निर्गुडी :(निगडी, निर्गुंडी हिं. संभालू गु. निगोड क. लक्की, नुक्की सं. निर्गुंडी, सिंधुवार इं. इंडियन प्रिव्हेट लॅ. व्हासटेक्स निगुंडो कुल-व्हर्बिनेसी). सु. ४·५–६ मी. उंचीचे हे लहान सदापर्णी क्षुप (झुडूप) सिंध, श्रीलंका, अफगाणिस्तान, फिलिपीन्स इ. प्रदेशांत व भारतात (महाराष्ट्र–दख्खन कोकण) पडीत जागी विशेषतः नद्या व ओढे यांच्या काठाने भरपूर आढळते. खोडाची साल पातळ व करडी कोवळे भाग लवदार व पांढरट पाने संमुख (समोरासमोर), संयुक्त, ३–५ दली असून दले २·५–४ सेंमी. लांब, भाल्यासारखी, फार क्वचित दातेरी, खालून पांढरट पण वरून गर्द हिरवी असतात. मुख्य देठ २·५ सेंमी. लांब असतो. फुलोरा अग्रस्थ, शाखायुक्त परिमंजरी [⟶ पुष्पबंध] असून त्यावर लहान, निळसर पांढरी फुले मार्च ते मे मध्ये येतात. त्यांची संरचना व इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ व्हर्बिनेसी कुलात (साग कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. अश्मगर्भी फळ (आठळी फळ) वाटाण्याएवढे व पिकल्यावर काळे असते. त्याखाली संवर्त सतत असतो [⟶ फूल].
या झाडांचा उपयोग बागेत शोभेकरिता व कुंपणाकरिता होतो. लाकूड कठीण असून जळणास वापरतात. फांद्यांचा उपयोग ताटी, कूड, टोपल्या इत्यादीकरिता करतात. मुळे कफोत्सारक (कफ काढून टाकणारी), ज्वरनाशक व पौष्टिक असतात. पाने कृमिनाशक, सुवासिक, पौष्टिक असून डोकेदुखीवर त्यांची पूड तपकिरीप्रमाणे ओढतात. संधिवातात सांध्यांच्या सुजेवर व प्रमेहामुळे होणाऱ्या वृषणाच्या (पुं-जनन ग्रंथीच्या) सुजेवर बांधण्यास व गळवे निचरण्यास पाने वापरतात. शुष्क फळे कृमिनाशक असून पानांचा रस व्रणशुद्धीवर गुणकारी असतो. अभिधानमंजरी व राजनिघंटू या संस्कृत ग्रंथांत या वनस्पतीच्या (सं. निर्गुंडी) गुणधर्मांविषयी उल्लेख आला आहे.
इंद्राणी, लिंगूर किंवा निर्गुंडी या नावांनी निर्गुंडीच्या वंशातील आणखी एक जाती (व्हायटेक्स ट्रायफोलिय) हिमालयाच्या पायथ्यापासून ते खाली दक्षिणेत भारतात सर्वत्र आढळते. तिला साधी किंवा संयुक्त पाने असून सर्व दले बिनदेठीची असतात. ही वनस्पतीही कुंपणाच्या कडेने लावतात. हिचे औषधी उपयोग वर वर्णन केल्याप्रमाणे आहेत.
चौगले, द. सी.
“