निरेनबर्ग, मार्शल वॉरेन :(१० एप्रिल १९२७ –  ). अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ. ⇨ रॉबर्ट हॉली व ⇨ हरगोविंद खोराना यांच्या समवेत रेणवीय जीवविज्ञानातील संशोधनाबद्दल वैद्यक आणि शरीरक्रियाविज्ञान या विषयांतील १९६८ चे नोबेल पारितोषिक त्यांना विभागून मिळाले.

त्यांचा जन्म न्यूयॉर्क येथे झाला. फ्लॉरिडा विद्यापीठाच्या बी. एस्. (१९४८) व एम्. एस्. (१९५२) या पदव्या मिळविल्यानंतर त्यांनी मिशिगन विद्यापीठाची पीएच्. डी. (१९५७) पदवी संपादन केली. १९४५–१९५० या काळात ते फ्लॉरिडा विद्यापीठाच्या प्राणिविज्ञान विभागात साहाय्यक अध्यापक आणि १९५०–५२ मध्ये पोषण प्रयोगशाळेत साहाय्यक संशोधक होते. त्यानंतर १९५२–५७ पर्यंत मिशिगन विद्यापीठाच्या जीवविज्ञान  विभागातील जीवरसायनशास्त्र शाखेत अध्यापन व संशोधन केल्यावर त्यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ या संस्थेच्या संधिशोथ (सांध्यांची दाहयुक्त सूज) व चयापचयात्मक विकार (शरीरात सतत होणाऱ्या रासायनिक व भौतिकी घडामोडींतून उद्‌भवणारे विकार), चयापचयात्मक एंझाइमे (जीवरासायनिक विक्रिया घडवून आणणारे प्रथिनयुक्त पदार्थ), जीवरासायनिक आनुवंशिकी इ. विविध विषयांशी संबंधित असलेल्या विभागांत संशोधन केले (१९५७–६६). या संस्थेच्या नॅशनल हार्ट इन्स्टिट्यूटमधील जीवरासायनिक आनुवंशिकी प्रयोगशाळेचे प्रमुख म्हणून १९६२ मध्ये त्यांची नेमणूक झाली.

निरेनबर्ग व त्यांच्या सहकाऱ्यांनी जिवंत कोशिकांतील (पेशींतील) प्रथिन संश्लेषणावर (घटक मूलद्रव्यांच्या संयोगाने तयार होण्याच्या क्रियेवर) १९६० साली संशोधन करण्यास सुरुवात केली. तत्पूर्वी १९५३ मध्ये जे. डी. वॉटसन व एफ्.एच्. सी. क्रिक या शास्त्रज्ञांनी डीऑक्सिरिबोन्यूक्लिइक अम्लाच्या [डीएनए ⟶ न्यूक्लिइक अम्ले] रेणवीय रचनेविषयी काही सिद्धांत मांडले होते. या रचनेत आनुवंशिकीय संकेत गोविले असावेत, असे त्यांना वाटत होते.

निरेनबर्ग यांनी कोशिका आनुवंशिकीय संकेत आपल्या गुणसूत्रांतील (आनुवंशिक गुणधर्म एका पिढीतून पुढील पिढीत नेणाऱ्या सुतासारख्या सूक्ष्म घटकांतील) डीएनएमधून नेतात या पूर्वमान्य सिद्धांतापासून आपल्या संशोधनाला सुरुवात केली. प्रथम त्यांनी डीएनए हे कार्य प्रत्यक्ष करीत नसून मध्यस्थ म्हणून रिबोन्यूक्लिइक अम्लाचा (आरएनएचा) उपयोग केला जातो असे दाखविले. विशिष्ट संकेताद्वारे जिवंत कोशिका अंतर्गत प्रथिनांचे संश्लेषण करतात आणि या प्रथिनांमुळे कोशिकेची घडण व कार्य ठरते, असे निरेनबर्ग यांनी सिद्ध केले. निरोप्यासारखे काम करणाऱ्या आरएनएमध्ये फक्त चारच न्यूक्लिओटाइडे [ॲडिनिलिक अम्ल (A), यूरिडिलिक अम्ल (U), सायटिडिलिक अम्ल (C) व ग्वानिलिक अम्ल (G) ⟶ न्यूक्लिइक अम्ले] असल्यामुळे त्यांच्यापासून एकूण ४३ = ६४ त्रिकुटे (कोडॉन्स) बनू शकतात. यांपैकी ६१ त्रिकूटांपासून कोणते ना कोणते तरी ⇨ ॲमिनो अम्ल तयार करण्याचा संदेश कोशिकेप्रत पोहोचतो. एश्चेरिकिया कोलाय नावाच्या सूक्ष्मजंतूंचा आनुवंशिकीय संकेत उलगडण्याच्या दृष्टीने पूर्ण अभ्यास झालेला असून त्याच्या आरएनए मधील ६४ त्रिकूटांचे कार्य स्पष्ट समजले आहे. आज पृथ्वीवर जिवंत असलेल्या प्राण्यांमधील कार्य आनुवंशिकीय संकेतांद्वारे चालत असावे, हे सर्व मान्य झाले आहे.

निरेनबर्ग यांच्या शोधामुळे आनुवंशिकीय संकेतांचे वाचन शक्य झाले आहे. यामुळे एका जैवभाषेतील संकेताचे दुसऱ्या जैव भाषेतील संकेतात रूपांतर करणे सोपे झाले आहे. न्यूक्लिइक अम्लांची भाषा प्रथिनांच्या भाषेत रूपांतरित करता येऊ लागली आणि त्यावरून जीन (गुणसूत्रांमधील आनुवंशिक घटकांचे एकक) कोशिकेच्या कार्यावर नियंत्रण कसे ठेवतात हे समजले. या त्यांच्या कार्याबद्दलच त्यांना नोबेल पारितोषिकाचा बहुमान मिळाला. आनुवंशिक म्हणून गणले गेलेले रोग (उदा., रक्तस्त्रावी रोग) मानवात कसे उत्पन्न होतात, हे या शोधावरून कळू शकेल आणि कदाचित या रोगांना प्रतिबंधही करणे शक्य होईल.

नोबेल पारितोषिकाखेरीज त्यांना नॅशनल मेडल ऑफ सायन्स (१९६५), रिसर्च कॉर्पोरेशन पुरस्कार (१९६६) तसेच मिशिगन, येल, शिकागो व विंझर या विद्यापीठांच्या सन्माननीय पदव्या हे  बहुमान मिळाले आहेत. ते अमेरिकन ॲकॅडेमी ऑफ आर्ट्‌स अँड सायन्सेस (१९६५) व नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस (१९६७) या संस्थांचे सदस्य आहेत.

भालेराव, य. त्र्यं.