकार उदयास आला, तिचा विचार करून काही विचारवंतांनी निबंधसाहित्यामागील जीवनविषयक प्रवृत्ति-प्रेरणांचा दृष्टिकोन मांडण्याचा प्रयत्न केला आहे. धार्मिक श्रद्धेने किंवा अंधश्रद्धेने एखादा विषय प्रतिपादन करण्याऐवजी बुद्धीवादाने, तर्कशुद्ध रीतीने, शास्त्रीय पद्धतीने व लौकिक भूमिकेने त्या विषयाचा मागोवा घेणे ही आधुनिक दृष्टी निबंधसाहित्यामध्ये असते, असे म्हटले जाते. शब्दप्रामाण्याऐवजी बुद्धिप्रामाण्य, समाजाबरोबर व्यक्तीचे मूल्य पारमार्थिक निष्ठेऐवजी इहलोकनिष्ठा यांचा पुरस्कार करण्याची प्रवृत्ती निबंधसाहित्याच्या मुळाशी आहे, असे म्हटले जाते. याचे प्रत्यंतर आधुनिक भारतीय भाषांतील निबंधसाहित्यावरून येऊ शकते. प्रबोधनाचे सगळे प्रश्नोपप्रश्न भारतीय निबंधकारांनी आपल्या निबंधातून हाताळलेले आहेत. त्यामागे एक आधुनिक दृष्टीकोन आहे. मराठीतील लोकहितवादी, जोतिबा फुले, विष्णुशास्त्री चिपळूणकर, लो. टिळक, गो. ग. आगरकर, शि. म. परांजपे, वि. का. राजवाडे, न. चि. केळकर, वि. दा. सावरकर, शं. दा.जावडेकर, श्री. म. माटे, द. के. केळकर, पु. ग. सहस्रबुद्धे, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी इत्यादींचे निबंधसाहित्य पाहिले, की त्यामागील इहलोकनिष्ठा, बुद्धिप्रामाण्य, विज्ञाननिष्ठा, तार्किक सुसंगती, व्यक्तिवाद तसेच स्वातंत्र्य, समता, बंधुता यांसारखी आधुनिक जीवनमूल्ये यांचे अधिष्ठान लक्षात येते.

निबंधवाङ्‌मयाला उतरती कळा लागली आहे, असा एक आक्षेप घेतला जातो. निबंध याऐवजी लेख, निबंधसंग्रहाऐवजी लेखसंग्रह अशा संज्ञा रूढ होत चालल्या आहेत. स्वत:ला निबंधकार म्हणवून घेण्यापेक्षा, समीक्षक, विचारवंत किंवा विचारवंत लेखक म्हणवून घेणे अधिक पसंत करण्यात येत आहे. तथापि, संज्ञेचा आग्रह सोडला तर, निबंधाची जी बुद्धीवादी, सप्रमाण, तर्कसंगत विवेचन करण्याची प्रकृती आहे, ती लेख किंवा लेखसंग्रह यांत टिकून असल्याचे दिसून येईल. समाजाला वैचारिक पातळीवर नाना विषयांची सप्रमाण माहिती आणि दृष्टी पुरवणारा निबंध हा प्रकार म्हणूनच महत्त्वाचा ठरतो.

संदर्भ : 1. Heydrick, B. A. Types of the Essay, New York, 1921.

           2. Kazin, Alfred, Ed. The Open Form: Essay for our Time, New York, 1965.

           3. Leslie, Fiedler, Art of the Essay, New York, 1958.

           4. Russel, Ney, Modern Essays, New York, Chicago, 1963.

           5. Silberstein, Suzanne Seldi, Marian, Ed. Sense and Style: The Craft of the Essay, New York, 1962.

           6. Wann, Louis, Century Readings in the English Essay, New York, 1926.

           ७. अळतेकर, म. मा. मराठी निबंध, नागपूर, १९६३.

           ८. सहस्रबुद्धे, पु. ग. पराधीन सरस्वती, पुणे, १९६२.

जाधव, रा. ग.