निरुक्त : वैदिक पदांच्या किंवा शब्दांच्या ⇨ निघंटु ह्या सर्वप्राचीन उपलब्ध शब्दकोशावर यास्काने लिहिलेले भाष्य. यास्काच्या काळाविषयी मतभेद आहेत. अनेक विद्वान त्याला पाणिनिपूर्वकालीन मानतात तथापि तो पाणिनीनंतर होऊन गेला असावा, असेही काहींचे मत आहे.
यास्काच्या निरुक्ताचे एकूण बारा अध्याय असून त्यांचे पूर्वषट्क आणि उत्तरषट्क असे दोन समभाग करण्यात आलेले आहेत. ह्यांखेरीज परिशिष्टरूप असे आणखी दोन अध्याय निरुक्ताच्या उपलब्ध हस्तलिखितात मिळतात. तथापि हे दोन अध्याय यास्काने रचिले नसावेत, असे सामान्यतः मानले जाते.
निरुक्ताच्या पहिल्या अध्यायात नाम, आख्यात, उपसर्ग आणि निपात ह्या चार पदप्रकारांची चर्चा आहे, तसेच ‘नामानि आख्यातजानि’ ह्या नैरुक्तांच्या प्रमुख सिद्धान्ताची व मंत्रांना अर्थ आहे किंवा नाही ह्याची यास्काने चर्चा केली आहे. दुसऱ्या अध्यायाच्या पहिल्या पादात निर्वचनसूत्रे आहेत. दुसऱ्या पादापासून तिसऱ्या अध्यायाच्या अखेरीपर्यंत निघंटूमधील ‘नैघंटुक कांडा’वर भाष्य आहे. हे भाष्य त्या कांडातील काही निवडक शब्दांवरच आहे. अध्याय चार ते सहांत निघंटूमधील ‘नैगम’ किंवा ‘ऐकपादिक’ कांडावर भाष्य आहे. ह्या कांडात ‘अनवगतसंस्कार’ किंवा व्याकरणदृष्ट्या अवघड असे शब्द असल्यामुळे त्यातील प्रत्येक शब्दाचे विवेचन यास्काने केले आहे.
सातव्या अध्यायापासून सुरू होणाऱ्या उत्तरषट्कात निघंटूतील ‘दैवतकांडा’वर भाष्य आहे. वेदांतील मंत्रांचे प्रकार, त्यांचे विषय आणि देवतांचे स्वरूप ह्यांची चर्चा सातव्या अध्यायाच्या आरंभी आहे. नंतर अग्नी, जातवेदस् इ. शब्दांचे विवेचन सुरू करून दैवतकांडातील शब्दांवरील भाष्य बाराव्या अध्यायाच्या अखेरीस संपविले आहे. दैवतकांडातील प्रत्येक पदाचे यास्काने विवेचन केले आहे.
यास्काची विवरणपद्धती अशी : प्रथम निघंटूतील शब्दाची व्युत्पत्ती घ्यावयाची शब्दाचा अर्थ स्पष्ट नसल्यास तो सांगावयाचा आणि तो शब्द ज्या ऋचेत आला असेल, ती उदाहरण म्हणून उद्धृत करावयाची. त्या ऋचेवर भाष्य करीत असताना निघंटूत नसलेल्या, परंतु त्या ऋचेत आलेल्या इतर शब्दांच्याही व्युत्पत्त्या यास्क देतो, इतकेच नव्हे, तर त्या शब्दांशी संबंधित असलेल्या इतर शब्दांच्या व्युत्पत्त्याही त्याने अनेकदा दिलेल्या आहेत. यास्ककाळी प्रचारात नसलेल्या वैदिक शब्दांची रूपे, भाष्य करीत असताना यास्क बदलतो त्यामुळे वैदिक ऋचांची भाषा आणि यास्ककालीन भाषा ह्यांतील फरक ध्यानात येतो.
व्युत्पत्ती देताना ज्या धातूंपासून नामे साधावयाची ते धातू यास्क वेगवेगळ्या प्रकारे सुचवितो. उदा., निघष्टव: निगमनात् (√गम्) १·१, वया: वेते: (√ वी) १·४, श्व: उपाशंसनीय: काल: (√ शंस्) १·६, गौ: दूरंगता भवति (√ गम्) इत्यादी. अशा प्रकारे धातूचा निर्देश केल्यावर त्या धातूनंतर येणारा प्रत्यय मात्र त्याने प्रत्येक ठिकाणी सांगितलेला नाही थोड्याच ठिकाणी सांगितला आहे. उदा., ओकारो नामकरण: (२·४) यु: उपबन्ध: (१·८).
औपमन्यव शाकपूणी, और्णवाभ ह्यांसारख्या अनेक पूर्वकालीन नैरुक्तांचा उल्लेख यास्काने केलेला आहे. तसेच वैदिक मंत्रांचा किंवा ऋचांचा अर्थ लावणाऱ्या ‘ऐतिहासिक’ (२·१६, १२·१, १०), ‘परिव्राजक’(२·८) अशा संप्रदायांचाही निर्देश त्याने केलेला आहे.
निरुक्तात यास्काने निर्वचनाची म्हणजेच व्युत्पत्तीची सूत्रे दिली असल्यामुळे आणि त्या सूत्रांनुसार अनेक शब्दांचा उलगडा करून दाखविला असल्यामुळे व्युत्पत्तिशास्त्राच्या इतिहासात निरुक्ताचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे.
निरुक्तावरील प्रसिद्ध टीका दुर्गाचार्यांची (पाचवे किंवा सहावे शतक) आहे. दुसरी टीका स्कंदमहेश्वरांची आहे. वै. का. राजवाडे ह्यांनी निरुक्ताचे मराठी भाषांतर टीपांसह केले आहे (इचलकरंजी ग्रंथमाला, ग्रंथांक ९, पुणे, १९३५).
संदर्भ : 1. Rajavade, V. K. Yaska′s Nirukta, Bhandarkar Oriental Research Institute, Poona, 1940.
2. Sarup, L. The Nighantu and the Nirukta, 4 Vols. Oxford, Lahore, 1920-29.
3. Skold, H. The Nirukta-Its Place in Old Indian Literature, Its Etymologies, Lund, 1926.
4. Varma, Siddheshwar, The Etymologies of Yaska, Hoshiarpur, 1953.
मेहेंदळे, म. अ.